शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

रचनात्मक संघर्षाचे शिक्षण




रचनात्मक संघर्षाचे शिक्षण
दाभोलकर, संघर्ष, प्रबोधन, चळवळ, पुस्तक विक्री, प्रशिक्षण शिबीर
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या व्याख्यानांना, चमत्काराच्या प्रात्यक्षिकांना मिळणारा प्रतिसाद उदंड असतो. त्याही पुढे जाऊन एखाद्या बाबाचा पर्दाफाश करायचा असेल तर काहीजणांचा उत्साह अनावर होतो. भानामतीच्या घटना इतरांना गूढ वाटतात, तर आपल्या कार्यकर्त्यांना ती चांगली संधी वाटते. भूत दाखविणे अथवा कोणत्याही कार्यकर्त्याला भूत लावून दाखविणे, यासाठी संघर्षाच्या पवित्र्यात कार्यकर्ते सदैव सिद्ध असतात. चमत्कारांना द्यावयाचे आव्हान असाच उत्साह निर्माण करते. ही सारी आणि या स्वरुपाची इतर कारणे ही संघर्षाची असतात. त्यामध्ये नाट्य असते, आव्हान असते. बातमी असल्यामुळे प्रसिद्धी असते. समितीची ओळख आज महाराष्ट्राला आहे. त्यामध्ये अंधश्रद्धांच्या विरोधात सतत संघर्षात उभे राहणे, यात समितीच्या लढाऊपणाचा नक्कीच वाटा आहे.

याबरोबरच संघर्षाच्या कार्यक्रमाची एक मर्यादाही जाणवते. एक तर संघर्षाचे विषय सतत असतातच, असे नाही. चळवळ स्थिरावल्यानंतर आता गूढ भानामतीचे प्रकार फारसे आढळत नाहीत आणि आढळले तरी टिकत नाहीत. भुताबाबतचे आव्हान घेऊनही आता सहजासहजी कोणी पुढे येत नाही. चमत्काराचा दावा करणारे बुवा, बाबा, स्वामी, महाराज देखील अपवादानेच दिसतात. बुवाबाजीचे प्रकार घडत असतात व शाखा त्याचा प्रतिकारही करीत असतात.

संघर्ष करण्याचे कार्यक्रम घेण्यात आणखी एक अडचण असते. अनेकदा अंधश्रद्धेचे रूप अप्रकटपणे देवाधर्माशी जोडलेले असते. त्याबाबत किती कठोर प्रहार करायचा व त्याचा परिणाम काय होईल, हे ठरविणे, सांगणे सोपे नसते. मूळ मुद्दा बाजूला राहून भलतेच काही उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे संघर्ष टाळण्याकडे काही कार्यकर्त्यांचा कल असतो. शिवाय एकदा लढाईला तोंड फुटले की, किती वेळ लागेल हे सांगणे शक्य नसते. त्यासाठी हुकमी वेळ, पैसा, धावपळ याचे गणित जमवावे लागते. याबाबतही अनेक अडचणी असू शकतात. या साऱ्याचा परिणाम असा होतो की, चळवळीच्या चमकदारपणाच्या आकर्षणातून आपण चळवळीकडे येतो; परंतु या ना त्या कारणामुळे ती झळाळी राहत नाही. मग कार्य थंडावते, कार्यकर्ते पांगतात.

रचनात्मक कार्य
कुठल्याही चळवळीत लढाईचे, आकर्षणाचे, प्रसिद्धीचे प्रसंग कमीच असतात व असणार. पण ज्यावेळी संघर्षाला सामोरे जावे लागते, त्यावेळी हुकुमी उपलब्ध असा असावा म्हणून शक्तिसंचय करावा लागतो. तो करता येतो रचनात्मक कार्यामधून. शांत, संथ, झळाळी नसलेले; पण उपयुक्तता असलेले हे असे कार्य असते. त्याबाबत जेवढा उत्साह, चिकाटी, कल्पकता, सातत्य दाखवावयास हवे, तेवढे दाखविले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

खरे तर भाषणे देणे हा कार्यक्रम शुष्क रचनात्मक नाही. समोरच्या श्रोतृवर्गाचा प्रतिसाद तुम्हाला ताबडतोब तुमच्या श्रमाचे फळ देतो. परंतु अर्थातच सन्मानाने मानधनासह निमंत्रण येईल, अशी वाट बघत बसले तर संपलेच. अनेक मोठ्या संघटनांचे कार्यकर्ते आजही स्वखर्चाने झपाटल्याप्रमाणे वेळ देऊन आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जिवाचे रान करीत असतात. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मूलत: प्रबोधनाची चळवळ आहे. व्याख्यानाचे निमंत्रण मिळविणे ही बाब आता चळवळीच्या प्रभावाने अवघड राहिलेली नाही. खरा प्रश्न आहे, व्याख्यानाचा. रचनात्मक कार्यासाठी स्वत:च्या पुढाकाराने स्वत:चा वेळ देण्याचा.

