मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

पाऊल पडते पुढे

पाऊल पडते पुढे
दाभोलकर, भूमिका, कार्यक्रम


अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे कार्य करते आहे. समितीचा विचार लोकांना आधी रूचत नाही, रूचला तर पचत नाही आणि आचरणात तर येतच नाही; स्वाभाविक समितीचे काम अवघड आणि अप्रिय आहे. समितीकडे कसलीही राजकीय ताकद नाही; फार मोठी कार्यकर्त्यांची फौज नाही. आर्थिक क्षमतेद्वारे प्रभाव पाडण्याचा तर प्रश्नच येत नाही. कार्यकर्ते आहेत; पण पूर्णवेळ कार्यकर्ते अपवादात्मकच. या सर्व अडचणींचा मुकाबला करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपले प्रभावक्षेत्र वाढवते आहे, याचा चळवळीतील कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना सार्थ अभिमान वाटावयास हवा. संघटनेचा विचार सत्य आणि समाजाला पुढे नेणारा आहे, याबद्दल जनमानसात एक समर्थन आढळते. हे समर्थन आढळते, याचे काही उघड दृश्य पडताळे आहेत. लोकमानसाचे समर्थन राजकीय पक्षांना पाहिजे असते. सत्तारूढ पक्ष जनमानसाचे हे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करतो. यापलिकडे समाजात काही मान्यवर संस्थाही असतात की, ज्यांना दीर्घकालीन कामगिरीमुळे नावलौकिक प्राप्त झालेला असतो. या दोन्ही पातळीवर विचार केला तर काय आढळते?
     
फेब्रुवारीमध्ये वैज्ञानिक जाणिवा व अंधश्रद्धा निर्मूलन याचा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्याचे राज्यव्यापी चर्चासत्र समितीने घेतले, ते रयत शिक्षण संस्थेबरोबर. ही संस्था भारतातील एक सर्वांत मोठी शिक्षणसंस्था आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्याच्या कामात समितीबरोबर त्यांनी यावे, यामध्येच समितीच्या लोकशिक्षणाच्या कामाची पावती मिळून जाते. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील पहिले सर्पमित्र संमेलन वनखात्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर संयुक्तपणे घेतले. सर्व खर्च शासनाने केला. वनमंत्री आवर्जून उपस्थित राहिले. वनखात्याच्या प्रधान सचिव पूर्ण दीड दिवस मुक्काम ठोकून होत्या. समितीने केलेल्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्याहीपलिकडे जाऊन आणखीही काही देण्यात आले. यामध्ये वनखात्याचे मंत्री व प्रशासन यांची मानसिक उदारता आहेच; परंतु त्याबरोबरच समितीला निर्माण झालेल्या मान्यतेचाही भाग आहे. नव्याने भरती झालेल्या पोलिसांचे प्रशिक्षण करणारी केंद्रे महाराष्ट्रात आहेत. या एकेका केंद्रात पाचशे प्रशिक्षणार्थी असतात. त्यांच्या प्रशिक्षणात आयुष्यभर उपयुक्त ठरणाऱ्या काही पूरक बाबींचा समावेश त्या केंद्राचा प्राचार्य, जो जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या दर्जाचा असतो त्याच्यामार्फत केला जातो. अनेक प्रशिक्षण केंद्रे आवर्जून समितीचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कार्यक्रम ठेवतात आणि तो उपयुक्त असल्याची दाद मनापासून देतात. सामाजिक वनीकरणाचे संचालनालय हे पर्यावरणरक्षणाचे कामही करते. त्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेनुसार महाराष्ट्रातील आठ हजार माध्यमिक शाळांच्यात हरितसेना स्थापन झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली काही वर्षे होळीच्या बाबतीत पर्यावरणाच्या दृष्टीने काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते. सामाजिक वनीकरण विभागाने या सर्व उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात केवळ स्वागत केलेले नाही, तर हरितसेनेमार्फत ते उपक्रम यावर्षी राबवण्यात येत आहेत. पर्यावरणसुसंगत निर्माल्य व गणेश विसर्जन याची सुरुवात समितीने करून १० वर्षे उलटली. आता बहुतेक नगरपालिका, महानगरपालिका, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे छात्र निर्माल्य गोळा करतात. गणेशाच्या मूर्ती पाण्यात विरघळणाऱ्या शाडू मातीच्या असाव्यात, यासाठी हरितसेनेने यंदा पुढाकार घेतला. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने समितीने सुचविलेलेच पर्याय देत सर्व नगरपालिका व महानगरपालिकांना पत्रे आणि त्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश जोडलेले होते, त्याचा अर्थ हा कार्यक्रम ‘अंनिस’च्या मागणीशी पूर्ण सुसंगत असा होता.
     
जादूटोणाविरोधी कायदा करण्याची मागणी समितीने लावून धरली. कायदा मंत्रिमंडळात मंजूर झाला. विधानसभेत पारित झाला. मात्र त्यापुढची त्याची वाटचाल अडखळत सुरू आहे; परंतु हे देखील लक्षात घ्यावयास हवे की, अजूनही कायदा करणारच, या मुद्द्यावर शासन ठाम आहे. संयुक्त चिकित्सा समितीकडे कायद्याचे प्रारूप सोपवण्यात आले आहे. त्या संयुक्त चिकित्सा समितीत कायदा व्हावा, या मताच्या आमदारांचे बहुमत आहे. यामुळे कायदा होईल, अशी आशा करण्यास नक्कीच जागा आहे.
     
समितीचा मार्ग प्रबोधन, रचना, संघटन व संघर्ष हाच आहे. राजकीय पक्ष अथवा शासन यांच्या दारात आम्हाला पदरात घ्या, अशा लाचारीने समिती कधीही गेलेली नाही. तरीही समितीच्या कार्याचा जो प्रभाव निर्माण झाला आहे, त्यामुळे त्या कामाची मान्यता व अनुकुलता वाढत आहे. प्रतिकुलता संपली म्हणून हुरळून जाण्याचे काहीच कारण नाही; परंतु पावले योग्य दिशेने पडत आहेत आणि त्या मार्गावर शासनाचा हात स्वत:हून पुढे येतो आहे, हे नक्कीच आश्वासक आहे. दीर्घ पल्ल्याची थकवा आणणारी अवघड वाटचाल करत असताना हा दिलासा नक्कीच आश्वासक आहे.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च २००८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...