‘बऱ्या’चे ‘चांगले’ कसे होणार?
दाभोलकर, संघटन, कार्यकर्ता, गुणदोष चिकित्सा
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते भेटले. सतत सर्वदूर संचार, अनेक संघटनांबरोबर संपर्क. सध्या काम करणाऱ्या संघटनांत आलेली निराशा, मरगळ याबाबत ते बोलत होते. बोलताना असेही म्हणाले, ‘सध्याच्या परिस्थितीत तुमचेच बरे चालले आहे, असे अनेकांना वाटते.’
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य बरे चालले आहे म्हणजे काय? काही बाबी लक्षात येतील. कार्याचे अस्तित्व सतत जाणवायचे तर विविध
उपक्रम आखावयास हवेत आणि ते नीटपणे पार पाडणारी यंत्रणा हवी. काही प्रमाणात आपल्या
संघटनेबाबत हे घडते आहे. संघटनेचा विचार वैशिष्ट्यपूर्ण हवा आणि तो पटविण्याची ताकद
हवी. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम विवेकवादाचे काम करणाऱ्या ज्या संघटना महाराष्ट्रात
आहेत, त्यापैकी जवळपास सर्वांचे मत असेच असते की, देव व धर्म या पायाभूत अंधश्रद्धांना उखडल्याशिवाय मलमपट्टी काय
कामाची? या पार्श्वभूमीवर देव व धर्म याबाबतची आमची
भूमिका तटस्थ आहे, हा समितीचा विचार लोकांना वेगळा वाटला. प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धा असते, हे झाले प्रचलित मत. विधायक श्रद्धांचा आम्ही आदर करतो आणि श्रद्धा
व अंधश्रद्धा यांचा निर्णय घेताना या शब्दाचे अर्थ व्यक्ती आपापल्या सोयीनुसार लावते
आणि खरी अडचण तेथे आहे. ही झाली समितीची भूमिका. या वैचारिक भूमिकांचा फायदाही आपल्या
संघटनेच्या वाढीला नक्कीच मिळाला असणार. परंतु यापलिकडे कुठल्याही संघटनेत एक महत्त्वाचा
पैलू असतो. तो म्हणजे कार्यकर्त्यांच्या आपापसातील संबंधांचा, राग-लोभांचा. त्याआधारेच संघटनेच्या वस्त्रातील आतील ताणे-बाणे
विणले जात असतात. याबाबत आपल्या संघटनेत काय स्थिती आहे? असावयास हवी?
संघटना माणसांची असते. कार्यकर्ते हे वासनाविचार
असलेली माणसेच असतात. त्यांच्या या मर्यादांचे प्रतिबिंब जसे त्यांच्या कुटुंबात उमटणार, तसेच जणू मोठे कुटुंबच असलेल्या संघटनेतही
पडणारच. अशावेळी काही पथ्ये पाळावी
लागतात, पाळली जावीत. पहिले महत्त्वाचे म्हणजे सहकाऱ्यांच्या
मागे टीका करू नये, उणी-दुणी काढू नयेत. सहकाऱ्यांचे दोष, त्याबाबतची नाराजी, आपले मत याची चर्चा खुलेपणाने
समोरासमोर करावयाची तयारी हवी. दुसरे महत्त्वाचे म्हणजे चुकांच्यावर जिव्हाळ्याने बोलावे; पण सतत टीकाच करून तेजोभंग करू नये. कार्यकर्ता वरिष्ठ झाला की, त्याला वरचा दर्जा प्राप्त झाला आहे, असे आपोआप वाटू लागते. मग अन्य कनिष्ठ सहकाऱ्यांना सूचना देण्याऐवजी
नकळत आदेश दिले जाऊ लागतात. हे टाळावयास हवे. संघटनेत नवे तरुण मोठ्या उमेदीने येतात.
समितीमध्ये आपोआपच दोस्तवर्तुळे तयार झालेली असतातच. त्यामध्ये या नव्या कार्यकर्त्याला
प्रवेश नकळत नाकारला जातो. त्यांना अपेक्षित संधी मिळत नाही, मानही नाही. त्यांच्या उत्साहाला आणि त्याबरोबरच संघटनेच्या विस्ताराला
ओहोटी लागते.
महत्त्वाकांक्षी असणे ही बाब स्वाभाविक आहे.
स्वत:च्या महत्त्वाकांक्षेला वाव मिळावा, असे
माणसाला वाटणे यात गैर काही नाही. एका अर्थाने व्यक्तीच्या व संघटनेच्या वाढीसाठी हा गुण उपयुक्त
आहे. पण या साऱ्यांबरोबरच गैरवाजवी आकांक्षा निर्माण झाली, तर संघटनेत ताण निर्माण होतात. कार्यहानी होते.
संघटनेतील असे व्यक्तिवादी गुणदोष बरेच मांडता येतील. ते नसणारी
संघटना असेल, हे मानणे मानवी स्वभावाच्या अज्ञानाचे लक्षण
मानावे लागेल. माझ्यापुढचा प्रश्न जो मी विचारचिंतनासाठी मांडत आहे, तो हा की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात आज
या प्रकारे जाणवणारे कोणते दोष समितीच्या कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना वाटतात आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते दूर करण्याचे
कोणते मार्ग त्यांना सुचतात?
अनेक मार्ग व पद्धती सुचू शकतील. त्या जरूर सुचवाव्यात. त्याच्या
कार्यवाहीचे प्रयोग करावे लागतील. ते आपण करू. पण त्यासाठी आपल्याला एकत्रितपणे अथवा
स्वतंत्रपणे चिंतन करावेच लागेल.
आपण शिबिरे अनेक घेतो. ती वैचारिक असतात. संघटना बांधणीची शिबिरे
जवळपास घेत नाही. स्वाभाविकच समितीच्या विचारांचा प्रचारक घडतो; पण शिस्तबद्ध कार्यकर्ता घडत नाही. अशी शिबिरे घेणे हा एक मार्ग
झाला. दुसरा मार्ग आत्मटीका करणाऱ्या बैठकांचा, साम्यवादी चळवळीतील हा
आवडता शब्द. तो मोलाचा आहे. कार्यकर्ते खस्ता खाऊन-धावून कामे करीत असतात, त्यामुळे त्यांची चिकित्सा करणे हे काम तसे अप्रियच. काही वेळा
यश मिळते. त्या सुखाची चव मनात रेंगाळत असताना त्याचे विश्लेषण नकोसे वाटते; परंतु आत्मटीका सुरू ठेवली तरच खरी प्रगती चालू राहते. चुका सुधारायला
प्रत्येक वेळी बौद्धिकेच लागतात असे नाही. संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांचे वर्तन
हे देखील मार्गदर्शक ठरू शकते. त्या संयमित वर्तनातून संघटना बांधणीचे संस्कार अबोलपणे
परिणामकारक ठरू शकतात. अशाच चर्चेच्या वेळी एकाने एक वेगळाच उपाय सुचविला. तो म्हणाला
‘सहकाऱ्याचे दोष सांगणे चांगले; पण खूप अवघड. वाईटपणा नको म्हणून टाळले जातात. त्यापेक्षा शाखांच्या
बैठकीत बाजूला एक पेटी असावी. ज्या व्यक्तीबद्दल जी सूचना असेल (उदा. बैठकीला वेळेवर
येत नाही, रागावतो चटकन, कार्यकर्त्यांना तोडून बोलतो.) ती त्या व्यक्तीच्या नावे चिठ्ठी
लिहून त्या पेटीत टाकावी. लिहिणाऱ्याने स्वत:चे नाव लिहायची गरज नाही. चिठ्ठीवरची नावे
पाहून संबंधितांनी आपापल्या चिठ्ठ्या घेऊन जाव्यात.’ आपल्या मित्राचे मत समजून
घ्यावे. स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करावा.
सुरुवातीलाच मी लिहिले आहे, आपली चळवळ बरी चालली आहे, असे महाराष्ट्रात मानले जाते. ती चांगली चालवायची, वर्धिष्णु बनवायची तर संघटनेतील कार्यकर्त्यांची जडणघडण व त्यांच्यामार्फत
होणारी समितीची घडण निर्दोष हवी. वर काही कल्पना वानगीदाखल दिल्या आहेत. आपापल्या प्रतिभेने
आपण त्यात सुधारणा करू शकाल, भर घालू शकाल; मात्र त्यासाठी विचार करण्याचा आणि नंतर लिहिण्याचा आळस झटकावयास
हवा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट १९९७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा