कार्यकर्त्यांची
तळमळ
दाभोलकर, चळवळ
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आता
पाय रोवून उभी आहे. अनेक उपक्रमांचे, संघर्षांचे, विधायक कार्याचे धुमारे फुटत आहेत. महाराष्ट्रात ‘फिरता’ असल्याने मला हे थोडे अधिक प्रकर्षाने जाणवते.
आपल्या सगळ्या सहकाऱ्यांपर्यंत या हालचाली, त्यातील गमती-जमती, राग-लोभ, अधिक-उणे यासकट पोचवाव्यात, असे नेहमी वाटायचे; पण सर्वांना आणि तेही
सविस्तरपणे लिहिणे काही जमायचे नाही. या सदरातून तो संवाद घडावा, अशी इच्छा आहे.
जयसिंगपूरला ३ जूनला अंधश्रद्धा निर्मूलन परिषद झाली. फुले-आंबेडकर
स्मृती शताब्दीचा कार्यक्रम म्हणून तेथील समितीने ती आयोजित केली होती. नगरपालिकेचे
भरघोस सहकार्य होते. सर्व उपस्थितांना प्रवासखर्च दिला गेला. त्यामुळे नऊ जिल्ह्यांतील
कार्यकर्ते आले होते. एकूण उपस्थिती दीडशेच्या आसपास. बहुतेक प्रतिनिधी आपल्या समितीचे
कार्यकर्ते होते. त्यामुळे परिषदेबरोबरच भेटीगाठीही पडल्या. त्याच दिवशी शेजारच्या
गावी काजळाच्या डबीत बघून भविष्य सांगणाऱ्या उपाध्ये बुवांच्या घरासमोर सांगली शाखेने
निदर्शने आयोजित केली होती. एकूण दिवस भरगच्च गेला. संयोजकांना फुले-आंबेडकर स्मृतीनिमित्त
अंधश्रद्धा निर्मूलन परिषद घ्यावी,
असे वाटणे आणि नगरपरिषदेने
सहकार्याचा हात देणे, या दोन्ही गोष्टी मला आपल्या विचाराच्या
वाढत्या प्रभावाच्या निदर्शक वाटल्या. समारोप करताना मी नेहमीपेक्षा वेगळे बोललो. फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या आधारे व्यापक मांडणी केली. लोकांना ते
नवे वाटल्याचे जाणवले.
नगर जिल्ह्याचे अकोला तालुक्यातील देशमुख परिषदेला मुद्दामहून आले
होते. ७२ वर्षांचा उग्र प्रकृतीचा म्हातारा! तिखट, परखड आणि तिरकसपणात जमा
व्हावी, अशी वाणीची धार. स्वत: जादूगार, स्वत:ची पुस्तकेही त्यांनी विक्रीला आणली होती. जुन्या सत्यशोधकी
चळवळीचा वारसा सांगणाऱ्या देशमुखांचा उत्साह तरुणाला लाजवणारा वाटला. ६, ७, ८ जुलैच्या संगमनेर शिबिराला ते दोन दिवस
आले होते. देव आणि धर्म यांना गाडूनच टाकले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत. देवाची
आरती करून येण्याबद्दल त्याची आळवणी करतात म्हणून ‘हे देवा तुमचे काही काम
नाही. तुम्ही इथून चालते व्हा,’ अशा काव्यरचना त्यांनी केल्या होत्या. आळवणी
करणारी ती ‘आरती’ म्हणून परत जा सांगणारी
ती ‘परती’ असे त्याचे नाव ठेवले
होते. मोठ्या उत्साहाने ती त्यांनी मुलांना म्हणून दाखवली. वेळ नव्हता म्हणून मेसच्या
दारात जादूचे प्रयोग करून दाखवले,
त्यांचा मार्ग न पटणारा, न पचणारा होता,
हे खरे. पण सत्तरी ओलांडल्यानंतरची
त्यांची तळमळ कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा, अशी होती. त्यांना बघताना
माझ्या मनात सतत विचार येत होता,
असे झपाटलेले कार्यकर्ते
मिळाले तर चळवळ वाढायला काय उशीर?
कार्यकर्ता झपाटून बाहेर पडूही शकेल. पण
त्याच्या पोटा-पाण्याचे काय?
चळवळीत लागणाऱ्या पैशांचे
काय? अनेक केंद्रे ग्रामीण भागात, अपुऱ्या साधनसामग्रीने; पण जिद्दीने लढतात.
चळवळ म्हटल्यावर होणारा किमान खर्च तरी त्यांना मिळावयास हवा. स्थानिक नाही जमले तर बाहेरून पुरवावयास
हवेत. म्हणून हल्ली मी ठरवले आहे. भाषणाला गेलो, भाषण झाले की, झोळी पसरायचीच. बहुधा ती रिकामी राहत नाही. ३० जूनला कोल्हापुरात
दोन भाषणे झाली. त्यानंतरच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पाचशे रुपये मिळाले. २ जुलैला
तर कमालच झाली. पुण्याहून लिमये म्हणून इंजिनिअर आले. विचारांनी नास्तिक. स्वत:च्या
आजूबाजूला अंधश्रद्धा निर्मूलन करायला तळमळीने धडपडणारे. जमेल तसा वेळ आणि शक्य तेवढा
पैसा त्यांना चळवळीला द्यावयाचा होता. आमचे थोडे बोलणे झाले. त्यांनी पटकन् पाकीट काढले
आणि पाचशेची नोट हातावर ठेवली. या दोन अनुभवांनी मी जरा सुखावलोच. संगमनेरच्या शिबीर
समारोपाला स्थानिक आमदार बाळासाहेब थोरात व सुप्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे होते.
मी चळवळीची स्थिती सांगितली आणि पाच हजार रुपये मदतीची मागणी केली. अध्यक्षीय समारोपात
रावसाहेबांनी ती स्वत:चा एक रुपया वर देऊन मान्य केली. थोडी आधी पूर्वसूचना द्या व
पैसे न्या, असे जाहीरपणे सांगितले. चिकाटीने हा अनुभव
चौफेर राबवावयास हवा.
संगमनेर शिबिरात पुण्याचा माधव गोखले ‘सर्प आणि अंधश्रद्धा’ यावर बोलला. त्याचा प्रत्यक्ष
अनुभव आणि मांडण्याची शैली यांनी विषय शिबिरार्थींना एकदम भिडला. अनेकांनी मला तसे
बोलून दाखवले. या विषयावर कुतूहलही बरेच असते. प्रत्येक शिबिरात हा विषय ठेवायला हवा.
ग्रामीण भागात तरी आरोग्यविषयक अंधश्रद्धा हा विषय मांडायला हवा. शिबिरार्थींचे खूप
प्रश्न काविळीवर होते.
मसले चौधरीला (ता. मोहोळ, जि. सोलापूर) अनुराधाबाई देशमुखच्या भक्तांनी
चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान नेमकेपणाने स्वीकारले नाही. नुसता घोळ घातला. वर आव्हान
स्वीकारावयास तयार आहे, ही रेकॉर्ड सुरू ठेवली. मात्र चमत्कार अध्यात्मिक असल्याने
तपासण्याच्या अटी स्वत:च्या सोयीने ठरवणार, असा पवित्रा घेतला. तो
उघडच मतलबी असल्याने नकार द्यावा लागला. गंमत अशी की, परवा ‘इंटरनॅशनल स्केप्टिक्स’चे अंक चाळत होतो आणि लक्षात आले. चमत्कारासाठी
नावाजलेले कुणीही असोत, काटेकोर चाचणीची अट आली की, अध्यात्मिकतेची ढाल करून मंडळी मागे पळतात.
अमेरिकेचा ख्यातनाम जादूगार व चमत्कारविरोधी चळवळीचा बिनीचा नेता जेम्स रँडी यांनी
त्याबाबतचे कार्य अनुभव दिले होते. अनुराधाबाई तोच कित्ता गिरवीत होती; तर घरोघरी मातीच्याच चुली हेच खरे.
तर मित्रहो,
हे लिहीत गेलो आणि लक्षात
आलं की, अजून खूपच लिहायचं राहिलंच. पण पत्रमर्यादा
संपत आली. आता भेट पुढच्या भ्रमंतीत. परंतु तोपर्यंत तुमचं सदराबाबत पत्र आलं तर पुन्हा
लिहिताना मदत होईल आणि मार्गदर्शनही.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९९०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा