जादूटोणाविरोधी
कायद्यासाठी स्वरक्ताची हजारो पत्रे
दाभोलकर, कायदा, आंदोलन, स्वरक्ताची पत्रे, संघर्ष,
समन्वयाची भूमिका,
संयोजन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही लोकशाहीवादी संघटना आहे.
स्वाभाविकच एखादी मोहीम, आंदोलन
घेण्याचा मुद्दा आला की, मतमतांतरे
आलीच. त्यातही आंदोलनाची कल्पना वेगळी असेल तर चर्चा अधिकच. जादूटोणाविरोधी कायद्यासाठीचा
संघर्ष स्वरक्ताने पत्र लिहून करावयाचा, अशी कल्पना ज्यावेळी कार्यकारी समितीत चर्चेला
आली, त्यावेळी
स्वाभाविकच अनेकांना अनेक प्रकारच्या शंका होत्या. कार्यकारी समितीने आंदोलनाचा निर्णय
घेतला. नोव्हेंबरमधील विधानसभा अधिवेशन तोंडावर होते. राज्य कार्यकारिणीबरोबर बोलण्यास
वेळच नव्हता.
आंदोलन जाहीर झाले. राज्य कार्यकारिणीत चर्चा घेण्याचा एक महत्त्वाचा
फायदा म्हणजे संपूर्ण राज्यातील प्रमुख कार्यकर्ते चर्चेत सहभागी होतात. वेळेअभावी
ते झाले नाही. यामुळे आंदोलनाची भूमिका सर्वत्र पोचली नाही. कार्यकर्त्यांच्यात आंदोलनाबाबतचा
संभ्रम कायम राहिला. या परिस्थितीत आंदोलन करणे व ते परिणामकारक करणे अवघड होते. पण
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यामुळे संदर्भच बदलले. मुख्यमंत्रीही बदलले. मग आंदोलन पुढे
ढकलण्यात आले. डिसेंबरमध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. भरपूर चर्चा झाली आणि आंदोलन
करण्याचे नक्की झाले.
साधारणपणे स्वरूप असे ठरले. जिल्ह्याच्या ठिकाणी महात्मा गांधी
अथवा अन्य समाजसुधारक यांच्या पुतळ्याजवळ जमावयाचे. तेथे स्वत:चे ५ सी.सी. रक्त काढून
बाटलीत घ्यावयाचे, ब्रश
वापरून त्या रक्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,
सोनिया गांधी व शरद पवार यांना पत्र लिहावयाचे.
हे प्रत्यक्षात आधी करूनही बघण्यात आले. रक्त किती लागते? लिहिण्यास वेळ किती लागतो? याचा अंदाज घेण्यात आला. एक पत्र लिहिण्यास
साधारण पंधरा मिनिटे लागतात, असे
लक्षात आले. एका मागोमाग एक अशी आठ पत्रे लिहावीत, असे ठरवण्यात आले. प्रत्यक्षात वेगळे घडत
गेले. प्रत्येक ठिकाणी रक्त काढणे चालू झाले की, वातावरणात जणू उत्साहाचा संचार होई. कार्यकर्ते
भराभर व अहमहमिकेने रक्त देत, ब्रश
हातात घेत आणि पत्र लिहावयास सुरुवात करत. त्यामुळे एकाच वेळी १५ पासून पन्नास पर्यंतच्या
संख्येने कार्यकर्ते स्वरक्ताने पत्र लिहीत आहेत, असा माहोल उभा राही. तो उत्साहवर्धक असे.
नंतर महात्मा गांधी अथवा समाजसुधारक यांच्या फोटो अथवा पुतळ्याच्या बाजूला सर्वजण आपापली
पत्रे घेऊन जमत. ‘कायदा झालाच पाहिजे’ ही घोषणा बुलंद केली जाई आणि त्या-त्या
जिल्ह्यातूनच नेतेमंडळींना पत्रे रवाना होत. सगळीकडे कार्यकर्त्यांचा चांगला उत्साह
होता. संख्याही चांगली होती.
बहुतेक ठिकाणी वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे यांनी उत्तम सहकार्य दिले.
स्वतंत्र लेखही छापले गेले. एकीकडे कायदा करण्याबाबत शासनाची अकार्यक्षमता व असंवेदनशीलता
आणि दुसरीकडे न थकता कायद्यासाठी संघर्ष करण्याचा समितीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार
व त्यासाठीची कृती, ही
बाब जनमानसात समितीच्या मागणीचे सच्चेपण व सत्याग्रहाचे वेगळेपण दोन्ही पोचवून गेली.
सर्व ठिकाणी मी होतोच. अविनाश पाटीलही बहुतेक ठिकाणी होतेच.
या झंझावाती दौऱ्याचा हा धावता वृत्तांत.
२ मार्च सकाळी १० वा. महात्मा फुले वाडा, पुणे : पुणे जिल्ह्यातील चार-पाच शाखांचे
कार्यकर्ते. संख्या ३०-३५. नव्यानेच कार्यकर्ते झालेल्या तरुणांची संख्या लक्षणीय.
बाबा आढावांची उपस्थिती. त्यांनी दोन समतागीते गायिली. सर्वांनी साथ दिली. सर्व इलेक्ट्रॉनिक
माध्यमे उपस्थित. वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मात्र अभावानेच. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी
विश्वस्त सुभाष वारे यांचीही उपस्थिती. अशा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राजकीय बाबींचे
भानही राखण्याचे त्यांचे आवाहन.
३ मार्च, सकाळी
१० वा. सोलापूर : पोलिसांनी हुतात्मा चौकात परवानगी नाकारल्याने बंद हॉलमध्ये कार्यक्रम.
सोलापुरातील नवे-जुने
कार्यकर्ते, मोहोळ
शाखेचे कार्यकर्ते उपस्थित. संयुक्त चिकित्सा समितीचे सभासद व मार्क्सवादी कम्युनिस्ट
पक्षाचे सोलापूरचे आमदार नरसय्या आडम यांची विशेष उपस्थिती. या कायद्याच्या जनसंघर्षात
अग्रभागी राहण्याची व प्रसंगी स्वत:चे रक्त सांडण्याची त्यांची घोषणा.
३ मार्च, सायं.
४ वा., गांधी चौक, लातूर : लातूर हा महाराष्ट्र अंनिसचा बुलंद
गड. त्यामुळे गांधी पुतळ्याच्या बाजूला मंडप टाकलेला. चार वाजताच तो कार्यकर्त्यांनी
भरलेला. थेट कृतीला सुरुवात. रक्त काढण्यासाठी आणलेल्या २५ सिरींज कमी पडल्या. रक्ताने
स्वत:ला शब्दांकित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आकडा ५० वर गेला. त्यात महिलांची संख्या
लक्षणीय होती.
४ मार्च, सकाळी
८.३० वाजता बीड मधला महात्मा फुले यांचा पुतळा : वेळ लवकरची; परंतु तरीही उत्साही कार्यकर्ते व समर्थक
हजर. बीड शहरातील काम गेली वर्षभर मंदावलेले. त्या पार्श्वभूमीवर ही तयारी व प्रतिसाद
नक्कीच आश्वासक.
५ मार्च, दुपारी
३ वा. महात्मा गांधी पुतळा, जालना
: रणरणते ऊन, तरीही
पुरेशी संख्या. चार वाजता रक्ताने पत्रे लिहिण्याला प्रारंभ. उत्साही सहभाग. त्यानंतर
विद्यार्थी वसतिगृहात विद्यार्थ्यांसमवेत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या खुल्या गप्पा.
