बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

महात्मा फुलेंच्या पुण्यात महापालिकेची बुवाबाजी



महात्मा फुलेंच्या पुण्यात महापालिकेची बुवाबाजी


दाभोलकर, निर्मलामाता, कुंडलिनी, सहजयोग, पुणे महानगरपालिका, आंदोलन, भूमिका
पुणे महानगरपालिकेने ७ एप्रिल रोजी सहजयोगाद्वारे कुंडलिनी जागृतीचा दावा करणाऱ्या निर्मलामाता यांना मानपत्र दिले. या कार्यक्रमास पुणे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र विरोध नोंदवला होता. याचा कृती कार्यक्रम म्हणून हे मानपत्र प्रदान करण्याचा सोहळा ज्यावेळी बालगंधर्व सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत झाला, त्याचवेळी महात्मा फुले यांच्या वाड्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याखाली डोळ्याला पट्टी बांधून अभिनव आंदोलन केले गेले. या आंदोलनास पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व मराठी, इंग्रजी वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रसिद्धी दिली. यासंदर्भात समितीने पुढील स्वरुपात भूमिका मांडली होती.
१) निर्मलामाता जी कुंडलिनी जागृत करण्याचा दावा करतात, ती कुंडलिनी मानवी शरीरात कुठेही अस्तित्वात नाही. त्यामुळे ती जागृत करून माणसांचा आत्मोद्धार करण्याचा दावा ही बुवाबाजीच ठरते. निर्मलामाताजींनी आधुनिक वैद्यकशास्त्रातील कोणत्याही पुस्तकातून कुंडलिनीच्या अस्तित्वाचा पुरावा सादर करावा, असे आव्हान समितीने दिले. त्याबरोबरच त्यासाठी समितीचे रु. २१ लाखाचे आव्हान आहे, हेही स्पष्ट केले.
२) निर्मलामाताच्याद्वारे ज्यावेळी कुंडलिनी जागृती केली जाते, त्यावेळी कुंडलिनी जागृत झालेल्या व्यक्तीच्या अंगावरून वाऱ्याची मंद झुळूक गेल्यासारखे संबंधितांना जाणवते, असे त्या सांगतात. ही साधी स्वसंमोहन अवस्थेतील  सूचनेद्वारे निर्माण होणारी बाब आहे. समितीदेखील हे करू शकते, असेही समितीने प्रतिपादन केले.
३) महाराष्ट्राला समाजसुधारकांचा वारसा आहे. अनेक थोर समाजसुधारकांची कार्यभूमी पुणे होती. महात्मा फुले यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेसमोर उभा आहे. हे सर्व लक्षात घेता महानगरपालिकेने सार्वजनिक पैशातून असे कार्यक्रम करणे ही बाब अयोग्य आहे; तसेच घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. या कर्तव्यापासून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक दूर जात आहेत.
४) डोळ्याला पट्टी बांधून सत्याग्रह करण्याचे प्रयोजन समितीतर्फे पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आले.
(अ) हा कार्यक्रम आम्ही पाहू इच्छित नाही, याचा प्रतीकात्मक निषेध म्हणून याच कार्यक्रमाच्या काळात डोळ्यावर पट्टी बांधली आहे.
(ब) महानगरपालिकेचे नगरसेवक आंधळेपणाचे वर्तन करत आहेत, हे देखील आम्ही याद्वारे सूचित करू इच्छितो.
(क)       सन्मानपत्र देण्याच्या कार्यक्रमामुळे पुरोगामी पुण्याचा पराभव होत आहे व महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वारसा विसरला जात आहे       याची वेदना व निषेध यासाठीही डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली.      
या आंदोलनात पुणे, पिंपरी-चिंचवड, येरवडा, भोर शाखांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यामध्ये दीपक गिरमे, अनंत लिमये, रासकर, अरविंद पाखले, मिलिंद देशमुख, विवेक सांबारे, नलवडे, ज्ञानोबा घोणे आदींचा समावेश होता. तसेच पुण्याचे माजी महापौर व समाजवादी नेते भाई वैद्य, उपमहापौर सतीश देसाई (काँग्रेस पक्ष), माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस), राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त सुभाष वारे, कष्टकरी पंचायतीचे नितीन पवार, लोकस्वतंत्रता संघटनेचे रा. प. नेने, ताहेर पुनावाला, लोकविज्ञानचे गुत्तीकर आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. माळवदकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सध्या पुणे महानगरपालिकेत सत्तेत आहे. परंतु त्या पक्षाचेही वर्तन चूक आहे आणि त्याबाबत पक्ष बैठकीत आवाज उठविला जाईल. त्याबरोबरच पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार हे बुवाबाजीच्याविरोधी आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (मे २००८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...