शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

बुवाबाजीचे घातक चाळे (भाग ४)

बुवाबाजीचे घातक चाळे  (भाग ४)

दाभोलकर, बुवाबाजी, रजनीश, फॅसिझम
कुठलीही बुवाबाजी ज्या वेळेला प्रभावी बनते, त्यावेळच्या तत्कालीन परिस्थितीत तिची लपलेली कारणे असतात. अशा कारणांचा पद्धतशीर अभ्यास करण्याची सवय आपल्याकडे नाही. रजनीश यांच्याबद्दल अशी मांडणी करण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्याप्रमाणे १९५० च्या काळात पाश्चिमात्य मानसोपचारतज्ज्ञ हे फ्रॉईडच्या मानसशास्त्रापासून फारकत घेऊ लागले. माणसाचा आजार ओळखण्यासाठी व उपचार करण्यासाठी मानसोपचार नसून मानवमात्रासाठी भरीव सुधारणा करण्याचे काम या शास्त्राने करावे, अशी मांडणी काही मानसोपचारतज्ज्ञ करत होते. त्यांनी आपल्या नव्या चिंतनासाठी अनेक अभ्यास केले. मोठ्या कुतुहलाने योग, वेद, बौद्धधर्मीय उपासना वगैरेंची भेट देऊन पाहणी केली. त्यांना त्यामध्ये धर्माएवढाच मानसोपचाराचा भाग दिसला. मात्र या विचाराची आश्रमातून चाललेली साधना ही पारंपरिक कर्मकांडे व कडक नीतिकल्पना यामध्येच बांधलेली होती; जी त्यांच्या पाश्चिमात्य मानसिकतेला भावणारी नव्हती. हा सर्व शोध सुरू असताना त्यांना आचार्य रजनीश वेगळे वाटले. त्यांचे तत्त्वज्ञान हे एखाद्या पुरोगामी गुरूसारखे होते. एका अर्थाने पुरोगामी गुरू हा शब्दप्रयोग विरोधाभासच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमची जबाबदारी घेतो ही बाब सोडता अस्खलित इंग्लिशमध्ये बंडखोर वाटणाऱ्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे रजनीश हे इतरांच्यापेक्षा वेगळे होते. माणसाचा समाधीचा अनुभव त्याच्या संभोगाशी जोडून दाखवणारे आणि स्त्री-पुरुष शरीरसंबंधांद्वारे पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, निर्मिक आणि निर्मिती यांचे दर्शन घडवणारे रजनीश पाश्चिमात्यांना भावले. उपासनेचा आधुनिक हिंदू मार्ग हा तोपर्यंत विवेकानंद अथवा गांधींचा होता. या उपासनेत तांत्रिक पंथाला कटाक्षाने दूर ठेवण्यात आले होते. रजनीशांनी आपल्या शिकवणुकीत या तंत्रपंथाचा कौशल्याने उपयोग केला. त्यामुळे शरीरसंबंधांतून चैतन्याच्या अलौकिक तत्त्वाचा अनुभव देण्याचा दावा करणारे त्यांचे तत्त्वज्ञान पाश्चिमात्यांना आकर्षित करून गेले. खरे तर रजनीशजी जे सांगत होते, त्यामध्ये अनेक त्रुटी व अंतर्विसंगती होत्या. परंतु बहुतेक सर्व गुरूंना जो फायदा मिळतो, तोच रजनीश यांनाही मिळाला. सामान्य भक्ताला; तो पौर्वात्य असो वा पाश्चिमात्य, धर्म व धार्मिक विचारपद्धती यांतील अनेक पंथ, याबद्दल इतके कमी माहीत असते की, त्याबाबत काही (चुकीची) माहिती देणारा गुरूही त्यांना ग्रेट वाटतो. शिवाय तो त्यांच्या भावनिक गरजा भागवीत असतोच. याबरोबरच रजनीश हा तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होता. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्याचा अभ्यास होता. मानवी स्वभावाची चांगली जाण असलेला तो निरीक्षक होता. वाचन प्रचंड होते. हिंदी उत्तमच होते. ध्यानधारणेच्या नाविन्यपूर्ण कल्पना शोधण्याची क्षमता अफाट होती. विनोदाची उत्तम जाण होती. याबरोबरच स्वत:च्या योजना अमलात आणण्यासाठी, लोकांना त्याप्रमाणे वापरून घेण्यासाठी तो पूर्णत: तरबेज व निष्ठूर होता. पश्चिमेकडील ग्रोथ मुव्हमेंट १९७० मध्ये ओसरू लागली होती. माणसाच्या मनाला बांधून ठेवण्याचे वेगवेगळे प्रयोग सुरू होते. कधी ते सुफी नृत्याचे होते, कधी अतींद्रिय शक्तींच्या अनुभवांचे; कधी चीन देशातील मनाचे नियमन करण्याचे किंवा तिबेटी बौद्ध धर्माचे. या सर्वांमध्ये काहीएक अध्यात्मिक विचारकौशल्याने गुंफण्याची गरज देखील जाणवत होती. ही सर्व गरज रजनीश यांनी अत्यंत चतुराईने पूर्ण केली. ग्रोथ मुव्हमेंटमधील काही भाग व भारतातील पारंपरिक ध्यानधारणा पद्धत या सर्वांच्या संयोगातून आपल्या पाश्चिमात्य शिष्याना आवडेल, असा एक फॉर्म्युला रजनीशांनी शोधून काढला. सत्तरीचा हा भारतात तरुणांच्या वैफल्याचा कालखंड होता. भारतात याच काळात काँग्रेसच्या एकसंध सत्तेला राज्याराज्यांत आव्हाने मिळाली, तर दुसरीकडे डावे पक्ष दुभंगले. परदेशामध्ये तेथील बेकारी, चलनवाढ याच्यावर आलेल्या उद्विग्नेतून हिप्पींचा जन्म झाला. अशावेळी समाजवाद, गांधी यांच्यावर परखड टीका करणारा आणि चांगले जीवन, लैंगिक स्वातंत्र्य; याबरोबरच उच्च पातळीवरील आत्मदर्शनाची खात्री देणारा रजनीश लोकप्रिय झाला नसता, तरच नवल! रजनीश यांनी मदर तेरेसा असोत, वा पोप पॉल अथवा मुरारजी देसाई, जुना हिंदू धर्म असो वा ख्रिश्चन, या सर्वांवर टीका केली आणि आपल्या अनुयायांना आपण मुक्त विचाराचे सर्वांपेक्षा श्रेष्ठ तत्त्वज्ञान व अनुभव देत आहोत, असा दावा केला. सामूहिक संमोहनासाठी त्यांनी वापरलेले अनेक मार्गही त्याला यासाठी उपयोगी पडले. या साऱ्याचा अर्थ एवढाच की, एखादा बाबा अथवा बुवा ज्यावेळेला तयार होत असतो, त्यावेळेस त्या-त्या समाजातील एक गरज तो भागवत असतो. अर्थात प्रभावी बनण्यासाठी आधी वर्णन केलेली सर्व साधनसामग्री त्याला हवी असतेच आणि तो ती वापरतोच. साठीच्या दरम्यान व्यवस्थाविरोधी (अ‍ॅन्टीएस्टॅब्लिशमेंट) चळवळींचा जगभर उदय झाला आणि त्यामध्ये व्यर्थता वाटू लागल्यावर अनेक धार्मिक किंवा धर्मसदृश पंथ निर्माण झाले. हे सर्व वातावरण रजनीशांना मोठे करण्यास अनुकूल ठरले. आपल्या देशात विविध बाबा, बुवा, पंथ यांचा विशिष्ट कालखंडात ज्या झपाट्याने उदय होतो, त्यांची कारणेही अशा व्यापक सामाजिक पर्यावरणात शोधावयास हवीत.     
बुवा, बाबा, स्वामी, महाराज, गुरू यांवरील विश्वास हा खरे तर श्रद्धेचा मामला असतो. ज्या गुरूवर, बाबावर माझी श्रद्धा असते, तिला माझ्या कल्याणाविषयी पूर्ण आस्था आहे. माझे कल्याण तिच्या हातात सुरक्षित आहे, अशी भक्ताची भावना असते. महाराजांवर भक्त पूर्णत: विसंबून असतो. स्वामी अथवा महाराज आपल्याला दगा देतील, ही कल्पनाही तो सहन करू शकत नाही. लहान मुलांची आईबापांवर जशी श्रद्धा असते, तसाच हा मामला असतो. आई-बाप मुलाला अनेकदा रागावतात, मारतात व मुलाच्या दृष्टीने अप्रिय कृत्य करतात. त्यांचे प्रयोजन त्या मुलाला कळत नसते. परंतु हे अनुभव पोटात रिचवूनही आई-बापांच्या आपल्यावर असलेल्या शुद्ध प्रेमाविषयी मुलाला जे आश्वासन असते, त्यामुळे आई-बापावरील त्याची श्रद्धा टिकून राहते. आई-बाप ही अखेर माणसेच असतात आणि त्यांनाही त्यांच्या अज्ञानाच्या, असमर्थतेच्या, स्वार्थाच्या मर्यादा पडलेल्या असतातच. मूल प्रौढ होते तेव्हा त्याला हे सर्व समजते आणि त्याची आई-बापांवर श्रद्धा उरत नाही. प्रेम, आदर, कृतज्ञता या भावना राहतात. परंतु त्यांच्यातील नाते आता प्रौढ, समान माणसामधील नाते बनते. असे झाले नाही आणि संपूर्ण जीवनभर प्रौढ बनलेले मूल बालकाप्रमाणेच, लहान वयाप्रमाणेच आई-वडिलांवर कायमचे अवलंबून राहू लागले, तर प्रौढ म्हणून झालेल्या त्याच्या विकासाबद्दल आपल्याला शंका येईल. बाबांच्या पायावर आपले उभे जीवन कुर्बान करणाऱ्या भक्तांच्याबाबत हेच घडत असते. बाबांचे शिष्य म्हणवून घेणारे प्रौढपणीही शब्दश: आपले बालकत्व जपत असतात. श्रद्धेचा हा आकृतिबंध असा असतो की, श्रद्धा व्यक्तीवर असते. ज्या व्यक्तीवर श्रद्धा असते ती व्यक्ती श्रद्धाळू भाविकांचे हित जपणारी आहे, याबद्दल भाविकांच्या मनात कोणतीही शंका नसते. ही श्रद्धा अनुभवाच्या पलिकडे जाणारी असते. जी व्यक्ती श्रद्धा ठेवते, तिला तिची श्रद्धा असलेल्या अवस्थेत त्या श्रद्धेचे प्रामाण्य अनुभवाच्या आधारे सिद्ध करता येत नसते. अनेकदा विसंगत वा विपरीत अनुभव येतात, तरीही श्रद्धा राखावी लागते. श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तीचे ज्ञान, वैचारिक शक्ती, कर्तृत्व, श्रद्धाळू व्यक्तीच्या शक्तीच्या आवाक्यात नसते, म्हणजे उघडपणे एक श्रेष्ठ-कनिष्ठतेचे नाते अस्तित्वात असते. एखादे विधान पुरेसा पुरावा असेल तर ते सत्य आहे म्हणून आपण स्वीकारतो आणि तसे नसेल तर त्या विधानाला असत्य मानतो. विधान पुरेशा पुराव्याच्या अभावाने सत्य ठरत नसेल, तर श्रद्धेने त्याचे सत्यत्व स्वीकारण्याचा प्रश्नच नसतो आणि श्रद्धेने जे विधान सत्य म्हणून स्वीकारण्यात येते, ते पुराव्याने सत्य म्हणून सिद्ध झालेले नसल्यास ते सत्य म्हणून स्वीकारणे अविवेकी वृत्तीचे ठरेल. पण मानवी मनोव्यापार लक्षात घेता श्रद्धेच्या रूपातील दोन भेद या ठिकाणी करावे लागतात. नोटा आपोआप दुप्पट करून मिळण्याची इच्छा, अमुक-तमुक कर्मकांड केल्यानंतर निश्चितपणे अमुक-तमुक लाभ होतील, अशी भावना आणि यांचा पगडा मनावर बसल्यामुळे निर्माण झालेली अविवेकी वृत्ती आणि मानवी कल्याणाचे अंतिम दर्शन एखाद्या महाराजांमार्फत होते हे समजून घेण्यात आणि त्याप्रमाणे आचरण करण्यात जीवनाचे परमकल्याण आहे, अशी श्रद्धा बाळगणारी अविवेकी वृत्ती यांच्यात फरक करावा लागेल. हे दुसरे श्रद्धेचे रूप अधिक गुंतागुंतीचे आहे आणि अनेक बाबांच्या बाबतीत या स्वरुपाचा प्रतिवाद त्यांचे समर्थक असतात; म्हणून थोड्या-अधिक तपशिलात ते समजून घ्यावयास हवे.
   
श्रद्धेने महाराज अथवा गुरू यांच्यामार्फत जे सत्य स्वीकारतात, त्यांची भूमिका सर्वसाधारणपणे अशी असते की, काही सत्यांचे ज्ञान मानवी ज्ञानशक्तीच्या पलिकडचे आहे. हे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानवी कल्याण साधण्यासाठी अत्यावश्यक आहे. अधिकारी व्यक्तीकडून ते लोककल्याणासाठी (परमेश्वर कृपेने) प्रकट होते. अशा अधिकारी व्यक्तींचे अंत:करण, बुद्धी पूर्णपणे शुद्ध झालेली असते. हे ज्ञान किंवा या ज्ञानाचा आशय असलेली विधाने सत्य किंवा असत्य आहेत, हे सिद्ध करणे मानवी शक्तीच्या पलिकडचे आहे. परंतु अधिकारी पुरुषावर श्रद्धा असल्यानेच हे ज्ञान प्रमाण म्हणून स्वीकारले जाते. अशा बाबांचे, स्वामींचे, महाराजांचे थोडक्यात प्रतिपादन असे असते की, मी जे सांगत आहे ते तुमच्या कल्याणासाठीच; पण तुमचे कल्याण कशात आहे, ते समजणे तुमच्या आकलनशक्तीच्या पलिकडचे आहे. तुम्ही माझ्यावरच्या श्रद्धेने हे प्रतिपादन सत्य म्हणून स्वीकारा. अधिकारी पुरुषांचे सामान्य माणसांना उद्देशून केलेले म्हणणे असे असते आणि या वृत्तीनेच सामान्य माणसे त्याचा स्वीकार करतात. ही भूमिका मूलत: अंतर्विसंगत आहे. मानवी ज्ञानशक्तीपलिकडे असलेले सत्य असते आणि त्याचे ज्ञान तरीही माणसाला होऊ शकते, असे तिच्यात गृहीत धरले आहे. हा काहीसा स्वत:च्या कातडीमधून बाहेर उडी घेण्यासारखा प्रकार झाला. मुलाला आई-बाप दिसतात. त्यांना जे समजत होते, ते मुलाला त्याच्या प्रौढपणी समजू लागते आणि ते आपल्याला लहानपणी समजू शकले नसते, हेही समजते. परंतु सर्वज्ञ असलेला कोणी आहे, असे कोणाही माणसाने स्वत: सर्वज्ञ असल्याशिवाय समजणे योग्य नाही. तेव्हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा परमेश्वर किंवा ईश्वराचा संदेश मिळालेली अधिकारी व्यक्ती आहे, हे श्रद्धेने स्वीकारावे लागते. यातही गंमत अशी की, ईश्वर आहे; आणि त्याने अमुक-तमुक महाराजांना अधिकार दिला आहे, हे माहीत झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला अधिकारी