शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

खरा केंद्रबिंदू



खरा केंद्रबिंदू
दाभोलकर, संघटन, जाहिरात संकलन, वार्तापत्र
आपल्या दिवाळी अंकाची तयारी जोरात सुरू होती. सुरुवातीच्या काळात संपादकांचा सूर काळजीचा होता. अपेक्षित तारखेपर्यंत ८५ हजारांच्याच जाहिराती ताब्यात आल्या होत्या. अंकाचा खर्चही त्यापेक्षा बराच जास्त होता. पण हळूहळू चित्र बदलत गेले. चारही बाजूंनी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी जाहिरातींचा ओघ सुरू झाला आणि बघता-बघता जाहिरातींच्यामधून मिळणाऱ्या रकमेचा आकडा दोन लाख ७५ हजार ओलांडून गेला. मला समाधान, आनंद, अभिमान सगळ्याच भावना मनात दाटून आल्या. जाहिरातीसाठी कोणाही बुजुर्ग व्यक्तीचा वरदहस्त नसताना महाराष्ट्रात दूरदूर पसरलेल्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या चिकाटीने ही झेप मारावी आणि त्यांना तसा प्रतिसाद मिळावा, ही बाब कार्यकर्ते आणि चळवळ दोघांनाही भूषणावह आहे, असे वाटले. वेगळ्या चळवळीशी संबंधित एका दिवाळी अंकाबद्दल चर्चा झाली. त्यावेळी जाहिरातीचा ताळेबंद आणि हिशेब बघताना तर समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावयास हवी, याची खात्री पटली.

यानंतर थोड्याच दिवसात नवनाथ लोंढे, राजगुरूनगर, पुणे यांचे पत्र आले. श्री. लोंढे हे बऱ्याच प्रतिकुलतेला तोंड देत अत्यंत तळमळीने चळवळीला वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्रात चळवळीच्या वाढत्या प्रभावाच्या वर्णनाबरोबर खंतही होती. गेल्या वर्षभरातील त्यांच्याशी संबंधित घटनांचा आढावा होता. त्यांनी असे मत व्यक्त केले की, काही बाबतीत आपण बरेच कमी पडतो. उदाहरणासह त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि त्यामध्ये तथ्यांश होताच. बुवाबाजीच्या एका प्रकरणाचा नेटाने पाठपुरावा करावयास न जमणे, पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराची बातमी प्रसिद्ध न होणे, ज्या ठिकाणी कार्यक्रम जाहीर व चांगले झाले, त्या ठिकाणी नवसासाठी कोंबडे मारले जाणे राजरोसपणे सुरू राहणे; अशा स्वरुपाची त्यांची खंत होती. माझ्यापुढे एक प्रश्नचिन्ह उभे राहिले.

प्रतिभा आणि आकर्षण टिकणार नाही!
जाहिराती चांगल्या प्रकारे मिळाल्या, याबद्दल कार्यकर्त्यांच्या करावयाच्या अभिनंदनाची शाई वाळते न वाळते, तोच डिसेंबर महिन्यात वार्तापत्राच्या वर्गणीदारांची पुढील वर्षाची नोंदणी सुरू करावी, हा तगादा लावावा लागणार. ते काम होईपर्यंत राज्य मेळावा आणि परिषद यासाठी अधिकाधिक संख्येने क्रियाशील कार्यकर्ते येतील. यासाठी उठाव करणे आलेच. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पाचे काही विशेष अभ्यासक्रम आपण सुरू करत आहोत. त्यापैकी एखाद्या विषयाचे एकतरी शिबीर जानेवारी महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात व्हावयास हवे. फेब्रुवारी महिन्यात मार्चमध्ये धरणे विधानसभेसमोर धरण्याच्या कार्यक्रमाची आखणी झाली. चळवळीने ज्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत त्या पूर्ण करायच्या तर मार्ग खडतर व कष्टाचा आहे. सवडीसवडीने जमेल तसे काम केले तर मार्ग सोपा आणि सवलतीचा आहे. काम वाढले म्हणून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. आपल्यातील कार्यकर्त्यांच्याही संघटनेकडून अपेक्षा वाढल्या असणार. त्यामुळे कठोर काम केले तरच लोकांच्या अपेक्षाभंगाच्या नाराजीला तोंड द्यावे लागणार नाही. सवडीचा आणि सोयीचा मार्ग आता उपलब्ध नाही.

खरी अडचण येथून सुरू होते. यापुढील टप्प्यावरचे काम अवघडच आहे. बुवाबाजीच्या चमत्काराचे सादरीकरण, चमत्कारांना आव्हान वा बुवाचा पर्दाफाश किंवा भुताचा शोध याच्या पुढील टप्प्यावर जाणारे हे काम आहे. आपली एक मर्यादा अशी आहे की, कार्यकर्ता लहानपणापासून आपल्याकडे घडलेला नाही. तो चळवळीला मध्येच कोठेतरी जोडलेला आहे. त्याला नोकरी आहे, कुटुंब आहे, अन्य अवधाने आहेत आणि हे सारे सांभाळत तो कार्य करीत आहे. त्याला जी मर्यादा असणार ती लक्षात न घेता चळवळीच्या विस्ताराची महत्त्वाकांक्षा पेलणार नाही आणि चळवळीचा महत्त्वाकांक्षी पुढच्या टप्प्यावर विचार केला नाही, तर आजची प्रतिभा आणि आकर्षण टिकणार नाही.

हा सुवर्णमध्य कसा साधायचा? काहीही झाले तरी आगेकूच सुरूच ठेवायची असेल, तर शॉर्टकट नाही. स्वत:चा वेळ काटेकोरपणे वापरणे आणि त्यामुळे उपलब्ध होणारा वेळ समितीच्या कार्याला देणे, याची निकड आहे. व्यक्तिगत आणि संघटनात्मक पातळीवर जेवढी शिस्त आणता येईल, तो प्रयत्न कसोशीने करावयास हवा. छोटी-मोठी साधनसामग्री जोडावयास हवी. सर्व थरातील नवीन लोक चळवळीकडे खेचले जातील आणि त्यातील काही कार्यकर्ते बनतील, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावयास हवे. या साऱ्यासाठी किमान समर्पणाची भावना त्याबद्दल कोणतेही अवडंबर न माजवता आचरणात आणावयास हवी. उत्तम दिवाळी अंक, भरपूर जाहिराती, भव्य राज्यव्यापी मेळावा हे सारे विस्तारण्याचे लक्षण आहेच; पण ही बाह्यलक्षणे काही वेळा पुरेशी यथार्थ ठरत नाहीत. संघटनेच्या खऱ्या विस्तारण्याचे प्रतिबिंब त्यातून पडतेच असे नाही. खऱ्या अर्थाने विस्तारणाऱ्या क्षितिजाचा केंद्रबिंदू आहे, कार्यकर्त्यांची बांधिलकी.            
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९९७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...