अंतर्मुख
करावयास लावणारे प्रश्न
दाभोलकर, संघटन, उपक्रम
नाशिकजवळच्या देवळाली कॅम्पमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार
पडले. चंद्रपूर, अमरावतीपासून रत्नागिरी-दापोलीपर्यंतचे कार्यकर्ते
आले होते. शिबिराची व्यवस्था, परिसर असा की, शिबिराबरोबरच काहीसे गॅदरिंग व्हावे आणि तसे झालेही. वेगवेगळ्या
ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत राहिले की, संघटना आपोआपच मनोमनी
जुळली जाते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध पैलूंवर इतकी नवनवी माहिती सतत येत आहे
की, त्यासाठी स्वत:ला ताजे ठेवण्यास अशी शिबिरे
हवीतच. संघटनांतर्गत ती घेतली की,
विचार व चळवळ दोन्हीची
बांधणी पक्की होत जाते. आपापल्या विभागात हे घडावे, असा प्रयत्न सर्वांनीच
मनावर घ्यायला हवा.
संघटनात्मक बांधणी व या वर्षातले ठळक उपक्रम, याची पत्रके मी सर्वांना रवाना केली होती. त्याला आलेली काही उत्तरे
बोलकी आहेत. धुळ्याजवळच्या सिंदखेडा शाखेचे काम व्यवस्थित सुरू असल्याचे परेश शहाने
कळविले. चंद्रपूरहून जुनघरेंनी कळवले की, काम सुरू आहे; पण तुम्ही दोन वर्षांत इकडे फिरकलाच नाही; तर चाळीसगावच्या डॉ. महाजनांनी काम पार थंडावल्याची सखेद कबुली
देऊन पुन्हा उभारी मारण्याचा निर्धार दाखवलाय. एकूण काय? जेथे काम चालते ते सर्वांपर्यंत पोचवावयास हवे, शक्य तेवढे प्रत्यक्ष व्यक्तिगत संपर्क साधायला हवेत. जेथे ढिलाई
आली असेल, त्यांना चेतवायला व कामाला लावायला हवे.
नवनव्या आव्हानांचा मुकाबला संघटनेच्या पातळीवर करायचा तर ही बांधिलकी व्यक्तिगत व
केंद्र पातळीवर मनापासून स्वीकारायला हवी, विभागात राबवावयाला हवी.
मागच्या वर्षी सातारला शिक्षणातून अंधश्रद्धा निर्मूलन कसे होईल, यावर महाराष्ट्र पातळीवरचे चर्चासत्र झाले. शिक्षणसंस्थांच्या सहकार्याने
त्याबाबत काय करता येईल, याचा एक छोटा कार्यक्रम आपण तयार केला. त्यातील
एक उपक्रम होता, शिक्षक-प्राध्यापकांचे प्रशिक्षण. ज्यांच्या
माध्यमातून नवा विचार पोचविला जाणार, त्यांनाच आपल्या विचाराचे
बनवणे हा त्या मागचा उद्देश होता. सातारला असे शिबिर झाले. रयत शिक्षण संस्थेने पुढाकार
घेतल्यामुळे १८० प्राध्यापक-शिक्षकांनी नावे नोंदवली. सव्वाशेच्या आसपास रोजची उपस्थिती
असे. विचार जागृतीसाठी याचा फायदा झाल्याचे जवळपास सर्वांचेच मत पडले. खरे तर आपल्या
अनेक शाखांवर छोट्या प्रमाणावर हा उपक्रम निश्चित करता येईल. स्थानिक महाविद्यालयांच्या-शाळांच्या
प्राचार्यांच्या साहाय्याने ४०-५० शिक्षक-प्राध्यापकांचे शिबीर घ्यावे. रोज सायंकाळी
एका विषयावर व्याख्यान असे त्याचे स्वरूप ठेवावे. आता बहुतेक केंद्रांवर, निदान त्या-त्या विभागात मिळून तरी वक्ते आहेतच. विचार सर्वदूर
पोचण्यास, संघटना वाढण्यास त्याचा नक्कीच उपयोग होईल.
पण ही उपक्रमशीलता दाखवण्यात अनेकदा आपली केंद्रे कमी पडतात.
२२, २३ ऑक्टोबरला सांगली शाखेने जैन समाजातील
‘कल्पद्रुम विधान’ या खर्चिक पूजाविधीला विरोध करण्यासाठी
सद्भावना उपोषण केले. कार्यक्रम ठीक झाला. तेथील प्रमुख कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील
व त्यांच्या दोन-तीन सहकाऱ्यांची फारच धावपळ झाली. त्यांची जिद्द व चिकाटी कौतुकास्पदच.
पण तरुणांची (१८ ते २२ वयोगटातील) दहा-एक कार्यकर्त्यांची फळी तरी सर्वच ठिकाणी उभी
राहण्याची गरज मला त्या निमित्ताने जाणवली. तरुण आपल्या चळवळीकडे कसे वळतील, कसे टिकून राहतील, याचा विचार अंतर्मुख होऊन करावयास हवा.
वैचारिक पातळीवर असेच अंतर्मुख करावयास लावणारा प्रश्नही यानिमित्ताने
झालेल्या गरमागरम चर्चेतून पुढे आला. तुम्हाला जैन धर्मातीलच पूजाविधी का दिसतात? गणपती उत्सवात लक्षावधी रुपयांची उधळपट्टी होते. ज्ञानेश्वरी पारायणांचे
प्रचंड सोहळे भरपूर थाटामाटात साजरे होतात, त्यावर बोला की! असे आपल्या
संघटनेला सुनावण्यात आले. याचा प्रतिसाद तुम्ही कसा कराल? संघटनेने कसा करावा, यावर स्वत: विचार करा.
स्थानिक केंद्राच्या बैठकीत चर्चा करा आणि डॉ. बोरकरांना ती जरूर कळवा म्हणजे पुढच्या
अंकात त्याच्या संकलनातून तुमच्या सगळ्यांच्या विचाराचे प्रतिबिंब आपल्याला दिसू शकेल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा