सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

बुवाबाजीविरोधी लढ्याची वैचारिक भूमिका



बुवाबाजीविरोधी लढ्याची वैचारिक भूमिका
   
दाभोलकर, बुवाबाजी, अंधश्रद्धा, अध्यात्म, दैवी सामर्थ्य, वैज्ञानिक दृष्टिकोन
बुवाबाजीविरुद्धची लढाई हा चळवळीतील नेहमीच आकर्षणबिंदू राहिला आहे. त्यामुळे ‘बुवाबाजी’ या शब्दाची व्याप्ती खूप मोठी ठरते. चिल्लर चमत्कार करून कुंकवाचा बुक्का अथवा हळदीचे कुंकू करणारी बाई ही बुवाबाजीच करत असते आणि ज्याच्या ७० व्या वाढदिवसाला रु. १७० कोटी एवढ्या देणग्या मिळत असतात. तो सत्य साईबाबाही बुवाबाजीच करत असतो. चमत्काराची बुवाबाजी करणाऱ्यांना विरोध करणे तसे सोपे आणि थेट असते. एकतर चमत्कार हे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी उघडपणे विसंगत असतात. घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. त्यामुळे चमत्काराचे अस्तित्व मान्य करणे हे एका अर्थाने कर्तव्यपूर्ती ठरते. दुसऱ्या बाजूने कोणी असा दावा केलाच की, असे दैवी सामर्थ्य माझ्याकडे आहेच, तर त्याला चमत्कार तपासण्याचे खुले आव्हानही देता येते; परंतु एकूण हे प्रकार कमीच असतात. कोणताही चमत्कार न करणारे; परंतु प्रचंड शिष्य वर्ग असलेले अनेक बुवा-बाबा-स्वामी, महाराज आपण पाहत असतो. त्यांच्या भक्तांच्या लेखी हे सर्वजण त्यांचे तारणहारच असतात. ही मानसिकता नीटपणे समजावून घेतल्याशिवाय बुवाबाजीमागच्या वैचारिक लढाईचा अर्थबोध होणार नाही. अर्थातच, या मानसिकतेला अनेक महत्त्वाच्या; पण अनुषंगिक बाबी जोडलेल्या असतात व त्यातूनच बाबांच्या प्रभावाचे अद्भुत रसायन तयार होते.
अध्यात्मिक अधिकार
देवाच्या मूर्ती सर्वत्र असतातच; परंतु काही मूर्तींना विशेष देवत्व प्राप्त झालेले असते. गणपतीची मंदिरे सर्वत्र असतात; परंतु दगडूशेठ हलवाई गणपती किंवा सिद्धिविनायक यांचे महात्म्य वेगळेच असते. बालाजीची मंदिरे नवीन नाहीत. पण तिरुपतीचे बालाजी एकमेवाद्वितीयआहेत. याचे केले जाणारे स्पष्टीकरण एवढेच असू शकते की, या स्थानात अथवा मूर्तीत काही अद्भुत सामर्थ्य हा जादूटोण्याचा प्रकार आहे. परंतु तसे मान्य करणे अशक्यच. प्रत्यक्षात घडते ते असे की, या विशेष पवित्र देवाची उपासना केली तर त्याच्या अद्भुत सामर्थ्याने संकट निवारले जाईल, असे भक्त मानतो. जीवनात लहानमोठ्या कोणत्याही अरिष्टापासून हे दैवी सामर्थ्य आपला बचाव करेल, अशी भावना बाळगली जाते; परंतु बहुतेकवेळा हे सारे स्वत:पाशीच ठेवले जाते, जाहीरपणे कबूल केले जात नाही. या देवांची भक्ती आम्ही करतो यामध्ये आणखी काहीच साधावयाचे नाही. भक्तीच साधावयाची आहे, असा दावा सर्वजण करतात. ही भक्ती कशासाठी याचे उत्तर तत्परतेने असे मिळते की, या भक्तीत जीवनाचे सार्थक आहे. हे सार्थक कशामुळे होते याचे उत्तर येते की, या भक्तीतून जीवनाचे अध्यात्मिक कल्याण घडते. आता म्हणजे काय होते याचा पुरावा द्या, हा प्रश्न अप्रस्तुत असतो. कारण तसा पुरावा मागू नये अशीच धारणा असते. उलट प्रश्न विचारला जातो. पुरावा कसला मागता? त्यांचा अधिकार आहे तसा. पुढे अशीही मल्लिनाथी केली जाते की, आई-वडिलांना, गुरुजनांना प्रत्येक पुरावा मागता काय? आइनस्टाइनसारख्या थोर शास्त्रज्ञाने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. त्यांना पुरावा मागाल काय? वरील सर्वच्या सर्व युक्तिवाद जी माणसे त्यांचे-त्यांचे बाबा, गुरू, महाराज, स्वामी यांच्या भजनी लागलेले असतात त्यांच्याबाबत याचप्रकारे करतात. अध्यात्मिक कल्याण हा आमच्या व्यक्तिगत अनुभूतीचा भाग आहे व त्याचा पुरावा मागण्याची आवश्यकता नाही आणि असा पुरावा मागणे, ही काही फारशी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे श्रद्धेला विनाकारण तडा जातो, असे ठामपणे मांडणारे हे प्रतिपादन आहे.
पुरावा मागण्याची गरज
घटनेमध्ये नागरिकांचे कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मुख्य तत्त्व म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत जेवढा पुरावा, तेवढाच विश्वास ठेवायचा; खरे तर दैनंदिन व्यवहारात देखील ही बाब आपण पाळत असतो किंवा एक विवेकी नागरिक म्हणून पाळावी, अशी अपेक्षा असते.  आई सांगते म्हणून ग्रहणकाळात दारे-खिडक्या बंद करून बसण्याची गरज नसते. वडील जातीसाठी माती खावी या विचाराचे असले, तरी मुलगा आंतरजातीय विवाहावर ठाम राहू शकतो. शाळेत गुरुजी पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते असे नुसतेच शिकवत नाहीत तर त्याचा पुरावा देतात आणि तो पुरावा कसा तपासावयाचा, हे पण शिकवतात. निदान त्यांनी तसेच शिकवावे, अशी रास्त अपेक्षा असते. गुरुजी असलेले ज्येष्ठ हे नंतर सहकारी देखील होऊ शकतात आणि श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही न मानता विचारांचे आदानप्रदान होऊ शकते. आइनस्टाइनचा सिद्धांत समजून घेण्यासाठी पुरेसा अभ्यास व परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणाही सुजाण व्यक्तीला तो समजून घेण्याची धडपड करता येते. समजून घेणेही शक्य होते. न्यूटनच्या सिद्धांतातील त्रुटी आइनस्टाइन दूर करू शकतो आणि त्याच्यामागील उणिवा कोणीही दाखवल्याच तर वैज्ञानिक विश्वात त्याचे स्वागतच होते. थोडक्यात, पुरावा मागणे, त्यासाठी प्रश्न विचारणे हे डोळसपणाचे; तसेच माणसाला पुढे नेणारे वर्तन आहे. लहान मूल अनेक निर्णयांच्यावर आई-वडिलांच्यावर अवलंबून असते. परंतु ते जसजसे मोठे होत जाईल, तसतसे स्वतंत्रपणे स्वत:चे निर्णय घेऊ लागते. व्यक्ती प्रौढ झाल्यावरही आई-वडिलांना विचारूनच प्रत्येक निर्णय घेऊ लागली तर पालकांनी केलेले त्यांचे संगोपन अपुरे व अयोग्य आहे, हे आपण समजू शकतो. या तर्काने असे निश्चितपणे म्हणता येते की, जो गुरू असतो तो शिष्याला दृष्टी देतो, त्याच्या पायावर उभे करतो. जीवनात स्वत:च्या कर्तृत्वाने लढण्याची हिंमत देतो; याउलट आपल्या भक्तांची सर्व जबाबदारी जो गुरू आपल्या अंगावर घेतो, तो त्यांना कायमचा दुबळा करतो, पांगुळगाडा देतो. स्वत:वर अवलंबून राहण्यास भाग पाडतो. अशा गुरूच्या कथित अद्भुत सामर्थ्याला जे शरण जातात ते स्वत:ची सारासार बुद्धी गहाण टाकतात. म्हणजे माणूस म्हणून त्यांची असलेली क्षमताच ते जणू गमावतात. बुवाबाजीची खरी भयानकता ही आहे.
बुवाबाजीची शक्तिस्थाने
वरील विवेचनात तथ्यांश असूनही माणसे फार मोठ्या प्रमाणात बुवाबाजीला बळी पडतात. बाबा, बुवा, महाराज, स्वामी, महंत यांना आपल्या जीवनाचे तारणहार समजतात. हे घडते याच्यामागे अनेक कारणे आहेत, बुवाबाजीची लढाई कशी गुंतागुंतीची आहे, हे या कारणांना समजावून घेतले की स्पष्ट होते.
१. आजही आपल्या समाजात बहुसंख्यांचा असा पारंपरिक विश्वास आहे की, विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे. तिचा कृपाप्रसाद या ना त्या स्वरुपात काहीजणांना लाभतो. चमत्कार माझे व्हिजिटिंग कार्ड आहे, असे सत्य साईबाबा म्हणतात ते याच अर्थाने. अशा दैवी सामर्थ्य लाभलेल्या व्यक्तीचे प्रारब्ध समजतात व बदलूदेखील शकतात. महाराजांच्या वरची श्रद्धा हा भवसागर उद्धारून नेईल, असे लोकांना मनोमन वाटते. बाबा वापरत असलेले आत्मा, ब्रह्म, मोक्ष हे शब्द ओळखीचे असतात. त्यांचे अर्थ गूढगहन वाटण्याऐवजी परिचित वाटतात. या शब्दांचा वापर करणारा व्यक्तींच्या मनापर्यंत फारसे काही न करता थेट भिडू शकतो.
२. या देशात सौम्य मनोरुग्ण असलेल्या व्यक्तींचे प्रमाण जवळपास १० टक्के आहे. अशा व्यक्तींना बाबा, बुवा देतात तसला आधार फार हवाहवासा वाटतो. काहीजण जन्मत:च कमी-जास्त प्रमाणात भोळसट असतात. जगातल्या धकाधकीच्या मामल्यात त्यांचा टिकाव लागणे तसे अवघडच असते. त्यांना महाराजांच्या नादी लागणे, हे दुहेरी फायद्याचे ठरते. एक तर आधार मिळाल्याचे समाधान लाभते व दुसरे म्हणजे स्वत:च्या जीवनातील अपयश महाराजांच्या कथित भक्तीच्या सेवेत झाकले जाते. याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. ती अशी की, माणसाचा मेंदू हा मूलत: एका प्राण्याचा मेंदू आहे. उत्क्रांतीच्या काळात माणसात बुद्धी धारण करणारा एक उत्क्रांत अवस्थेतील मानवी मेंदू विकसित झाला. पशुमेंदूच्या उत्क्रांतीचा विचार करता त्यापेक्षा खूपच कमी काळात विकसित झालेला हा मानवी मेंदू या दोन्हीमध्ये पुरेशी सुसंगती नाही, असे आधुनिक संशोधन सांगते. मानवी मेंदूला आपल्याच मेंदूचा एक मोठा भाग असलेल्या प्राणी मेंदूवर व त्याद्वारे व्यक्त होणाऱ्या अतार्किक विचार व वागण्यावर मात करता आलेली नाही. म्हणजेच सदैव वैज्ञानिक दृष्टिकोनाचीच विचार करण्याची क्षमता मानवी मेंदूला अजून लाभलेली नाही. पारंपरिक संस्कार जीवनाच्या प्राथमिक शारीरिक निसर्गप्रेरणा या प्रभावाखाली हा मेंदू आहे. निदान काही प्रमाणात तरी यापासून त्याला मुक्त करणे हे काम शिक्षणप्रक्रियेचे आहे, जे आजही डोळसपणे शिक्षण व्यवस्थेत बहुसंख्य वेळा केले जात नाही. या सर्व मर्यादा माणसाला बुवाबाजीकडे वळण्यासाठी पूरक ठरतात.
३. समाजजीवनात विलक्षण अगतिकता, अस्थिरता व असुरक्षितता आहे. या सर्वांवरचा हुकमी उपाय व सोपा प्रभावी तोडगा यासाठी माणसे बाबाच्या भक्तीत लागतात. आजचे जीवन नियंत्रित करणारे राजकारणी, शेअर बाजारदार, स्मगलर, सिनेकलावंत या सर्वांना सतत एका अस्थिर जीवनातच जगावे लागत असते, उद्याची शाश्वती नसते. अशी माणसे जीवनातल्या वाढत्या गरजांनी रोज अधिकाधिक अगतिक होत आहेत. बेकारी, महागाई, जातीय दंगली, दुष्काळ, व्यसनाधिनता, बायकांची छेडछाड अशा अनेक बाबतीत आपले काहीच चालू शकत नाही म्हणून हताश बनली आहेत. त्याला स्वाभाविकपणेच कोणत्या तरी दैवी आधाराची गरज लागते. ती गरज बाबा भागवतात. महिलांच्याबाबत सततचे असुरक्षिततेचे वातावरण आजूबाजूला असते. त्यांनाही आधार हवाच असतो.
४. अर्थात, परिस्थिती अनुकूल आहे म्हणून बुवा निर्माण होतील; परंतु टिकणार नाहीत. आज समाजामध्ये विविध पातळीवर, विविध स्तरावरील बुवाबाजी वाढलेली दिसते. त्याचे महत्त्वाचे एक कारण हे आहेच, की यामागे संबंधित बुवा, बाबा, महाराज, स्वामी यांची एक पद्धतशीर यंत्रणा आहे. या महाराजांकडे असलेला पैसा, बहुसंख्यांना दिपवून टाकणारा भपका, प्रसारमाध्यमांकडून विकत घेतली जाणारी व्यापक प्रसिद्धी, गरजेनुसार टीकाकारांचा चोख बंदोबस्त करणारे गुंडपुंड या सर्वांना लाभणारा राजकीय लोकांचा आश्रय, हे सारे घटक बुवाबाजी संघटित व समर्थ करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात.
५. या देशातील माणसांचा पारंपरिक तत्त्वज्ञानातूनच कर्मविपाकावर विश्वास आहे. आपण केलेल्या पापाचे फळ भोगावयास लागू नये आणि काही चांगले हातून घडले तर त्याचे फल विनाविलंब मिळावे, यासाठी अशा कोणत्या तरी शक्तींची गरज असते की, ज्यांना माणसाची नियती, संचित, प्रारब्ध समजू शकते. त्याच्या दुष्परिणामापासून माणसाला जे वाचवू शकतात आणि चांगले काही घडावे, यासाठी दैवी आधार पुरवू शकतात. संचित बदलण्याचे हे काम गुरूच्या कृपाप्रसादानेच होईल, अशी बहुसंख्यांची खात्री असते. समाजात असलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, ही गोष्ट आणखी तीव्र बनवतो. म्हणूनच अंगावरील वस्त्राचे भान नसलेला चांगले मिष्टान्न जेवण सोडून उकिरड्यावरची शिते चिवडणारा, व्यक्तिगत स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष करणारा, अर्थहीन बडबडणारा, व्यसनात रमलेला असा माणूस आपणाकडे मनोरुग्ण न मानता अवलिया अथवा विदेही असा सद्पुरुष समजतात. ज्या ठिकाणी चिकित्सा तहकूब होते, तेथे बुवाबाजीचे पीक अमाप येते, यात नवल नाही.
बुवाबाजीचे मार्ग
बुवाबाजीचे प्रमाण वाढते व माणसे त्याला बळी पडतात. याचे कारण बुवा, बाबा, महाराज, स्वामी हे संतसाहित्याचा वापर आपल्या सोयीसाठी करतात. या देशात संतांनी धर्माच्या मार्गाने मानवतेचा, करुणेचा मार्ग सांगितला व कृतिशील आचरून दाखवला. उठता-बसता त्यांचे नाव घेणारे या बाबांच्याकडे मात्र असतात; फक्त कोरडे शब्द. ज्यांच्या मुखातून संतांचा उद्घोष होतो ते प्रत्यक्ष वर्तनात कमालीचे मतलबी असतात. त्याची सर्व आखणी व्यक्तिमहात्म्य वाढवणाऱ्या तंत्राची असते. विशिष्ट रंगाचे कपडे, विशिष्ट रंगाची माळ, पेन, बॅज आणि या सर्व ठिकाणी छोट्या-मोठ्या आकारातील महाराजांचा फोटो यातून प्रथम एकजुटीची भावना निर्माण होते. सोबत जीवनाला जणू उद्धारून नेणारा एखादा छोटा-मोठा मंत्र बाबा देत असतोच. या एकजुटीच्या भावनेत एक समाधान व सामर्थ्य असते. पुढे-पुढे त्याची सवय होते. त्याच्याशिवाय राहणे अश्नय बनते किंवा तशी इच्छा झालीच तरी तसे न वागण्याची सक्ती केली जाते. त्यानंतर मग एक गुप्तता निर्माण होते आणि सर्व काही आदेशानुसार चालत राहते. मठ चिल्लर नरेंद्र महाराजाचा असो वा स्वत:ला भगवान समजणाऱ्या ओशो आचार्य रजनीशांचा; प्रक्रिया हीच असते. महाराजांची भक्ती सोडून सर्व जीवन निरर्थक आहे, असे वाटू लागते.    
महाराजांना विरोध करणे महापाप बनते. त्यांना विरोध करणाऱ्या दुर्जनांचा नाश हे पुण्यदायी मानले जाते. महाराजांच्या अनुग्रहानेच जीवनाचे कोटकल्याण होईल, असा संदेश सतत बिंबवला जातो. त्यामुळे भक्त हा कडवा सैनिक बनतो आणि बुवाबाजी ही एक अभेद्य व्यूहरचना बनते. ती टिकवून धरण्यासाठी सतत ब्रेन वॉशिंग व कंडिशनिंग चालू राहते. यामधून भक्ताला संमोहित करणारे वातावरण तयार होते. संमोहन अवस्थेप्रमाणेच माणसाची चिकित्सक बुद्धी तहकूब होते. भक्तांची महाराजांवरील तीव्र भक्ती, प्रीती यामुळे संमोहनसदृश अवस्थेत जाणे सहज शक्य होते. संवेदनाचे भ्रम तयार होऊ शकतात. आजूबाजूला काहीच नसताना चंदनाचा वास येतो. दैवतांचे मंजुळ स्वर कानी पडतात. फारच भाग्यवान असेल तर देवाचे दर्शन घडते. दैवी चमत्काराला साक्षी बनण्याचे परमपुण्य लाभते. बाबांचा शब्द मोक्षाचे दार उघडतो आहे, अशी जाणीव होते. बहुसंख्यवेळा हे संमोहन अवस्थेतील मनोभ्रम असतात. काही वेळेला तो गंभीर मानसिक आजारही असू शकतो, यासोबत पद्धतशीरपणे पिकवलेल्या अफवांचे मोठे पीक असते. सर्व वातावरणाचा संदेश एकच असतो. भक्ताच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी बाबांनी घेतली आहे. ही परमभाग्याची गोष्ट आहे. कारण त्यामुळे भक्ताला भौतिक, भावनिक, अध्यात्मिक, पारलौकिक सर्व आधार एकाचवेळी प्राप्त झाले आहेत.
अध्यात्म आणि बाबा
ज्या अध्यात्मिक कल्याणासाठी बाबांच्याकडे जावयाचे ते आध्यात्मिक कल्याण म्हणजे काय, याची कोणतीही एकसंध व एकवाक्यता असलेली मांडणी नाही. पण तरीही जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते हे वाक्य आवडीने ऐकवले जाते. तसेच अध्यात्मिक यशस्वी जीवन हेच जीवन सार्थक मानले जाते. प्रत्येक धर्माचे, पंथाचे अध्यात्म वेगवेगळे असते. काही वेळा ते विरोधीही असते. ते व्यक्तिसापेक्ष तर असतेच असते, तरीही बौद्धिक प्रतिवादाने माणसाच्या मनातील या अध्यात्मिकतेचा प्रतिवाद करणे जवळपास अश्नय बनते, असा अनुभव आहे. म्हणून यासाठी मी अध्यात्माचा पारंपरिक व जवळपास सर्वमान्य अर्थ घेतो. तो असा आहे की, या विश्व व विश्वाच्या पलिकडे एक चैतन्य आहे. त्याला तुम्ही चैतन्य म्हणा, ब्रह्म म्हणा, परबह्म म्हणा, पारमार्थिक सत्य म्हणा, परमात्मा म्हणा; परंतु असे काहीतरी आहेच. त्याचे स्वरूप सच्चिदानंद आहे. म्हणजेच ते सत्य आहे, शाश्वत आहे आणि आनंद स्वरूप आहे. व्यक्तीच्या जीवनातील आत्मतत्त्व आणि हे परब्रह्म तत्त्व एकमेकाला भेटणे म्हणजे जिवा-शिवाची गाठ पडणे आणि आनंदाचे डोही, आनंद तरंगअशी अवस्था निर्माण होते. आता ही सारी झाली शब्दांची आतषबाजी. यातून नेमके काय म्हणावयाचे आहे किंवा नेमका कोणता अर्थ निघतो, हे स्पष्ट होत नाही. नुसता शब्दबंबाळपणा. परंतु खरा अध्यात्मिक पुरुष ओळखायचा कसा? त्याची सोपी खूण अशी की, अध्यात्मिक व्यक्ती हे मान्यच करते की, भौतिक सुखापलिकडचे जीवनाचे श्रेयस आहे व भौतिक सुखापेक्षा ते अनंत पटीने मोलाचे आहे. असे ज्या व्यक्तीला वाटते ती व्यक्ती त्याचा डांगोरा पिटत बसत नाही, तर त्या व्यक्तीच्या जीवनातच संयम, सदाचार, अपरिग्रह भरून राहिलेले असतात. ती व्यक्ती मानवसन्मुख कृती करते. अध्यात्म ही त्या व्यक्तीच्या मानसिक, आंतरिक विकासाची साधना असते. त्यामुळे जीवनात ही शूचिता व पावित्र्य येते, त्यांचा सहज प्रत्यय इतरांना येतो. जे आचरणात येते ते अध्यात्म. बाकीची सर्व पोकळ बडबड वा पोपटपंची, व्यवहारात नैतिकदृष्ट्या जागे ठेवलेले नामस्मरण, बाकीचा देखावा अथवा नामाचा गजर. थोडक्यात, या निकषावर महाराजांची अध्यात्मिकता तपासता येते, तपासावयास हवी. यासाठी गाडगेबाबांसारखे चांगले उदाहरण शोधून सापडणार नाही. अंगठाबहाद्दर गाडगेबाबांनी कोट्यवधी रुपये जमवले. खर्च केले. प्रत्येक पैशाचा हिशोब चोख ठेवला आणि आयुष्यभर स्वत:ची मालमत्ता म्हणून निर्माण केली; फक्त हातातील काठी, अंगावरच्या चिंध्या आणि डोक्यावरच्या खापराचा तुकडा. स्वत: बांधलेल्या भव्य धर्मशाळेत स्वत:ची पत्नी मुक्कामाला गेली आहे, हे समजताच तिला तेथून तरातरा बाहेर काढले. हे वैराग्य आणि अध्यात्म एका बाजूला; तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र महाराजांची काही लाखाची अलिशान गाडी, देशोदेशी पसरलेले निर्मलामातादेवीचे भव्य संगमरवरी प्रासाद, सत्यसाईबाबाचे स्वत:चे विमानतळ. एवढेच कशाला लाखाच्या घरात बिदागी घेऊन ज्ञानेश्वरीचा सप्ताह घालणारे ह.भ.प. आणि निर्माण केलेले विश्वस्त निधी आपल्या घरच्यांच्या मुठीत ठेवणारे अध्यात्मिक महाराज, संयम, सदाचार, अपरिग्रह, शुचिता यांची ही कसोटी मानली तर भोंदू बाबांचे वस्त्रहरण फार लवकर व फार स्पष्टपणे होऊ शकेल.
आपण काय करावे?
बुवाबाजीपासून स्वत: आणि समाज दूर राहण्यासाठी आणि ठेवण्यासाठी असा संकल्प करावयास हवा की, मी स्वत:वरचा विश्वास गमावणार नाही. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे धैर्याने जगणे यात माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत:चे प्रश्न काय आहेत व ते कसे सोडवायचे, ते कुठपर्यंत सुटू शकतात? याचे भाव आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद याचा वापर करून येते. सर्वमान्य नीतिसंकेताचे पालन करणे यामुळे आचरणात कणखरता येते. स्वत: बुवाबाजीपासून दूर राहणे आणि इतरांना या मानसिक गुलामगिरीतून दूर ठेवणे, यातच जीवनाची सार्थकता आहे. जो गुरू, बाबा, स्वामी, महाराज भक्तांच्या सर्व प्रश्नांची कायमस्वरुपी सर्व उत्तरे आयुष्यभर देण्याची जबाबदारी घेतो, तो त्या भक्ताला अधिकाधिक गाळात नेतो, परावलंबी बनवतो. खरा गुरू भक्ताला पायावर उभे राहून जीवनसंघर्षाच्या रणधुमाळीत लढण्याची हिंमत व ताकद देतो. त्याला सजग समर्थ डोळस बनवतो आणि स्वत:च्या विवेकबुद्धीच्या रूपाने असा एक गुरू तरी आपल्या प्रत्येकाजवळ असतोच असतो. निर्भयपणे आणि कृतिशीलपणे त्याला कौल लावण्यास आपण शिकले पाहिजे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (विशेषांक २०००)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...