समिती उत्सुक आहे
दाभोलकर, संघटन, प्रशिक्षण
सातारच्या मेळाव्याला आलेल्या सर्वांना एक पत्र महाराष्ट्र कार्यकारिणीच्या
वतीने मी पाठविले. त्यामध्ये विनंती होती की, यापुढील कामाचा उठाव तुमच्या
कृतिशील सहभागावरच अवलंबून आहे. कागदावर क्रियाशील सभासदांची संख्या बरीच असते. पण
ते निकष तळमळीने आचरणात आणण्यासाठी धडपडणारे कमी असतात. तेव्हा मी हे निकष पाळेन, असे ठामपणाने सांगणारे जे कार्यकर्ते निघतील त्यांच्याशी संपर्क, त्यांचे प्रशिक्षण या सर्वांची आखणी समिती करत आहे. त्याला नेमकेपणा
यावा यासाठी कृपया स्वत:बाबत कळवावे आणि आपल्या सहकाऱ्यांनाही कळविण्यास सांगावे.
समितीच्या अपेक्षा तशा मर्यादित आहेत. समितीच्या ध्येयधोरणाशी बांधिलकी
असावी. साप्ताहिक बैठकीला बहुसंख्य वेळा यावे. समितीचे उपक्रम, वार्तापत्र,
वर्गणीदार नोंदणी, समितीची पुस्तकविक्री यामध्ये किमान सक्रिय राहावे, असे काहीसे त्याचे रूप आहे. थोडक्यात सांगायचे तर दर आठवड्याला
एक ते दोन तास शाखा बैठकीसाठी द्यावेत व आणखी तेवढाच वेळ समितीच्या कामाला द्यावा.
याला प्रतिसाद म्हणून येणारी पत्रे अजून चालू आहेतच. परंतु माझ्या
लक्षात गोष्ट आली ती ही की, शाखांमधील जे कार्यकर्ते मला देखील कमी परिचित
आहेत, अशा तुलनेने नव्या कार्यकर्त्यांचा उत्तरामधील
उत्साह वाखाणण्यासारखा वाटला. त्याचे एक कारण मला असे दिसते की, या कार्यकर्त्यांना आतापर्यंत थेटपणे असे कधी संघटनेकडून पत्र पोचलेलेच
नव्हते की, तुमच्या कामाची आम्ही कदर करतो. त्यासाठी
तुम्हाला सतत संपर्कात ठेवू इच्छितो. तुमच्या क्षमतांच्या विकासाची व्यक्तिगत व संघटनात्मक
संधी मिळाल्यावर त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यापैकी काहींनी माझे मित्रदेखील या
कामात येण्यास इच्छुक आहेत, असे लिहिले. काहींनी मी निकष काटेकोरपणे
पार तर पाडेनच; परंतु त्याचबरोबर आणखी स्वत:ची जादा भर टाकेन, असे लिहिले. आमच्या प्रशिक्षणाची शिबिरे वा मेळावे लवकर घ्या, असा सूर जवळजवळ सर्व पत्रांतून उमटला. कोणत्याही पदाची अपेक्षा
न करता काम करण्याची तयारी काहींनी दाखविली, तर काहींनी कोणतीही जबाबदारी
टाकल्यास ते काम करण्याचीही तयारी दाखविली. काहीजणांनी आम्ही अत्यंत गांभीर्याने व
मनापासून हे पत्र लिहीत आहे, असे कळवले. याबरोबरच काहीजणांनी स्वत:च्या
व्यक्तिगत ‘कमिटमेंट’ देखील उत्साहाने कळवल्या.
सर्व शाखांतील सध्या स्वत:ला क्रियाशील म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांना
व्यक्तिगत भेटून क्रियाशील कार्यकर्त्यांची ही नोंदणी आणि मग पुढील आखणी करण्याचा आपला
संघटनात्मक प्रयत्न चालूच आहे. परंतु या प्रतिसादांतून मला लक्षात आलेला मुद्दा थोडा
वेगळा आहे. समितीचे विचार समजून घेणे आणि समितीच्या कामाशी किमान पातळीवर व स्वत:च्या
पद्धतीने जोडून घेणे, याची देखील सुप्त इच्छा असलेले अनेकजण असणार.
जसे फारसे परिचित नसलेले क्रियाशील कार्यकर्ते उत्साहाने अधिकाधिक क्रियाशील बनू
इच्छितात; फक्त गरज आहे थेट व नीट संपर्काची. तसेच
आपापल्या ठिकाणी या कामासाठी जोडून घेऊ इच्छिणारे लोक असणार. गरज दुहेरी आहे. एक तर तुमचे छोटेसे जोडून घेणे देखील आम्हाला
लाखमोलाचे वाटते आणि तुमच्या भावनेला सक्रिय प्रतिसाद देण्याची आमची इच्छा, क्षमता व संघटन आहे, असे होकारात्मक चित्र
संघटनेने उभे करावयास हवे. दुसऱ्या बाजूला अशा व्यक्तींना संपर्कात आणण्यासाठी सतत
डोळस, जागरूक हवे. यातील कोणी वार्तापत्र वाचून
आपणास भेटतील, कोणी व्याख्यानंतर आपणास संपर्क साधतील, तर कोणाला अनौपचारिक गप्पांमध्ये आपला मुद्दा पटेल. आणखी कोणास
एखाद्या प्रसंगाने आपली आठवण होईल. हे लिहीत असताना माझ्या डोळ्यासमोर आहे की, हा लेखही काही हजार वाचक आणि काही शेकडा कार्यकर्ते वाचतील. त्यांनी
माझ्या या विचाराला त्यांच्या अनुभवातून प्रतिसाद दिला, या कल्पनेचा अधिक उणेपणा कळवला किंवा त्यापुढे जाऊन सरळ मदतीचा
हात पुढे केला तर त्यासाठी मी आणि आपली समिती उत्सुक आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा