गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

सत्य साईबाबांना स्मरून सांगायचे तर...



सत्य साईबाबांना स्मरून सांगायचे तर...  

दाभोलकर, सत्य साईबाबा, चमत्कार, सेलिब्रिटीज, ईश्वरी शक्ती, नरसिंहय्या, गाडगे बाबा, मानसिक गुलामगिरी
शंभरहून अधिक देशांत स्वत:चा अध्यात्मिक व आर्थिक पसारा असणाऱ्या सत्य साईबाबांचे निधन झाले. अत्यंत सामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेल्या, फक्त तेलगू भाषाच बोलता येणाऱ्या आणि स्वत:च्या राज्याच्या सीमा क्वचितच ओलांडणाऱ्या बाबांच्या प्रभावाचा हा विस्तार थक्क करणारा आहे. हजारो खेडेगावांना विंधन-विहिरी, पंचतारांकित दर्जाच्या शिक्षणसंस्था, त्याच तोडीची नि:शुल्क आरोग्यव्यवस्था देणारी इस्पितळे, अशा अनेक सेवा-सुविधा सत्य साईबाबांच्या ट्रस्टमार्फत पुरविण्यात येतात. त्यांची एकूण मालमत्ता ४० हजार कोटी ते एक लाख कोटी रुपये एवढी महाप्रचंड असल्याचे अंदाज आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रिटींचे सेलिब्रिटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्य साईबाबांच्या भक्तगणांत आहे. गेल्या तीन-चार दशकांत सत्य साईबाबांनी असंख्य वेळा आपल्या भक्तसमुदायासमोर चमत्कार केले. विभूती, रूद्राक्ष, सोन्याची अंगठी-चेन, भारी घड्याळे इत्यादी वस्तू त्यांच्या रिकाम्या हातांत अवकाशाच्या अथांग पोकळीतून आपोआप येत होत्या. भाविकांना त्यांचा प्रसाद मिळत होता. चमत्कार करण्याची शक्ती ही परमेश्वराने मला बहाल केलेले व्हिजिटिंग कार्ड आहे असे ते सांगत. मानवी उद्धारासाठी पाठवलेला महापुरुष तो हाच, याची खूण जनसामान्यांना पटावी, यासाठी जगद्नियंत्याने दैवी शक्तीचा आविष्कार घडवणारे चमत्कार करण्याची अद्भुत शक्ती त्यांना बहाल केली आहे, असा त्यांचा दावा होता. ते जाहीरपणे सांगत की, ‘माझ्या अमर्याद शक्तीचा केवळ मर्यादित बाह्य आविष्कार म्हणजे चमत्कार. अशा काही उच्च दर्जाच्या शक्ती माझ्यात आहेत की, त्यांच्यामार्फत मी आपल्या मनातून संकल्पाने वा शुभेच्छेने वस्तू निर्माण करू शकतो. (माझ्यासारखा) जो मनुष्य ईश्वरी शक्तीनुसारच काम करतो, त्याच्या बाबतीत या शक्ती संपुष्टात येण्याचा प्रश्नच येत नाही, त्याच्यामार्फत साक्षात् ईश्वरी शक्तीच काम करीत असते. ज्याच्यापासून वेद निघाले, त्या माझ्या अध्यात्मिक वैभवाच्या तुलनेत माझे चमत्कार हे प्रचंड हत्तीवर बसलेल्या चिलटाप्रमाणे आहेत. सत्य साईबाबांचे हे सर्व प्रतिपादन आजच्या वैज्ञानिक जगाचा मूलाधार असलेल्या कार्यकारणभावाला रद्दबातल ठरवणारे आहे. याबाबतचे सत्य शोधले तर...? परंतु याबाबतच्या शास्त्रीय तपासणीची सर्व आव्हाने सत्य साईबाबांनी संपूर्ण दुर्लक्षित केली. त्यांचे भक्तगण असणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, बहुश्रुत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांसारख्या दिग्गजांनाही सत्य साईबाबांच्या चरणी लीन होताना हे चमत्कार प्रश्नचिन्हांकित करावेसे वाटले नाहीत. म्हणूनच त्यांच्या दु:खद निधनाबाबत संपूर्ण सहवेदना दाखवूनही काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक वाटते. कृपया हा औचित्यभंग मानला जाऊ नये.
   
या देशातील बहुतेकांची मानसिकता ही चमत्कारशरण असते. विज्ञानाची उच्च पदवी घेणारा माणूस हा गणिती व शास्त्रीय विचारपद्धतीचा वापर करतो, पण हे विश्व स्वायत्त कार्यकारणभावाने बद्ध आहे या वैज्ञानिक दृष्टिकोना’चा स्वीकार मात्र तो करतोच असे नाही. त्याला मनोमनी असे वाटते की, हा कार्यकारणभाव ओलांडू शकणारी दैवी शक्ती अस्तित्वात आहे. सामान्यपणे असंभव, अशक्य, अतर्क्य वाटणाऱ्या घटनांस अगर कृतींस चमत्कार म्हटले जाते. या घटना मानवी बुद्धीच्या आकलनाच्या मर्यादा ओलांडून जातात, म्हणून त्या अलौकिक समजल्या जातात. जनमानसात त्याबद्दल कमालीचे कुतूहल, औत्सुक्य आणि जिज्ञासा असते. चमत्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर, पूज्यभाव आणि श्रेष्ठत्वाची भावना असते. या व्यक्ती प्रत्यक्ष परमेश्वराचाच अंश आहेत आणि त्यांना भूत-भविष्य जाणण्याची शक्ती प्राप्त झालेली असेल, हे लोकांना संभवनीय वाटते. चमत्काराबाबत प्रश्न विचारला तर असा युक्तिवाद ऐकविला जातो की, चमत्कार करणारे ९९ टक्के लोक बदमाष असतात हे खरेच; परंतु चमत्कार करणारे शंभर टक्के लोक खोटेच असतात असे म्हणणे, हे देखील अशास्त्रीय नाही काय? ज्ञात विज्ञानाच्या नियमापलिकडेही काही शक्ती असू शकेल की नाही? याचे साधे उत्तर असे, की चमत्कार करणारे ९९ टक्के लोक थोतांड आहेत, असे ज्या तर्काच्या वा तपासणीच्या आधारे कळते, त्याच आधारे उरलेल्या १ टक्क्याची तपासणी करावयास हवी. समजा, या तपासणीत काही संदिग्धता आढळली तर असे मानता येईल, की या कथित चमत्काराला ठामपणे नकार देणारा पुरेसा पुरावा आज उपलब्ध नाही. अशा वेळी शहाणपणा याच्यातच आहे, की तसा पुरावा शोधणे चालू ठेवायचे; पण व्यवहार मात्र सिद्ध झालेल्या गोष्टींच्या आधारेच करावयाचा. या कथित अद्भुत चमत्कारामागचे सत्य देखील आजवर असंख्य चमत्कारांची रहस्ये ज्या पद्धतीने समजली, त्याच पद्धतीने आज ना उद्या समजेल, असा विश्वास बाळगायचा. असे मानणे व त्याप्रमाणे वाटचाल करणे हेच आधुनिक मानवाचे लक्षण आहे.
बाबांच्या चमत्कारावरील विश्वास हा प्रचितीचा भाग नसतो; तर श्रद्धेचा मामला असतो. ज्या बाबावर त्याच्या अनुयायांची श्रद्धा असते, ते अनुयायी स्वत:चे कल्याण बाबांच्या हातात सुरक्षित आहे, याबद्दल नि:शंक असतात. लहान मुलांची आपल्या आई-वडिलांवर जशी श्रद्धा असते, तसाच हा प्रकार आहे. मानवी कल्याणाचे अंतिम दर्शन एखाद्या बाबा वा महाराजामार्फत होते आणि त्याच्या सूचनेप्रमाणे आचरण करण्यात जीवनाचे परमकल्याण आहे, हे भाविकांच्या लेखी बाबांच्या श्रद्धेबाबतचे रूप असते. ज्ञानेंद्रियांपलिकडच्या सत्याचा-परतत्त्वाचा-स्पर्श झालेल्या या महापुरुषांच्या खाणाखुणा कोणत्या? ही असामान्य माणसे दोन प्रकारे सामान्यांपेक्षा वेगळी असतात, असे मानले जाते. एक : त्यांच्याकडे दैवी सामर्थ्य असते, विज्ञानाचे नियम लागू नसल्याने ते चमत्कार करू शकतात. त्या व्यक्ती जे भविष्य वर्तवितात ते खरे ठरते, त्यांनी उच्चारलेला शब्द आपोआप सत्य बनतो. दुसरे : अशा व्यक्ती पराकोटीच्या सद्वर्तनी, सद्गुणी, सज्जन असतात; त्यांचे जीवन हे वेगळ्या पातळीवरचे असते; तुकाराम, विनोबा, गाडगेबाबा ही या स्वरुपाची उदाहरणे आहेत. वरील दोन्ही स्वरुपांच्या खाणाखुणा शोधण्याचे अजब आकर्षण बहुतेकांना असते. त्या मानसिकतेतूनच तपासणीला तयार नसणाऱ्या, चिकित्सेला नकार देणाऱ्या श्रद्धेचा जन्म होतो. चमत्काराला बळी पडणारे हे मन एका मानसिक गुलामगिरीला जन्म देत असते. भारतीय समाजाची जडणघडण मुळातच दैववादावर आधारलेली आहे. कोणतीही लहान-मोठी संकटे हे लोकांना आपल्या नशिबाचे भोग वाटतात. दैवीशक्तीमुळे चमत्कार करणारा बाबा यातून आपली सुटका करेल, अशी त्यांची (अंध) श्रद्धा असते. आत्मविश्वासाने प्रयत्नपूर्वक एखाद्या समस्येला भिडणे आणि निर्भयपणे ते काम तडीस नेणे, यापेक्षा खडतर वास्तवाला घाबरून बहुसंख्य जण आपली बुद्धी बाबांकडे गहाण टाकतात.     
सर्व चमत्कार सिद्धीमुळे शक्य होतात त्या सिद्धींचा मोह टाळावा, त्या क्षुद्र आहेत, असे साधू संतांचे व धर्मपरंपरेचे मत आहे. ज्यांच्याजवळ निखळ नैतिक धर्मभावना आहे, ते नेहमीच चमत्कार करण्याच्या विरोधात राहिले आहेत. जो माणूस चमत्कार करून शिष्य गोळा करतो, त्याचा संतवाङ्मयात धिक्कार केला आहे. हातातून सोन्याच्या साखळ्या सहजपणे व अनेक वेळा निर्माण करणाऱ्या सत्य साईबाबांची अद्भुत शक्ती खरी आहे, असे क्षणभर मानले तर मग स्वाभाविकच असा प्रश्न पडतो, की देशाचा कर्जबाजारीपणा हटवण्यासाठी आणि भारताला (तथाकथित) सुवर्णभूमीचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी काहीतरी करावे, असे त्यांना कधीच कसे वाटले नाही? बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ गांधीवादी व शास्त्रज्ञ एच. नरसिंहय्या यांनी सत्य साईबाबांना काटेकोरपणे चमत्कार तपासण्याबाबत तीन वेळा विनंती केली होती. त्या तिन्ही वेळा सत्य साईबाबांकडून साधी पोचही देण्यात आली नाही. बाबांनी सोन्याची अंगठी देताच तीच मूठ मिटून तत्क्षणी त्यातून बाबांना रसगुल्ला देणाऱ्या सुप्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार यांना बाबांच्या भक्तांनी धक्के मारून बाहेर काढले होते. मोकळ्या हातातून भक्तांना सोन्याची चेन पंतप्रधान नरसिंह रावांच्या उपस्थितीत देत असताना, ती चेन बाबांच्या हातात, स्मृतिचिन्हाखालून दुसऱ्या भक्ताने कशी हस्तांतरित केली, याचे स्वच्छ-स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध असताना याबद्दल बाबांनी मौन का बाळगले?  
चमत्कार करणाऱ्या बाबाकडे लोक कशाला जातात? वासना आणि स्वार्थ सोडावयाचा असतो, उदात्त व पवित्र व्हावयाचे असते, म्हणून क्वचितच कोणी बाबाकडे जातात. त्यापैकी प्रत्येकाला काही ना काही आधार वा लोभ हवा असतो. भले नामवंत अभिनेता असो, क्रीडापटू वा यशस्वी राजकारणी; कमालीच्या स्पर्धात्मक जीवनातून येणारी अगतिकता व अस्थिरता बाबांच्या दैवी आधाराजवळ जाण्यास त्यांना भाग पाडते. विलक्षण गतिमान समाजजीवनात अनेक अदृष्टांच्या भीतीने मन सतत धास्तावलेले असते. बाबांना हे अदृष्ट दिसते, कळते; प्रसंगी बदलताही येते. याची खूण म्हणजे त्यांचे दैवी चमत्कार. मग मन शरणागत न झाल्यासच नवल. आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, मोक्ष, मुक्ती, विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे व ती अवतार घेते, या सर्व कल्पना या देशातील बहुसंख्यांच्या मनात पक्क्या असतात. अचिकित्सक सामाजिक मन, बाबाची राजमान्यता व लोकमान्यता, सामाजिक प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, प्रसारमाध्यमे यांचा भरभक्कम पाठिंबा या सर्व मानसिकतेला आवश्यक नेपथ्य पुरवतो. यातून दैवी शक्तीचा करिष्मा दाखवणाऱ्या आणि उच्च अध्यात्मिक उद्घोष करणाऱ्या बाबांना भरभक्कम अधिष्ठान प्राप्त होते.
बाबा-बुवा यांच्या बुवाबाजीचे वाहक बनलेल्या चमत्कारांना विरोध केला की, संतांनी केलेल्या चमत्कारांचा दाखला देण्यात येतो. शेकडो वर्षांपूर्वी ज्या बाबी घडून गेल्या असे सांगण्यात येते, ज्यांचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे शास्त्रीय तपासही अशक्य आहे, अशा चमत्कारांबद्दल जणू काही ते सत्यच आहेत, अशी अभिनिवेशाची भूमिका खरे तर घेतली जाऊ नये. या मंडळींनी आधुनिक काळातील संत तुकडोजी महाराज यांनी चमत्काराच्या अनिष्टाबाबत मांडलेले विचार पाहावेत. ते म्हणतात....
चमत्काराच्या भरी भरोनी, झाल्या अनेकांच्या धूळदाणी।
संत चमत्कार यापुढे कोणी, नका वर्णू सज्जन हो।।
लोकांचिया या ओळखून भावा,
अनेक दांभिक येती गावा।
लुटती जनास ढोंगी बाबा, मागे लागुनिया।।
प्रयत्नाचा मार्ग सोडती, अल्पायासे लाभ इच्छिती।।
चमत्कारांच्या थापेत जाती, गारूडियांच्या।।
चमत्कारांवर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबांना मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की, अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यावरचा स्वत:चा विश्वास गमावतात, इतरांनीही तो गमवावा, असे वातावरण तयार करतात. चमत्कारांच्या बाबतीत ही पलायनवादी भूमिका अधिक ठळकपणे दिसते.
   
चमत्कारांचे महात्म्य वाढण्याचे अनेक तोटेच व्यक्तिगत व सामाजिक जीवनात दिसतात. अशा परिस्थितीत खरे तर चमत्कारांची शास्त्रीय चाचणी देण्याची जबाबदारी तसा दावा करणाऱ्या बाबा-बुवांच्यावर द्यावयास हवी. त्यामुळे घटनेत नागरिकाचे कर्तव्य सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव सोडून कोणताही चमत्कार घडत नाही, याची प्रचिती मिळेल.   
