‘सेक्युलर’
हिंदुत्ववाद
दाभोलकर, धर्मांधताविरोध, जमातवाद, सावरकर
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य धर्मांधतेच्या विरोधात आहे, हे चटकन समजते. धर्मश्रद्धा बहुतेक वेळेस अंधरूपाने प्रकट होते.
रूढी, व्रतवैकल्ये, कर्मकांडे, सण, उत्सव या सर्वांमध्ये गुंतलेल्या माणसाबद्दल
आपण सतत बोलत असतो, कृतीही करत असतो. हे काम स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी मोठ्या आग्रहाने केले. त्यामुळे ते अंधश्रद्धा निर्मूलनाचेच प्रवक्ते आहेत, असेही आपल्यापैकी अनेकांना वाटते. सावरकर
एवढेच काय; बॅरिस्टर जिना देखील पारंपरिक अर्थाने धर्मश्रद्ध
नव्हतेच; पण तरीही त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडले, त्यांची फळे आपण आज भोगत आहोत.
आपण धर्मांधतेविरोधी आहोत; परंतु जमातवादाविरोधी
आहोत का, असा प्रश्न विचाराल तर समितीचे बहुसंख्य
कार्यकर्ते व हितचिंतक विचारात पडतील. कारण धर्माची अंधता व अंधश्रद्धा हे नाते आपल्याला
चटकन समजते-उमजते. परंतु जमातवादाचा धोका तेवढ्या नेमकेपणाने आपल्या मनात नोंदलेला
नसतो. धर्मांधतेविरोधात एक महाराष्ट्रव्यापी मोहीम आपल्या समविचारी काही संघटनांनी
अलिकडेच चालू केली. संपूर्ण महाराष्ट्रात ती पुढील वर्षभर चालेल. त्यानिमित्ताने आपण
आपले विचार अधिक नेमके व धारदार करावयास हवेत, असे मला वाटते.
‘जमातवाद’ याचा अर्थ धर्म हा राजकीय हेतूने एकत्र
आणणे किंवा लोकांना एकत्रित आणणारा राजकीय घटक म्हणून धर्माचा वापर करणे. असे करावयाचे म्हणजे स्वत:च्या धर्माबद्दल, त्याच्या उज्ज्वल भूत आणि भविष्य काळाबद्दल अतिरेकी अभिमान निर्माण
करावयाचा. दुसरीकडे, इतर धर्म तात्त्विकदृष्ट्या आणि व्यवहारातही
कसे कमअस्सल आहेत, याचा सतत पुकारा करावयाचा; याबरोबरच ते आपले शत्रू आहेत, हे घोषित करावयाचे आणि
यासाठी करावयाच्या कृती कार्यक्रमात हिंसा अटळ, आवश्यक, समर्थनीय व नैतिक आहे, असे आग्रहाने प्रतिपादन
करावयाचे. जमातवादाची ही लक्षणे लक्षात घेतली म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे सावरकरांचे
कार्य हे प्रत्यक्षात त्यांच्या जमातवादी तत्त्वज्ञानाला ताकद देण्यासाठीच त्यांना
हवे होते, हेच स्पष्ट होते. धर्माच्या तलवारीवर अंधश्रद्धेचा
गंज चढलेला असेल तर ती पुरेशी प्रभावी ठरणार नाही. यासाठी तो गंज काढून तलवार लखलखीत
करावी, अशी ती भूमिका होती. ती विवेकवादी बुद्धिप्रामाण्यवादाची
नव्हती. जमातवादी राजकारणाला सोयीस्कर अशी विज्ञानवादी होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या
कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी हे नीटपणे समजावून घ्यावयास हवे. धर्माच्या नावाने
राजकारण करणाऱ्या शक्ती कोणत्याही धर्माच्या असोत, त्या विवेकवादी चळवळीला
घातकच आहेत. त्यांचा कठोरपणे मुकाबला करावयास हवा. परंतु मुसलमान, ख्रिश्चन यांनी स्वत:ला सांभाळून नीटपणे आणि निमूटपणे राहावे, असे इशारे अलिकडे बजरंग दल अथवा विश्व हिंदू परिषद यांनी दिले.
त्यातील गांभीर्य अधिक आहे. कारण या राष्ट्रातील बहुसंख्यांना विद्वेषी भावनेने चेतावण्याचा
तो प्रकार आहे. तो तसा वाटू नये म्हणून हिंदुत्ववाद्यांनी एक वैचारिक धक्कातंत्र वापरले
आहे, ते म्हणजे त्यांच्या मते, खरे धर्मनिरपेक्ष तेच आहेत आणि बाकीचे खोटे धर्मनिरपेक्षवादी आहेत, म्हणजे काय?
