पशुहत्याविरोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पशुहत्याविरोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

वाचन मनन, चिंतन



वाचन मनन, चिंतन     
दाभोलकर, सत्याग्रह, पशुहत्याविरोध, वाचन
१७ फेब्रुवारीला बार्शीला पोचलो. १८ तारखेला चाळीसजणांसह निपाणीकरांच्या नेतृत्वाखाली चिवरीच्या यात्रेत सत्याग्रहासाठी दाखल झालो. मागच्या वर्षीच्या आठवणी मनात जाग्या होत्या. निवडणुकीच्या प्रचारासारखी रणधुमाळी मागील वर्षी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात उठवली होती. शासनाची साथ होतीच. देवीसमोरच्या जागेवरचे बळी थांबले हे खरे; पण बाजूबाजूला हजार-बाराशे पशुहत्या झालीच. शिवाय दुसऱ्या दिवशी भुताच्या यात्रेच्या वेळी प्रबोधन करणाऱ्या सत्याग्रहींना मार खावा लागला. या वर्षी काय होणार याचे प्रश्नचिन्ह मागील वर्षीपेक्षा मोठे होते. मागील वर्षीची स्थिती यावर्षीही कायम राहावी, असा आपला आग्रह होता. यंदा पशुहत्या करावयाचीच, असा शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना अट्टाहास होता. शासन सांगत होते की, प्रबोधन मोहीम चालवू नका, सत्याग्रह करू नका, आम्ही सारे बघून घेतो. अशा तणावाच्या वातावरणात लाख-दीड लाखाच्या यात्रेत काय होणार, याचा दबाव आणि चिंता सर्वांनाच होती. १८ तारखेला सकाळी यात्रास्थळावर गाडी पोचली आणि लक्षात आले प्रश्न खरा सोडवलाय भाविकांनीच, यात्रेकरूंनीच. म्हणजे असे की, ते यात्रेला फिरकलेच नाहीत. लाखाची यात्रा मांडली जाणाऱ्या त्या विस्तीर्ण माळरानावर जेमतेम पाच-दहा हजार यात्रेकरूच आले होते. अनेक गावांत तर आठवडा बाजाराला यापेक्षा जास्त गर्दी असते; शिवाय येताना त्यांनी रेडे, बकरी, कोंबड्या काहीच आणले नव्हते. त्यामुळे हत्या होण्याची शक्यता मुळातच निकालात निघाली होती. तापलेल्या वातावरणाचा हा सारा अप्रत्यक्ष परिणाम होता.

मला आणि सोबतच्या अनेकांना प्रश्न पडला. यात्रा जवळपास मोडलीच. हे चांगले घडले की वाईट? योग्य की अयोग्य? यात्रेतील पशुहत्या थांबायला हवीच, अंगात येऊन बेभान घुमणे बंद व्हायला हवेच, याबद्दल शंकाच नाही. पण यापलिकडे जाऊन यात्रा भरण्यालाच आपला विरोध आहे का? यात्रा म्हणजे त्याला येणाऱ्यांच्या दृष्टीने जणू स्नेहसंमेलनच. हजारोंच्या संख्येने जथ्थ्या-जथ्थ्याने येऊन लहानमोठे, पुरुष-बाया, अडाणी, ग्रामीण समाजाला सामुदायिक आनंद लुटण्याचे ठिकाण म्हणजे त्यांच्या यात्रा. त्यामध्ये पशुहत्या होऊ नये हे बरोबर; पण पूर्ण यात्राच बंद पडणे किती श्रेयस्कर? आपला विरोध नेमका कशाला? उत्तर वाटते तितके सोपे नाही; पण टाळता येणारेही नाही. आपण साऱ्यांनीच स्वत:च्या विचाराला यासाठी ताण द्यावयास हवा. तो तुम्ही द्यावा, मनमोकळेपणाने यावर बोलावे, लिहावे असे मला आग्रहाने सुचवावेसे वाटते.
मुंबईला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. जहागीरदार यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. ते अलिकडेच निवृत्त झाले. विवेकनिष्ठ, वैज्ञानिक विचारसरणीचे न्या. जहागीरदार हे कृतिशील उपासक. खंदे पुरस्कर्ते. निवृत्तीनंतर न्यायमूर्तींना या ना त्या स्वरुपात सन्मानित कामे व पदे सहज मिळतात; पण जहागीरदार यांनी निर्णय घेतला की, वेळ फक्त वाचन-मननात घालवायचा आणि एवढेच नाही, तर आपल्याला कोणीही कार्यक्रमाला बोलवले तर आपल्या खर्चाने सामाजिक भावनेने जायचे. त्यांना वाटते, निवृत्ती आधीच घेतली असती तर बरे झाले असते. कारण वाचायला महासागर पडलाय आणि वेळ तर इतका अपुरा. मी त्यांना विनंती केली, दर महिन्यातून एखादा दिवस मुंबईतील आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही तुमच्या या वाचनातले काही कण देत चला. त्यांनी ती आनंदाने मान्य केली.

