बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

हिंदी आणि इंग्लिश भाषेचा प्रभाव



हिंदी आणि इंग्लिश भाषेचा प्रभाव
दाभोलकर, चळवळ, संघटन, श्रमप्रतिष्ठा
मे महिन्यात दिल्लीला गेलो होतो. महाराष्ट्र परिचय केंद्राने दिल्लीतील मराठी भाषिकांसाठी माझी चर्चा ठेवली होती. विषय अर्थातच होता चळवळ अंधश्रद्धा निर्मूलनाची. महाराष्ट्रात चळवळ कशी सुरू झाली? कशी विस्तारत आहे? विविध उपक्रम कोणते झाले? कोणते संघर्ष लढवले गेले? चळवळीची भावी दिशा काय? याबाबत मी तासभर बोललो. नंतर प्रश्नोत्तरे झाली. उपस्थितांत पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार श्री. वसंतराव गोवारीकरांच्या पासून दिल्लीतील अनेक नामवंत बडी मंडळी होती. सर्वांना विवेचन नवे वाटल्याचे जाणवले. ही सर्व चळवळ दिल्लीमधील हिंदी व इंग्लिश राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रांतून यावयास हवी, असे सर्वांचे मत पडले. त्यासाठी सहकार्य करण्याचेही त्यांनी कबूल केले. पुन्हा दिल्लीला गेल्यावर विविध वृत्तपत्रांतील मराठी भाषिक वार्ताहर व अमराठी; परंतु या विषयात रूची असणारे वार्ताहर यांच्याशी वार्तालाप ठेवण्याची कल्पना केंद्राचे संचालक श्री. हेजीब यांनी बोलून दाखवली.

आता एक प्रश्न स्वाभाविकच तयार होतो की, आपले कार्य नव्हे; परंतु निदान परिचय तरी पोचण्यासाठी हिंदी व इंग्लिशमध्ये लिहिणे व बोलणे अटळ होत आहे. मुंबईसारख्या बहुभाषिक ठिकाणी तर चळवळ करतानाही हिंदी किंवा इंग्लिश गरजेचे बनले आहे. काही कार्यकर्ते मोठ्या धडाडीने याबाबत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, हे कौतुकास्पदच नव्हे; तर अनुकरणीय आहे. मुंबईच्या सेन्टॉर या पंचतारांकित हॉटेलात महिलांच्या समोर गरज असल्याने अलका जोशी इंग्लिशमध्ये बोलली. स्वाती वैद्य, अनुराधा दफ्तरदार, बजरंग सोनवणे यांना तर एका प्रसंगी समोरचा बहुसंख्येने अमराठी भाषिक समुदाय बघून व्याख्यानासाठी हिंदी व इंग्लिश या भाषांचा आश्रय घ्यावा लागला. फलज्योतिष यासारखा काहीसा अवघड विषय ऐनवेळी बजरंग सोनवणे यांनी हिंदीत मांडला. मला या सर्वांच्या हिमतीचे कौतुक वाटते. मी स्वत:ही अजून इंग्लिश वा हिंदी भाषण देऊ शकत नसल्याने ते अधिकच वाटते. आपली वाढती चळवळ लक्षात घेता व महाराष्ट्रासह भारतभर हिंदी आणि इंग्लिश या भाषांचा प्रभाव लक्षात घेता आपण सगळ्यांनीच या दिशेने थोडी-थोडी तयारी करावयास हवी, असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?

३०, ३१ मे या तारखांना पनवेल (शांतीवन) येथे महाराष्ट्र पातळीवरचे संघटनात्मक शिबीर पार पडले. या शिबिराचा वृत्तांत स्वतंत्र पत्रकाने तुमच्यापर्यंत पोचेलच. मला सांगायचा आहे तो मुद्दा वेगळाच आहे. असे मोठे शिबीर म्हटले की, हॉल झाडणे, पाणी भरणे, सतरंज्या घालणे; तसेच कार्यकर्त्यांच्या अनेक छोट्या-मोठ्या अडचणी सोडवणे याचे काम पडतेच. एका अर्थाने ही शुद्ध हमाली कामे आहेत; न आवडणारी, नकोशी वाटणारी आणि कंटाळवाणी. पण शिबीर यशस्वी व्हायचे असेल तर कोणीतरी घरचे कार्य समजून ही कामे करावीच लागतात. पनवेल शिबिरात उल्हास ठाकूर, मच्छिंद्रनाथ मुंडे, प्रबोध दळवी यांनी हसत-खेळत ही सर्व हमाली केली. विवेक काशीकरने पुस्तकांचे गठ्ठे भर उन्हात शब्दश: घामाने निथळत आणले. मला वाटते, आपण सर्वांनीच हा चांगला गुण उचलण्याचा मनापासून प्रयत्न करावयास हवा. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात थोडा चमकदारपणा व प्रसिद्धी आहे. त्याच्या सुप्त आकर्षणाने कार्यकर्ते समितीकडे वळतात काय, अशी साधार शंका हल्ली काही-काही वेळा मला येते.

आपल्याला पातळीवर या शंकेचे निरसन करावयाचे तर संघटनेच्या अशा हमाली कामात मनापासून पुढे सरसावयास हवे. आपला संघटनात्मक कस लागणार तो असे किती कार्यकर्ते आपण मिळवू शकतो, यावरच.

मा. नानासाहेब गोरे हे महाराष्ट्रातील एक प्रखर बुद्धिवादी कृतिशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आपल्या चळवळीत सतत मार्गदर्शन केले आहे, आधार दिला आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना ‘फाय फौंडेशन’चा एक लाख रुपयांचा राष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला. त्यांनी त्यामध्ये स्वत:च्या काही रकमेची भर घालून विश्वस्त वृत्तीने एकत्रित सर्व रक्कम काही संस्थांना वाटून दिली. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारला त्यांनी पंधरा हजार रुपये दिले. अर्थातच हे पैसे महाराष्ट्रातील कामासाठीच वापरायचा निर्णय पनवेलच्या बैठकीत आपण आधीच घेतला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्र कार्यकारिणी त्याचा योग्य तो विनियोग करेलच. सांगायचा मुद्दा असा की, सामान्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंतच्या सदिच्छांचे फळ चळवळीला मिळत आहे. आपण ते जाणीवपूर्वक संघटित करावयास हवे, ही जबाबदारी मात्र आपली.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट १९९१)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...