बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

महाराष्ट्राची वाटचाल बाराव्या शतकाकडे


महाराष्ट्राची वाटचाल बाराव्या शतकाकडे
दाभोलकर, कायदा, नरबळी






इ. स. १२ व्या शतकात घडतील, असे वाटावे अशा घटनांबद्दल मला २१ व्या शतकात लिहावे लागत आहे आणि तेही अपवादात्मक नाही, तर पुन्हा-पुन्हा घडणाऱ्या भीषण वास्तवाबद्दल आहे.



२०११ च्या एप्रिलमध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंत्रिमंडळाने पाचव्यांदा मंजूर केला. त्यानंतर लगेच मे महिन्यात अंधश्रद्धेमुळे नरबळीच्या तीन घटना कराड, राजापूर, अक्कलकुवा या तालु्क्यात घडल्या. यापैकी कराड येथील घटनेत तर घरातील पाच वर्षांच्या नातीमुळे भानामती होते, असे समजून सख्ख्या आजीने गळा दाबून तिचा जीव घेतला. २०१३ मध्ये एप्रिल महिन्यात सहाव्यांदा जादूटोणाविरोधी कायदा मंत्रिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर लगेच मे महिन्यात अंधश्रद्धेमुळे चार नरबळी गेले.

     

चाकण येथे सुनील बबन पाचंगे या संगीत शिक्षकाने दोन नरबळी दिल्यास पैशाचा पाऊस पडतो, या मांत्रिकाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून आपल्या मित्राचा आणि त्याच्या वयोवृद्ध आईचा खून केला. प्रथम तो मित्राला घेऊन लोणावळ्याला गेला आणि अत्यंत थंड डोक्याने त्याने आपल्या मित्राचे जगणे संपवले. त्याचा चेहरा इतका विद्रुप केला की, तो ओळखूच येऊ नये. त्यानंतर तीन दिवसांनी त्याने त्या मित्राच्या आईला, मुलाला नोकरी लागली असून त्याला भेटावयास जायचे आहे, असे सांगून तिला खेड (राजगुरूनगर) येथे रात्री नेले आणि तिचा गळा कापून तिचे जीवन संपवले.



यवतमाळ येथे सपना गोपाळ पळसकर ही घाटंजी तालु्क्यातील चोरंबा गावातील ७ वर्षांची मुलगी. ती मागील दसऱ्यापासून बेपत्ता होती. त्याबाबत सत्य स्पष्ट झाले २४ मे २०१३ ला. गावातील दुर्गाबाई सीताराम शिरभाते हिच्या अंगात देवी येत असे. अंगात आलेल्या देवीने असे सांगितले की, मला सपनाचा नरबळी न दिल्यास साऱ्या गावावर कोप होईल. काही माणसे मरतील. यानंतर मोतीराम मेश्राम या मांत्रिकाने दसऱ्याच्या रात्री सपनाला उचलले. तोच लाईनमन असल्याने त्याने सर्व गावातील वीज गायब केली. तिला यशोदाबाई शिरभाते हिच्या घरी आणले. तिचे हातपाय बांधून तिचे शिर कापले. भांड्यात रक्त घेतले व देवीला त्याचा प्रसाद दिला. ते रक्त नंतर या कृत्यात सहभागी असणाऱ्या सर्वांनी प्राशन केले. त्या सात जणांच्यात सपनाचा सख्खा मामा आणि सख्खे आजोबाही होते. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांच्या मतदार संघात हे गाव येते.



धामोरी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर येथे अलका रवींद्र तुपसेंद्रे या तरुणीला सौम्य मानसिक आजार होता. तिला तिच्या नातेवाईकांनी मांगीरबाबाच्या दरबारात उपचारासाठी नेले. भिकाजी लक्ष्मण ताते व भागवत हरी वाकळे या दोघांचा धामोरी येथे मांगीरबाबाचा दरबार भरतो. अलकाला तिच्या मृत पुतणीने झपाटले आहे, असे सांगण्यात आले आणि त्यातून तिची सुटका करण्यासाठी या भोंदूबाबांनी तिला पाच वेळा अमावस्येला दरबारात खेपा घालण्यास सांगितले. तीन वेळा तिने उपचार घेतला. चौथ्या वेळेस ती आली त्यावेळी तिला थंड पाण्याने अंघोळ घालण्यात आली आणि त्यामध्येच तिचा मृत्यू झाला.



मे २०११ व मे २०१३ मधील नरबळीच्या या काही घटना. जर यामधल्या दोन वर्षांच्या कालावधीमधील नरबळी झालेले महाराष्ट्रातील तपशील याला जोडले, तर प्रश्नाचे गांभीर्य किती जीवघेणे आहे, हे समजू शकेल आणि त्या विरुद्धचा उपाय किती बहुआयामी व अनेक पैलू असलेला असावयास हवा, याची समज येऊ शकेल. वरील सर्व घटना घडल्यानंतर एक चर्चा झालीच. स्वत: सामाजिक न्याय विभागाचे मंत्रीच असे म्हणाले की, जादूटोणाविरोधी कायदा झाला असता तर हे प्रकार झाले नसते. हे फक्त अंशत: खरे असलेले उत्तर आहे. जादूटोणाविरोधी कायदा वाटचालीशी व त्या कायद्याशी मी अगदी सुरुवातीपासून व जवळून संबंधित आहे. या कायद्याने अशा घटना रोखण्यास काहीशी मदत होईल; परंतु ती बरीच कमी असेल, ती तर व्हावयास हवी; पण त्यापलिकडे देखील अशा गोष्टी थांबवण्यासाठी याबाबतचे एक व्यापक कृतिशील भान व्यक्त व्हावयास हवे.



पोलीस यंत्रणेने एक काळजी घ्यावी, अशी मागणी समिती सतत करत आहे. १५ वर्षांपूर्वी श्री. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांनी त्याला मान्यताही दिली होती. अर्थात ना त्यांनी, ना त्यांच्यानंतर आलेल्या गृहमंत्र्यांनी याबाबत काही कार्यवाही केली. मागणी अशी होती की, आपापल्या भागातील मांत्रिक, भगत, देवऋषी, जादूटोणा करणारे बाबा-बुवा यांची नोंद व माहिती प्रत्येक पोलीस स्टेशनने नीटपणे व गुप्तपणे जमा करून करावी. संबंधितांना याबाबत तंबीही द्यावी. तसे झाले तर आपण संभाव्य गुन्हेगारांच्या यादीत आहोत, याचा एक वचक निर्माण होऊ शकतो. वर नोंद केलेल्या तिन्ही बाबतीत अशी सक्षम यंत्रणा असती तर नक्कीच फायदा झाला असता. आई-मुलाचा बळी देऊन पैशाचा पाऊस पडेल, असा दावा करणारा भोंदूबाबाच होता. सपनाचा नरबळी मागते, त्यावेळेस ती व्यक्ती गंभीर गुन्हाच करत असते. जर जादूटोणाविरोधी कायदा असता व त्यातील तरतुदी गावातील काहीजणांना तरी माहीत असत्या तर दुर्गा शिरभाते हिच्या अंगात येण्यावर प्रतिबंध निर्माण करता येणे शक्य होते. अर्थात, याबाबत; तसेच कोपरगाव येथे अलकाचा जो मृत्यू झाला, त्याबाबत एक गोष्ट ही लक्षात घ्यावयास हवी की, आपणाकडे एकूणच आरोग्य व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. जी आहे ती ग्रामीण भागातील गरिबांना जवळपास उपलब्धच नाही. त्यापुढे जाऊन मानसिक आजाराबद्दल सुशिक्षितांनाही माहिती नाही आणि त्या आजारांवरील उपचाराच्या सोयी तर खूपच कमी आहेत. जर ही माहिती व या सोयी असत्या तर बिचाऱ्या अलकाला कोणत्या तरी दरबारात जाण्याची गरजच पडली नसती.



परंतु यापलिकडेही या सर्व घटनांकडे अधिक गांभीर्याने पाहावयास हवे. या स्वरुपाच्या घटना एकाच वेळी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा, भारतीय घटनेतील प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन व मानवतावाद बाळगावा, या कर्तव्याचा, वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती या शिक्षणाच्या गाभाघटकाचा आणि आपण ज्या समाजात जगतो, त्यातील आधुनिकतेचा दारूण पराभव करत असतात, हे वास्तव कटू वाटले, तरी मनोमनी स्वीकारावयास हवे. १८२३ मध्ये जन्मलेल्या लोकहितवादींनी लिहिले आहे, ठिकठिकाणी धुन्या लावून बाबा बसले आहेत. मांत्रिक लोक भोळ्या लोकास आपल्या कपटजालात अडकवण्याची वाट पाहत आहेत. किमयागार, जादूगार, मूठ मारणारे यांच्या टोळ्या ठिकठिकाणी भेटतात. हे सर्व जण व्यक्तीला तिच्या इच्छांची तृप्ती व मोक्षाची प्राप्ती, याचे आश्वासन देतात. मात्र वास्तवात हे सर्व लोक आपल्याला लुबाडण्यास निर्माण झाले आहेत, हे लक्षात घेऊन मोठ्या सावधगिरीने आपला बचाव केला पाहिजे. २०० वर्षांपूर्वी हे महाराष्ट्रात लिहिले गेले आणि आज जादूटोणाविरोधी कायद्याला सातत्याने विरोध होतो वा कचखाऊपणा दाखवला जातो, ही मानसिकता आपण हरघडी करत असलेला समाजसुधारकांचा पराभव दाखवते.



शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव व सारासार शहाणपण प्राप्त करून घेणे, याला पायाभूत महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक कार्यामागे कारण असल्याशिवाय ते घडूच शकत नाही. असे जर असेल तर पैशाच्या पावसामागे काही कारण आणि तेही नरबळी देण्यासारखे असेल काय, याचा विचारदेखील त्या भूलथापांना बळी पडलेल्या शिक्षकाच्या मनात येऊ नये, हे आधुनिक समाज म्हणून आपले मोठे अपयश आहे. वारंवार वेगवेगळ्या रूपात हे स्पष्ट होते आहे. साधा सारासार विचार काय सांगतो? जी व्यक्ती नोटा दुप्पट करून देते अथवा पैशांचा पाऊस पाडू शकते, तिला किरकोळ रक्कम संबंधितांकडून घेऊन हे करण्याची गरजच काय? तिने स्वत:च आपल्याकडे असलेल्या नोटा दुप्पट करत बसाव्यात. याचा धंदा करणारी व्यक्ती आपल्याला फसवत आहे, हे न समजणे म्हणजे सारासार बुद्धीला सोडचिठ्ठी देणे होय.



या प्रकारातील गंभीर व मन सैरभैर करणारी बाब आहे, ती म्हणजे याबाबतची कृत्ये करणाऱ्या व्यक्तीची असंवेदनशीलता व अविवेक. अत्यंत थंडपणे, नियोजनपूर्वक आपल्या मित्राचा आणि त्याच्या आईचा खून करण्याची ही असंवेदनशीलता प्रत्यक्षात आजच्या समाजवास्तवातील बधीर बनलेल्या घृणास्पद मानसिकतेचे दर्शन घडवते. आजच्या जीवनात पैसा हा परमेश्वर नव्हे, तर त्याही पलिकडे काही असेल त्याचे प्रतीक झाला आहे. जीवनातील प्रत्येक बाब, सर्व भौतिक सुखे, सेलिब्रेटी बनणे, यशस्वी राजकारण करणे, या सर्वांचा एकच निकष आहे तो म्हणजे पैसा हवा. मर्यादित उत्पन्न असलेल्या असंख्य व्यक्ती या लग्नाला, मुलाच्या शिक्षणाला, अन्य मौजमजेला सहजपणे कोटीच्या कोटी रकमा कशा खर्च करतात, हे विचारणे म्हणजे स्वत:च्या अज्ञानाचे, भाबडेपणाचे वा वेडेपणाचे लक्षण ठरते. जीवनव्यवहारात पैसा हा घटक तुच्छ मानू नये. परंतु पैसा हे कधीही सर्वश्रेष्ठ मूल्य मानता येणार नाही. उदार आर्थिक धोरणाने पैशाला सर्वोच्च स्थान दिले. श्रीमंती ही प्रतिष्ठा मिरवण्याची गोष्ट बनून गेली. मध्यम वर्गातील एक मोठा गट श्रीमंत वर्गात गेला. त्याने आपली श्रीमंती मिरवणे सुरू केले इतपत समजता येते. पण या नवश्रीमंत वर्गाने श्रीमंत वर्गाची असंवेदनशीलता अधिक विकृत स्वरुपात आत्मसात केली. चाकण येथील हत्याकांड हे या भोगवादी प्रवृत्तीचे घृणास्पद गुन्हेगारी रूप आहे. मात्र या वाटेवरच आज बऱ्याच जणांचा प्रवास सुरू आहे. अव्वाच्या सव्वा व्याज देणाऱ्या संस्था, शेअर बाजारातील सटोडिये, गुंठेसम्राट, प्रशासनातील मो्क्याच्या जागी असलेले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे हे वागणे, याची हरघडी दिसणारी उदाहरणे आहेत. या सर्वांचे परिणाम देखील एवढेच भयानक आहेत. ज्यावेळी बाब चाकणसारख्या हत्याकांडापर्यंत जाते, त्यावेळी हा समाज जागा झाल्याचे नाटक करतो आणि पुन्हा कूस बदलून झोपी जातो.



या परिस्थितीवर मात करण्याची जबाबदारी असलेले शिक्षण क्षेत्र, प्रसारमाध्यमे व जनता यांची स्तब्धता भयचकित करणारी वाटते. खरे तर विज्ञानाच्या कार्यकारणभावाशी विसंगत असलेल्या बाबींना नकार देण्याचे शिक्षण शाळा-महाविद्यालयांत द्यावयास हवे; उलट गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात वैभव महालक्ष्मीचे व्रत एकदम फार्मात आले आहे. पैशाची तंगी असणाऱ्या माणसाला ते मोहात पाडतेच; पण आणखी वैभवाची हाव बाळगणाऱ्या कुटुंबांनाही ते व्रत चूक वाटत नाही. त्यासाठी फळ देणाऱ्या झाडांच्या असंख्य फांद्या तोडून, तांब्याच्या कलशात घालून, नंतर पाण्यात फेकून देणे, ही बाब योग्यच वाटते. वैभव प्राप्त व्हावे म्हणून असंख्य फळझाडांच्या फांद्याचा बळी देणे व पैशाचा पाऊस पडतो म्हणून नरबळी देणे, हा प्रवास एकाच रस्त्यावरील नाही काय? परंतु अशा व्रताबाबत शाळेत शिक्षक आधी काही सांगत नाहीत आणि कोणी तसे सांगण्याचे धैर्य दाखवले तर धर्मावरचे आक्रमक म्हणून पालकांची झुंडशाही शाळेवर येते. ही वाटचाल आज ना उद्या, कमी वा जास्त प्रमाणात चाकणकडेच जाणार.

लोकशाही देशात माध्यमे फार महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु आज ती अर्थकारणाला बांधलेली आहेत. प्रचंड आर्थिक लाभ देण्याचा दावा करणाऱ्या वास्तुशास्त्राचे, विविध प्रकारच्या शुभरत्नांच्या जाहिरातींचे व कार्यक्रमांचे पेवच इलेक्ट्रॉनिक माध्यमांत फुटलेले आहे. त्यामुळे चाकणसारख्या प्रकाराबाबत त्यातील टोकाच्या घृणास्पदतेमुळे माध्यमांनी टीकेची भूमिका घेतली, तरी तेही प्रश्नाच्या मूळ गाभ्याकडे जाणे टाळतात.



आणखी एक मुद्दा नीट लक्षात घ्यावयास हवा. स्वत:च्या सख्ख्या नातीचा गळा चिरताना आजोबांचा हात अडखळला नसेल, हे मानण्याची माझी तयारी नाही. परंतु त्यांनी असा विचार केला असेल की, देवीच्या कोपामुळे गाव संकटात येणे वा अनेकांचा जीव जाणे, यापेक्षा एक हत्या परवडली. याचा अर्थ असा की, एका दहशतवादाखाली त्यांनी हे अमानुष कृत्य केले. हा दैवी दहशतवाद आहे आणि तो नेहमीच्या दहशतवादापेक्षा लढण्यासाठी जास्त अवघड आहे, याची नोंद घ्यावयास हवी.



खरे तर एकाही बाबा-बुवाकडे अथवा देवळात देखील न जाता १७ वर्षे पंतप्रधान राहिलेले पंडित नेहरू होऊन गेले. हे आजच्या लोकनेत्यांना सांगितले तरी पटणार नाही आणि पटले तरी पचणार नाही. राजकारणातच नव्हे, समाजजीवनाचे नेतृत्व करणाऱ्या, साहित्य, कला याबाबतही आज सर्वत्र या ना त्या कारणाने अवैज्ञानिक भूमिका घेतली जाते. एवढेच नव्हे, तर त्याचे समर्थनही केले जाते. स्पष्ट आणि परखड दृष्टिकोन देणारे पु. ल. देशपांडे वा श्रीराम लागू आता पुढच्या पिढीत आहेत कोठे? वैचारिक नेतृत्व करणाऱ्यांनीच बोटचेपी भूमिका घेतली की, समाज आपोआपच दैववादाकडे वाटचाल करू लागतो. यामुळे आज एका बत्थड समाज-मानसिकतेचा जन्म झाला आहे. समाजाची वैचारिक पडझड होते आहे. वैचारिक शहाणपणाचे समाजाचे बेअरिंग सुटले आहे. अशा वेळी नैतिक पतन अपरिहार्य होते. नरबळी ही या किडलेल्या समाजवास्तवाची भयसूचक घंटा आहे.



लढाई अवघड आहेच; पण प्रत्येकाने असा संकल्प करावयास हवा की, मी स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धैर्याने जगेन. संवेदनशीलता जोपासणे, स्वत:चे प्रश्न काय आहेत? ते कसे सोडवायचे? ते कुठपर्यंत सुटू शकतात? याचे भान विवेकवाद माणसाला देतो. समाजातील सर्व संवेदनशील जागृत घटकांनी आपल्या विवेकबुद्धीला स्मरून समाजाला ग्रासणाऱ्या या अनिष्टाचा मुकाबला करावयास हवा.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(जुलै २०१३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...