चालढकल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चालढकल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २८ जानेवारी, २०१८

जादूटोणाविरोधी कायद्याची धीमी वाटचाल




जादूटोणाविरोधी कायद्याची धीमी वाटचाल
दाभोलकर, कायदा, चालढकल, इच्छाशक्तीचा अभाव, कालहरणाची काळी पत्रिका, आरोप
जादूटोणाविरोधी कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांना दोन जुलैला पुणे येथे पत्रकारांनी छेडले. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘या पावसाळी अधिवेशनात कायदा मंजूर होईल. आतापर्यंत कायदा मांडू,’ असे म्हणणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच कायदा मंजूर करू, असे शब्द वापरत होते, हे सुद्धा आश्वासक होते. त्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले की, ‘हा कायदा फक्त अघोरी अंधश्रद्धांच्या विरोधात आहे; शिवाय वारकऱ्यांच्या सर्व सुधारणा मान्य करून वीस बदल कायद्यात केलेले आहेत. यामुळे कायदा करण्यात अडचण नाही. ८ जुलैला संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मला फोन करून भेटीला बोलाविले. त्या भेटीच्या वेळी योगायोगाने विधानसभेचे अध्यक्ष ना. दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण मला भेटले. त्या सर्वांचा सूर कायदा करण्याबाबत होकारार्थी होता. एकूण सर्व वातावरण कायदा होऊ शकेल, असे वाटणारे होते. ९ जुलैला मी, अविनाश पाटील व नंदकिशोर तळाशीलकर यांनी विधानपरिषदेचे भाजप नेते विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यांच्याशी कायद्याबाबत चर्चा केली. दुसऱ्या दिवशी टी.व्ही.९ चॅनेलवर कायद्याचे कट्टर विरोधक शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याशी चर्चा झाली. या दोघांनी जे आक्षेप घेतले, ते अर्थहीन होते. दुसरीकडे, १० तारखेला सकाळी आम्ही राज ठाकरे यांना भेटलो. त्यांनी कायद्याला पूर्ण पाठिंबा दिला. कायद्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत म्हणून चित्रपुस्तिका प्रकाशित करण्याची सूचना केली व स्वत: त्यासाठी सहकार्य देण्याचे कबूल केले. याबरोबरच झी.टी.व्ही. यांनी माझी कायद्याबाबत अर्धा तास मुलाखत दाखविली. ए.बी.पी. माझाने देखील एक विशेष कार्यक्रम सादर केला. हे सर्व वातावरण दिलासा देणारे होते.

दुसऱ्या बाजूला, १० जुलैपासून वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांनी, त्यांना न विचारता कायदा केल्यास वारी रोखण्याची भूमिका घेतली. त्याबाबत मुख्यमंत्री यांनी यू टर्न घेतला आणि त्यांनी जाहीर केले की, वारकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कायदा करणार नाही. आता वारकरी बांधवांशी तब्बल दोन वर्षे चर्चा केल्यानंतर व कायदा करणार, असे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनाकलनीयपणे पुन्हा चर्चा सुरू करणे, यामागचे कारण समजणे अवघड होते. मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक इच्छाशक्तीचा अभाव एवढेच त्याचे कारण असणार. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांना लिहिले की, बहुसंख्य वारकऱ्यांचा व त्यांच्या प्रतिनिधींचा कायद्याला पाठिंबा आहे. मात्र काही राजकीय हिंदुत्ववादी शक्ती वारकऱ्यांच्यात कार्यरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून कायदा याच अधिवेशनात करावा. कारण मुख्यमंत्र्यांना हे नक्की माहीत आहे की, कायद्यामध्ये धर्माची उपासना व आचरण यावर कसलेही बंधन नाही. सर्व वारकऱ्यांची १०० टक्के समज पटेपर्यंत कायदा थांबवल्यास तो कधीच होणार नाही. त्यामुळे आता खरा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक व राजकीय निर्धाराचा आहे. मात्र आजची परिस्थिती अशी आहे की, याबाबत मुख्यमंत्र्यांकडून फारशी आशा बाळगता येत नाही.

