मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

भानामती नव्हे.... मनोविकृती




भानामती नव्हे.... मनोविकृती
दाभोलकर, भानामती, भानामतीचे प्रकार, मानसशास्त्र, उपाययोजना, भांडाफोड
भानामती हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर एक चित्र आपोआप उमटते. अचानकपणे पेटणारे अथवा फाटणारे कपडे, घरावर येऊन पडणारे दगड, घरातील अन्नात राख वा विष्ठा मिसळली जाणे, बंद कपाटातील वस्तू बाहेर येणे, वस्तू गूढ पद्धतीने नाहीशा होणे, अशा अनेकविध घटनांना भानामती किंवा काळी जादू मानली जाते. भानामती झालेली व्यक्ती कोनाड्यात किंवा खुंटीवर बसते, केसाने छताला लटकते, तिच्या डोळ्यातून, नाकातून, कानातून सुया, दाभण, खिळे बाहेर पडतात. सर्व अंगावर आपोआप बिब्ब्याच्या फुल्या उमटतात. अशा समजुती सर्व महाराष्ट्रात आढळतात. मराठवाड्यात हे समज तर पक्के आहेतच; पण त्याचबरोबर मराठवाडा विभागाची म्हणून एक स्पेशल भानामती आहे ती अन्यत्र कोठेही आढळत नाही. ही भानामती झालेली व्यक्ती शरीराला आळोखे-पिळोखे देते. त्या व्यक्तीच्या; बहुसंख्यवेळी स्त्रीच्या अंगात येते. केस मोकळे सुटतात, स्वत:च्या कपड्याचे भान राहत नाही, असंबद्ध बडबडणे, विचित्र पाहणे, हसणे, विव्हळणे, गळा काढून रडणे असे बघणाऱ्यांची मती गुंग करणारे प्रकार चालू होतात. गटागटाने महिलांच्या अंगात येते, पुढची वाट मग स्वाभाविकपणे बाबा, बुवा, मांत्रिक, भगत, जाणत्या यांच्याकडे वळते. व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, गावाच्या बरबादीला सुरुवात होते.

मराठवाड्यात या सर्वांच्या विरोधात समिती गेली आठ वर्षे लढत आहे. प्रत्यक्ष चळवळीमुळे लोकमानसात स्थिरावलेले भानामती या शब्दाचे अनेक अर्थ लक्षात आहेत. त्याचे प्रमुख तीन विभाग होतात.

मनोविकार, अंगातले संचार, भुंकणे व सुया हुल्या
व्यक्तीला तीव्र स्वरुपाचा मानसिक विकार निर्माण होतो. वेडेवाकडे हातवारे, स्वत:शीच बडबडणे, हसणे, अतिबडबड किंवा सुन्न बसून राहणे, जेवणाच्या पात्रात अळ्या अथवा विष्ठा दिसणे, निरनिराळे पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज ऐकू येणे, ते प्राणी-पक्षी दिसणे या स्वरुपाचे भास होणे, या लक्षणांमुळे गंभीर मनोविकृतीला संबंधित व्यक्तीवर भानामती केली आहे, असे मानले जाते. अंगात आलेल्या बाईच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रासंगिक विघटन झालेले असते. त्या घागरी फुंकत असतात. केस मोकळे सोडून घुमत असतात. जळता कापूर खातात, या प्रकारांनाही काही वेळा भानामती असेच मानले जाते.

सुया हुल्या हा खास मराठवाडी ग्रामीण शब्द आहे. काही स्त्रियांना छातीत, पोटात टोचल्यासारख्या वेदना होतात. नैराश्यामुळे अशा संवेदनाचा उगम मानसिक असतो, रुग्णांचे अंतर्मन मनोव्यथांचे रूपांतर शारीरिक वेदनात घडवून आणते. करणी करणारा मांत्रिक आपल्या जवळील बाहुल्यांमध्ये सुया टोचून रुग्णांमध्ये या वेदना निर्माण करतो, असाही समज लोकांमध्ये असतो (या वेदना शारीरिक आजार जसे - पोटाचा टी.बी., अल्सर, मूत्राशयाचा दाह इत्यादीमुळे ती होऊ शकतात. जीवनसत्त्वाच्या कमतरतेतूनही होतात.) या सर्व लक्षणांना सुया हुल्या (हुल्या= मळमळ) असे नाव आहे. ही लक्षणे भानामतीची समजली जातात.

भुंकणारी भानामती  
ही मराठवाड्याची स्पेशालिटी आहे. जोरजोराने विशिष्ट लयीत संबंधित स्त्री कण्हत असते. त्या आवाजाला भानामतीचे भुंकणे समजले जाते. हे प्रकार गटागटाने चालतात. विशेषत: ग्रामीण, अशिक्षित महिला वर्गात, मराठवाड्यात अनेक खेड्यांत हे रुग्ण आणि त्यामधून निर्माण झालेली भयग्रस्त मानसिकता आढळते. हा एक संस्कृतीबंधित (कल्चर बाइंड) मनोविकार आहे. मराठवाड्याची हद्द ओलांडल्यावर नंतर हा प्रकार इतरत्र आढळत नाही. भुंकणारी भानामती झालेली व्यक्ती उपचारासाठी मांत्रिक, वैदू यांच्या आहारी जाते. पैसा खर्च करते, सामाजिक आर्थिक शोषण निमूटपणे सोसते.

भानामतीचा दुसरा प्रकार वर सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे आपोआप दगड पडणे, कपडे कातरले जाणे, डोळ्यातून उघडे, काचा निघणे, स्त्रीच्या अंगावर बिब्ब्याच्या फुल्या उठणे या प्रकारचा असतो. तो मराठवाड्यात व महाराष्ट्रात सर्वत्र दिसतो.

स्त्रियांना मासिक पाळीचे अंगावर पांढरे जाण्याचे आजार अनेकदा व दीर्घकाळ आढळतात. या स्वरुपाच्या सर्व विकारांना अशिक्षित ग्रामीण बाई भानामतीचे विकार या एकाच सदरात टाकते. याबरोबरच पोटाचा टी.बी., अल्सर, मधुमेह, त्वचा आजार हे दीर्घ व सातत्याच्या उपचारांची गरज असलेले आजार आहेत. जुना दमाविकार डॉक्टरांना दाद देत नाही. प्रदीर्घ औषधोपचार करावा लागल्यानंतर आजार समजावून घेण्याऐवजी तो बाहेरबाधेचे लक्षण समजला जातो; शिवाय दीर्घ आजार माणसाच्या मनावर ताण निर्माण करतो. विकाराची वेदना लोळणे, घुमणे या स्वरुपात बाहेर पडू शकते. बरा न होणारा आजार व काही वेळेला त्या आजाराचा मानसिक आविष्कार, यामुळे त्याला भानामती मानले जाते.

भानामतीची भयानकता
मराठवाड्यात; विशेषत: आंध्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात अनेक गावे अशी आहेत, की जणू काही सर्व गावच भानामतीने ग्रस्त आहे, वाटावे. एखादी बाई भुंकू लागली की बघता-बघता डझनवारी बायका त्या आवाजात सूर मिसळतात. गावात भयग्रस्त वातावरण तयार होते. गावची भानामती हा मानसिक आजार आहे. तो औषधोपचार व मानसोपचार यांनी दूर होऊ शकतो. त्याचबरोबर सामाजिक, कौटुंबिक वातावरणही बदलावे लागते, याची माहिती गावकऱ्यांना नसते. कोणीतरी तांत्रिक, मांत्रिकानेच हे केले, असा गावकऱ्यांचा समज असतो. ग्रामीण भागातील अनेक डॉक्टर मंडळी भानामतीच्या रुग्णाला उपचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ही केस आमच्या वैद्यकशास्त्रातील नाही, असे सांगून रुग्णांची बोळवण करतात. यामुळे गावाचा गैरसमज अधिकच पक्का होतो. भानामतीग्रस्त व्यक्तीला घेऊन त्याचे कुटुंबीय भगत-देवऋषी यांच्या मागे लागतात. भानामती करणाऱ्या मांत्रिकापेक्षा पॉवरफुल मांत्रिक असेल, तरच भानामती बाबा दूर करता येतो, असा सार्वत्रिक (गैर) समज आढळतो. अशा जाणत्याच्या शोधात भटकत बडा पहाड, सैलानीबाबा, गाणगापूर, दत्तसंस्थाने अशा ठिकाणी वाऱ्या सुरू होतात. उपचार करणारा तांत्रिक, मांत्रिक रुग्णाला शारीरिक वेदना होतील, अशी कृती करतो. कोणी भानामती केली सांग?’ असा सवाल दरडावून विचारला जातो. वेदनांनी त्रस्त झालेली आणि समज बेताचीच असलेली महिला कोणाचे तरी नाव सांगते. नाव फुटले, नाव फुटले म्हणत गावकरी मंडळी त्या इसमाचा शोध घेतात. त्याला चोप देतात. गावात जगणे त्याला मुश्कील होते. गावातील भांडणाचे ते मोठे कारण होते. कधी-कधी त्याची हत्या होते. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालु्क्यातील सिळपणी गावच्या दत्तू सटवाई कोतवाल (सूर्यवंशी) या दलित कोतवालाचा खून तीन वर्षांपूर्वी भानामती करून गावाला त्रास देतो म्हणून ग्रामस्थांनी केला होता.

भानामती-करणी या क्षेत्रात ज्यांचे नाव घेतले जाते, ती मंडळी विशेषत: गोसावी, जंगम, मातंग, पोतराज, कुडमुडे, ज्योतिषी, दलित अशी असतात. दलित, पीडित समाज अगोदरच गावात दबून वागत असतो. कधी पोटा-पाण्यासाठी, तर कधी अंगात खरेच येते, या अज्ञानापायी, भ्रमापायी त्यातील काहीजण भगतगिरी करतही असतात. पण या प्रकारात दुसरे कोणी आपले नाव घेईल, त्यामधून जीवावर बेतेल, हे त्यांच्या गावीही नसते आणि तसा आळ गावकऱ्यांनी घेतल्यावर गाव सोडून परागंदा होण्याची वेळ येते.

भानामतीमागचे मानसशास्त्र
प्रत्येक माणसाला मन आहे. मेंदू मनाचे कार्य करतो. त्यामध्ये बुद्धी, भावना, वैयक्तिक व सामाजिक व्यवधान, स्मरणशक्ती, सारासारबुद्धी इत्यादींचा समावेश होतो. माणसाच्या मनाचे फ्राईड या शास्त्रज्ञाने ढोबळ मानाने दोन भाग पाडले. एक जागृत मन, दुसरे सुप्त मन. आजूबाजूच्या वातावरणातून निर्माण झालेला राग, भीती, द्वेष, घृणा या भावना; तसेच जागृत पातळीवर व्यक्त न करता येण्यासारखे ताण अंतर्मनात दडपले जातात, साठले जातात. हा ताण जागृत पातळीवर न येण्याची अनेक कारणे आहेत. सीमित भाषा, ज्ञान, सामाजिक दडपण अशा अनेक कारणांमुळे मानसिक ताण जागृत अवस्थेत व्यक्त होत नाहीत. सासूबद्दलचा संताप, व्यसनी नवऱ्याबद्दलचा वैताग, आर्थिक अडचणींमुळे कुचंबणा अशा अनेकविध नाराजी अंतर्मनात दडपून टाकलेल्या असतात. एका मर्यादेनंतर हे साठवून ठेवण्याची त्या माणसाच्या मनाची क्षमता संपते. पाणी अडवून ठेवण्याची धरणाच्या भिंतीची क्षमता संपल्यानंतर ती भिंत फुटू नये, यासाठी धरणाचे दरवाजे उघडले जातात. जादा पाणी वाहू दिले जाते. धरणफुटीचा धोका टळतो. भानामतीद्वारा याच प्रकारे अंतर्मनातील दाब कमी केला जातो. भानामतीने झपाटलेल्या व्यक्तीची प्रत्येक कृती - ओरडणे, लोळणे, विव्हळणे, घुमणे, थुंकणे ही ताण कमी करण्यासाठी असते. भुंकणे हे एक प्रकारचे रडणेच असते. दु:ख व्यक्त करण्याच्या या प्रकाराला हिस्टेरिकल हायपरव्हेंटिलेशन (उन्मादावस्थेतील अतिमनमोकळेपणा) म्हणतात. मानसिक दमछाक होणे आणि त्यानंतर ठराविक गतीने, ठराविक वेळी भानामतीचा संचार अंगात होणे. याला कारण तशी पारंपरिक शिकवणच मराठवाड्यातल्या मानसिकतेने मिळाली आहे. ही भुंकणारी भानामती इतरत्र आढळत नाही. याचे कारण मराठवाड्यातील पारंपरिक समजुती, वातावरण, सामाजिक स्थिती, थोडक्यात; ज्याला आपण कल्चर म्हणतो, ते सर्व या प्रकाराला पोषक आहे. हा प्रकार पिढ्यान्पिढ्या चालत आलेला आहे, चालूही आहे. म्हणूनच भानामतीला वैज्ञानिक परिभाषेत कल्चर बाऊंड सिंड्रोम असे म्हणतात. व्यक्ती ज्या पारंपरिक विचाराने, संस्कृतीने बांधलेली असते म्हणूनच मराठवाड्यातील भानामती हा संस्कृतीबाधित विकार आहे. घट्ट सामाजिक वीण, मागासलेपणा, शिक्षणाचा अभाव, आर्थिक दैन्य जास्त असलेल्या खेडेगावात आणि प्राधान्याने महिला वर्गामध्ये भानामती आढळली नाही, तरच नवल.

भानामतीवरील उपाययोजना
भानामतीवर उपचार करणाऱ्या लोकांचे - बाबा, बुवा, महाराज, मांत्रिकाचे - मराठवाड्यात अमाप पीक खेडोपाडी आहे. त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर एक महत्त्वाचे सत्य त्यांच्याच तोंडातून बाहेर येते ते असे की, बहुसंख्यजण कबुली देतात की, भानामती बंद करण्याची कोणतीही विद्या, मंत्र-तंत्र आमच्याकडे नाही. भानामती झालेल्या व्यक्तीचे आणि त्याच्या नातेवाईकांचे समाधान करणे हीच छा-छू करण्याची गरज असते. योगायोगाने वा स्वत:ची प्रतिकार शक्ती वाढून कोणी बरे झाले की, त्याचे श्रेय मांत्रिकाच्या नावावर चढते. अशा जाणत्यांच्याकडे न जाणेच श्रेयस्कर.

बंगलोरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थने मानसिक आजारावरील उपचारासाठी कम्युनिटी सायकीअ‍ॅट्री नावाचा एक प्रकल्प चालविला होता. मनोरुग्णतेचा उपचार करताना मानसोपचारतज्ज्ञ हा एक घटक आहे. त्याचबरोबर संबंधितांना कुटुंबियांना या उपचारात जाणीवपूर्वक सहभागी करून घेणे, हा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. अशा आजाराभोवती बाहेरची बाधा, झपाटणे या अंधश्रद्धांचे गूढ वलय असते. गावातील मान्यवरांच्याकडून (सरपंच, शिक्षक, सरकारी अधिकारी) या अंधश्रद्धांबाबत स्पष्ट भूमिका घेणे हे आवश्यक व महत्त्वाचे असते. त्या उपाययोजनेचाही या सामूहिक मानसोपचार पद्धतीत समावेश आहे. चौथा महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या कौटुंबिक, सामाजिक वातावरणाच्या ताणातून हा मानसिक आजार निर्माण होतो, त्याचे निराकरण करण्याचा सोशल वर्कर या कार्यकर्त्यामार्फत प्रयत्न.

नांदेड अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार मुलमुले हे मानसोपचारतज्ज्ञ आहे. तसेच डॉ. जोशी, नांदेड, डॉ. पाटील पती-पत्नी, लातूर हे सर्व मानसोपचारतज्ज्ञ चळवळीशी जोडलेले आहेत. त्यांच्या पुढाकाराखाली भानामतीचे सर्वेक्षण, भानामतीबाबत प्रबोधन, प्रत्यक्ष गावात जाऊन लोकांच्या अंधश्रद्धांचे निराकरण आणि उपचार शिबिरे असा कार्यक्रम गेली सात वर्षे समिती चालवित आहे. अकराशेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. मात्र अजूनही भानामती याबाबतची लोकांची अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात कायम आहे. भानामती प्रबोधनाची मराठवाडाव्यापी धडक मोहीम आहे ती यासाठी.