मला वाटतं, आपला प्रश्न दुहेरी आहे. महाराष्ट्रात फिरताना मला सतत जाणवतं की, कार्यकर्त्यांचे नवे मराठी वाचनही थांबले आहे. मग त्यांचे मनन, चिंतन आणि स्वत:च्या मांडणीत त्याचा समावेश तर दूरच राहिला. हा विचारांचा शिळेपणा घालवायला निर्धारपूर्वक कंबर कसायला हवी. चळवळ पुढे जाते आहे आणि कार्यकर्ता विचारात मागे रेंगाळतो आहे, हे चित्र बदलावयास हवे. पण समजा अगदी नाहीच झाला वेळ तर निदान आपापल्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील अशा कार्यकर्त्यांना, मित्रांना आणि सहानुभूतीदारांना एकत्र घेऊन महिन्यातून किमान एकदा तरी एक बैठक घ्यावी आणि आपल्याकडे असलेल्या चळवळीवरील एखाद्या पुस्तकाचे सामुदायिक वाचन करायला हरकत नाही. सुरुवातीला एखादा विषय घ्यायचा, त्यावर वाचन करायचे, चर्चा करायची, असा प्रयत्न केला तरी विचारांची देवाणघेवाण होईल. पुढच्या बैठकीकरिता प्रत्येकाने काहीतरी वाचन करून यायचे आणि मग त्यावर चर्चा करायची. या चर्चेच्या अनुरोधाने आपल्या समोरील प्रश्नांकडे पाहण्याची एक वैचारिक पातळी निर्माण होण्यास मदत होईल. 
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९२)

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

विचार तर कराल?



विचार तर कराल?
दाभोलकर, चळवळ, अनुभव, पशुहत्याविरोध
गेली दोन महिने दैनिक पुढारी या वर्तमानपत्रातून मी सदर चालवतो. कोल्हापूर, सांगली, बेळगाव या भागात चांगला खप असलेला हा विभागीय पेपर. प्रत्येक रविवारच्या पुरवणीत विचार कर कराल? या नावाने हे सदर चालते. संपादकांचे म्हणणे असे की, सदराला वाचकांचा उदंड प्रतिसाद आहे. खरे तर मी नवीन वा वेगळे असे काय लिहितो? चळवळीचे अनुभव, त्या अनुषंगाने येणारे विचार, हेच जे आपण सतत बोलतो, सांगतो. परंतु दिसते असे की, लोकांना ते हवे आहे. मला वाटते, या प्रातिनिधिक अनुभवावरून आपल्यापैकी ज्यांना-ज्यांना लिहिता येते (आणि थोडेबहुत लिखाण प्रत्येकाला जमतेच) त्यांनी लेखाच्या रूपाने, चर्चेच्या रूपाने, सदर चालवण्यासाठी आपापल्या भागातील दैनिकात, शक्य नसेल तर साप्ताहिकात लिखाण करावयास हवे. आपली चळवळ ही एकता, प्रबोधनाची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत भिडण्यासाठी आपला प्रयत्न हवा. वृत्तपत्राएवढे हुकमी साधन त्यासाठी दुसरे कोणते असणार? आपापल्या पातळीवर जमेल तेवढा त्याचा वापर करावयास हवा.
     
चिवरीच्या यात्रेत पशुहत्येविरुद्ध मोठा सत्याग्रह झाला. त्यासाठी आधी बरीच तयारी करावी लागली. निपाणीकर महिनाभर त्यातच बुडालेले होते. बार्शीच्या प्रा. जाधव सरांच्यावर तर चाकूहल्ला होता होता वाचला. सोलापूरचे केंद्र यशवंत फडतरेच्या नेतृत्वाखाली प्रचाराला बाहेर पडले ते दहा दिवस घरी गेलेच नाही. गावोगाव, वस्ती-वस्तीवर ते गेले. मिळेल ते खाल्ले, जमेल तिथे झोपले. सगळा बाडबिस्तरा बरोबरच घेतला होता. एका गावात मार खावा लागला, तरीही मंडळी हटली नाहीत की डगमगली नाहीत. मला वाटते, आपली चळवळ आता या टप्प्यावर उभी आहे, त्या टप्प्यावर या स्वरुपाच्या समर्पित आणि झुंजार कार्यकर्त्यांची आपल्याला फार गरज आहे. आपल्या केंद्राचा नंबर अशा बाबतीत पहिला लागावा म्हणून आपल्याला काय-काय करावे लागेल, याचा प्रत्येक केंद्राने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.
     
कराडला युवा एल्गार मेळाव्याला बाबा आढाव व त्यांच्या सोबत पी. डी. पाटील होते. कराडसारख्या राजकीय शहरात सतत चोवीस वर्षे नगराध्यक्षपद भूषविणारी; त्याबरोबरच सह्याद्री साखर कारखान्याची अनेक वर्षे चेअरमन असलेली ही व्यक्ती. मेळाव्यात माझे व बाबांचे भाषण झाले. नंतर पी. डी. पाटील बोलले. राजकारण, सरकार या धकाधकीत मूल्य आणि विचार जागवण्याचा वारसा आम्ही विसरून गेलो, याची प्रखर जाणीव आधीची दोन्ही भाषणे ऐकताना झाल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. चळवळीसाठी नि:संकोचपणे मदत मागावी, असे सुचविले. दोन प्रकारे हे घडू शकते, असे स्वत:च सांगितले. एकतर कारखान्यामार्फत आजूबाजूच्या शंभर गावांत वाचनालयाची पुस्तके जातात, त्या सर्व ठिकाणी आपल्या विचारांची पुस्तके घेणे आणि दुसरे म्हणजे समितीच्या पुस्तिका प्रकाशनांना जाहिरात रूपाने मदत करणे, हा अनुभव मला सर्वत्र येतो. तुम्हालाही येतो का? छोटी-मोठी मदत करायला अनेक जण उत्सुक असतात, प्रश्न असतो, त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोचण्याचा आणि त्यांच्याकडून मिळणारी मदत वापरण्याची चोख यंत्रणा उभी करण्याचा. मला वाटते, आपण यात अपुरे पडत आहोत.

याचाच जणू एक भाग म्हणजे महाराष्ट्रातून मला येणाऱ्या पत्रांचे प्रमाण वाढले आहे. ही पत्रे चळवळीसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या विविध ठिकाणी विखुरलेल्या माणसांची आहेत, ती आपल्या मनाची आहेत. पण संकोचाने, भीतीने आतापर्यंत ती त्यांची मते मांडावयाला घाबरत. आपल्या चळवळीने त्यांना बळ लाभल्यासारखे वाटते. चळवळ जाणून घेण्याबद्दल त्यांना उत्सुकता असते. चळवळीला जोडून घेण्याची त्यांची इच्छा असते. परंतु ही माणसे असतात आपापल्या ठिकाणी, सुटी-सुटी. समितीची शाखा सुरू करून चालवावी, हे त्यांना शक्य नसते. पण स्वत:च्या पातळीवर काम करायला तर हवे असते. सहयोगी म्हणून ही माणसे चळवळीला नीटपणे जोडता आली तर मला वाटते, एक यंत्रणा उभी राहू शकते. पूरक, समविचारी व उपयोगी. पण हे घडावे कसे? तुम्हाला काही सुचते? जरूर कळवा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९१)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...