मानीत नाहीत; त्या व्यक्तीला अधिकारी मानत असल्यामुळे ईश्वर अथवा अन्य कोणी शक्तीने मानवी ज्ञानशक्तीपलिकडचे ज्ञान तिला दिले आहे, असे भक्त मानतो. आता ईश्वर आहे की नाही आणि मानवी ज्ञानशक्तीपलिकडे ज्ञान आहे, हे कसे कळते? असे कळणे हे अनुभव, तर्क आणि पुरावा यांच्यापलिकडे उडी मारणे आहे; परंतु प्रत्यक्षात जागोजागी आपापले बाबा, बुवा, गुरू, महाराज यांच्यावर श्रद्धा ठेवून भक्त अशी उडी मारत असतात. विशिष्ट व्यक्तीच्या अधिकारावर श्रद्धा कशी ठेवली, याचे उत्तर भक्तांकडून असे दिले जाते, की अमुक-अमुक माणूस अधिकारी आहे, याचा पुरावा मिळू शकत नाही; पण अशी खूण मला मिळाली आहे, असे तीव्रतेने जाणवते. परतत्त्व स्पर्श म्हणा, ईश्वराचा कृपाप्रसाद म्हणा, ज्ञानेंद्रियांपलिकडचे ज्ञान समजा, हे सर्व किंवा यापैकी काही या अधिकारी व्यक्तीच्या जीवनात आहे, याच्या खाणाखुणा भक्ताला जाणवतात. आता या खाणाखुणा म्हणजे पुरावा नाही. त्यामुळे या खाणाखुणांवर विसंबून बाबांच्या सेवेत स्वत:ला झोकून देण्यासाठी श्रद्धा ठेवूनच उडी घ्यावी लागते. श्रद्धेमध्ये दृढतेला महत्त्व असते ते यामुळेच. आता चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न यापुढच्या टप्प्यावर निर्माण होतो. या खाणाखुणा कोणत्या? परतत्त्वाने स्पर्श केल्यानंतर ही माणसे इतर प्राकृत माणसासारखी राहू शकणार नाहीत. हे वेगळेपण दोन प्रकारचे असू शकते. अशी व्यक्ती असामान्य असू शकते, ती चमत्कार करते, भविष्य वर्तवते आणि खरे ठरते. तिने उच्चारलेला शब्द आपोआप सत्य बनतो, हा झाला एक प्रकार. दुसऱ्या प्रकारात अशा व्यक्ती पराकोटीच्या सद्वर्तनी, सद्गुणी व सज्जन असतात. त्यांचे जीवन हे वेगळ्या प्रकारचे वेगळ्या पातळीवरचे असते, हे सामान्य माणसांना दिसू शकते. बुद्ध किंवा ख्रिस्त, तुकाराम अथवा गाडगेबाबा ही या स्वरुपाची उदाहरणे आहेत. या दोन्ही प्रकारच्या खाणाखुणा शोधण्याचे अजब आकर्षण बहुतेकांना असते, ज्या प्रमाणात विधानांना अनुकूल पुरावा असेल, त्या प्रमाणातच सत्य म्हणून त्यांचा स्वीकार करावा, या तत्त्वात विवेकवादाचे सार आहे आणि त्यामध्ये श्रद्धेला स्थान नाही. अशा श्रद्धेशिवाय माणसे उत्कृष्ट सर्जनशील, नि:स्वार्थी पद्धतीने जगू शकतात, हे सिद्ध झाले आहे. दुसरीकडे, श्रद्धेने अधिकारी पुरुषाद्वारा अतितापर्यंत उडी घेण्याची खोल प्रवृत्ती मानवी मनात आहे, हे आतापर्यंतच्या संस्कृतीच्या इतिहासावरून दिसते. अशी श्रद्धा ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे का, हा बहुचर्चित विषय आहे. श्रद्धा हा मनुष्यप्राण्याच्या ‘माणूस’ म्हणून झालेल्या विकासासोबतच त्याच्या मनाचे अंगभूत वैशिष्ट्य म्हणून जन्माला आलेली धारणा आहे. तिचे रूप तर्कशक्तीशी विसंगत असेल, विकृत, मतलबी, विवेकहीन असेल; तर त्या विरोधात संघर्ष करावयासच हवा. परंतु माणसाच्या मनाचे वैशिष्ट्य असलेली सर्जनशील श्रद्धा विज्ञाननिष्ठविरोधी असायलाच हवी, असे नाही. या अर्थाने श्रद्धा ही प्रवृत्ती मानवी प्रकृतीचा घटक बनते, अशीही एक मांडणी आहे. सुसंस्कृत असणे याचा अर्थ माणसाचे स्वत:शी, अन्य माणसाशी आणि निसर्गाशी असलेल्या नात्यांविषयी सर्व पर्यायी शक्यता ध्यानात बाळगून जगणे. या शक्यता भिन्न जीवनप्रकार सामोरे आणतात. त्यांचा आदर करावयास हवा; परंतु माणूस आणि विश्व यांच्याविषयीचे हे ज्ञान प्रत्येक मानवी व्यक्तीला समताधिष्ठित चांगले जीवन जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत ठरावयास हवे. कोणत्याही गुरूवरील कथित श्रद्धा ही निरामय आहे की विकृत वळणावर उभी आहे, हे या निकषावर ठरवावयास हवे. या क्ष किरण चिकित्सेतून बाबावरील श्रद्धेचा वेध घ्यावयास हवा.     
शुद्ध शुचिर्भूत जीवन हे एक उच्च ध्येय आहे; पण ते साध्य करण्यासाठी बाबाला शरण जाणे हे कोणत्याच अर्थाने उपकारक ठरण्याची शक्यता नाही. प्रामाणिकपणे मनातील कामवासना आणि अभिलाषा याची जाणीव व्यक्तीला स्वत:ला प्रामाणिकपणे व्हावयास हवी. समता, व्यक्तिस्वातंत्र्य, मनातल्या या शंकांचे समाधान करण्यासाठी प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य यांना महत्त्व दिले जावयास हवे. स्वाभाविक भावनांवर निर्मलामातेप्रमाणे कडक टीका करणे अथवा रजनीशांच्या प्रमाणे अनिर्बंध मोकळेपणा देणे, हे दोन्ही चूकच. मानवी स्वातंत्र्य आणि निर्णय यामुळे माणूस स्वच्छंदपणे आयुष्याचा उपभोग घेतो. त्यामुळे त्याला यामधून निर्माण होणाऱ्या स्वैराचारापासून वाचवायला कोणा बाबा, बुवा, महाराज यांच्या अध्यात्मिक दर्शनाचा लगाम हवा, ही गोष्ट माणूस म्हणून व्हावयाच्या विकासाला फारशी उपकारक नाही. अध्यात्माचा सारा आटापिटा ज्या आत्मपूर्ती दर्शनासाठी चालतो, त्यासाठीही मानवी मनाचे स्वातंत्र्य आवश्यक आहे; संपूर्ण शरणागती नव्हे, हे लक्षात घ्यावयास हवे.  
प्रत्यक्षात बुवा, बाबा काय करत असतात, याचा अभ्यास केला तर काय चित्र दिसते? या देशात संतांनी धर्माच्या माध्यमातून मानवतेचा व करुणेचा मार्ग सांगितला व कृतिशील आचरून दाखवला. माणसांना आपल्या नादी लावणारे बुवा, बाबा, स्वामी, महाराज हे संतसाहित्याचा वापर आपल्या सोयीसाठी करतात. मात्र मुखातून संतांच्या शब्दांचा कोरडा उद्घोष करणारी ही मंडळी प्रत्यक्षात वर्तनात कमालीची मतलबी असतात. त्यांच्यामार्फत परतत्त्वाच्या मार्गावर पाऊल टाकणे अशक्य. हे सर्व बाबा, बुवा स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेले असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमहात्म्य वाढवणाऱ्या तंत्रांची असते. बाबांच्या भक्तांचे विशिष्ट रंगाचे कपडे, विशिष्ट रंगांच्या माळा, छातीवर महाराजांचा फोटो असलेला बिल्ला; तसेच पेन, बाबांनी दिलेला जीवन उद्धरून नेणारा एखादा छोटा-मोठा मंत्र, यातून प्रथम एकजुटीची भावना निर्माण होते. या भावनेत एक समाधान व सामर्थ्य असते. पुढे-पुढे या सर्व वातावरणाची सवय होते. त्याच्याशिवाय राहणे अशक्य बनते किंवा तशी इच्छा एखाद्या भक्ताला झालीच, तर त्यावर चाकोरीबाहेर न वागण्याची सक्ती केली जाते. सर्व कारभारात एक प्रकारची गुप्तता असते. मठ चिल्लर नरेंद्र महाराजांचा असो वा स्वत:ला भगवान समजणाऱ्या ओशो आचार्य रजनीशांचा; प्रक्रिया हीच असते. महाराजांची भक्ती सोडून सर्व जीवन व्यर्थ आहे, असे वाटणे ही जीवनाची इतिकर्तव्यता बनते. महाराजांना विरोध करणे महापाप ठरते. त्यांना विरोध करणाऱ्या दुर्जनांचा नाश पुण्यदायी मानला जातो. महाराजांच्या अनुग्रहानेच जीवनाचे कोटकल्याण होईल आणि हा भवसागर तरून जाता येईल, असा संदेश सतत बिंबवला जातो. त्यामुळे भक्त हा कडवा सैनिक बनतो. बुवाबाजी ही एक अभेद्य व्यूहरचना बनते. ती टिकवून धरण्यासाठी सतत ब्रेन वॉशिंग व कंडिशनिंग सुरू राहते. यामधून भक्ताला संमोहित करणारे वातावरण तयार होते. संमोहित अवस्थेप्रमाणेच माणसाची चिकित्सक बुद्धी तहकूब होते. किती वेळा तर भक्ताची महाराजांवरील तीव्र भक्ती, प्रीती यामुळे तो संमोहनसदृश अवस्थेत जाणे सहज शक्य होते. संवेदनांचे भ्रम तयार होऊ शकतात. आजूबाजूला काहीच नसताना चंदनाचा वास येतो. दैवतांचे मंजूळ स्वर कानी पडतात. फारच भाग्यवान असेल तर देवाचे दर्शनही घडते अथवा महाराज देवाच्या रूपात दर्शन देतात. दैवी चमत्काराला साक्षी बनण्याचे परमपुण्य लाभते. बाबांचा शब्द जणू मोक्षाचे दार उघडत आहे, असे वाटू लागते. भारून टाकणारे वातावरण आणि भारावलेला भाविक यासाठी संदेश एकच असतो. भक्ताच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी बाबांनी घेतली आहे, ही परमभाग्याची गोष्ट आहे. जीवनातील चिंता मिटल्या आहेत. आता सुख-शांती, समाधान, समृद्धी याचे महाद्वार खुले होणार आहे. बाबांच्या कृपाशीर्वादाने भक्ताला भौतिक, भावनिक, अध्यात्मिक, पारलौकिक सर्व आधार एकाचवेळी प्राप्त झाले आहेत.    
ज्या अध्यात्मिक कल्याणासाठी बाबांच्याकडे जावयाचे, ते कल्याण म्हणजे काय, याची एकवाक्यता असलेली एकसंध मांडणी नाही; पण तरीही जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते, हे वाक्य आवडीने ऐकवले जाते. तसेच अध्यात्मिक यशस्वी जीवन हेच जीवनसार्थक मानले जाते. त्यासाठी आपापल्या गुरूचा आशीर्वाद वा सत्संग लागतोच. प्रत्येक धर्माचे, पंथाचे अध्यात्म वेगवेगळे असते. अनेकदा ते विरोधीही असते. ते व्यक्तिसापेक्ष तर असतेच असते. तरीही बौद्धिक प्रतिवादाने माणसांच्या मनातील या कथित अध्यात्मिकतेचा प्रतिवाद करणे अवघड बनते, असा अनुभव आहे. म्हणून घटकाभर अध्यात्माचा पारंपरिक व सर्वमान्य अर्थ घेऊ या. तो असा आहे की, या विश्वात, विश्वातील प्रत्येकात एक चैतन्य आहे. व्यक्तीच्या जीवनात असतो, तो आत्मा, विश्व व्यापून राहिलेला तो परमात्मा, व्यक्तीच्या जीवनात असते ते ब्रह्म. विश्वात आहे ते परब्रह्म. व्यक्तीच्या जीवनातील हे आत्मतत्त्व आणि विश्वचैतन्यातील परब्रह्म तत्त्व एकमेकाला भेटणे म्हणजे जिवा-शिवाची गाठ पडणे आणि आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था निर्माण होणे. स्वत:च्या सच्चिदानंद रूपाची ओळख होणे. म्हणजेच हे रूप सत्य आहे, शाश्वत आहे आणि अखंड आनंद स्वरूप आहे, याची प्रचिती पाहणे. आता यापेक्षा आणखी काय हवे? परंतु हा झाला नुसता शब्दबंबाळपणा. त्यापलिकडे जाऊन खरा अध्यात्मिक पुरुष ओळखायचा कसा? त्याची सोपी खूण अशी, की व्यक्ती जीवनात संयमी व सदाचारी असते. अपरिग्रही राहते. भौतिक सुखापलिकडचे जीवनाचे श्रेयस आहे व भौतिक सुखापेक्षा ते अनंत पटीने मोलाचे आहे, असे या व्यक्तीला वाटत असते. मात्र ती व्यक्ती या सगळ्याचा डांगोरा पिटत बसत नाही, तर ती करुणेने मानवसन्मुख कृती करते. अध्यात्म ही त्या व्यक्तीच्या आंतरिक मानसिक विकासाची साधना असते. त्यामुळे तिच्या जीवनात जी शूचिता व पावित्र्य येते, त्याचा सहज प्रत्यय इतरांना येतो. जे आचरणात येते ते अध्यात्म, बाकीची सर्व पोकळ बडबड वा पोपटपंची. व्यवहारात नैतिकदृष्ट्या जागे ठेवते ते नामस्मरण; बाकीचा देखावा अथवा नामाचा गजर. थोडक्यात, या निकषावर महाराजांची अध्यात्मिकता तपासता येते, तपासावयास हवी. यासाठी गाडगेबाबांच्यासारखे उदाहरण शोधून सापडणार नाही. अंगठाबहाद्दर बाबांनी कोट्यवधी रुपये जमवले, खर्च केले, पै न् पैचा हिशोब चोख ठेवला. आयुष्यभर स्वत:ची मालमत्ता म्हणून त्यांच्याकडे होती; फक्त हातातील काठी, अंगावरच्या चिंध्या आणि डोक्यावर खापराचा तुकडा. स्वत: पैसे मिळवून बांधलेल्या एका धर्मशाळेतील एका खोलीत शिष्यगणांनी आपल्या पत्नीस राहावयास जागा दिली, हे समजताच त्यांनी तिला तेथून तरातरा बाहेर काढले. हे वैराग्य आणि अध्यात्म एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र महाराजांची काही लाखांची अलिशान गाडी, निर्मलामातादेवींचे देशोदेशी पसरलेले भव्य संगमरवरी प्रासाद, सत्यसाईबाबांचा प्रचंड भपका, स्वत:चे विमानतळ. एवढेच कशाला, ज्ञानेश्वरीचा सप्ताह घालणारे ह.भ.प.देखील लाखांच्या घरात बिदागी घेणारे आणि निर्माण केलेले विश्वस्त निधी आपल्या घरच्यांच्या मुठीत ठेवणारे. संयम, सदाचार, अपरिग्रह, शूचिता, चारित्र्य या खऱ्या अध्यात्मिक कसोट्या मानल्या तर कथित बाबांचे आणि गुरूंचे वस्त्रहरण फार लवकर व स्पष्टपणे होऊ शकते.