भानामतीची उपाययोजना प्रामुख्याने स्त्रियांच्याबाबतच करावयास हवी. कारण फार मोठ्या संख्येने स्त्रियाच या अंधश्रद्धेच्या बळी असतात. स्त्रियांची संख्या अधिक असते. याचे कारण त्यांचा संवेदनशील स्वभाव, भावनांचा कोंडमारा, लैंगिक असमाधान, पतीविषयी, मुलांविषयी असलेल्या अपेक्षांची पूर्ती न होणे, कौटुंबिक त्रास, आर्थिक चिंता अशा अनेकविध बाबीत असते. मानसिक चिकित्सा, ताण आणणाऱ्या घटकांचा निरास याद्वारे याबाबत उपाय होऊ शकतो; परंतु याबरोबर स्त्री सुधारणांचा व्यापक संदर्भही लक्षात ठेवावयास हवा. स्त्रियांना शिक्षण मिळणे, समान दर्जा मिळणे, आर्थिक स्वायत्तता निर्माण होणे, सामाजिक प्रतिष्ठा लाभणे या गोष्टी ज्या प्रमाणात घडतील, त्या प्रमाणात भानामतीचे भुंकणे अशा भडक मार्गाने स्वत:ची अभिव्यक्ती करण्याची गरज त्यांना राहणार नाही.

भानामती हा मानसिक आजार आहे. तो औषधे मानसोपचार व सामाजिक वास्तवात बदल याने संपुष्टात आणता येतो, हे समजणे, पटणे आणि त्याचा समाजात प्रचार करणे हे फार महत्त्वाचे आहे. समाजाशी संबंधित अनेकविध घटकांच्यात भानामतीबद्दल भरपूर अंधश्रद्धा आढळतात. शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, विद्युत मंडळाचे कमर्चारी, पोलीस, आरोग्यसेविका, सरपंच, तालुका पंचायत व जिल्हा परिषदेचे सदस्य या सर्वांना भानामतीबाबतचे सत्यज्ञान होणे आणि त्यांनी त्या विचारांचे वाहक बनणे फार गरजेचे आहे. असे झाले तर या अंधश्रद्धेला लोकमानसात असलेली मान्यता झपाट्याने कमी होईल.

भानामतीचा भांडाफोड
भानामती शब्दाचा आणखी एक अर्थ आपोआप घडणाऱ्या गूढ घटना. घरावर दगड पडणे, अचानक कपडे फाटणे, पेटणे, बंद कपाटातील वस्तू बाहेर येणे, वस्तू अचानक नाहीशा होणे. असे प्रकार घडू लागले की, भीतीचे वातावरण पसरते. करणी, जादूटोणा, काळी जादू यावरील लोकांचा विश्वास दृढ होऊ लागतो. ही भानामती सर्वत्र आढळते. मराठवाड्यात अर्थातच तिचे प्रमाण भरपूर आहे.

