रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

भूकंपग्रस्त विभागाची मानसिकता




भूकंपग्रस्त विभागाची मानसिकता
दाभोलकर, भूकंप, मानसिक अपघात, भयग्रस्तता, जनसंवाद
भूकंपग्रस्त भागातील भौतिक पुनर्वसनाचे काम धीमेपणे आकार घेत आहे. घरे, वीज, पाणी, फोन, रेशन, चादर, कपडे, शेतीला मदत, जीवनावश्यक अन्य बाबी यांचे वाटप कमी-जास्त प्रमाणात झाले आहे. मात्र याचा अर्थ सर्व काही सुरळीत आहे, असे नाही. विशेषत: लोकांच्या मानसिकतेचे वर्णन तर भयग्रस्तता व विमनस्कता असेच करावे लागेल. त्यातही भूकंपामध्ये ज्या गावात मृत्यू झाले, त्या गावांच्या बरोबरच ज्या गावात फक्त वित्तहानीच झाली व जिल्ह्यातील ज्या गावात फक्त धक्के बसले, नुकसान असे काही झाले नाही, या सर्व विभागात कमी-जास्त प्रमाणात वरील बाबी आढळतात.

जबरदस्त मानसिक अपघाताचे ताबडतोबीचे मनावर होणारे परिणाम हे सुरुवातीलाच होऊन गेले आहेत. आघातानंतर महिना ते दीड महिन्यांनी दिसू लागतात. सुमारे सहा महिन्यांपर्यंत त्यांचा उद्भव व्यक्तींच्यामध्ये होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने याची गणना मानसिक आजारातच केली आहे. पोस्टट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर या नावाने प्रामुख्याने ते ओळखले जातात. त्याबरोबरच ग्रीफ रिअ‍ॅक्शन एंक्झायटी, डिप्रेशन याचे रुग्णही आढळतात. या स्वरुपाच्या मानसिक प्रतिक्रिया भूकंपासारख्या अनपेक्षित आघातानंतर काही प्रमाणात नैसर्गिक असल्या तरी काही प्रमाणात ते आजारच असतात. औषधोपचार न करता त्यातील काही बरे होतातही. परंतु योग्य उपचाराशिवाय हे ताण व्यक्तीवर दीर्घकाळ प्रभाव गाजवून त्याला त्रासदायक ठरण्याचीही शक्यता असते.

अशा रुग्णांवरील उपचारांसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या शासनाच्या पुण्याच्या संस्थेस मध्यवर्ती संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. याबरोबरच सोलापूर मेडिकल कॉलेजमधील मानसोपचार विभाग, लातूर, सोलापूर येथील शासकीय रुग्णालये यांनीही काही योजना आखल्या आहेत. उमरगा व औसा या दोन भूकंपग्रस्त तालु्क्याच्या ठिकाणी प्रत्येकी दोन पूर्णवेळ मानसोपचारतज्ज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ही बेंगलोरची संस्था भूकंपग्रस्तांच्या मानसिकतेचा पुढील पाच वर्षे अभ्यास करण्याचा प्रकल्प उभारत आहे, असेही सांगण्यात येते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समितीचे कार्यकर्ते असलेले डॉ. प्रदीप पाटकर, रायगड व डॉ. प्रसन्न दाभोलकर, सातारा या मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपल्या कार्यकर्त्यांचे थोडे प्रशिक्षण केले. त्याआधारे एक प्रश्नावली घेऊन कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. सालेगाव, सास्तुर, होळी, एकोंडी, राजेगाव, रेबेचिंचोळी, तावशीगड, उदमपूर वगैरे गावांत ही पाहणी झाली. छातीत सतत धडधडणे, झोप न लागणे, घडलेल्या घटनांचे विचार व चित्र परत मनासमोर येणे, जेवण व काम यात मन न लागणे, थोडा आवाज झाला तरी घाबरायला होणे, जगण्यात अर्थ नाही असे वाटणे, या स्वरुपाची लक्षणे घरात कोणाकोणात आढळतात, याचीही पाहणी होती. मात्र प्रश्न महत्त्वाचे नाहीत. संबंधित कुटुंबांशी सहानुभूतीचा संवाद महत्त्वाचा आहे, याची पक्की जाण कार्यकर्त्यांना देण्यात आली होती. शासनाने अशा स्वरुपाचे सर्वेक्षण केले आहे, असे आम्हाला सांगण्यात आले होते; प्रत्यक्षात तसे कोठे आढळले नाही. हे जिव्हाळ्याचे बोलणे वेगळे व उपयुक्त वाटल्याचे बहुतेकांनी सांगितले. मनाचा आजार म्हणजे वेड लागणे, अशीच सार्वजनिक समजूत होती. यामुळे मनाला अस्वस्थ वाटते का, याच शब्दात चर्चा केली जात असे व माणसे मोकळी होऊन बोलत. अनेक स्त्रिया स्वत:चा अनुभव कधी-कधी चहात साखरेऐवजी तिखटच घालतो, समोर भाकरी तव्यावर असते; पण पुढे काय हे सुचत नाही. निवडायला घेतलेल्या तांदळातून नुसती बोटेच फिरत राहतात व नजर कुठेतरी शून्यावर नकळत लागून राहते, वाटी खाली पडून आवाज झाला तरी दचकायला होते, असे सांगत. सर्वेक्षणाच्या दहा प्रश्नांपैकी तीनपेक्षा अधिक प्रश्नांना होकारार्थी उत्तर येणाऱ्यांची तपासणी मानसोपचारतज्ज्ञ करत व आवश्यकतेनुसार औषधे देत. येते सहा महिने या उपक्रमात सातत्य राखण्याची कल्पना आहे. पोस्टट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असलेल्या व्यक्तींचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के आढळले. स्त्रियांची संख्या त्यात स्वाभाविकच अधिक होती.

अधिक व्यापक पातळीवर सर्व गावांतून हे काम करणे अत्यावश्यक दिसते व त्यासाठी काही बाबी लक्षात घ्यावयास हव्यात. मानसिक उपचार यंत्रणेचा शासकीय सांगाडा उपलब्ध आहे. मात्र या योजनेत गावातील अशा रुग्णांचे एकत्रित गट घेऊन मानसोपचार करण्याची कल्पना आहे. लोक यासाठी घराबाहेर येणे हे शक्य वाटत नाही. त्यामुळे ही योजना फारशी उपयुक्त ठरू शकणार नाही. यासाठी तीव्र मानसिक धक्क्यानंतर मनाचे काही आजार उद्भवतात, त्यावर उपचार असतात, ते घेणे इष्ट असते. त्यामुळे फायदा होतो याची कल्पनाच लोकांना नाही. ती घराघरात, मनामनात पोचावयास हवी. यासाठी उमरगा तालु्क्यातील भूकंपग्रस्त ३२ गावांत छात्रभारतीने संयोजित केलेल्या युवा दक्षता समित्या आम्हाला मदत करत आहेत. त्यांचे थोडे प्रशिक्षणही आम्ही घेतले. अशा स्वयंसेवी संस्था वा लातूर, सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या सहाय्यातून हे घडू शकेल. मात्र संबंधितांना उपचारासाठी घराबाहेर आणण्याएवढेच याबाबत त्यांच्याशी आपुलकीने व समंजसपणे बोलणे हे महत्त्वाचे आहे, याची जाण बाळगावयास हवी. याबरोबरच किमान एक मानसोपचारतज्ज्ञ आठवड्यातून एकदा प्रत्येक भूकंपग्रस्त गावात जाईल, हे बघावयास हवे. चार पूर्णवेळ मानसोपचारतज्ज्ञ गावांची संख्या ८२, वाहने व अन्य सुविधा लक्षात घेता हे सहज शक्य आहे. तालु्क्याच्या ठिकाणी मानसोपचारतज्ज्ञ राहतील व लोक त्या ठिकाणी येतील, हे घडणार नाही. गावातील उपचारही मानसोपचारतज्ज्ञांच्या हाताखालील कोणाकडे तरी सोपवणे उचित होणार नाही.

लोकांच्या मनातील भयग्रस्तता ही अधिक गंभीर बाब आहे. ही भावना कमी-जास्त प्रमाणात; परंतु सर्वदूर पसरलेली आहे. ३०, ३१ ऑक्टोबरला भूकंपाचा मोठा धक्का बसणार, असे ज्योतिषाचा हवाला देऊन बोलले गेले. नंतर १३ नोव्हेंबर, अमावस्या या दिवसाची भीती सर्वांच्या मनात आढळली. अमक्या-तमक्या ठिकाणी जोरदार धक्का बसला, अमक्या तमक्या ठिकाणी लोक दगावले, आणखी कुठल्यातरी ठिकाणी जमिनीवर एका बाजूला प्रचंड फुगवटा व दुसरीकडे खड्डा तयार झाला, आणखी कोठे जिच्या खोलीचा अंदाज लागत नाही, अशी भेग जमिनीला पडली, जमिनीतून लाव्हा रस बाहेर पडणार आहे, अशा अनेक गोष्टी बोलल्या जात असतात. याबरोबरच पडलेल्या घरांच्या ढिगाऱ्यातून हाका ऐकू येतात, तेथे काही स्त्रिया फिरताना दिसतात व अचानक अदृश्य होतात, या गोष्टी देखील तिखट-मीठ लावून सांगितल्या जात आहेत.

अनेक सुशिक्षितांच्या बोलण्यात विश्वासार्ह म्हणून ज्या पत्रकाचा उल्लेख आला, ते थोडक्यात पुढीलप्रमाणे  - जिल्हाधिकारी कार्यालय’, उस्मानाबाद येथे नोंदवून ठेवलेल्या पुढील भूकंपाच्या तारखा. या तारखा ९३-९४ या दोन्ही सालासाठी दिलेल्या आहेत. पत्रकाचे चार भाग असून पहिल्या भागात अमेरिका, जर्मनी, जपान यांनी दिलेल्या तारखा, दुसऱ्या भागात पंजाबमधील ज्योतिषांचे अंदाज, तिसऱ्या भागात भूकंपाचे मोठे धक्के बसणाऱ्या तारखा व चौथ्या भागात सर्वानुमते एकमत झालेल्या भूकंपाच्या तारखा यांचा उल्लेख आहे. ही पत्रके अनेकांनी सद्भावनेने शाळांना पाठवली आहेत. पत्रकाच्यावर जिल्हाधिकारी कार्यालय असे जरी लिहिले असले तरी खाली कोणाची सही आहे का? प्रकाशक कोण आहे? परदेशी भूकंपतज्ज्ञ मराठवाड्यात येऊन हा अंदाज कधी घेऊन गेले? ज्योतिषशास्त्र नसताना त्या आधारे भूकंपाची अचूक वेळ कशी सांगता येईल? भूकंप केव्हा होणार व केवढा होणार? याचा पूर्वअंदाज शास्त्रालाच आज घेता येत नसताना मोठ्या धक्क्यांच्या तारखा कशा व कोणी सांगितल्या? सर्वानुमते काही तारखांच्यावर एकमत झाले, म्हणजे काय? हे सारे घबराटीच्या मानसिकतेमुळे कोणी विचारलेही नाही. उलट असे प्रश्न आम्ही उपस्थित केल्यावर त्याचा चुकीच्या पद्धतीने प्रतिवाद केला गेला. उमरगा, नळदुर्ग या गावात अपवाद वगळता सर्वचजण आज घराबाहेर झोपतात. इतर अनेक ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. किल्लारीला वर्षभर आधी धक्के बसले व नंतर मोठा भूकंप झाला, तेव्हा आमच्या भागात आणखी वर्षांनी तो होईल, असा प्रतिवाद सतत केला जातो. लाईट गेली तर दवाखान्यातले पेशंटचे नातेवाईक इमारतीतून बाहेर पळाले. पेशंट मृत झाला तरी वीज येईपर्यंत ते आत आले नाहीत, असे उदाहरण एका डॉक्टरने सांगितले. घरात झोपण्याची इच्छा आहे; पण बायका-मुले तीव्र विरोध करतात, असे आणखी जणांचे म्हणणे. पत्र्यावर दगड पडला तर खेड्यातले लोक दचकतात आणि रस्त्यावरून ट्रक गेल्याने होणारा आवाज व हादरा याने सुशिक्षितांच्या घरातही पोटात भीतीचा गोळा येतो अशी अवस्था. मुलांचा अभ्यास अशा अवस्थेत होणार कसा? दहावी, बारावीमधील विद्यार्थ्यांना तर अधिकच अडचण. भूकंपाने हानी झालेल्या गावांची मानसिकता आणखी वेगळी बनली आहे. सर्व रेशन मोफत मिळते, अनेक वस्तूंचे वाटप होते. त्यामुळे मजुरीला दीडपट दर देऊनही लोक शेतात जाण्यास उत्सुक नाहीत. संभाव्य मदतीच्या आशेने गावातील घरांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. पुण्या-मुंबईला कायमचे गेलेले लोक खोपटे टाकून मदतीची वाट पाहत आहेत. दारू मिळतेच, काम नसलेले हात, मोकळे मन, भयग्रस्तता, अफवा या सर्वांतून अशी मानसिकता निर्माण होत असेल, हे सांगण्याची गरज नाही. ती बदलणे ही एक सर्वप्रथम प्राधान्याची गरज झाली आहे.

डोळस व निर्भय मानस बनवण्यासाठी जनसंवादाची मोहीम प्रभावीपणे चालू करावयास हवी. भीती अनाठायी आहे, हे पटवून द्यावयास हवे. भूकंपात एकही आर.सी.सी. बांधकाम जमीनदोस्त झाले नाही, तेव्हा अशी घरे असलेल्यांनी तरी ताबडतोब घरात झोपावयास सुरुवात करावयास हवी.

तीन प्रकारचे प्रशिक्षण करता येईल. एक म्हणजे भूकंपापासून स्वत:चा बचाव कसा करावा, यावर इंग्लिशमध्ये अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. भूकंप टाळता येणार नाही; परंतु प्राणहानी या उपायांनी नक्कीच मर्यादित करता येईल. दुसरा मुद्दा घरबांधणीचा. मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. याचे कारण घरे चुकीच्या पद्धतीने बांधलेली होती. भरपूर जाड भिंती व बांधकामासाठी फक्त माती व दगडाचे गोटे वापरलेले. स्वाभाविकच बाहेरून चिरेबंदी दिसणाऱ्या; पण प्रत्यक्षात अनेक वर्षांच्या पावसाने फुगलेल्या या भिंती कोसळल्या नसत्या तरच नवल. सिमेंट, वाळू, विटांनी आधुनिक पद्धतीने बांधलेल्या भिंतीची जाडी कमी असूनही अशा बांधकामांचे तुलनेत बरेच कमी नुकसान झाले आहे. भूकंपासंदर्भात घराची चाचणी कशी करावी, डागडुजी काय करावी, नव्याने बांधकाम करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती स्ट्रक्टरल इंजिनिअरमार्फत लोकांना देता येईल. अशा धक्याला सामोरे जाताना कोणते त्रास होतात? त्याची कोणती लक्षणे दिसतात? मुलांना त्यातून बाहेर कसे काढावे? मोठ्यांनी आपले मन कसे सावरावे? याबाबत मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरू शकतो.

या गोष्टी एकत्रितपणे करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जलोटा यांच्याशी बोललो. त्यांना ही कल्पना अतिशय योग्य वाटली व संयोजनात जिल्हा परिषदेचे पूर्ण सहकार्य त्यांनी देऊ केले. लातूर जिल्ह्यातही याची कार्यवाही होणार आहे.

संवाद उपयोगी पडतो. धीर वाढवणारा ठरतो, असा अनुभव अणदूर व नळदुर्ग येथील ग्रामस्थ; तसेच उमरग्यातील प्रतिष्ठित व्यक्ती, संघटना यांच्याशी बोलल्यावर आला. गावाची मानसिकता बदलण्याची गरज असून खेळ, गाणी, गोष्टी, पथनाट्य, भजन अशा अनेक बाबी त्यासाठी उपयोगी ठरू शकतील. गावामध्ये निर्भय फलक बसवण्याची कल्पना असून त्याद्वारे लोकांना परिस्थितीची वस्तुनिष्ठ कल्पना देणे, आधार देणे व निर्धार कायम ठेवणे काही प्रमाणात शक्य होईल. जनमानस निर्भय व डोळस बनण्यासाठी शास्त्रज्ञ, कलाकार, पत्रकार, साहित्यिक यांचाही सहभाग या जनसंवाद मोहिमेत अपेक्षित आहे. डॉ. वसंत गोवारीकर, श्रीराम लागू, निळू फुले वगैरेंनी तो देऊही केला आहे.

प्रचंड संख्येने व अकाली झालेल्या मृत्यूमुळे भुते, पिशाच्य याबाबतची भीती पसरू लागली आहे. त्याचा वेळीच प्रतिकार करावयास हवा. त्यातील फोलपणा उघडकीला आणण्यासाठी १३ डिसेंबर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी उद्ध्वस्त गावात रात्रभर राहण्याची कल्पना आहे. याबरोबरच गंडे, ताईत, दोरे, अंगारे, धुपारे, छोटे-मोठे यज्ञ या अंधश्रद्धा देखील निर्धाराने व जागरूकपणे प्रयत्न केल्यास रोखता येतील.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अचानक कोसळणाऱ्या नैसर्गिक आपत्तीस (भूकंप, ज्वालामुखी, पूर, वादळ वगैरे) समर्थपणे तोंड देण्याची क्षमता ७५ टक्के विकसनशील देशाकडे नाही. १९९५ सालापर्यंत याबाबतचा ब्ल्यूप्रिंट संबंधित सर्व राष्ट्रांनी तयार करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. या आपत्तीकालीन उपाययोजनेत समर्थ व कृतिशील मानसिकतेचा भाग मोठा आहे. मात्र इतिहासातील शौर्याच्या आपण कितीही गप्पा मारत असलो तरी प्रत्यक्षात ही मानसिकता आपल्या समाजात निर्माण झालेली नाही. सहा-सहा वर्षे बॉम्बगोळ्यांच्या वर्षावात धैर्याने वागणारी राष्ट्रे आपणास माहिती आहेत; मग वीरश्रीचा वारसा सांगणाऱ्या लोकांनी निसर्गाने आपल्याविरुद्ध पुकारलेल्या एका छोट्या युद्धाचा मानसिक पातळीवर खंबीर मुकाबला करावयास नको काय?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी १९९४)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...