आज अनेकविध रचनात्मक कामे संघटनेमार्फत निर्माण झालेली आहेत. माझा मुद्दा आहे तो असा की, ही रचनात्मक कामे संघटनेतील क्रियाशील कार्यकर्त्यांचा स्थायी भाव झालेली नाहीत. पुस्तकविक्री हे एक अतिशय उपयुक्त रचनात्मक हत्यार आहे. एका बाजूला समितीचा विचार त्यामुळे सर्वदूर जातो, तर दुसऱ्या बाजूला संघटनात्मक कामासाठी हुकमी निधी पुस्तकविक्रीच्या माध्यमातून उभा राहतो. मात्र यासाठी पुस्तक जवळ ठेवण्याची, इतरांना दाखविण्याची, त्याबद्दल बोलण्याची, पुस्तक विकत घेण्याचा आग्रह करण्याची वृत्ती हवी. आज संघटनेत असे आढळत नाही. सत्यशोध प्रज्ञा परीक्षा हे असेच एक रचनात्मक कार्य आहे. त्याचे प्रशिक्षण शिबीर घेतले की, आपले काम संपले, अशी जाणीव अनेक कार्यकर्त्यांच्यात आढळते. यामुळे शिबिराचा पाठपुरावा करून शिक्षकांना आपल्या शाळेत केंद्र सुरू करण्यासाठी उद्युक्त करणे, हे घडत नाही. मग स्वत:च्या शाखेमार्फत किमान एक-दोन शाळांत सत्यशोध प्रज्ञा परीक्षेचे केंद्र चालविणे तर दूरच. खरे तर याही उपक्रमांतून विद्यार्थी अथवा तरुणांशी संपर्क आणि शाखेला काही निधी याचा लाभ होऊ शकतो. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पात आता आपण व्यसनमुक्ती, सर्पविज्ञान, महिला आरोग्य असे छोटे-छोटे अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर हे तर अधिकच गरजेचे झाले आहे.

कोणत्या कार्यकर्त्यांची उभारणी हवी?
याचे भान विसरले की, समितीच्या कामाला प्रासंगिक उत्साही उपक्रमाचे स्वरूप प्राप्त होते. आज अन्य कोणीही तेवढे करीत नाही. त्यामुळे त्या कार्याबाबत कौतुकही होते; परंतु यामधून ना संघर्षासाठी शक्तिसंचय होतो ना रचनात्मक कामाच्या भक्कम पायावर संघटनात्मक उभारणी होते. ही त्रुटी असूनही आज समितीचे कार्य तरून जाते, याचे कारण काहीजण खूप अधिक काम करतात आणि एकूण फायद्याची बाजू वरचढ दाखवतात. जसे-काही व्यक्ती, शाखा निष्ठेने मोठ्या संख्येने आपली प्रकाशने विकतात आणि समितीचा प्रकाशन व्यवसाय फायद्यात ठेवतात.

कुठल्याही संघटनेत रचनात्मक संघर्षाचे हे संतुलन कसे राखलेले असते, यावरच प्रगतीची वाटचाल अवलंबून असते. मला तरी आज याबाबत संघटनेची स्थिती समाधानकारक वाटत नाही. कामाची यापुढची झेप घ्यायची तर ही उणीव दूर करावयास हवी. मोजक्या संघर्षात असो; पण ठामपणे उभे राहतील आणि संथपणे, सातत्याने प्रसिद्धिविन्मुख राहून रचनात्मक कामाला स्वत:ला जोडून घेतील, अशा कार्यकर्त्यांची उभारणी हे आजचे अग्रहक्काचे काम आहे. हे कसे घडून येईल? आजची नेमकी स्थिती याबाबत काय आहे आणि ती कशी पालटेल, याबाबत मी सहकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर १९९७)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...