माणसाचे सर्वांत प्रभावी हत्यार म्हणजे त्याची बुद्धी. बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन हीच शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती विसरल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी, अज्ञाताचे दर्शन कोणामार्फत तरी चमत्काराच्या दैवी सामर्थ्याने होते, असे मानून त्याच्यापुढे नतमस्तक होणे ही गोष्ट माणूस नक्कीच टाळू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा गाभाघटक आहे, मूल्यशिक्षणातही समाविष्ट आहे,  तो किती थेटपणे चमत्काराच्या विरोधात उभा आहे, हे विद्यार्थ्यांना समजावले जात नाही. संस्कारित करणे तर दूरच राहिले. चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे, ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते. चमत्कार करणाऱ्या कोणत्याही बाबापेक्षा जादूगार अधिक प्रभावी चमत्कार करतात; पण त्यामुळे अचंबित होऊन कोणी त्यांच्या पायावर डोके टेकवून जीवनातील प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारत नाही. जादूगार हा मनोरंजन करणारा कलाकार असतो. चमत्कार करणाऱ्या बाबाची बातच वेगळी असते. रिकाम्या हॅटमधून जिवंत कबूतर काढणारा जादूगार पोटार्थी माणूस असतो; मात्र रिकाम्या हातातून चिमूटभर विभूती काढणारा बाबा ही परमपूजनीय व्यक्ती असते. ज्या चमत्कारामुळे बाबा अंगारा निर्माण करतो, त्यामुळे कार्यकारणभाव मोडीत काढणारे दैवी सामर्थ्य त्याला प्राप्त होते. हे कसे शक्य आहे, हा प्रश्न विचारणे पाखंडाचे लक्षण ठरते. याचे कारण चमत्काराच्या प्रभावाने निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करते. विशेष धोकादायक म्हणजे या मानसिक गुलामगिरीचे समर्थन, संघटन, संरक्षण, संवर्धन व उदात्तीकरण केले जाते आणि त्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.
चमत्काराचा वादग्रस्त मुद्दा उभा करून बाबांच्या अफाट सेवाकार्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा एक आक्षेप असतो. सत्य साईबाबांनी शाळा, दवाखाने आदी समाजहिताच्या गोष्टी उभ्या केल्या हे खरेच आहे, चांगलेही आहे. पण या स्वरुपाची असंख्य कार्ये याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर कोणतेही राज्य शासन वा केंद्र शासन करतच असते. त्याचे कौतुक नसते, कारण लोकांच्या करातून मिळालेल्या पैशातूनच हे सारे घडवले जाते. बाबांच्या सेवाकार्याबद्दलही हाच नियम का लागू करू नये? असंख्य सेवाकार्ये करणाऱ्या सरकारला सामान्य नागरिक प्रश्न विचारतो, चिकित्सा करतो, पाच वर्षांनी पदच्युतही करू शकतो, तो त्याचा अधिकार मानला जातो. बाबांच्या ट्रस्टला अफाट देणग्या मिळण्यात त्यांच्या चमत्काराचा नि:संशय वाटा आहे. मग त्या चमत्कारांना प्रश्न विचारणे, त्यांची चिकित्सा करणे यामुळे बाबांचा अधिक्षेप का मानला जातो? कोणतेही बाबा कितीही सत्य असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगले आहे; पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, क्षणाक्षणाला हे प्रेमस्वरूप उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले जाते? बाबांना भक्तांनी शरण यावे, असे अघोषित फर्मान असते. त्यातच भक्ताचे परमकल्याण असल्याचा पुकारा असतो. बाबाचा प्रत्येक शब्द हेच ब्रह्मवाक्य व नैतिकता असते. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्यांचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही असते; अट फक्त एकच असते, बुद्धी वापरायची नाही. त्यामुळेच विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील बाबांचे चमत्कार अद्भुत दैवी शक्तीचा आविष्कार म्हणून पाहू शकतात.   
संकल्प असा करावयास हवा की, मी स्वत:च्या चिकित्सक बुद्धीवरचा विश्वास गमावणार नाही. स्वत:चे व समाजाचे प्रश्न काय आहेत, ते कसे सोडवायचे, ते कुठपर्यंत सुटू शकतात, याचे भान व्यक्तीला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद देतो. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धैर्याने जगणे यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत: चमत्काराच्या भुलभुलैय्यापासून दूर राहणे, इतरांना मानसिक गुलामगिरीपासून दूर ठेवणे, यातच जीवनाची सार्थकता आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जून २०११)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...