धर्मावर आधारित राष्ट्रवाद हीच ज्यांची धारणा आहे, त्यांनीच स्वत:ला खरे धर्मनिरपेक्षवादी म्हणून घोषित केले. त्यांच्या
मते, हिंदू धर्म हाच फक्त धर्म या संज्ञेला पात्र
आहे. ‘धर्म’ ही एक विशाल संकल्पना आहे आणि त्यामध्ये
जीवनाची, समाजाची धारणा करणारी सर्व अंगे आपोआपच समाविष्ट
आहेत. परंतु हे फक्त खरे आहे, हिंदू
धर्माबद्दलच.
बाकीचे धर्म उदाहरणार्थ, इस्लाम अथवा ख्रिश्चन या फक्त उपासनापद्धती आहेत. या उपासनापद्धतीचा
पूर्ण आदर या देशात केला जाईल. कारण या देशाची तशी परंपराच आहे. परंतु याची एक पूर्वश्रद्धा
आहे, ती अशी की, या अन्य धर्मियांनी मान्यता द्यावयास हवी की, या राष्ट्राचा मुख्य प्रवाह हिंदू धर्म आहे. याचाच अर्थ हे अन्य
धर्मीय पहिल्यांदा व्यापक राष्ट्रीय अर्थाने (जो हिंदुत्ववाद्यांच्या मनात आहे) प्रथम
हिंदू आहेत; मग त्यांच्या उपासना धर्माचे आहेत. म्हणजेच
त्यांनी स्वत:ची ओळख हिंदू-मुस्लिम,
हिंदू-ख्रिश्चन अशी करून
द्यावयास हवी. ही भूमिका धर्म ओलांडून राष्ट्राच्या मुख्य गाभ्यापर्यंत जाऊन पोचते.
म्हणून ती खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे. ती भूमिका बाळगणारे हिंदुत्ववादी ‘सेक्युलर’ आहेत आणि या भूमिकेला विरोध करणारे ‘स्युडो सेक्युलर’ आहेत.
परंतु हा वैचारिक गोंधळ उडवून देऊनच ही मंडळी थांबत नाहीत, तर दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन आणि मुस्लिम यांनी आमचा प्रस्ताव मानावा; अन्यथा या राष्ट्रातून बाहेर पडावे, असे बजावू लागतात आणि त्यासाठी शारीरिक बळाचा (हिंसेचा) वापर करतात.
जमातवादाच्या या चेहऱ्याचा धर्मचिकित्सेशी वा धर्मसुधारणेशी काहीही संबंध नसतो.
या सर्वांविरोधात उभे राहत असताना कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात
ठेवावयाच हवी. मुस्लिम धर्मांधता, जमातवाद यामुळे हिंदूंना कट्टर बनणे शक्य झाले हे खरे आहे; परंतु हे अर्धसत्य आहे. मुस्लिम जमातवाद्यांच्या चुकांच्यामुळे हिंदू जमातवाद फोफावण्यास मदत झाली
हे खरे; परंतु याबरोबरच यासाठी महत्त्वाचे आर्थिक
कारणही आहे, जे डोळ्याआड करून चालणार नाही. भारतातील
वाढ खुरटलेल्या भांडवलशाहीला लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जमातवादाची वाढ होणे
सोयीचे होते. आता तर मूठभर भांडवलदारांपेक्षा गावोगावी पसरलेला, कोणताही विधिनिषेध न बाळगणारा व्यापारीवर्ग तालु्क्यात संघटित झाला
आहे. त्यांच्या प्रचंड नफेखोरीवरून,
ऐषआरामी जगण्यावरून लक्ष
उडवण्यासाठी जमातवाद वापरला जात आहे.
थोडक्यात असे की, धर्मांधता विरोधाचे आणि
धर्मनिरपेक्षतेचा पुकार करणारे कार्य हे केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाने होणार नाही. त्यासाठी
जमातवाद जाणीवपूर्वक व हिंसक पद्धतीने जनसमुदायात पोचवण्याचे कट-कारस्थान आपण ओळखले
पाहिजे, त्याचा मुकाबला करणे आपले कर्तव्य मानले
पाहिजे. निदान आक्रमक प्रबोधनाच्या पातळीवर हे करण्याची गरज पूर्वी कधी नव्हती, एवढी आता निर्माण झाली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे १९९९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा