विचार
तर कराल?
दाभोलकर, चळवळ, अनुभव, पशुहत्याविरोध
गेली दोन महिने दैनिक ‘पुढारी’ या वर्तमानपत्रातून मी सदर चालवतो. कोल्हापूर, सांगली, बेळगाव या भागात चांगला खप असलेला हा विभागीय
पेपर. प्रत्येक रविवारच्या पुरवणीत ‘विचार कर कराल?’ या नावाने हे सदर चालते. संपादकांचे म्हणणे असे की, सदराला वाचकांचा उदंड प्रतिसाद आहे. खरे तर मी नवीन वा वेगळे
असे काय लिहितो? चळवळीचे अनुभव, त्या अनुषंगाने येणारे विचार, हेच जे आपण सतत बोलतो, सांगतो. परंतु दिसते असे की, लोकांना ते हवे आहे. मला वाटते, या प्रातिनिधिक अनुभवावरून आपल्यापैकी ज्यांना-ज्यांना
लिहिता येते (आणि थोडेबहुत लिखाण प्रत्येकाला जमतेच) त्यांनी लेखाच्या रूपाने, चर्चेच्या रूपाने, सदर चालवण्यासाठी आपापल्या भागातील दैनिकात, शक्य नसेल तर साप्ताहिकात लिखाण करावयास
हवे. आपली चळवळ ही एकता, प्रबोधनाची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत भिडण्यासाठी
आपला प्रयत्न हवा. वृत्तपत्राएवढे हुकमी साधन त्यासाठी दुसरे कोणते असणार? आपापल्या पातळीवर जमेल तेवढा त्याचा वापर करावयास हवा.
चिवरीच्या यात्रेत पशुहत्येविरुद्ध मोठा सत्याग्रह झाला. त्यासाठी
आधी बरीच तयारी करावी लागली. निपाणीकर महिनाभर त्यातच बुडालेले होते. बार्शीच्या प्रा.
जाधव सरांच्यावर तर चाकूहल्ला होता होता वाचला. सोलापूरचे केंद्र यशवंत फडतरेच्या नेतृत्वाखाली
प्रचाराला बाहेर पडले ते दहा दिवस घरी गेलेच नाही. गावोगाव, वस्ती-वस्तीवर ते गेले. मिळेल ते खाल्ले, जमेल तिथे झोपले. सगळा बाडबिस्तरा बरोबरच घेतला होता. एका गावात
मार खावा लागला, तरीही मंडळी हटली नाहीत की डगमगली नाहीत.
मला वाटते, आपली चळवळ आता या टप्प्यावर उभी आहे, त्या टप्प्यावर या स्वरुपाच्या समर्पित आणि झुंजार कार्यकर्त्यांची
आपल्याला फार गरज आहे. आपल्या केंद्राचा नंबर अशा बाबतीत पहिला लागावा म्हणून आपल्याला
काय-काय करावे लागेल, याचा प्रत्येक केंद्राने अंतर्मुख होऊन विचार
करायला हवा.
कराडला युवा एल्गार मेळाव्याला बाबा आढाव व त्यांच्या सोबत पी.
डी. पाटील होते. कराडसारख्या राजकीय शहरात सतत चोवीस वर्षे नगराध्यक्षपद भूषविणारी; त्याबरोबरच सह्याद्री साखर कारखान्याची अनेक वर्षे चेअरमन असलेली
ही व्यक्ती. मेळाव्यात माझे व बाबांचे भाषण झाले. नंतर पी. डी. पाटील बोलले. राजकारण, सरकार या धकाधकीत मूल्य आणि विचार जागवण्याचा वारसा आम्ही विसरून
गेलो, याची प्रखर जाणीव आधीची दोन्ही भाषणे ऐकताना
झाल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. चळवळीसाठी नि:संकोचपणे मदत मागावी, असे सुचविले. दोन प्रकारे हे घडू शकते, असे स्वत:च सांगितले. एकतर कारखान्यामार्फत आजूबाजूच्या शंभर गावांत
वाचनालयाची पुस्तके जातात, त्या सर्व ठिकाणी आपल्या विचारांची पुस्तके
घेणे आणि दुसरे म्हणजे समितीच्या पुस्तिका प्रकाशनांना जाहिरात रूपाने मदत करणे, हा अनुभव मला सर्वत्र येतो. तुम्हालाही येतो का? छोटी-मोठी मदत करायला अनेक जण उत्सुक असतात, प्रश्न असतो,
त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे
पोचण्याचा आणि त्यांच्याकडून मिळणारी मदत वापरण्याची चोख यंत्रणा उभी करण्याचा. मला
वाटते, आपण यात अपुरे पडत आहोत.
याचाच जणू एक भाग म्हणजे महाराष्ट्रातून मला येणाऱ्या पत्रांचे
प्रमाण वाढले आहे. ही पत्रे चळवळीसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या विविध ठिकाणी विखुरलेल्या
माणसांची आहेत, ती आपल्या मनाची आहेत. पण संकोचाने, भीतीने आतापर्यंत ती त्यांची मते मांडावयाला
घाबरत. आपल्या चळवळीने त्यांना बळ लाभल्यासारखे वाटते. चळवळ जाणून घेण्याबद्दल त्यांना उत्सुकता
असते. चळवळीला जोडून घेण्याची त्यांची इच्छा असते. परंतु ही माणसे असतात आपापल्या ठिकाणी, सुटी-सुटी. समितीची शाखा सुरू करून चालवावी, हे त्यांना शक्य नसते. पण स्वत:च्या पातळीवर काम करायला तर हवे
असते. सहयोगी म्हणून ही माणसे चळवळीला नीटपणे जोडता आली तर मला वाटते, एक यंत्रणा उभी राहू शकते. पूरक, समविचारी व उपयोगी. पण
हे घडावे कसे? तुम्हाला काही सुचते? जरूर कळवा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा