सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

‘विवेकजागरा’वरील हल्ला : अर्थ व अन्वयार्थ





विवेकजागरावरील हल्ला : अर्थ व अन्वयार्थ
दाभोलकर, विवेकजागर, विरोध
३१ मार्चला जो प्रसंग घडला, तो स्वाभाविकच मन प्रक्षुब्ध करणारा होता. वातावरण बराच काळ तणावपूर्ण होते. मात्र डॉ. लागू व मी दोघेही शांत होतो. इतके शांत आम्ही कसे राहू शकतो, याचा विचार करताना आमच्या लक्षात आले की, हा कार्यक्रम करताना मनामध्ये नकळत; पण निश्चितपणे अशा हल्ल्याची शक्यता आम्ही गृहीत धरली होती. त्यामुळे एका अर्थाने अनपेक्षित असलेला हल्ला दुसऱ्या अर्थाने अजिबात अनपेक्षित नव्हता. वादावादी, कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न, दमदाटी हे प्रकार या कार्यक्रमात यापूर्वीही कुर्डुवाडी, सांगली येथे झाले होते. सगळीकडे प्रकार साधारण सारखाच. गंध लावलेल्या तरुणांचे टोळके, स्वत:ला कट्टर धर्माभिमानी म्हणवणारे, तोंडात अरेरावीची भाषा देवाधर्माबद्दल बोलला तर याद राखा, धडा शिकवू. चर्चा करण्याऐवजी हाणामारी करण्याची इच्छा.

औरंगाबादचा प्रकार यापुढे महाराष्ट्रात अन्यत्र होणारच नाही, असे मानता येत नाही. या प्रवृत्तींना मिळालेला सत्तेचा ‘आशीर्वाद’ विसरणे चूक ठरेल; पण मग आपण काय करायचे? डॉ. लागू व मी यांचा निर्धार आहे की, हे कार्यक्रम (आणि अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य) पूर्ण ताकदीने चालू ठेवायचे. पण लोकांना काय वाटते? हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना काय वाटते?

पहिला मुद्दा तर व्यावहारिक आहे. कार्यक्रमात वा त्यानंतर गोंधळ घालणे वा गुंडगिरी करणे याची शक्यता गृहीत धरावयास हवी. त्यासाठी पोलिसांच्या उपस्थितीची मागणी सनदशीरपणे करावयास हवी. परंतु केवळ पोलिसांवर अवलंबून राहून चालणार नाही. आपण हात उगारणार नाही, हे अगदी खरे; पण उगारलेला हात धरण्याची ताकद आपल्याकडे नक्कीच हवी. ती आपण कमवावयास हवी (खरे तर आजही अनेक ठिकाणी ती मित्रसंघटनांसह आपणात आहे) याही पुढे जाऊन आपल्यावर हात उगारण्याची हिंमतच होणार नाही, एवढे सामर्थ्य आपण मिळवावयास हवे.
यापुढे जाऊन या प्रकाराच्या मानसिकतेकडे कसे पाहता येईल?
मारहाण करण्याचा प्रयत्न ही चूकच अशी धादांत खोटी बातमी प्रसृत करणाऱ्या देवगिरी तरुण भारतलाही म्हणावे लागले. (चित्रलेखा ८ एप्रिल) बहुतेक जणांनी मुद्द्यांचे उत्तर देता येत नाही म्हणून गुद्द्यावर आले, याचाही आवर्जून उल्लेख केला आहे. परंतु तरीही हितचिंतकांनीच काही मुद्दे उपस्थित केले. त्यातील एक असा की, तुम्ही अगदी एकसारखे, नेटाने हे अंधश्रद्धा निर्मूलन इतके का लावून धरता? त्यामुळे तुम्ही लक्ष्य बनता - हा मुद्दा मला तर चूक वाटतो. आपल्या कार्याला आज जे काही थोडेबहुत यश, मान्यता मिळाली आहे, ती आपल्या कार्याच्या दहा वर्षांच्या चिकाटीमुळेच. दुसऱ्या काहीजणांचे म्हणणे असे की, ‘देवाधर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत, ही भूमिकाही सोडा. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य बुवाबाजी, भूत, भानामती, जादूटोणा अशा गोष्टींच्या पुरतेच मर्यादित करा. हे शक्य नाही इष्टही नाही, अशी भूमिका घेतली, असे क्षणभर गृहीत धरू, तरीही विरोधकांचे समाधान त्यामुळे होईलच कशावरून? यात्रेतील देवाच्या नवसाच्या नावाने होणारी पशुहत्या थांबवा म्हटले (जे सर्व साधू-संत, समाजसुधारकांनी म्हटले आहे) तरी यांचा देव कोपतो, धर्म बुडतो. चमत्कार नाही म्हटले की, यांना परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी अविश्वास दाखवला म्हणून राग येतो. गणपती दूध पित नाही, असे शास्त्रीय सत्य सांगणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळतात. अंगात देवी येत नाही, असे म्हटले की, देवीचा अपमान होतो. त्यामुळे देव, धर्म या कल्पनेच्या चिकित्सेला विरोध करावयाचे म्हटले तर पाऊल पुढे पडणे अवघड. तटस्थता याचा अर्थ एवढाच की, देवधर्म सोडूनच चळवळीत या, असे समिती म्हणत नाही आणि व्यासपीठावरून नास्तिकवादाचा व दुसऱ्या बाजूला देवाधर्माचा प्रचार करत नाही. ही भूमिका समजून घेताना लोकांना वेळ लागतो, हे खरे; पण दहा वर्षांपूर्वीपेक्षा आता ही भूमिका पटत चालली आहे, हेही खरे. तुम्ही तटस्थ आहात फक्त बोलण्यापुरते. वस्तुस्थितीत तुम्ही नास्तिकच आहात, असाही एक आक्षेप आहे. चळवळीत काही काळ राहिलेला कार्यकर्ता हळूहळू आपोआप देव धर्माचे अस्तित्व प्रश्नचिन्हांकित करू लागतो, हे खरे आहे. यामधून पुढे तो देवधर्म नाकारतोही; परंतु चळवळीत सहभागी होण्याची ही पूर्वअट नाही आणि चळवळीतले त्यांचे स्थानही त्याच्या नास्तिक असण्या-नसण्यावर अवलंबून नाही; शिवाय समितीच्या कार्यात विविध धर्माचे लोक आहेत आणि त्यांचे याबाबतचे आचरण यामध्ये फरकही आहे. तो स्वाभाविक आहे. समितीच्या व्यासपीठाच्या वर संघटनेच्या सहभागाच्या चौकटीत देवधर्माबाबत तटस्थता समिती आवश्यक मानते. व्यक्ती नास्तिक आहे का, हा मुद्दा त्यामध्ये गौण बनतो.

विषमता आणि शोषण यांचा पाया : धर्म
विचारले जाणारे सर्व प्रश्न, मुद्दामहून उठवले जाणारे काहूर, हे सर्व लक्षात घेताही ‘विवेकजागरा’चा कार्यक्रम मला समितीसाठी, आपल्या चळवळीसाठी उपयुक्त वाटतो. गेली तीन वर्षे हा कार्यक्रम चालू आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी जो नावाजला आहे. जेथे-जेथे तो झाला, तेथे-तेथे संयोजकांनी श्रोत्यांनी त्यातील मांडणी विचाराला चालना देणारी वाटल्याचे आवर्जून सांगितले आहे. याही पुढे जाऊन एका ज्येष्ठ दलित कार्यकर्त्याने याबाबत औरंगाबादला याबद्दल व्यक्त केलेले मत परखड; पण वास्तवाचा वेध घेणारे आहे. त्याच्या मते, ‘लागू, दाभोलकर या आडनावाची माणसे देव, धर्म, अंधश्रद्धा याची चिकित्सा करावयास बसतात, त्यावेळी इथल्या प्रतिगामी सनातन्यांना खरा हादरा बसतो. स्वत:च्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या गोटाला आतून हादरा बसल्यासारखा वाटतो. याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की, धर्मचिकित्सेची चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गाडगे महाराजांच्या नंतर महाराष्ट्रात जवळपास थांबलेलीच आढळते. धर्म हा अनेकदा विषमता व शोषण याचा पाया असतो, याचा विसरच त्यामुळे पडत आहे. उलट धर्माभिमानी म्हणवत, धर्माला कुरवाळत त्या आधारे धर्मा-धर्मात विद्वेषाचे विखार पेरण्याचे कार्य महाराष्ट्रात पद्धतशीरपणे चालू आहे. त्या आधारे राजकारण खेळले जात आहे. अनेक कारणांनी अगतिक झालेला सामान्य माणूस या भूलथापांना बळी पडत आहे. एवढेच नव्हे, तर त्यामुळे भांबवलेल्या पुरोगामी शक्तींनाही या धर्मभावनांना आपणही फार कुरवाळू नये, असा संभ्रम पडत आहे. धर्माचा नैतिक आशय तर या सगळ्या राजकीय खेळीत कधीच लुप्त झाला आहे. यासाठी धर्मचिकित्सेचे आंदोलन महाराष्ट्रात पुन्हा उभारण्याची गरज आहे. विवेकजागराच्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यामधून धर्माबद्दल माणसे डोळस बनण्यास होणारी सुरुवात ही ज्यांचे समाजकारण, राजकारण, धर्मद्वेष आणि धर्मआंधळेपणा यावर अवलंबून आहे, त्यांना कसे रूचणार? ही मीमांसा जर सत्य असेल तर मग याचा अर्थ काय? तो असा की, दहा वर्षांच्या अखंड प्रयत्नांमधून आपली चळवळ ही आता एका योग्य आणि पुढच्या टप्प्यावर पोचली आहे. तो आहे विधायक धर्मचिकित्सा करण्याचा आणि त्या विचाराला कृतिशील बनवण्याचा पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या औरंगाबादमधील संघटना, डावे पक्ष यांच्या बैठकीत मी हा विचार मांडला आणि त्या सर्वांनी तो एकमुखाने उचलून धरला, याचे विशेष समाधान वाटते.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे १९९६)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...