बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

कृतिशील धर्मचिकित्सेला विधायक प्रतिसाद




कृतिशील धर्मचिकित्सेला विधायक प्रतिसाद
दाभोलकर, धर्मचिकित्सा, विसर्जित गणपती दान, पर्यावरण, उपक्रम, समाजमान्यता
पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जित गणपती दान करा या उपक्रमास ज्या-ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी नेटाने संयोजन केले, त्या सर्व ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचे काही वृत्तांत या अंकात दिले आहेत. एकूण अनेक ठिकाणी पार पडलेल्या या उपक्रमावर एक दृष्टिक्षेप टाकण्याचा हा प्रयत्न आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास ५००० गणपती दान मिळाले, सातारा जिल्ह्यात सातारा शहर -१२००, कराड - १०००, पाटण - १००, मल्हारपेठ - ३५ असा प्रतिसाद मिळाला. पुणे येथे १२३० मूर्ती मिळाल्या. नाशिक येथे १०००, सोलापूरला ५५०, लातूरला १५० एवढी माहिती लेख लिहीपर्यंत हाती आलेली आहे. तरीही याचा अर्थ १०,००० हून अधिक गणपती निश्चित दान मिळाले आहेत.

जवळजवळ सर्व प्रसारमाध्यमांनी या कल्पनेचे स्वागत केले. वृत्तपत्रांनी अधिक विस्तृत बातम्या दिल्या. काही वृत्तपत्रांनी लेखही प्रसिद्ध केले. प्रत्यक्ष उपक्रम पार पडल्यानंतर त्याला उचित प्रसिद्धीही मिळाली. स्थानिक वृत्तपत्रांनी फोटोसह या बातम्या दिल्या. दूरदर्शन व विविध मराठी वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे छोटे-मोठे वृत्तांत दाखवले. पुणे आकाशवाणीने आधी व नंतर योग्य प्रकारे विषय लोकांच्यापर्यंत पोचवला. टाईम्स ऑफ इंडियासारख्या इंग्लिश वृत्तपत्रानेही योग्य प्रकारे प्रसिद्धी दिली. सातारा, लातूर अशा ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांनी विसर्जनस्थळाला भेट देऊन कल्पनेचे सक्रिय स्वागत केले. खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी मंत्री व सध्याचे आमदार अभयसिंहराजे भोसले अशा अनेक राजकारणी लोकांनीही उपस्थित राहून पाठिंबा दिला. सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष असे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गणेशोत्सव मंडळाचे सदस्य असलेले जिल्हा परिषदेतील कर्मचारी या सर्वांनी एकत्रितपणे निर्णय करून गणपती दान दिला व एक चांगला पायंडा उभा केला. हा उपक्रम घरगुती गणेशमूर्तीसाठी होता, तरीही काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आग्रह करून मूर्ती दान दिली. ज्या भागात हे कार्यक्रम झाले ते क्षेत्र ज्या नगरसेवकाच्या हद्दीत येत होते, त्या नगरसेवकांनी आवर्जून पाठिंबा नोंदवला. पुणे येथे ज्या दोन ठिकाणी विसर्जन झाले, त्या दोन्हीकडचे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते. त्या दोघांनीही उपस्थित राहून पाठिंबा दिला. त्या-त्या भागातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी या मोहिमेस स्वत:हून सहकार्य देऊ केले, तर पुण्याच्या नेने घाटावर आजूबाजूच्या नागरिकांनी गणेशमूर्तींच्या प्रतीकात्मक विसर्जनासाठी मोठे टब आणि स्वच्छ पाणी देऊ केले व प्रतिवर्षी देण्याचे आश्वासन दिले. परंतु सर्वात मोठा व उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला, सर्व थरातील नागरिकांच्याकडून. सर्वत्र अनुभव असा आला की, अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने मूर्ती मिळाल्या आणि त्याबरोबर कौतुकाचे व सहकार्याचे शब्दही. पाठीवर फिरणारा हा आश्वासक हात खरोखरच अनपेक्षित होता. म्हणूनच तेवढाच आनंददायीही. हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. खरे तर याआधीच तो सुचावयास पाहिजे होता. आम्ही या कार्यक्रमात पुढील वर्षी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तयार आहोत,’ अशा प्रकारचे प्रोत्साहन सतत मिळत होते. महानगरपालिका, नगरपालिका, स्वयंसेवी संस्था अशा अनेकांनी उपक्रमाला पाठिंबा दिला. सक्रिय सहकार्य केले. बहुसंख्य ठिकाणी किती मूर्ती दान मिळतील, हा अंदाज फसला. मिळणाऱ्या मूर्तींची संख्या इतकी जास्त होती की, व्यवस्था अपुरी पडल्याने नियोजित वेळेच्या आधीच दान स्वीकारणे बंद करणे भाग पडले. 

या उपक्रमाला मिळणारा पाठिंबा पाहून काहीजणांचे पित्त खवळणे स्वाभाविक होते. याचा प्रभाव काही ठिकाणी जाणवला. कोल्हापूर व सातारची माहिती इतरत्र आहेच. पुणे येथे एस. एम. जोशी पुलाखाली झालेल्या प्रमुख कार्यक्रमात गोंधळ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दोघा-तिघांनी केला. (त्यांचा प्रतिवाद वृत्तपत्र प्रतिनिधींनी परस्परच केल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली.) पुणे येथे महापौर आधी येतो, म्हणाले आणि ऐनवेळी त्यांना हा उपक्रम वादग्रस्त वाटल्याने आले नाहीत. कराड नगरपालिकेलाही तसेच वाटले. त्यामुळे त्यांनी सहकार्य देण्यास नकार दिला. सोलापूर येथे मात्र विरोध करणाऱ्या या शक्तींना मर्यादित अर्थाने यश आले. सातव्या दिवशी जे विसर्जन झाले, त्यावेळी जाणीवपूर्वक तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला गेला व त्यामुळे अनंत चतुर्दशीला या उपक्रमास पोलीस कमिशनर यांनी परवानगी नाकारली. वाद आपल्या बाजूने पूर्णपणे टाळण्याच्या सूचना सर्व ठिकाणी देण्यात आल्या होत्या. बहुसंख्य ठिकाणी त्याचे चांगले पालन झाले. त्यामुळे मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याचा विरोधकांचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. विरोधकांचे मत साधारणपणे अपेक्षितच होते. मूर्तीचे पाण्यातील विसर्जन हा त्यांच्या लेखी पवित्र धर्मश्रद्धेचा भाग होता आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचाच कार्यक्रम असल्याने विसर्जनाची पवित्र धर्मश्रद्धा अंधश्रद्धा बनते, असा आक्षेप होता. हिंदू धर्मच का सुधारता हे तुणतुणे होतेच; शिवाय नदीचे प्रदूषण कारखान्यांनी होते, ड्रेनेजने होते त्याबद्दल का बोलत नाही, हा देखील एक तिरकस प्रश्न होताच. कार्यक्रमाला एकूण मिळणारा अनपेक्षित उत्साही प्रतिसाद व कार्यकर्त्यांचे संयमी वागणे यामुळे विरोधकांच्या इच्छा फलद्रुप मात्र होऊ शकल्या नाहीत. कल्पना जनमानसात थेट पोचल्याने आपापल्या ठिकाणी लोकांनी आपापले मार्ग शोधले. त्यातील काही पुढीलप्रमाणे :- मातीची मूर्ती आणून स्वत:च्या घरी स्वच्छ पाण्याच्या टबात विसर्जन करण्यात आले. ते पाणी झाडांना घालण्यात आले. आपापल्या कॉलनीतील मूर्ती आपापल्या कॉलनीतच समारंभपूर्वक विसर्जित करण्यात आल्या. नंतर बाहेर नेऊन निर्गत करण्यात आल्या. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची घरी बसवलेली मोठी सुबक मूर्ती घरीच शोकेसमध्ये ठेवण्यात आली. ती पुढे (काही वर्षे तरी) प्रतिवर्षी प्रतिष्ठापित करण्यात येईल. त्यासोबत आणलेली एक अतिशय छोटी मूर्ती तळ्यात/नदीत विसर्जित करण्यात आली. घराच्या बागेत खड्डा खणून त्यात मूर्ती विसर्जित करण्यात आली. चांदीची अथवा चांदीचे पाणी दिलेली धातूची मूर्ती काही महिलांनी विकत आणली व प्रतिवर्षी त्याच मूर्तीची स्थापना करण्याचे ठरवले. मूर्तीसोबतचे निर्माल्य गोळा करणे, या बाबीला आता जवळपास सार्वत्रिक मान्यता लाभली आहे. त्यामुळे याबाबत विरोध संभवत नाही. परंतु विसर्जित गणपती दान करा ही मोहीम नेटाने चालवावी लागेल. त्यासाठी पुढीलवर्षी संभाव्य रूपरेखा अशी राहू शकेल -

१. उपक्रमाची तयारी सुमारे तीन महिने आधी चालू करणे.
२. नामवंत व्यक्ती, सामाजिक संस्था यांचा पाठिंबा मिळवणे. तो प्रसिद्ध करणे.
३. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात उतरवणे.
४. आपापल्या ठिकाणी ज्या-ज्या संस्था हा उपक्रम करतील त्यांना प्रोत्साहित करणे.
५. मूर्ती मातीची असावी, आकार लहान असावा, रंग वनस्पतीचे असावेत, विसर्जन घरगुती असावे याचा प्रचार करणे.
६. मूर्ती विसर्जित न करता घरीच ठेवाव्यात आणि प्रत्येक वर्षी त्याच प्रतिष्ठापित कराव्यात, यासाठी आवाहन करावे.


अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०००)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...