बुवाबाजीचे अनर्थ लक्षात घेऊन त्या विरोधात सुरू असलेला संघर्ष हा परत-परत करावा लागत असला तरी महाराष्ट्राला तो नवीन नाही. बुवाशाहीविरुद्ध निर्माण झालेल्या बुवाशाही विध्वंस संघाच्या सभासदांची १९३५ मधील ही प्रतिज्ञा पाहा. त्याकाळी महाराष्ट्रात प्रभावी असलेल्या किर्लोस्कर मासिकाने तिला चालना दिली होती आणि सभासदांच्या प्रवेशपत्रकाचा नमुना छापला होता, तो असा - आपल्या समाजात बुवा, महाराज यांच्या नादी लागणारे बुवाबाज स्त्री-पुरुष पुष्कळ आहेत. हे बुवाबाज लवकरच बुवाशाही मनुष्य प्रज्ञाहत होतो; आळशी बनतो व उद्योग न करता बुवाच्या प्रसादाने सर्व प्राप्त व्हावे म्हणून बुवाच्या नादी लागतो. आपल्या समाजाच्या व राष्ट्राच्या उत्कर्षास अडथळा उत्पन्न करणारी ही बुवाशाही आहे. ती पूर्ण नाहीशी व्हावी, असे माझे मत असल्याने या संघाचा सभासद होत आहे.
मनुष्य व पशू यांना आहार, निद्रा, भय, मैथुन ही सारखीच आहेत. पशूपेक्षा मनुष्यामध्ये अधिक काही आहे; म्हणजे विवेक, म्हणजेच बरे-वाईट जाणण्याची शक्ती. हे काम बुद्धीचे आहे. बुवाबाजीत अडकलेला माणूस आपल्या बुद्धीची स्वत:च हत्या करतो व मनुष्य आणि पशू यांच्यातील अंतर नाहीसे करतो. आर्य चाणक्याने मुद्राराक्षस नाटकामध्ये एका प्रसंगात असे म्हटले आहे की, माझे आप्तेष्ट गेले, सगेसोयरे गेले, लोभाविष्ट होऊन आलेले लोक गेले; सैन्य गेले, पैसा गेला तरी बेहत्तर; पण माझ्या बुद्धीने मात्र मला दगा देऊ नये म्हणजे झाले. धर्म आणि समाज या क्षेत्रात आपल्या देशात पुष्कळ बौद्धिक गुलामगिरी होती व अजूनही आहे. परंपरेने चालत आलेले आहे ते उत्तम आहे. त्याबाबत आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर गोष्टींबाबत चिकित्सा नको; मग सुधारणा तर दूरच राहिली, अशी भावना आहे. काही बदल करावयाचाच असेल तर तो ईश्वरी अवताराने करावा, हे या समाजाच्या मनावर बिंबले आहे. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाने काही मिळवून समर्थ व समृद्ध व्हावे, याऐवजी स्वतंत्र प्रज्ञेला सोडचिठ्ठी देऊन कोणा विभूतीने शरण जावे, ही खोडच समाजाला लागली आहे. अशा विभूती बुवाबाबांच्या रूपाने गावोगावी मौजूद आहेत आणि लोकही आपली बुद्धी गहाण टाकून कुटुंब, समाज व राष्ट्र याविषयी उदासीन होऊन आपले तन, मन, धन बाबांच्याकडे गहाण टाकत आहेत. बुवा आणि त्यांच्या जातकुळीतील बाबा, महाराज, स्वामी यांनी अशा लोकांची ‘बुध्दिहत्या’ करण्याचा कारखानाच जणू चालवला आहे. त्यातून या समाजाची सुटका कधी होणार आणि कशी होणार, हा एक अव्वल दर्जाचा सामाजिक प्रश्न आहे. बहुसंख्य बाबा लोक हेच सांगत सुटलेले असतात की, हे जग मिथ्या आहे, माया आहे, क्षणभंगुर आहे. त्यामुळे समाजाची जिज्ञासा मरते, निवृत्ती वाढते, पराक्रमाचा जोम उरत नाही. दैववाद, देववाद, अंधविश्वास बोकाळतात. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान असे तत्त्वज्ञान प्रमाण ठरते. अन्यायाची चीड, प्रतिकाराविषयी तळमळ, समाजाला स्वकर्तृत्वाने बदलण्याची पुरुषार्थी वृत्ती, या जाणिवा बुवाबाजी खुडून आणि खणून काढतात. बुवाभक्त बनलेला समाज आळशी बनतो. स्वत:चा प्रपंच, समाज, राष्ट्र याविषयी उदासीन होतो.     
अनेक शतकांच्या वाटचालीतून निर्माण झालेल्या आपल्या देशातील या सामाजिक मानसिकतेवर गेल्या दशकात जागतिकीकरणामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आता आणखी एक कलम झाले आहे. जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदात्तीकरण ही नवभांडवलशाहीकडून येणारी आक्रमणे आहेत. बेकारी प्रचंड वाढत आहे, आर्थिक असुरक्षितता फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला चंगळवादी उपभोग, संस्कृतीचा रतीब विविध प्रसारमाध्यमांच्या द्वारा रोज घरी आणून टाकला जात आहे. आर्थिक ताण असो वा चंगळवादाचा भुलभुलैया; दोन्ही बाजूने मन:शांतीची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. स्वाध्याय, सिद्ध सायन्स, रेकी, सहजसिद्ध योग, बैठक कुंडलिनी जागृती इत्यादी मार्गांनी लोकांना चित्तशांतीपासून आर्थिक समृद्धीपर्यंत शेकडो गोष्टी मिळवून देण्याचे दावे करणाऱ्या शास्त्री, बापू, बुवा, श्रीश्री, सद्गुरू, विश्वसंत प्रभृतींचे अक्षरश: पेव फुटले आहे. हे उद्धारण नवसाम्राज्यशाही आक्रमणाला अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी उठवले गेले आहे, असे एक प्रतिपादन आहे. दुसरे प्रतिपादन असे की, मध्यमवर्गाने आधुनिकतेच्या नावाने पाश्चात्य जीवनशैली जवळ केली. पण त्याचवेळी आपली पाळेमुळे टिकवून ठेवण्याची धडपडही सुरूच ठेवली. त्यातून ही बुवाबाजी वाढते आहे. यातून भक्तिभावनेचा बाजार उभा राहिला आणि धार्मिक उत्सवापासून ते सर्व पातळीवरील बाबा, बुवा, महाराजांचे अमाप पीक बाजारात आले. प्रश्न केवळ बुवा, बाबा, शास्त्री, स्वामी, महाराजांकरवी फैलावल्या जाणाऱ्या अंधश्रद्धांचा नाही. त्याची प्रदीर्घ परंपरा पूर्वापार येथे आहेच. या आंधळ्या आणि वेडगळपणाच्या पातळीवर वैचारिक मांडणी करणाऱ्या गुरू, महाराजांना जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे, तो चिंताजनक आहे. जनसामान्यांची द्विधा मन:स्थिती आणि खंबीर राजाश्रय, यामुळे हे प्रस्थ समाजात एवढे वाढले आहे.
फॅसिझमचे विध्वंसकारी रूप जगाने बघितले आहे. व्यवस्था परिवर्तनाबद्दल बोलावयाचे नाही; काल्पनिक शत्रू उभा करायचा, मुक्तीचे अतिशय सोपे तत्त्वज्ञान सांगावयाचे, एका नेत्याच्या शब्दावर चालणारी संघटना उभारायची, हिंसेचे वावडे मानायचे नाही, साधनसाध्य शूचिता मोडीत काढायची, काही काल्पनिक स्वप्नांचा भुलभुलैय्या उभा करून लोकांची बुद्धी पांगळी करायची, ही झाली फॅसिझमची काही वैशिष्ट्ये. जर्मनीमधील नाझींचा अभ्यास केला तर सहजपणे हे कळू शकेल. बाबा लोक आज या देशात जे करत आहेत, त्याला फ्रेंडली फॅसिझम हा शब्द वापरता येईल.
कोणताही बुवा-बाबा समाजात व्यवस्थापरिवर्तनाबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. स्वत:ला शरण येण्याचे फर्मान काढतो आणि त्यातच मुक्ती असल्याचा पुकारा करतो. बाबाचा शब्द हीच त्याच्या साम्राज्याची घटना असते वा वेदवाक्य. मग ते सत्यसाईबाबा असोत वा पांडुरंगशास्त्री आठवले, रजनीश असोत वा नाना धर्माधिकारी; बहुसंख्य बाबा आपली कार्यपद्धती गुप्ततेने चालवतात. तेथे नैतिकतेचा संबंधच नसतो. बाबांचा शब्द हेच ब्रह्मवाक्य आणि हीच नैतिकता. विरोधी ब्र उच्चारणाऱ्याला धमकावण्यापासून ठोकण्यापर्यंतचे सर्व मार्ग वापरले जातात. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्यांचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही घेतलेली असते. अट एकच असते, बुद्धी वापरावयाची नाही. या देशाला असलेला फॅसिझमचा धोका गुजरात दंगलीनंतर अधिकच स्पष्ट झाला आहे. बुवाबाजीचे सर्व पंथ, उपपंथ या फॅसिझमला अनुकूल अशी संरचना निर्माण करत असतात.
बुवाबाजीपासून स्वत: आणि समाज दूर राहण्यासाठी आणि ठेवण्यासाठी असा संकल्प करावयास हवा की, मी स्वत:वरचा विश्वास गमावणार नाही. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे धैर्याने जगणे यात माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत:चे प्रश्न काय आहेत व ते कसे सोडवायचे, ते कुठपर्यंत सुटू शकतात, याचे भान आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद याचा वापर करून येते. सर्वमान्य नीतिसंकेतांचे पालन करणे, यामुळे आचरणात कणखरता येते. स्वत: बुवाबाजीपासून दूर राहणे आणि इतरांना या मानसिक गुलामगिरीतून दूर ठेवणे, यातच जीवनाची सार्थकता आहे. जो गुरू, बाबा, स्वामी, महाराज भक्तांच्या सर्व प्रश्नांची कायमस्वरुपी सर्व उत्तरे आयुष्यभर देण्याची जबाबदारी घेतो, तो त्या भक्ताला अधिकाधिक गाळात नेतो, परावलंबी बनवतो. खरा गुरू भक्ताला स्वच:च्या पायावर उभे राहून जीवनसंघर्षांच्या रणधुमाळीत लढण्याची हिंमत व ताकद देतो. त्याला सजग समर्थ डोळस बनवतो. स्वत:च्या विवेकबुद्धीच्या रूपाने असा एक गुरू तरी आपल्या प्रत्येकाजवळ असतोच असतो; निर्भयपणे आणि कृतिशीलपणे त्याला कौल लावण्यास आपण शिकले पाहिजे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...