रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

खोट्या बातम्यांची बित्तंबात



खोट्या बातम्यांची बित्तंबात      

दाभोलकर, डॉ. लागू, विवेक जागर, प्रेस कौन्सिल, सामना, तरुण भारत, खोटी बातमी
ता. ३१ एप्रिल १९९६ रोजी मी व डॉ. श्रीराम लागू यांच्या औरंगाबाद येथील विवेकजागराच्या कार्यक्रमात स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. मला मारहाण केली. या घटनेचे अत्यंत विपर्यस्त वृत्त औरंगाबादेवरून निघणाऱ्या सामनादेवगिरी तरुणभारत या दोन दैनिकांनी छापले. त्यातील काही भाग असा-
१. एप्रिल सामना - औरंगाबाद : छत्रपती शिवाजी खोटे बोलला, असा शब्द शिवरायांची संभावना करणारे डॉ. श्रीराम लागू व हिंदू धर्मावर टीका करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर संतप्त तरुणांनी प्रश्नांची सरबत्ती केली.... शनिवारी दुपारी ४ वाजता विवेकानंद महाविद्यालयाच्या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले होते. प्रसंगी शिवाजी महाराज खोटे बोलले, असे वाक्य त्यांनी उच्चारले होते. तसेच स. भु. सभागृहात दाभोलकरांनी संतांच्या ईश्वरी साक्षात्काराबद्दल शंका घेणारे मत व्यक्त केले. याबाबत दाभोलकरांनी असे म्हटले आहे की, परमेश्वरी साक्षात्कार झालेला माणूस वेडा असला पाहिजे, तो खोटे बोलत असला पाहिजे किंवा मग तो संमोहन विद्येच्या आहारी गेला असला पाहिजे....
१ एप्रिल, दै. ‘देवगिरी तरुणभारत’ -....
काल, शनिवारी विवेकानंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागू यांनी शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले. महाभारतात व्यासांनी जे लिहिले त्या कमी भाकडकथा आहेत, शिवाजीच्या तर खूपच भाकडकथा आहेत. त्यांना चरित्रच नाही. शिवाजीने गायीला कसायापासून वाचविले, असा उल्लेख केला जातो. पण शिवाजी किती खोटे बोलला, हे सांगितले जात नाही, अशी व अन्य काही विधाने डॉ. श्रीराम लागू यांनी शिवाजी महाराजांबद्दल केली होती....
अत्यंत चुकीच्या व लोकांच्या मनाची दिशाभूल व्हावी, अशा प्रकारे छापलेल्या बातम्यांच्या बाबत दोन्ही वृत्तपत्रांविरुद्ध प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे मी व डॉ. लागूंनी ठरविले. पण त्याआधी संबंधित वृत्तपत्रांना संधी द्यावी, यासाठी त्या दोन्ही वृत्तपत्रांच्या संपादकांना पत्रे पाठविली, ती अशी-

स.न.वि.वि.
मी व डॉ. श्रीराम लागू हे महाराष्ट्रात ‘विवेकजागरा’चा वादसंवाद हा कार्यक्रम करतो. श्रद्धा-अंधश्रद्धा, देवाचे अस्तित्व, धर्माचे प्रयोजन, फलज्योतिष, अंगात येणे, या स्वरुपाच्या विविध बाबी याबद्दल मुलाखतीद्वारे प्रश्नोत्तर रूपाने होणारी चर्चा, असे त्याचे स्वरूप असते.          
या स्वरुपाचा आमचा कार्यक्रम ता. ३० मार्च १९९६ रोजी औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका दंतकथेचा उल्लेख एका प्रश्नाचे उत्तर देताना झाला. दुसऱ्या दिवशी सरस्वती भुवन, औरंगाबाद येथे खुला कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर आदल्या दिवशी जे अजिबात बोलले गेले नाही, त्यावरून काही तरुणांनी वितंडवाद घातला. मला मारण्याचा प्रयत्न झाला. मला वाचविणाऱ्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. डॉ. श्रीराम लागूंनाही धक्काबुक्की झाली.  
हे वृत्त आपल्या दैनिकाच्या ता. १ एप्रिल १९९६ च्या अंकात अत्यंत विपर्यस्त, चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झाले. त्यामुळे मी व डॉ. लागू, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ यांचे नुकसान झालेच; तसेच समाजात प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्नही दिशाभूल करणाऱ्या वृत्तामुळे झाला.
तरी आपण याबाबत दिलगिरी व्यक्त करून सत्य परिस्थिती ठळकपणे प्रसिद्ध करावी. असे न झाल्यास आम्हास न्यायालयात व प्रेस कौन्सिलकडे त्याबाबत दाद मागावी लागेल.

आपला विश्वासू,
(डॉ. नरेंद्र दाभोलकर)
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
      
या पत्राला अर्थातच उत्तर आले नाही. पुन्हा एकदा १५ सप्टेंबरला स्मरणपत्र पाठविले आणि त्याच वेळेला प्रेस कौन्सिलकडे तक्रार नोंदविण्यात आली. खरे तर तक्रार दोन महिन्यांच्या आत नोंदवायची असते. त्यामुळे उशीर का झाला, यावरही खुलासे झाले. ते पटल्यानंतरच केस दाखल झाली. दोन्ही वृत्तपत्रांतील बातम्या इंग्लिशमध्ये भाषांतर करून पाठवाव्या लागल्या. तक्रार, पत्रव्यवहार हा अर्थात इंग्लिशमध्ये होता. एकूण कोर्टाची (किंवा प्रेस कौन्सिलची) प्रक्रिया वेळ खाणारी असते; पण चिकाटीने ती लढवायची, असे ठरविले होते.          
थोडी आणखी पत्रापत्री झाली आणि २२ एप्रिल १९९७ ला सुनावणीची तारीख लागली. फक्त चार दिवस आधी पत्र मिळाले. एवढे बरे होते की, सुनावणी मुंबईला होती; पण डॉ. लागूंना ही तारीख सोयीची नव्हती. त्यामुळे पुढची तारीख मागून घेण्याचे ठरले. तारखा देणे ही गोष्ट कोर्टाला अजिबातच नवी नसते. मुंबईच्या कौन्सिल हॉलमध्ये प्रेस कौन्सिलचे चेअरमन न्या. पी. बी. सावंत (निवृत्त न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली) आपल्या कौन्सिलच्या सदस्यांसह वेळेत उपस्थित झाले. कोणत्याही परिस्थितीत पुढची तारीख देण्यात येणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. कौन्सिलच्या कामाची सुरुवात झाली.   
पहिली केस चालविताना बघितल्यावरच ही काहीशी अनौपचारिक प्रक्रिया आहे, याची कल्पना आली. आणखी काही खटल्याचे कामकाज बघितल्यावर तर आमची बाजू मी स्वत:च मांडण्याचा निर्णय घेतला. एक तर वकिलाशिवाय आपापली बाजू मांडायची मुभा होती. न्या. सावंत मराठीमध्ये बोलण्यासही अनुमती देत होते. शिवाय घडणाऱ्या घटनांचा संदर्भ, आमची वक्तव्ये, छापून आलेल्या खोडसाळ बातम्या यांचा अन्वयार्थ मला अधिक नेमकेपणाने माहीत होता. दोन्ही वृत्तपत्रांचे संपादक व मी यांच्यात सुनावणीस प्रारंभ झाला. दैनिक सामनाच्या प्रतिनिधीचे म्हणणे असे होते की, कार्यक्रमाच्या स्थळी संतप्त तरुणांच्याकडून मिळालेली माहिती आम्ही छापली. दुसऱ्या बाजूची माहिती आम्हास मिळाली नाही म्हणून छापली नाही. न्या. सावंत यांनी त्यास समज दिली. डॉ. दाभोलकर इतकी वर्षे हे काम करतात, हे तुम्हाला ठाऊक असणार. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधून सत्य जाणून घेणे, हे तुम्ही करावयास हवे होते. तुम्ही जर विद्यार्थी नेत्यांना विचारले तर मग डॉ. लागू-दाभोलकर यांना का विचारले नाही? न्यायमूर्तींनी आणखी एक प्रश्न विचारला, हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम चांगले आहे, असे आपणास वाटते ना? आणि त्या प्रश्नाला दै. सामनाच्या प्रतिनिधीने होकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील कथित घटनेबद्दल डॉ. लागू हे नेमके काय म्हणाले, ते मी सांगितले. बालशिवाजीला कसायाने गाय कोठे गेली, हे विचारले, बालशिवाजीने गाय गेल्याच्या विरुद्ध दिशेला बोट दाखविले. त्यामुळे अकारण मारल्या जाणाऱ्या गायीचे प्राण वाचवून शिवाजीने नैतिक कामगिरी केली; पण मग त्याला त्यासाठी खोटे बोलावे लागले. हे धार्मिक भाषेत अनैतिक आहे. असा पेच अनेकदा जीवनात येतो आणि त्याचा निर्णय धर्माच्या नव्हे, तर विवेकाच्या आधारे घ्यावा लागतो. हे सर्व स्पष्टीकरण ऐकल्यानंतर न्यायमूर्ती म्हणाले, डॉ. लागूंचे प्रतिपादन मला अतिशय संयुक्तिक दिसते. विवेक हा कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कोणत्याही खऱ्या धर्मभावनेचा पाया हा विवेकच असतो. या विवेकाचे पालन करून शिवरायांनी चांगले उदाहरण घालून दिले आहे. या मांडणीत गैर काहीच नाही. उलट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कामच या विवेकाधिष्ठित, खऱ्या धर्मभावनेचे पोषण करणारे आहे. यानंतर मुद्दा निघाला साक्षात्काराचा. साक्षात्काराबद्दल दाभोलकरांनी व्यक्त केलेली शंका ही हिंदू धर्माचा अपमान आहे, असे वृत्तप्रतिनिधींचे म्हणणे होते. याबाबत न्या. सावंत यांचे मत अगदी स्पष्ट होते. ते म्हणाले, एक तर हे सर्व विवेचन मला शास्त्रीय दिसते. अधिक महत्त्वाचे म्हणजे संतांचे, प्रेषितांचे साक्षात्कार हे सर्वच धर्माचे भाग आहेत; फक्त हिंदू धर्माचे नाहीत. त्यामुळे साक्षात्कारावरचे हे मत हे तर फक्त हिंदू धर्मावरची टीका होऊच शकत नाही.

या सगळ्या सुनावणीच्या अंती न्यायमूर्तींनी स्पष्टपणे दोन्ही प्रतिनिधींना सांगितले, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे चांगले आहे, तुम्ही या कामाला मदत करण्याच्या दृष्टीने विचार करणे हेच योग्य आहे. तेव्हा या कामाला मदत देण्याचे दोन्ही प्रतिनिधींनी मान्य केले. यानंतर डॉ. लागू व दाभोलकर यांचा खुलासा तिसऱ्या पानावर छापण्याबाबत आदेश न्यायमूर्तींनी दिला. त्यामध्ये दिलगिरी असावी, असेही सांगितले. या निकालाची बातमी महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांनी छापली. मराठवाड्यातील सर्वाधिक खपाच्या दै. ‘लोकमतने तर ठळकपणे प्रसिद्ध केली.
या बातमीनंतर मी प्रत्यक्ष खुलासा वृत्तपत्रांना पाठविला- डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल छापलेल्या बातमीबाबत दिलगिरी.
दैनिक सामना, संभाजीनगर यांच्या १ एप्रिल १९९६ च्या अंकात म्हणे शिवाजी खोटे बोलला, हिंदू धर्माचीही संभावना केली या मथळ्याखाली जी बातमी प्रसिद्ध झाली, त्यामुळे डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर व त्यांच्या ‘विवेकजागरा’चा कार्यक्रम यांना जी हानी पोचली, त्याबद्दल दै. ‘सामना, संभाजीनगर दिलगिरी व्यक्त करीत आहे. त्या वृत्ताबाबत डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुढील खुलासा केला आहे - छत्रपती शिवाजी खोटे बोलला, अशा शब्दांत डॉ. लागू यांनी शिवरायांची संभावना केली, अनुद्गार काढले.... प्रसंगी शिवाजी महाराज खोटे बोलले ही सर्व वचने डॉ. लागूंच्या तोंडी घातली आहेत. डॉ. लागू यांना शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांनी असे उद्गार काढणे शक्यच नाही. हे उद्गार त्यांच्या तोंडी घालणे म्हणजे निव्वळ कुभांड आहे. बालशिवाजीने कसायापासून गायीचे प्राण वाचविले, या कथेचा संदर्भ देऊन निर्माण होणारा नैतिक पेच हा विवेक व सारासार बुद्धी याआधारे कसा सोडवावा लागतो, याचे विवेचन लागू यांनी औरंगाबाद येथील विवेकजागराच्या कार्यक्रमात केले होते. या गोष्टीतून नीतीचा पाया विवेकाधिष्ठित असावा, हा विचार मांडला गेला. २१ एप्रिल १९९७ रोजी प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. पी. बी. सावंत यांनीही या विचाराला नि:संदिग्ध अनुकुलता दर्शविली. हिंदू धर्मावर डॉ. दाभोलकर यांनी टीका केली, यासाठी बातमीत ईश्वर साक्षात्काराबद्दल दाभोलकरांचे मत दै. ‘सामना’च्या वरील बातमीत देण्यात आले आहे. साक्षात्कार या प्रकाराचे मानसशास्त्रीय पातळीवर दाभोलकर नेहमीच स्पष्टीकरण देतात. त्यामध्ये हिंदू धर्माच्या अवमानाचा कोणताच प्रश्न येत नाही. ता. २२ एप्रिल १९९७ रोजी प्रेस कौन्सिल समोरच्या सुनावणीत न्या. सावंत यांनी याबाबत स्पष्ट मतप्रदर्शन केले की, सर्वच धर्मात साक्षात्कार आहेत, त्याची शास्त्रीय चिकित्सा चूक ठरत नाही व कोणाचा अवमान ठरत नाही. आपली मते मान्य नसणाऱ्या व्यक्ती व त्यांचे विचार यांना हेतुपुरस्सर बदनाम करण्यासाठी अशा बातम्या पसरविल्या जातात काय, याचा संपादकांनी शोध घेणे व त्याला आळा घालणे, हे गरजेचे आहे. संपादक म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी आहे, असे मत डॉ. लागू व डॉ. दाभोलकर यांनी काढलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.
हा खुलासा दै. ‘देवगिरी तरुण भारतने प्रसिद्ध केला. तो १३ जुलैपर्यंत तरी दै. ‘सामना’ने मात्र तो प्रसिद्ध केला नाही (वा केला असल्यास निदान माझ्या पाहण्यात नाही - तरुण भारतने रजिस्टर पोस्टाने त्यांचे अंक मला पाठविले) असेच चालू राहिले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट १९९७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...