कायद्याच्या कालहरणाची काळी पत्रिका प्रकाशित करण्याच्या कार्यक्रमाला मराठीतील प्रिंट मीडियाने मोठीच मदत केली. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांत कायद्याच्या काळ्या पत्रिकेचे प्रकाशन काही ठिकाणी समाजसुधारकांच्या पुतळ्यासमोर झाले; तर बहुतेक ठिकाणी ते पत्रकार परिषदेत झाले. त्यांचे इतिवृत्तांत स्थानिक जिल्हा वृत्तपत्रांत; तसेच विभागीय वृत्तपत्रांतही चांगल्या प्रकारे आले आहेत. शासनाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ स्वत:च्या तोंडाला काळे फासण्याचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात व लातूर येथे उत्तम प्रकारे पार पडला. कदाचित हा महिना संपेपर्यंत आणखी काही ठिकाणी कार्यक्रम घडतील.

या सर्वांमध्ये, अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक संघटित शक्ती असून सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी सातत्याने गेली १८ वर्षे संघर्षशील आहे, हे वास्तव ठळकपणे लोकमानसासमोर आले. काळ्या पत्रिकेची कल्पना ही मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना आवडली. यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची आग्रही मागणी समितीने कायम ठेवली आहे. मात्र आता निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीवर आहे. २२ जुलैला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यानंतरच परिस्थितीचा अचूक अंदाज येऊ शकेल.

ताजा कलम
जादूटोणाविरोधी कायद्याबाबत मंगळवार, ता. २३ जुलै रोजी मी विधानभवनात थडकलो. कोणतीही वेळ न घेता थेट भेटीसाठी गेल्यावर काही वेळा प्रचंड गैरसोय होते आणि काही वेळा अनपेक्षित लाभ होतो. माझे तसेच झाले. जादूटोणाविरोधी कायदा ज्या संसदीय कामकाज मंत्री ना. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे, ते मला त्यांच्या कार्यालयात तुलनेने मोकळे भेटले. आतापर्यंत अनेकदा या कामासाठी मी त्यांना भेटलो आहे. ते उडवाउडवी करतात, असा माझा ग्रह अनुभवाने बनला होता. २३ जुलैला मात्र अनुभव वेगळा आला. त्यांनी माझे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र नीट वाचले. त्यावर खुणा केल्या. सचिवाला बोलावून असे सांगितले की, हे पत्र ताबडतोब सामाजिक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांच्याकडे द्या व वारकरी प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यासाठी वेळ मागण्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवावे, अशी विनंती करा. त्याबरोबर त्यांनी ११ जुलै रोजी वारकरी संपद्रायाच्या नेत्यासमवेत झालेली चर्चा सांगितली. ही चर्चा मी मुख्यमंत्र्यांच्या समवेत बोलूनच त्यांच्यावतीने केली आहे, हे सांगितले. त्याप्रमाणे ते म्हणाले की, वारकरी बांधवांना मी स्पष्ट कल्पना दिली आहे की, हा कायदा फक्त अघोरी बाबी, जादूटोणा, करणी याविरोधात आहे. अशा बाबींना संतांनीही नेहमीच विरोध केला आहे. हा कायदा मांडण्यापूर्वी तुम्हाला दाखवण्यात येईल आणि मुख्यमंत्री तुमची बैठकही घेतील. याप्रमाणे ही बैठक आपण लवकरात लवकर घेऊ या, असे त्यांचे होकारात्मक प्रतिपादन होते. त्यानंतर मी थेट ना. शिवाजीराव मोघे यांच्याकडे गेलो. तेही लगेच भेटले. पत्र लिहिण्यासाठी ते तयारच होते. त्यांचे सचिव श्री. नाईकडे यांनी पत्र तयार केले. तोपर्यंत ना. महोदय विधान परिषदेत कामकाजासाठी गेले होते; पण विधानपरिषदेत कर्मचारी पाठवून त्यांची सही ताबडतोब आणण्यात आली. त्यानंतर हे पत्र घेऊन मी या बाबीशी संबंधित मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना भेटलो. त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. मात्र नेहमीप्रमाणेच त्यांनी मला ताबडतोब वेळ दिला. मी त्यांना दोन्ही पत्रे दिली. एक ना. शिवाजीराव मोघे यांचे व दुसरे मुख्यमंत्र्यांची भेट मागणारे माझे पत्र. त्यांनी ताबडतोब भेटी ठरवण्याशी संबंधित मुख्यमंत्र्यांचे पी. एस. अभिजित घोरपडे यांच्याकडे माझे पत्र पाठवले. म्हणजे खरे तर मीच ते घेऊन गेलो. अधिवेशन चालू असताना पी. एस. अत्यंत व्यस्त असतात. मात्र ते त्यांच्या जागेवर होते. ते पूर्णत: महात्मा फुले यांच्या विचाराला मानणारे आहेत. त्यांनी सोमवार अथवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या सोयीनुसार वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींच्याबरोबर बैठक बोलावण्याचे मान्य केले. मी परतलो. सातारा गाठण्यास रात्री एक वाजला. २५ तारखेला सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याचा फोन आला. ताबडतोब गाडी घेऊन निघालो. पाऊस, खराब रस्ते यावर मात करत चार वाजता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोचलो. तिथे महाप्रचंड गर्दी होती. दालनात मराठवाड्याबरोबरच्या मोठ्या प्रतिनिधी मंडळाशी मुख्यमंत्री चर्चा करत होते. मुख्यमंत्र्यांच्या खोलीत दाटीवाटीने आमदार बसले होते वा उभे होते. त्याच्या आतल्या बाजूच्या मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्येही काही जण घुसले होते. माझ्या आधीची भेटीची वेळ दिलेले तीन आजी-माजी आमदार ताटकळत होते; शिवाय सहा वाजता मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट बैठक होती. अशा परिस्थितीत भेट मिळणे केवळ अशक्य दिसत होते. मराठवाडा प्रतिनिधींसमवेत बैठक संपवून मुख्यमंत्री त्यांच्या खोलीत आले. मुख्यमंत्री निधीला देणगी देणाऱ्या काहीजणांचे चेक हातात घेऊन त्यांनी फोटो दिले. ते घाईघाईने आतील चेंबरमध्ये गेले. तेथे काही महत्त्वाची चर्चा चालू असावी. मी आणि इतर अनेक इच्छुक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अस्वस्थपणे काय होणार, असा विचार करत बसलो होतो. तेवढ्यात आतून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह बाहेर आले. मी त्यांना मला चारची वेळ मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले. त्यांनी दारावरच्या शिपायास आतील लोक बाहेर आल्यावर मला सोडण्यास सांगितले. तोपर्यंत काटा सहावर सरकला होता. आतील लोक बाहेर येण्याच्या आतच घाईघाईने ना. हर्षवर्धन पाटील व ना. नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये घुसले. आता त्यांची चर्चा झाल्यावर मुख्यमंत्री थेट कॅबिनेटलाच जाणार, हे उघड होते. त्यामुळे मी क्षणभर विचार केला. संकेत बाजूला ठेवले आणि मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये घुसलो. दारावरच्या पहारेकऱ्याने किंवा आत असलेले पी. एस. यादव यांनी माझी ही घुसखोरी चालवून घेतली. मुख्यमंत्र्यांची संबंधित दोन मंत्र्यांच्या बरोबरची कामाची चर्चा संपली. ते कॅबिनेटला जाण्यासाठी वळले, तेवढ्यात मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. मी म्हणालो, ‘आपण वारकरी प्रतिनिधींशी कायद्याच्या मसुद्याबाबत चर्चा करणार आहात. विधानसभा चालू आहे. त्यामुळे हक्कभंग होणार नाही का?’ या मुद्द्याने मुख्यमंत्री व ना. हर्षवर्धन पाटील यांनी थोडी चर्चा केली. दोघांचेही मत असे पडले की, तसे होणार नाही. मग मी ही चर्चा आपण लवकरात लवकर करावी, विधिमंडळात कायदा मांडावा व मंजूर करावा, अशी मागणी केली. त्याला अर्थातच ठोसपणे होय, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. ना. हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘जर आम्हाला कायदा करावयाचाच नसता तर आम्ही आधीच्या या सर्व बाबी तरी कशाला केल्या असत्या?’ मी म्हणालो, ‘वारकऱ्यांमध्ये हिंदुत्ववादी राजकीय शक्ती कार्यरत आहेत. यामुळे सर्व वारकरी नेत्यांचे समाधान अशक्य आहे. याबाबत मुख्यमंत्री स्पष्टपणे असे म्हणाले की, ‘आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे व त्याबाबत आम्ही योग्य ती दक्षता घेऊ चर्चा संपली. मात्र वारकरी प्रतिनिधींच्या समवेत बैठक घेणे, कायदा विधानसभेत मांडणे व तो मंजूर करून घेणे याबाबत ठोस वेळापत्रक ठरले नाही. कायदा करण्याची शासनाची तयारी आहे; मात्र त्याबाबत प्राधान्य दाखवण्यासाठी सामाजिक इच्छाशक्ती कमी पडत आहे, असे माझे मत बनले. मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्याच्या काळात आमदार भाई जगताप व डॉ. सुधीर तांबे (काँग्रेस), आमदार विद्याताई चव्हाण यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. यासाठी वातावरणनिर्मिती करावयास राज्यव्यापी मोहीम काढावी, अशी सूचना त्यांच्यामार्फत पुढे आली.

या अधिवेशनात कायदा दोन्ही सभागृहात मंजूर होणे. मला शक्य दिसत नाही. परंतु वातावरण कायद्याच्या दिशेने हळूहळू, पण निश्चितपणे अनुकूल बनत आहे. याच दिवशी सनातन संस्थेचे धरणे आझाद मैदानावर होते आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटावयास त्यांचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी आता कायदा संपूर्ण रद्दच करण्याची मागणी केली आहे. वारकरी संप्रदायातील मोठा गट कायद्यास पाठिंबा देण्याची शक्यता त्यांना दिसत असल्याने त्यांनी आता कायदा सुधारणा याऐवजी कायदाच नको, अशी टोकाची भूमिका घेतलेली दिसते, जी एका अर्थाने समितीची मागणी मान्य होण्याच्या वाटेवर आहे, या मानसिकतेचे लक्षण आहे, असे मला वाटते. याचाच एक भाग म्हणजे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी समितीवर व माझ्यावर आरोप केले. परदेशातून पैसे घेऊन समिती लोकांची दिशाभूल करते आहे, या स्वरुपाचे हे आरोप होते. त्यांना तिथल्या तिथेच विधान परिषदेत आमदार विद्याताई चव्हाण यांनी विरोध केला. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाईम्सने याबाबत माझे म्हणणे मागवून घेऊन छापले होते, हे विद्याताईंनी वाचले होते आणि मी आता विधान परिषदेत हे वाचून दाखवीन, असे त्या मला म्हणाल्या. अनेक कार्यकर्त्यांनीही ते वाचून फोन केले. एकूण आपण हळूहळू ध्येय साध्य करण्याच्या दिशेने चाललो आहोत, अशी माझी भावना आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी आणखी एक जोरदार धक्का द्यावा लागेल, तो आपण देऊच.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०१३)




शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अनावृत पत्र

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अनावृत पत्र
दाभोलकर, कायदा, चालढकल
मा. ना. पृथ्वीराज चव्हाण,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
सादर नमस्कार,

अनेक दडपणांना न जुमानता आपल्या शासनाने जादूटोणाविरोधी कायदा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पटलावर ठेवला, याबद्दल आपले आणि मंत्रिमंडळाचे मन:पूर्वक अभिनंदन! आपण व अजितदादा; तसेच ना. मोघे यांच्या संवादी भूमिकेमुळे वारकरी समुदायाची बहुतांशी नेतेमंडळी कायद्याबाबत अनुकूल झाली ही मोठीच उपलब्धी आहे. संतांचा परखड वारसा जपणाऱ्या वारकरी बांधवांचा तर याला कधीच विरोध नव्हता. यामुळे या अधिवेशनात हा कायदा होणारच, अशी आम्हाला खात्री होती. अधिवेशनाच्या प्रारंभीच्या पूर्वसंध्येला तसा आत्मविश्वास आपण व अजितदादा यांच्या बोलण्यातून माध्यमांसमोर स्पष्टपणे प्रकट झाला होता. या परिस्थितीत विधेयक फक्त दाखल होणे एवढे एकच पाऊल पुढे पडले, याची वेदना आणि त्यासोबतचे मत कळवण्यासाठी आपणास हे खुले पत्र लिहीत आहे.

माननीय मुख्यमंत्री महोदय, पवनेचे पाणी पेटल्याने शेवटच्या चार दिवसांत विधिमंडळ कामकाज पत्रिकेचे प्राधान्यक्रमच बदलले; अन्यथा विधेयक संमतही झाले असते असे कोणी म्हणेल, त्यात मर्यादितच तथ्य आहे, असे मला नम्रपणे वाटते. या कायद्याची अनेक वर्षे आश्वासने मिळूनही अडखळतच चाललेली वाटचाल आपण लक्षात घ्यावी. म्हणजे माझी भीती आपण समजू शकाल. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बिल न मांडता येण्याची नामुष्की या बिलाबाबत १३ एप्रिल २००५ ला विधिमंडळाने अनुभवली आहे. सर्व सहमतीसाठी हा कायदा पुढे सौम्य करण्यात आला. १६ डिसेंबर २००५ ला तो विधानसभेत मंजूर झाला. पुढे तब्बल चार वर्षे विधान परिषदेत तो मंजूर करण्याबाबत टोलवाटोलवी झाली. त्यावेळचे सामाजिक न्यायमंत्री खाजगीत असे सांगत की, सत्तारूढ पक्षाच्या आमदारांचाच मला भरवसा नाही. त्यात काही तथ्य असावे. कारण विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचे नाही, असा आधीचा स्वत:चाच आग्रह शासनाने सोडला आणि २००७ साली कायद्याचे प्रारूप संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले. अशी समिती ही प्रश्न रेंगाळत ठेवण्याचेच हत्यार ठरते, ही भीती खरी ठरली. सामाजिक न्यायमंत्री आणि त्यावेळचे मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही २००९ सालच्या निवडणुकांपर्यंत समितीचे कामकाज पूर्ण झाले नाही आणि त्या विधानसभेबरोबर विधेयकही बरखास्त झाले. मला माफ करा, परंतु ही वाटचाल या विधेयकाबाबतची त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांची द्विधा मन:स्थिती दाखवते, असे मला वाटते. कायदा करण्याचा लेखी शब्द तर दिला आहे; पण हे पुरोगामी पाऊल निवडणुकीच्या राजकारणात महाग पडेल का, या संभ्रमातून हा विलंब घडला. निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या ना. अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट बहुमत असूनही एक वर्ष काहीच केले नाही, हा त्याचाच परिणाम. मा. पृथ्वीराजजी आपण, अजितदादा, ना. शिवाजीराव मोघे यांनी निर्धारपूर्वक ही परिस्थिती बदलली. त्यासाठी आपण निश्चितच धन्यवादास पात्र आहात. यामुळेच असे वाटत होते की, या अधिवेशनात हा कायदा होणारच. ता. १९ जुलैला ना. अजितदादा पवार यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्याला ना. आर. आर. पाटील, ना. ढोबळे, गृह, कायदा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, वारकरी संघटनांचे सर्व प्रमुख नेते व प्रा. एन. डी. पाटील व मी उपस्थित होतो. कायद्याचा संपूर्ण मसुदा मराठी व इंग्लिशमध्ये वाचला गेला. त्याबाबत आक्षेपाच्या फैरी झडल्या. त्याचे परिणामकारकणे व पूर्णपणे शंका-समाधान मंत्रिमहोदय आणि सनदी अधिकारी यांनी केले. बैठकीला उपस्थित बहुतेकांनी त्याबाबत सहमती दर्शवली. बहुचर्चित तेरावे कलम हे चुकूनही अन्याय होऊ नये, यासाठीचे संरक्षण कवच आहे, ही भूमिकाही मान्य झाली. तरीही अजितदादांनी परत-परत सांगितले की, कायदा करणारे आमचे शासन लोकांच्या धार्मिक भावनांचा पूर्ण आदर करते. हा कायदा फक्त शोषण करणाऱ्या अघोरी अंधश्रद्धांच्या विरोधी आहे. चुकूनही त्यामुळे काही अडचण निर्माण झाली तर तत्क्षणी संबंधित बदल करण्याचा मी शब्द देतो. अजून तीन वर्षे आम्हीच सत्तेत आहोत. पूर्ण बहुमतात आहोत. त्यामुळे कोणतीही शंका कृपया बाळगू नका. कायद्याबाबत जी भूमिका आजपर्यंत समिती मांडत होती, ती शासनाने ठामपणे आणि प्रकटपणे घेतली, ही बाब निश्चितच उमेद वाढवणारी होती.

मा. पृथ्वीराजजी, यानंतर असे काय झाले की, कायद्याचे विधेयक जेमतेम फक्त मांडले गेले. एक कारण मला स्पष्ट दिसते ते म्हणजे या कायद्याला विरोध करणारा एक कडवा हिंदुत्ववादी गट महाराष्ट्रात प्रथमपासून आहे, त्याने शक्य तेवढ्या पातळीवर खोटा विषारी प्रचार केला. काही माध्यमांनी त्याला साथ दिली. संपूर्ण कायद्यात श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म हे शब्द देखील नसताना आणि कायद्याचे नाव नरबळी, अघोरी प्रथा, जादूटोणा यांच्या प्रतिबंधाशी स्पष्टपणे संबंधित असताना मराठीतील एका प्रमुख साप्ताहिकाने अंधश्रद्धेचा अंधा कानून असे नाव देऊन कायद्याचा संपूर्ण विपर्यास्त अर्थ मांडणारी मुखपृष्ठ कथा छापली. ती वाचल्यावर मला तर मंत्रालयातील बैठकीचीच आठवण झाली. तेथील फसवे प्रतिपादन, चुकीचा युक्तिवाद, आक्रस्ताळेपणा जसाच्या तसा त्या लेखात उतरला आहे. कायद्यातील अतिशय स्पष्ट तरतुदींचा ठरवून विपरीत अर्थ काढला आहे. त्याचे प्रतिबिंब काही वृत्तपत्रांतून उमटले. विधान परिषदेतील विरोधी पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने तावातावाने अशी मुलाखत दिली की, हा कायदा मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यासाठी येणार आहे का? आता त्यांना ते नक्कीच माहीत असणार की, या कायद्यात विशिष्ट स्वरुपाचे वर्तन हे गुन्हा समजण्यात आलेले आहे आणि ते वर्तन कोणत्या धर्मातील व्यक्ती करते, त्याच्याशी काहीही संबंध नाही, हे गेल्या दशकभराच्या कायद्याच्या वाटचालीत परत-परत स्पष्ट झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाऊन पाऊस पडू दे, अशी पूजा केली तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी या नेत्यांची विधाने वाचल्यावर तर हसावे की रडावे, हेच कळत नाही.

मा. नामदार मुख्यमंत्री महोदय, या अपप्रचाराचा परिणाम झाला असावा, अशी मला शंका आहे. तेरावे कलम वगळून म्हणजेच पुन्हा कायदा बदलून मगच कायदा मांडला जाणार आहे, अशी हूलही उठवण्यात आली. आपले शासन त्याला पुरून उरले आणि कायदा मांडण्यात आला, ही निश्चितच दिलासा देणारी बाब आहे. ज्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आपल्या शासनाने केली आहे, त्या संघटनेच्या प्रचार यंत्रणेने त्यानंतर अशी गरळ ओकली की, महाराष्ट्रातील हिंदूद्रोही राज्यकर्त्यांनी अंधश्रद्धाविरोधी विधेयक हिंदुत्ववादी आणि वारकरी यांचा विश्वासघात करून मांडले आहे. त्याला विरोध करण्यासाठी आपापल्या मतदार संघातील आमदारावर लोकांनी दबाव आणावा. धर्माच्या आधारे लोकांच्यात विद्वेष निर्माण करणाऱ्या या संघटना आणि धर्माच्या आधारे राजकारण करणारे पक्ष यांची ही अभद्र यूती आहे, हे आपण जाणताच. आमची विनंती अशी आहे की, राजकीय आणि सामाजिक निर्धाराने यांना तडाखेबंद उत्तर दिले जावे.

माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाणसाहेब, खरे तर हा कायदा भारतात सर्वात प्रथम करण्याचे श्रेय आपल्या नेतृत्वाला लाभणार आहे, हे महाराष्ट्राला भूषणावह आहे. अधिक महत्त्वाचे म्हणजे त्याचा आशय हा अनेक आयामी आहे आणि त्या प्रत्येक पैलूला महत्त्व आहे. सामान्य जणांच्या जीविताचे, वित्ताचे रक्षण करणे, त्यांची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा देणे, ज्या रूढी, प्रघात लोकांच्या व समाजाच्या आरोग्याला घातक आहेत त्यांना अटकाव करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. ते या कायद्यामुळे साध्य होईल. दुसरे असे की, श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती, याची चर्चा काही बाबतीत तरी निकालात निघेल. कायद्यात दखलपात्र गुन्हे असलेल्या बाबी या श्रद्धा समजण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. याबरोबर तिसरी महत्त्वाची बाब घडेल. इंदिराजींनी घटनेत नागरिकांच्या कर्तव्याचा समावेश केला. त्यातील महत्त्वाचे कर्तव्य आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन व सुधारणावाद जोपासून मानवतेचे रक्षण करण्याचे. या कर्तव्याला या कायद्याने थेट हातभार लागणार आहे. त्याबरोबरच विधायक धर्मचिकित्सेमुळे लोकमानसातील धर्मनिरपेक्षता बळकट होण्यासाठी मदत होणार आहे. देशाची वाटचाल या दिशेने झाल्याने ज्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येते. तीच मंडळी स्वत:च्या संकुचित स्वार्थासाठी कायद्याच्या निमित्ताने साप, साप ओरडत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत प्रत्यक्षात भुई धोपटत आहेत.

सदसद्विवेक बुद्धीला स्मरून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले माननीय पृथ्वीराजजी, मी आपणास हे सर्व यासाठी सांगत नाही की, ते आपणास ज्ञात नाही. मी आपणास यासाठी लिहिले आहे की, नागपूरच्या अधिवेशनापर्यंत आता महाराष्ट्रात कायद्याबाबत दिशाभूल मोहीम चालेल. अफवा पसरवण्यात येतील. सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना भेटून त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होईल. जिल्हा परिषदेची निवडणूक होईपर्यंत कायदा करू नये, असा पर्याय मांडला जाईल. हे घडणार नाही, घडू नयेच, अशीच माझी मनोमनी इच्छा आहे. आपण आणि अजितदादा यांच्या नेतृत्वात तो कणखरपणा आहेच. तरीही प्रदीर्घ विपरीत पूर्वानुभवाने मनात शंकेची पाल चुकचुकते म्हणून हे लिहिले आहे. विनंती अशी आहे की, आपले सरकार समाजसुधारकांचा वारसा सांगणारे एक ठोस पाऊल कृतिशील टाकत आहे. आमदारांनी अभिमानाने लोकांना हे सांगावे, अशी ही बाब आहे. रिडालोस’च्या जाहीरनाम्यात या कायद्याचे आश्वासन होते. त्यामुळे त्यांचे आमदार; तसेच महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरवादी अनेक संघटना याबाबत आपली साथ निश्चितपणे देतील. येत्या हिवाळी अधिवेशनात प्रतीक्षा थांबेल, जादूटोणाविरोधी कायदा स्वाभिमानपूर्वक संमत होईल आणि पुरोगामी महाराष्ट्राचे एक दमदार पाऊल आपण व अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली पुढे पडेल, अशी आशा बाळगतो. सदिच्छांसह.

आपला नम्र,
नरेंद्र दाभोलकर
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २०११)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...