६ मार्च, सकाळी
९, महात्मा गांधी भवन,
औरंगाबाद : गांधी पुतळ्याजवळचा कार्यक्रम
पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गांधी भवनात हलवावा लागला. औरंगाबाद जिल्ह्यात ‘अंनिस’ काम वाढले आहे. याचा प्रत्यय म्हणजे रक्त
देण्यासाठी जवळच्या शाखातील तरुण आवर्जून आले होते. ई.टी.व्ही., झी.टी.व्ही., दूरदर्शन, आय.बी.एन.लोकमत, साम टीव्ही असे सर्व चॅनेल झाडून हजर होते.
६ मार्च, दुपारी
१ वाजता जळगाव : येथे डॉ. जोशी यांच्या रुग्णालयातील हॉल. येथेही पोलिसांनी परवानगी
नाकारल्याने कार्यक्रम बंदिस्त जागेत. जळगाव जिल्ह्यातील काही शाखांच्या कार्यकर्त्यांचीही
भरउन्हात उपस्थिती. संख्या मर्यादित. प्रसारमाध्यमांचाही प्रतिसाद जेमतेम. पण कार्यकर्त्यांचा
निर्धार वाखाणण्याजोगा.
६ मार्च, रोजी
धुळे : येथे सायंकाळी ६ वाजता गांधींच्या पुतळ्याजवळ चौकात स्टेज घातलेले. त्यावर उत्तर
महाराष्ट्राचे आजी कुलगुरू निंबाजी ठाकरे, ज्येष्ठ नेते पन्नालालजी सुराणा यांची उपस्थिती. अनेक पक्ष संघटनांची
प्रातिनिधिक हजेरी. कार्यक्रमानंतर कायद्याबाबत जाहीर व्याख्यान.
७ मार्च, रोजी
सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक, नाशिक
: येथे नाशिक शाखेचे सर्व कार्यकर्ते, जिल्ह्यातील इतर शाखांच्या कार्यकर्त्यांची प्रातिनिधिक उपस्थिती.
समविचारी पक्ष संघटना यांच्या उपस्थितीचा प्रभाव. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हुदलीकर
यांचा उत्साहवर्धक सहभाग. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांनी ही सर्व घटना ठळकपणे पहिल्या
पानावर छापली. शाखेचे कामकाज मध्यंतरी थंडावले होते. नुकतीच तेथे पुन्हा नव्याने कार्यकारिणी
झाली होती. त्या कार्यकारिणीचा प्रारंभच जोरदार संघर्षाने झाला अशी कार्यकर्त्यांची
भावना झाली.
७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता, अहमदनगर : येथे गांधी पुतळ्याजवळ. नगर जिल्ह्यातील
संघटनेचे काम तसे विस्कळीत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक शाखांच्या कार्यकर्त्यांची
उपस्थिती, ही उमेद वाढविणारी बाब.
प्रसारमाध्यमांचा प्रतिसाद मर्यादित.
९ मार्च रोजी सकाळी परिवर्तन सभागृह, सातारा : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्याजवळ ठरलेला कार्यक्रम आदल्या दिवशी रात्री १० वाजता नोटीस बजावून पोलिसांनी
रोखला. सकाळी परिवर्तन संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील शाखांच्या
कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
९ मार्च रोजी सायं ५ वाजता, बेळगाव : येथे गावातील गांधी स्मारकाजवळ
कार्यकर्ते जमले. स्मारक उद्यानात आहे. बेळगाव महानगरपालिकेची परवानगी घेतलेली. पोलीस
स्टेशनला सूचना दिलेली. तरीही पोलिसांनी परवानगी नाकारली. शेजारच्या तुकाराम बँकेच्या
सभागृहात साडेसहाला भाषण होते. तेथे कार्यक्रम घेण्याचे ठरले. कार्यकर्ते हॉलमध्ये
जमले. १५ जणांनी रक्ताने पत्र लिहिण्यास सुरुवात केली. सर्व काही सुरळीत चालले असताना
सीन अचानक ट्रान्सफर झाला. पोलीस अधिकाऱ्यासह १०-१२ पोलीस हॉलमध्ये घुसले. त्यांनी
कर्नाटक पोलीस कायद्याप्रमाणे पत्रलेखन ताबडतोब थांबवण्याचा आदेश दिला. बेळगाव अंनिसचे
अध्यक्ष अॅड. राम आपटे त्यांना म्हणाले, ‘कोणत्या कायद्याप्रमाणे
तुम्ही ही कारवाई करत आहात? कायदा
दाखवा. मी गेली पन्नास वर्षे वकिली व्यवसाय करतो.’ पोलिसांच्याकडे उत्तर
नव्हते.
मात्र त्यांनी दांडगाई चालू ठेवली. पत्र लिहिण्यासाठी हाताखाली
घेतलेले पुठ्ठे हिसकावून घेतले. पत्रे ओढली. लिहून झालेली पत्रे ताब्यात घेतली,
चुरगळली, फाडली. पत्र लिहिण्याचे सर्व सामान ब्रश, बाटल्या जप्त केल्या.
कळस म्हणजे कार्यकर्ते बसलेल्या खुर्च्या ओढल्या. महात्मा गांधींचा फोटो जप्त केला.
कार्यकर्त्यांना शब्दश: हॉलबाहेर हाकलले. त्यानंतर सर्व कार्यकर्ते तरुण भारत,
सकाळ, पुढारी व इंडियन एक्स्प्रेस या बेळगावातील
प्रमुख दैनिकांच्या कार्यालयात गेले. पोलिसांची दंडेलशाही आणि त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे
घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला ही बाब त्यांनी नीटपणे मांडली.
थोडक्यात :- नियोजित सर्व कार्यक्रम कार्यकर्त्यांनी जिद्दीने यशस्वी
केले. त्यांची साधनसामग्री स्वत:च उभारली. सर्व कार्यक्रम वेळेत, शिस्तीत झाले. प्रसारमाध्यमांनी चांगली दखल
घेतली. इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रभर कार्यक्रम पोचला. कार्यक्रम
हा कोणालाही भडक वा अप्रस्तुत वाटला नाही. समिती प्रामाणिकपणे अनेक वर्षे सनदशीरपणे
लढत आहे आणि त्यातीलच एक अधिक निकराचा आत्मक्लेश म्हणून आता रक्ताने पत्रे लिहीत आहे.
ही लोकभावना संघटनेबाबतची जनमानसातील प्रतिमा दाखवते.
दि. १० मार्च २००९, सांगली, कष्टकऱ्यांची
दौलत सकाळी १२ वाजता
सांगली येथील कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध समविचारी
संघटनांचे कार्यकर्ते व सांगली जिल्ह्यातील आटपाडी, शिराळा, जत, तासगाव व इस्लामपूर या केंद्रांतील ‘अंनिस’चे
कार्यकर्ते घटनास्थळी जमले होते. या ठिकाणी रक्ताने पत्रे लिहिण्याच्या संख्येचा उच्चांक
मोडला. ५० पेक्षाही जास्त पत्रे लिहिली गेली. ‘जादूटोणाविरोधी कायदा’ झालाच पाहिजे,’ या घोषणेने सभागृह दणाणून गेले. त्यानंतर पत्रकार परिषदेत डॉ. दाभोलकरांनी
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या चळवळीबाबत आपली भूमिका सविस्तर विषद केली.
ता. १० मार्च कोल्हापूर, बिंदू चौक सायं. ५ वाजता
बिंदू चौक हे ठिकाण कोल्हापुरातील राजकीय जागृती व्यक्त करण्याचे
केंद्र मानले जाते. अशा खुल्या ठिकाणी कार्यक्रमाला परवानगी मिळेल का, याची साशंकता होती. परंतु संबंधित पोलीस
अधिकाऱ्यांनी पुरोगामी चळवळीला पूरक ठरणारी भूमिका स्वखुशीने घेतली. सुमारे ५० कार्यकर्त्यांनी
पत्रलेखन केले. इचलकरंजीचे कार्यकर्तेही आले होते. त्यांनी इचलकरंजी येथे स्वतंत्र
कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले व तो घेतलाही.
गुरुवार, ता.
१२ मार्च, हिंदी मोरभवन,
बर्डी, नागपूर
नागपूर येथे पत्रलेखन व नंतर भाषण असा कार्यक्रम एकत्रितच ठरला
होता. धुळवडीचा दुसरा दिवस होता. नागपुरात धुळवड प्रचंड खेळली जाते. परिणामी दुसऱ्या
दिवशी म्हणजेच कार्यक्रमाच्या दिवशी भाषणाची बातमी स्थानिक वृत्तपत्रात कोठेच आली नव्हती.
कार्यकर्त्यांनी अन्य मार्गांनी प्रयत्न केले होते. परंतु ते लोकांच्यापर्यंत पोचले
नसावेत किंवा लोकांना सवड अथवा आवड नसावी. नागपूरची शाखा संघटनात्मकरित्या नवीन आहे.
त्याचीही मर्यादा होतीच. यामुळे भाषणाला श्रोते खूप कमी होते. भाषणाआधी रक्ताने पत्र
लिहिण्याचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये अंदाजे १२ जणांनी सहभाग नोंदविला.
शुक्रवार, ता.
१३ मार्च सकाळी १० वाजता, गडचिरोली
येथील बी. एड. कॉलेजचा हॉल. कार्यकर्त्यांची संख्या मर्यादित होती. परंतु समविचारी
व्यक्ती; तसेच संघटनांचे प्रतिनिधी
आले होते. सुमारे २५ जणांनी रक्ताने पत्रे लिहिली. पत्रकार परिषद चांगली झाली.
१३ मार्च सायंकाळी ५ वाजता मातोश्री शिक्षण संस्थेचे मातोश्री सभागृह,
चंद्रपूर शिक्षणसंस्थेचे प्रमुखच कार्यक्रमात
आवर्जून सहभागी होते. रक्ताने पत्रे लिहिण्यात सुमारे २० ते २५ कार्यकर्त्यांनी भाग
घेतला. तेथेच सभा झाली. सभेला तरुण आणि तरुणी यांची भरपूर उपस्थिती होती. तसेच नागरिकही
चांगल्या संख्येने आले होते.
शनिवार, ता.
१४ मार्च सकाळी १० वाजता, यवतमाळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन
शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला; तसेच डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासही हार अर्पण
करून कार्यक्रम सुरू झाला. रक्ताने पत्रे लिहिण्याच्या कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनी
यांची संख्या लक्षणीय होती. सुमारे तीस जणांनी आपला सहभाग नोंदवला.
शनिवार, ता.१४
मार्च सायं. ५ वाजता, पंजाबराव
देशमुख स्मारक, अमरावती
अमरावतीतील कार्य संघटनात्मकरित्या प्राथमिक अवस्थेत आहे. परंतु तेथील प्राचार्य रमेश
अंधारे यांच्या पुढाकाराने व सहकार्याने कार्यक्रम उत्तम झाला. सुमारे २० जणांनी पत्रे
लिहिली. प्रसिद्धिमाध्यमांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवार, ता.
१५ मार्च, दुपारी ४ वाजता,
ठाणे
ठाणे येथील कार्यक्रम आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ
होता. कायद्याला विरोध असणाऱ्या प्रवृत्तींनी तक्रार केल्यामुळे पोलिसांची कायदा व
सुव्यवस्थाबाबत मानसिकता जागृत झाली. त्यांनी कार्यक्रम बंद जागी हलवण्यास भाग पाडले.
प्रत्यक्षात कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे ५० पत्रे लिहिली गेली. महिलांची संख्या
लक्षणीय होती.
सोमवार, ता.
