बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

त्याला जगायचंय, त्याला लढायचंयही


त्याला जगायचंय, त्याला लढायचंयही
दाभोलकर, मदत    




त्याचे नाव मनोज बबन आढाव, वय वर्षे १२, मु. पो. सांगवी (ता. सिन्नर, जि. नाशिक). आई-वडील दोघेहीजण मजुरीला जाऊन पोट भरणारे. निसर्गाने त्याला लहानपणापासूनच मधुमेह बहाल करून साखरसम्राट बनविले होते. पहिलीत असताना रोगाचे निदान झाले. त्या सहा-सात वर्षांच्या पोराला डॉक्टरांनी सांगितले, गोड-धोड बघून उगीच जीव पाखडू द्यायचा नाही. कडुलिंब खायचा, भात पूर्ण वर्ज्य, आणखी अशीच कडक पथ्यं; पोरगं निग्रही. त्याने पथ्य अगदी कडक म्हणजे कडक पाळायला सुरुवात केली. झालं उलटंच; चक्कर येऊ लागली, तोंडाला फेस येऊ लागला. मग आणखी मोठ्या डॉक्टरांना दाखविलं. त्यांनी समजावलं, ‘इतके कडक पथ्य नाही पाळायचे. साखर एकदम कमी होते. थोडी बाजरीची भाकरी, थोडा भात खात जा. साखर रक्तात जास्त नको, तशी कमीपण नको. मनोजने स्वत:चे स्वत:ला अ‍ॅडजेस्ट करून घेतले. कधी साखर कमी झाल्याने चक्कर येते वाटले, तर थोडी साखर खावी आणि ती किती खावी, याचे गणित त्याचे त्याने जुळविले. पण वर्षभरातच पथ्यावर भागेना. गोळ्या पुऱ्या पडेनात. इंजेक्शन अपरिहार्य बनले. रोज दोनदा हे इंजेक्शन घ्यायला हवे. सकाळी १० युनिट, संध्याकाळी २० युनिट. रोज डॉक्टर भेटणे, परवडणे आणि त्यांनी इंजेक्शन टोचणे, हे सारे ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतमजुराच्या पोरासाठी अशक्यच. मनोज स्वत: इंजेक्शन योग्य त्या प्रमाणात भरायला आणि टोचून घ्यायला शिकला. इंजेक्शनचा खर्च महिन्याला ६०० रुपये. एवढे पैसे दरमहा बाजूला काढणे म्हणजे सगळ्याच कुटुंबाची कसरत. मनोज यंदा सहावीला गेला. शाळा सोमठाणे येथे. घरापासून ३ किलोमीटर दूर. इंजेक्शन घेऊन धावत-पळत मनोज शाळा गाठायचा. उन्हातल्या त्या धावपळीत साखर कमी होऊन चक्कर येऊन पडायचा. नवीन मुख्याध्यापकांनी आजारपणासाठी शाळा सोडण्याचा सल्ला दिला. मनोजच्या वडिलांना तो सोयीचा वाटला. मनोजची शाळा सुटली. आणखी तीन महिन्यांतच बाळूमामांच्या मेंढरांचा कळप नाशिक जिल्ह्यात आला. बाळूमामाचा कृपाप्रसाद लाभलेली व त्यामुळे आजाऱ्याला बरे करण्याची अद्भुत शक्ती मिळालेली, असे या मेंढरांचे वर्णन केले जाते.’ वडिलांनी मनोजला बाळूमामाच्या मेंढरात सोडला. औषधे बंद केली. एक महिना त्या मेंढरात मनोज राहिला. इंजेक्शनशिवाय आपण जगत नाही, हे एव्हाना त्याला चांगले कळले होते. त्याने इकडून-तिकडून थोडे पैसे जमा केले. इंजेक्शन घेऊन मनोजने मेंढरांचा कळप सोडला. तो घरी परतला. बापाला ते फारसे रुचले नाही. शाळा सुटलीच होती. पोटासाठी काहीतरी मिळवणे गरजेचे होते. आदार माणिकराव कोकाटे यांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी पैशाची सोय करून मनोजला एक टपरी टाकून दिली. मनोज टपरीवर स्वत:चे पोट चालवू लागला. औषधापुरते पैसे मिळवू लागला. एवढ्यात कुठूनतरी गुटख्याचे भयानक दुष्परिणाम मनोजला समजले. त्यामुळे टपरीवरील गुटख्याची विक्री त्याने बंद केली. अर्थातच ते धंदाच बंद करण्यासारखे होते. मनोज आणि त्याची आई यांनी ही टपरी कशीबशी सुरू ठेवली आहे, एवढेच. चासनळी (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथील कृष्णा चांदगुडे व त्यांच्या मानवता संघाच्या सभासदांना ही बातमी कळली. श्रम न करता मनोजला शाळेत येता-जाता यावे, यासाठी त्यांनी त्याला सायकल घेऊन दिली. मनोजची धावपळ जरा वाचेल. परंतु या गोंधळात जानेवारी उजाडला. त्यामुळे मनोजचे हे वर्षतर गेलेच; मात्र तो जिद्दीने पुढच्या वर्षी पुन्हा सहावीत बसून शिक्षण सुरू ठेवण्याची व किमान बारावीपर्यंत पूर्ण करण्याची हिंमत बाळगून आहे. अर्थात हे सोपे नाही. औषधाच्या किमती त्याच राहिल्या असे मानले तरी दर महिन्याला किमान ६०० रुपये लागतील. बेभरवशाची मजुरी आणि टपरी यावर कुटुंबाचे पोट चालवून एवढी रक्कम दरमहा उभारणे मनोजच्या आई-वडिलांना अशक्यच आहे. त्यासाठी समाजातील शेकडो हात पुढे झाले तर मात्र अशक्य काहीच नाही.

     

(डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वरील लेखाला अनुसरून मनोजची बातमी दै. सकाळच्या सर्व आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्याच दिवशी साम मराठी या वाहिनीवर स्पेशल रिपोर्ट दाखविण्यात आला. मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद चांगला मिळाला. ८० हजार रुपये जमा झाले व पाच वेगवेगळ्या संस्थांनी मनोजला दत्तक घेण्याची तयारी दाखविली. यामध्ये महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा समावेश आहे. डॉ. दाभोलकर, कृष्णा चांदगुडे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस, नाशिक) व ‘सकाळ’ परिवार यांच्यामुळे मनोजचा लढा समाजासमोर आला. मदतीचे शेकडो हात पुढे आले. आज मनोज एका नवीन जीवनासाठी सज्ज झाला आहे.)

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(मे २००९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...