या स्वरुपाचे सर्व प्रकार महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील समितीच्या कार्यकर्त्यांनी आव्हानपूर्वक शोधून काढले आहेत, थांबवले आहेत. गेल्या आठ वर्षांतील अशा प्रकरणांची संख्या दीडशेहून अधिक असेल. हे प्रकार हुडकून काढण्याचे एक प्रभावी तंत्र समितीने तयार केले आहे. मराठवाड्यातील समितीच्या लातूर शाखेने त्या आधारे भानामतीचे अनेक प्रकार जे इतरांना मती गुंग करणारे वाटत होते, ते शोधून काढून संपुष्टात आणले आहेत. हे सर्व प्रकार करण्यामागे व्यक्ती सायकॉलॉजिकली माल अ‍ॅडजेस्टेड (मानसिकदृष्ट्या जुळवून घेऊ न शकणारी) वा मेंटली अ‍ॅबनॉर्मल (मनोविकृत) असते. या व्यक्तींना अपयश आलेले असते; परंतु त्याला अनेकदा त्या व्यक्ती कारणीभूत नसतात. परिस्थितीच त्यांच्या हाताबाहेरची असते. आलेल्या अपयशाने व्यक्ती वैफल्यग्रस्त व तिरस्कृत बनते. अशा वेळी लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधणे, स्वत:ला सहानुभूती मिळवणे, यासाठी भानामतीचे प्रकार घडविले जातात. परंतु त्यामुळे घरातल्यांना शेजाऱ्या-पाजाऱ्यांना भरपूर त्रास होतो. भीतीचे वातावरण तयार होते व लोकांच्या मनातील अंधश्रद्धांना बळकटी मिळते म्हणूनच याविरोधात सतर्क व कृतिशील राहावे लागते. त्याबरोबरच पोलीस खात्यालाही याबाबतचे प्रशिक्षण देण्याचाही प्रयत्न करावयास हवा. मराठवाड्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील जिल्ह्यातही हे प्रकार घडतात. परंतु याची पाहणी करून उपाययोजना सुचविण्यासाठी कर्नाटक शासनाने पंधरा वर्षांपूर्वीच बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एच. नरसिंहय्या यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमले होते. त्याचा रिपोर्टही उपलब्ध आहे. अशा घटनांच्या बंदोबस्तासाठी निजामाच्या राज्यात भानामती पथकाची निर्मिती करण्यात आली होती. महाराष्ट्र शासन देवदासी प्रश्नांप्रमाणेच याबाबत अभ्यास गटाची स्थापना करू शकेल आणि त्यातील शिफारशीप्रमाणे पुढील कार्यवाहीची दिशा ठरवू शकेल. समिती गेली आठ वर्षे ही मागणी शासनाकडे करत आहे. भानामतीची घटना ज्यांना कळविणे बंधनकारक आहे, अशी समिती नेमल्यास आणि त्या समितीत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असल्यास ताबडतोब भानामतींच्या सर्व घटनांचा तपास करून उपाय सुचविता येतील. घबराट टाळता येईल, गूढ शक्तीचा फोलपणा लोकांना कळेल.

भानामती हा मराठवाड्यावरील कलंक आहे. जिद्द, निर्धार व सामूहिक प्रयत्न दाखविले तर एकविसाव्या शतकात पाऊल टाकताना मराठवाड्यातील भानामतीला कायमची रजा देणे शक्य होईल, असा अंधश्रद्धा निर्मूलन समितीला विश्वास वाटतो.

थोडक्यात महत्त्वाचे
·         भानामती म्हणून घडणाऱ्या घटनांच्या मागचे गूढ निश्चितपणे उलगडता येते. आपल्या जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा.
·         अंगात येणे, लोळणे, घुमणे, भुंकणे हा भानामतीचा प्रकार म्हणजे सौम्य       स्वरुपाची मनोविकृती आहे. त्यावर उपचार करावा.
·         स्त्रियांना समान वागणूक मिळावी, त्यांचा सामाजिक दर्जा सुधारावा. शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन मिळावे, यासाठी सामूहिक प्रयत्न करावा.
·         एखादी व्यक्ती भानामती करते या अंधश्रद्धेपोटी तिचे जगणे मुश्कील करणे योग्य नव्हे, तो गुन्हाही आहे.
·         विचार करूया, कार्यकारणभाव शोधूया, भानामतीला मूठमाती देऊन मराठवाडा भानामतीमुक्त करूया.

भानामती मोहीम आखणी
·         निलंगा, नांदेड, लातूर येथे संयोजन बैठका-एकूण आठ जीप, आठ जथ्थे. प्रत्येक जथ्थ्याबरोबर मानसोपचारतज्ज्ञ वा डॉक्टर, संपूर्ण लातूर जिल्हा ढवळून काढणार- ३०० खेड्यांशी थेट संपर्क.
·         डिसेंबरअखेर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत भानामती प्रबोधन मोहीम - प्रत्येक ठिकाणी व्याख्याने, मानसोपचारतज्ज्ञांच्या मुलाखती, पोस्टर, पुस्तके
·         उपचार शिबिरांचे स्वतंत्र आयोजन - मी पाहिलेली भानामती/मी अनुभवलेली भानामती यावर लेखन स्पर्धा.
·         उद्घाटन ता. ११ मे लातूर-कुलगुरू जनार्दन वाघमारे. प्रमुख पाहुणे निळू फुले, समारोप ता. ६ उदगीर-औरंगाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. देशमुख व डॉ. मोहन आगाशे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे १९९७)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...