१६ मार्च. मुख्यमंत्र्यांनी
दुपारी सव्वातीनची वेळ भेटीला दिली होती. समारोपाचा कार्यक्रम १७ तारखेला होता. त्यामुळे
१७ तारखेची भेटीची वेळ मागितली होती. परंतु मुख्यमंत्री त्या दिवशी नाहीत म्हणून त्यांनी
स्वत:हून आधीची वेळ दिली. विधानसभा अधिवेशनाचा तो पहिला दिवस होता. मुख्यमंत्री प्रचंड
धावपळीत होते. त्याबरोबरच त्यांना सायंकाळी विमानाने दिल्ली गाठावयाची होती. त्यांच्या
ऑफीसमध्ये आमदारांचा गराडा पडला होता. या सर्व परिस्थितीतही मुख्यमंत्री बैठकीच्या
हॉलमध्ये आले. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे व
खात्याचे सचिव उपस्थित होते. समितीच्या शिष्टमंडळात नरेंद्र दाभोलकर आणि आमदार पी.
जी. दस्तूरकर यांच्याबरोबरच संयुक्त चिकित्सा समितीमधील सहभागी आमदार गणपतरावजी देशमुख,
नरसय्या आडम, कपील पाटील, श्रीमती उषा दराडे, गृहराज्यमंत्री नितीन राऊत उपस्थित होते.
ही बैठक घडून येऊ शकली, याचे
सर्वाधिक श्रेय स्वत:च्या रक्ताने पत्रे लिहिण्याच्या आंदोलनाने महाराष्ट्रभर जी वातावरणनिर्मिती
केली, त्याकडे जाते. बैठक चांगली
झाली ती या अर्थाने की, कायद्याबाबत
निर्माण झालेली कोंडी त्यामधून फुटली. संयुक्त चिकित्सा समितीचे कामकाज गेली दीड वर्षे
ठप्प होते. या परिस्थितीत हर्षवर्धन पाटील यांना असे सांगावे लागले की, शासनाला कायदा करावयाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी
कायदा संवादाने, समन्वयातून
व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
स्वाभाविकच कार्यवाहीची रूपरेखा ठरली. ती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठरल्याने सामाजिक
न्यायमंत्र्यांना मान्यही करावी लागली. त्याप्रमाणे लोकसभा निवडणुका संपताच पंढरपूर
येथे जाऊन वारकऱ्यांच्या समवेत संवाद साधला जाईल. त्यानंतर संयुक्त चिकित्सा समिती
जूनमध्ये आपले कामकाज पुरे करेल आणि जुलै महिन्याच्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळासमोर
हा कायदा मांडण्यात येईल. सरकारच्या या जबाबातही दोन अडचणीच्या बाबी आहेतच. एक म्हणजे
सरकारने कृती करण्याचा आपला शब्द पाळावयाचा. दुसरे म्हणजे समन्वयाची भूमिका. ठीक आहे;
परंतु झोपी गेलेल्या राजकारण्यांना जागे
करण्यासाठी ती योग्य ठरेलच, असे नाही. कारण त्यांचा विरोध प्रामाणिक नाही, तर मतलबी आहे. अशा वेळी सामाजिक व राजकीय
इच्छाशक्ती दाखवावी लागते. याबाबत सत्तारूढ पक्ष कसा वागतो, हे प्रत्यक्षातच पाहावे लागेल. मात्र शिष्टमंडळाबरोबर
झालेल्या सविस्तर चर्चेनंतर शासनाने दखल घ्यावी इतपत प्रभावी जनजागरण सर्व प्रतिकूल
परिस्थितीतही समितीने केले आहे. याची आलेली प्रचिती हा एक दिलासा देणारा भाग होता.
मंगळवार, ता.
१७ मार्च, आझाद मैदान, मुंबई. सकाळी ९ पासून कार्यकर्त्यांचे येणे
चालू झाले. ठाणे, मुंबई
येथील कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. लातूरकरही मोठ्या संख्येने उपस्थित झाले
होते. परंतु महाराष्ट्रातील सुमारे १५ जिल्ह्यांतून कार्यकर्ते आले होते, ही बाबही उमेद देणारीच होती. मंडपात रक्त
काढता येणार नाही, असा
एक दुबळा विरोध पोलिसांनी केला. पण कार्यकर्त्यांनी दाद दिली नाही. सर्वांनी स्वत:च्या
रक्ताने पत्रे लिहिली, घोषणा
दिल्या, गाणी म्हटली. प्रसारमाध्यमांच्या
प्रतिनिधींची उपस्थिती चांगली होती. त्यामध्ये इंग्लिश, हिंदी, गुजराती अशा सर्व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींचा
समावेश होता. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमेही होती. याचबरोबर चळवळीचा साथी संजय कांबळे
याच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या विवाहाचा आनंद सोहळा मंडपातच उत्साहाने पार पाडण्यात
आला. सायंकाळी ५ वाजता लिहिली गेलेली १२५ पत्रे मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात
आली. आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वतीने अशी विनंती करण्यात आली होती की,
आम्ही कायदा करत आहोत. तेव्हा आझाद मैदानावरील
कार्यक्रम रद्द करावा. मात्र शासन सदैव शाब्दिक आश्वासन देत असते. त्यामुळे कार्यक्रम
ठरल्याप्रमाणे जोरदारपणे करण्यात आला. विधानपरिषदेत याबाबतचा ठराव सर्वप्रथम मांडणारे
आमदार पी. जी. दस्तूरकर पूर्णवेळ उपस्थित होते.
लक्षणीय नोंदी :
१) अभियानात सुमारे १००० पत्रे लिहिण्यात आली. हा आकडा व त्याचे
महाराष्ट्रव्यापी रूप अनेकांना संघटनेबद्दल आदर वाढविणारे वाटले.
२) या उपक्रमाबाबत काहीशी साशंकता सुरुवातीला संघटनेत होती. प्रत्यक्षात
अनुभव वेगळा आला. लोकमानस व प्रसारमाध्यमे यांनी आंदोलनाला उचलून धरले. विरोधी सूर
नगण्य होता. त्यांचाही मागणीला पाठिंबा होता; पण मार्गाबद्दल मतभिन्नता होती.
३) समितीच्या कामाला व कायद्याला विरोध करणाऱ्यांची एक प्रकारची
कोंडी झाली. त्यांनी विरोध करण्याचे काही प्रयत्न केले. पण ते फुटकळ व परिणामशून्य
ठरले.
४) आंदोलनाचा प्रभाव स्पष्ट जाणवला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना
बैठक घ्यावी लागली.
५) ‘अंनिस’ कार्यकर्त्यांची संख्या मर्यादित आहे. परंतु ती कार्यक्रमाच्या
नाविन्यामुळे पुरेशी ठरली.
६) कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले. कायद्याच्या प्रतिकूल अशा लढाईत
टिकून राहण्याचा उत्साह व आत्मविश्वास बळावला.
७) ‘अंनिस’ ही तत्त्वाला चिकटून राहणारी चिवट व लढाऊ संघटना आहे,
याची प्रचिती या लढ्यातून लोकमानसात पोचली.
८) कार्यक्रमाचे संयोजन कार्यकर्त्यांनी बहुतेक ठिकाणी चोखपणे केले
होते. ही संघटनात्मक सक्षमतेची पावती आहे. मुंबईचे संयोजन अत्यंत नेटके होते. विशेष
म्हणजे ते तरुण फळीने सांभाळले होते.
९) महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात कार्यक्रमाचे संयोजन झाले.
त्याबरोबरच इचलकरंजी, संगमनेर,
उदगीर, वर्धा अशा ठिकाणी स्वतंत्रपणे झाले.
१०) संपूर्ण आंदोलन संघटनेच्या स्वबळावर यशस्वी झाले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल २००९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा