सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

चळवळीतील ताणे-बाणे



चळवळीतील ताणे-बाणे
दाभोलकर, वैचारिक स्पष्टता, शिबिरे, चळवळ, युवा एल्गार
आपली चळवळ वाढती आहे, तशी चळवळीसाठीची भ्रमंतीदेखील. प्रत्यक्ष लढती, चळवळीतील ताणे-बाणे, अडीअडचणी हे महत्त्वाचे; पण स्वतंत्र लेखांचे विषय. या आपल्या संवादात माझी कल्पना अशी की, या भ्रमंतीत जाता-जाता जे मनाला स्पर्शून जाते, खुणावून जाते, अंतर्मुख करते, त्यातलं काही मनमोकळेपणाने तुमच्या विचारासाठी मांडायचे.
     
पनवेलला युवा एल्गार मेळाव्यासाठी गेलो होतो. प्रमुख पाहुणे होते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील. साडेचारशे शाळा, कॉलेजेस आणि वार्षिक अंदाजपत्रक साठ कोटींचे असणारी ही संस्था. पण त्याचे चेअरमन पद भूषविणाऱ्या (आणि सत्यशोधकी विचारांचे कणखर पुरस्कर्ते असणाऱ्या) एन. डी. पाटील यांनी किती साधेपणाने वागावे! सकाळी साडेआठच्या कार्यक्रमाला वेळेवर येण्यासाठी ते पहाटे सहा वाजता मुंबई उपनगरातून निघाले. गाडी बदलत पुढच्या प्रवासासाठी घेतलेली भली मोठी बॅग सावरत साडेआठला पनवेलला पोचले. ब्रेकफास्ट असला शब्दही न उच्चारता गावातून तासभर मिरवणुकीबरोबर चालले आणि पोटतिडकीने केलेले भाषण संपवून शांतपणे पुन्हा पुढे रवाना झालो. स्वत:चे पद, प्रमुख पाहुण्याचा मान यापैकी कशाचाही काडीचाही बडेजाव या माणसाने मांडला नाही. चळवळीला जागणाऱ्या माणसाचे खरे मोठेपण कसे असावे, याचा मला वाटते. हा आदर्श वस्तुपाठच ठरावा.
     
दापोलीत युवा एल्गार मेळाव्याचे पाहुणे म्हणून तिथले प्रांताधिकारी पांढरपट्टे साहेब आले होते. आपल्याशी संवादी सूर जमणारी मंडळी सर्वत्र पसरली आहेत, याचा सुखद प्रत्यय त्यांनी आणून दिला. मुंबईला राजा ट्रॅव्हल्सच्या राजा पाटलांनी भेटायला बोलविले होते. हिंदी सिनेमाच्या तोडीच्या त्यांच्या अलिशान ऑफीसमध्ये छान गप्पा झाल्या. मुंबईला एखाद्या बैठकीला जागा मिळण्याची; आणि तीही मध्यवस्तीत, कोण मारामार? तर त्यांनी एकदम ऑफरच दिली की दादरच्या मध्यवस्तीतील त्यांच्या ऑफीसमध्ये साप्ताहिक बैठक घेत चला. थोडक्यात काय, आपण प्रवाहाविरुद्ध पोहतोच; परंतु त्यामध्येही मदत करणारे अनेक हात असतात, याचा अनुभव उमेद वाढवणारा असतो.
     
सोलापूरला जत्रेतील पशुहत्येला प्रतिबंध करण्यासाठीचा विरोध संघटित करण्यासाठीची पहिली परिषद झाली. आपले सोलापूर, सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते होते. महाराष्ट्रातील इतर अनेक संघटना होत्या. त्यात जैन बांधवांचा भरणा बराच होता. त्यांनी मुद्दा असा काढला की, पशुहत्येबद्दल बोलायचे ते फक्त जत्रेमधीलच का? शाकाहाराचाच प्रचार करावयास हवा. त्यांची संख्या भरपूर असूनही मी प्रमुख पाहुणा म्हणून बोलताना स्पष्ट विरोध नोंदविला. नवस फेडण्यासाठी जत्रेत दिले जाणारे बळी व त्यामुळे येणारे कर्जबाजारीपण यात लक्षावधी गरीब ग्रामीण जनता भरडून निघते म्हणून आमचा त्याला विरोध आहे; मांसाहाराला नाही, हे मी स्पष्ट केले. त्याचा अनुकूल परिणामही झाला. मला वाटते, आपल्या चळवळीत असे वैचारिक मांडणीचे मुद्दे येतात, तेव्हा आपण पुरेसे स्पष्ट असणे गरजेचे आहे; प्रसंगी तोटा झाला तरीही! शिवसेनेबद्दल पूर्वी असेच झाले होते. तुम्हाला काय वाटते!
     
अर्थात, ही वैचारिक स्पष्टता आता दैनंदिन चळवळीतही महत्त्वाची बनली आहे. आपली चळवळ केवळ बुवाबाजी, भूत-भानामतीविरोधाची नाही, असे आपण सांगतो; तर दुसरीकडे धर्म व देव बुडवायला आपण निघालोय, असा प्रचार होतो. मग काय होते? कळव्याला ठाण्याजवळ माझे अगदी अलिकडे भाषण झाले. प्रचंड म्हणावा एवढा पोलीस बंदोबस्त. भाषणानंतर प्रश्न आले, त्यात देवाबद्दल भूमिका काय? धर्माबद्दल काय, अशा अर्धा डझन चिठ्ठ्या होत्या, प्रश्नोत्तरे संपल्यावरही काही जण आले. मला वाटते, त्या सर्वांशी मी संवाद साधू शकलो. मला वाटते, महाराष्ट्रात सर्वत्र हा प्रश्न आज ना उद्या येणार आणि त्याचे संवाद साधणारे आणि वितंडवाद टाळणारे उत्तर देण्याची कला व अभ्यास आपण आत्मसात करायला हवा.
     
यासाठी शिबिरे हा एक मार्ग आहेच आणि त्या शिबिराची मागणी इतकी की, छाती दडपून जाते. पण एक चांगली खूण ही आहे व पूर्वी शिबीर म्हटले की, एक-दोन वक्ते हवेतच, असे अटळ असायचे. जामखेडला शिबीर झाले. नगर जिल्ह्याच्या दहा तालुक्यांतील ८० शिबिरार्थी आले. पुणे शाखेने अतिशय उत्तमपणे तीन दिवसांचे शिबीर घेतले. संघटना समर्थ होत चालल्याचाच हा पुरावा आहे, असे मला वाटते. ही ताकद ठिकठिकाणी उभी झाली तर किती चांगलं होईल?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी १९९१)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...