असे
झाले मुंबईतील ‘थोबाडीत मारा’ (स्वतःच्या) आंदोलन
दाभोलकर, स्वतःच्याच थोबाडीत मारायचे आंदोलन,
उपोषण, मंत्र्यांचे आश्वासन
शुक्रवार, दि.
२५ जुलै. मुंबईला अधून-मधून; पण
जोरदारपणे पावसाच्या सरी कोसळत होत्या. ज्या आझाद मैदानावर ‘स्वत:च्याच थोबाडीत मारा’ या अभिनव सत्याग्रहाचा समारोप होता,
त्याच्या एका बाजूला पाणीही
साचले होते. समितीचा मंडप ज्या ठिकाणी घातला गेला होता, त्याला लागूनच प्रा. एन. डी. पाटील बेमुदत
उपोषणाला बसले, त्यांचाही
मंडप होता. सरांचे उपोषण त्यांना शासनाने वर्षापूर्वी दिलेले आश्वासन पाळले नाही,
या वचनभंगाबद्दल होते;
तर आपला सत्याग्रह १९९९ साली लेखी स्वीकारलेल्या
कार्यक्रमाबाबत सतत ९ वर्षे वचनभंग चालू आहे, त्यासाठी होता. मंडपातले प्रतिनिधी वेगवेगळे
होते; परंतु अंत:करणे परिवर्तनाच्या
समान धाग्यांनीच बांधलेली होती. स्वाभाविकच दोन व्यासपीठे होती; पण अनेक बाबतीत वक्ते एक होते. घोषणा पूरक
होत्या. गाण्यातील शब्द वेगळे होते; पण आशय समग्र बदलाचाच होता. सकाळी ९ पासून कार्यकर्ते येऊ लागले.
११ वाजता कार्यकर्त्यांची संख्या शंभरीच्या घरात पोचली. मुंबई, ठाणे, रायगड येथील कार्यकर्तेच बोलावले असल्याने
स्वाभाविकपणे एवढीच संख्या अपेक्षित होती. मात्र उत्साहाने इस्लामपूर (जि. सांगली)
शाखेचे कार्यकर्ते खास जीप करून आले होते; तर अन्य काही जिल्ह्यांतील कार्यकर्तेही प्रातिनिधिक स्वरुपात होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर गजानन खातू, पुष्पाताई भावे, सदाशिव अमरापूरकर, सुरेखा दळवी, समविचारी संघटनांचे अन्य नेते, कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली. आपापली
मते मांडली. पाठिंबा दिला. कमी-जास्त प्रमाणात सगळ्यांचा सूर एकच होता. तो म्हणजे सरकारचा
नाकर्तेपणा, अक्षम्य
दिरंगाई, सरकारला जाब विचारण्याची
गरज इत्यादी. परंतु प्रसारमाध्यमांना या भाषणात कमी रस होता. त्यांना पाहिजे होती,
‘स्वत:च्याच थोबाडीत मारा’ या सत्याग्रहाची छायाचित्रे. व्यासपीठावरील ध्वनिक्षेपकावरून १
पासून १०० पर्यंतचे आकडे जोराने उच्चारले गेले आणि दोन्ही मंडपातील उपस्थित समुदायाने
स्वत:च्या गालावर थपडा मारत त्याला साथ दिली. १०० चा एक राऊंड झाला की, काही भाषणे, गाणी; मग पुन्हा राऊंड असे सतत चालू राहिले.
दीड वाजता पोलिसांच्या गाडीतून समितीचे १२ प्रतिनिधी कार्यकर्ते
सदाशिव अमरापूरकरांच्यासह विधानभवनात मंत्र्यांच्या भेटीसाठी गेली. सामाजिक न्याय विभागाचे
मंत्री ना. चंद्रकांत हांडोरे यांची भेट मला निराशाजनक वाटली. संयुक्त चिकित्सा समितीकडे
गेले १५ महिने ‘जादूटोणाविरोधी विधेयक’ सखोल चर्चेसाठी आहे. मात्र त्याबाबतची कार्यवाही अत्यंत संथ गतीने
चालू आहे. १३ सप्टेंबर २००७ नंतर त्याची बैठकही नामदार महोदयांनी घेतलेली नाही. ती
का घेतली नाही, याचे
काही कारणही ते देऊ शकले नाहीत आणि या बैठका लवकर संपवून हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव
मांडूच, असेही स्पष्टपणे सांगण्याची
(वा न सांगण्याची) हिंमत त्यांनी दाखवली नाही. त्यांनी दिलेली सर्वच उत्तरे असमाधानकारक
होती. शिष्टमंडळाला त्याबद्दल तीव्र नाराजी वाटली, हे त्यांच्याही लक्षात आले असावे. कारण अधिकृत
भेट संपल्यानंतर त्यांनी सदाशिव अमरापूरकर यांना पुन्हा बोलावून घेतले आणि स्वत:ची
बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर सर्व शिष्टमंडळ विधिमंडळाच्या इमारतीत
उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले. त्या दिवशी उपमुख्यमंत्री अत्यंत व्यग्र होते.
एक तर त्यांच्या गृहखात्यावर सविस्तर चर्चा चालू होती. शिवाय मुख्यमंत्री मुंबईत नसल्याने
त्यांच्यावर अधिक जबाबदारी होती. त्यातच विधिमंडळ अधिवेशन एक आठवडा आधी संपवण्याचे
ठरल्याने कामकाजाचा ताण होता. तरीही शिष्टमंडळाला भेट देण्याचा शब्द त्यांनी दिला होता
व तो त्यांनी पाळला. त्यांची भेट मिळण्यासाठी सुमारे दीड तास थांबावे लागले. तेवढ्या
वेळात सदाशिव अमरापूरकर व नरेंद्र दाभोलकर यांनी विधानसभेचे सभापती बाबासाहेब कुपेकर
यांची भेट घेतली. कुपेकर यांनी ‘अंनिस’च्या कामाला स्वत:चा
मनापासून पाठिंबा असल्याचे सांगितले व कायद्याचा विषय निकाली लागण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी
बोलण्याचे मान्य केले.
उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमवेत भेट कमी वेळात;
पण नेमकी झाली. त्यांनी सांगितले की,
या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या
समवेत त्यांचे बोलणे झाले होते व मुख्यमंत्रीही कायदा करण्याच्या बाजूचेच आहेत. ६ ऑगस्टला
म्हणजे बुधवारची मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक घडवून
आणून जादूटोणाविरोधी कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या तोंडूनच होकार ऐकण्याचा मनोदय
त्यांनी बोलून दाखवला. यावेळी मृणालताई गोरे, उल्का महाजन यापण उपस्थित होत्या. पुन्हा
पोलिसांच्या गाडीतून सर्व शिष्टमंडळ आझाद मैदानावर आले. भेटीगाठींचा वृत्तांत सत्याग्रहींना
कथन करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीत प्रदीर्घ काळ होऊनही ही लढाई चिकाटीने लढण्याचा
व त्यात यशस्वी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मग दोन्ही मंडपातील कार्यकर्त्यांनी
आपापल्या शेजाऱ्याचे हात हातात धरले. उच्च स्वराने ‘हम होंगे कामयाब’ हे गाणे गायले आणि यश मिळेलच, हा आशावाद सर्वांच्या मुखातून पुन्हा एकदा
अधोरेखित झाला.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २००८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा