सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

गोडबाबा : उताणा पैलवान



गोडबाबा : उताणा पैलवान         

दाभोलकर, गोडबाबा, बुवाबाजी, सॅकरीन, चाचणी, प. वि. वर्तक
एकदा चितपट केल्यानंतर युक्त्या-प्रयुक्त्या करून पुन्हा-पुन्हा आव्हान देणारे (आणि पुन्हा-पुन्हा चितपट होणारे) काही पैलवान असतात. भानुदास गायकवाड ऊर्फ गोडबाबा हा त्यातीलच एक. खरे तर या मंडळींना माहीत असते की, आपला टिकाव लागणार नाही. पण लढत देत आहोत, या आभासाचे फायदेही एवढे मोठे असतात की, त्यांना हा मोह होतो. काहीवेळा त्यांच्या नावाने आपला डाव साधणे त्यांना भरीला घालत असतात. पुन्हा एकदा बहुचर्चित बनलेल्या गोडबाबाचा प्रवास बघितला की, हे लख्खपणे लक्षात येते.           
१९८२ मध्ये भानुदास गायकवाड गुरुवारी आपल्या शेतात औदुंबराच्या झाडाखाली झोपला असता, काही अकल्पित घडले आणि तो हस्तस्पर्श करेल ती वस्तू म्हणे गोड लागू लागली. पुण्याच्या परामानस संस्थेचे प्रमुख श्री. व. वि. अकोलकर यांनी त्याला तपासले. चाचण्या घेतल्या. १४ मे १९८२ च्या पुणे तरुण भारतमध्ये त्यावर पानभर लेख लिहिला. त्यांच्याशी संबंधित असल्याचा तर्क वर्तवला. त्यावेळी जोरदार खप असलेल्या श्री साप्ताहिकाने २७ जून १९८२ च्या अंकात भानुदासची कव्हरस्टोरी छापली. १४ नोव्हेंबर १९८२ ला आकाशवाणी पुणेवर त्याची बातमी आली.
हळूहळू त्याची बुवाबाजी पसरत गेली. आपल्या पूर्वजन्मीच्या पुण्याईने व दत्तकृपेने गोडी आल्याचा डांगोरा त्याने पिटला. बारामतीच्या चित्रपटगृहात स्वत:च्या चमत्काराची जाहिरात स्लाईडद्वारे दाखवण्यास सुरुवात केली. औदुंबराची राख भस्म म्हणून देणे सुरू झाले. गुरुवार, सोमवार दर्शनाचे वार ठरले. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे गोडबाबा दैवीशक्तीने अचूक देतो, असा प्रसार सुरू झाला.   
१९८३ च्या मार्च महिन्यात मी बारामतीला गेलो, त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अस्तित्वात नव्हती. अ‍ॅड. विजय मोरे यांच्या बंगल्यावर रात्री गोडबाबाची चाचणी पार पडली. त्याने गोड केलेले पाणी घेतले. दोन शक्यता होत्या, एक तर शरीरातील अपवादात्मक जैव-रासायनिक क्रिया आणि दुसरी अधिक संभाव्य म्हणजे फसवणुकीची. गोडी निर्माण करणारा कृत्रिम पदार्थ वापरण्याची. हे पदार्थ तीन प्रकारचे असतात. सहज उपलब्ध स्वस्त म्हणजे सॅकरीन. गोडी देणारा हा कृत्रिम रासायनिक पदार्थ साखरेपेक्षा पाचशेपट गोड असतो. त्यामुळे गोडबाबाने गोड केलेले पाणी प्रथम सॅकरीनसाठी तपासले. ही तपासणी साधी सोपी असते. कुठल्याही महाविद्यालयाच्या रासायनिक प्रयोगशाळेत ती करता येते. तरीही त्याबरोबरच दिल्लीच्या एका मान्यताप्राप्त संशोधन संस्थेतही त्या पाण्याचा नमुना पाठवला. आमचे निदान तज्ज्ञ संस्थेकडूनही पक्के करण्यात आले. हे सारे प्रसिद्ध झाले. गंमत म्हणजे शास्त्रीय चाचणी घेऊन पानभर लेख लिहिणाऱ्या प्रा. अकोलकरांनी ही साधी चाचणी घेतली नव्हती आणि त्यामुळे गोडबाबाचा चमत्कार ही उत्तर न सापडलेली (वा अत्यंत अपवादात्मक अशी चयापचय क्रियेची) घटना आहे, असा भ्रम कायम राखण्यात या शास्त्रीय (!) चाचणीचा हातभार लागला. माझा निष्कर्ष जाहीर झाल्यावरही गेल्या बारा वर्षांत कधीही अकोलकरांनी ही साधी; पण निर्णायक चाचणी गोडबाबाच्या संदर्भात केली नाही.

सामनात पहिल्या पानावर फोटो
गोडबाबाचा हा चमत्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अक्षरश: हजारोवेळा संपूर्ण महाराष्ट्रात बुवाबाजीच्या चमत्काराच्या प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणात गेल्या दहा वर्षांत केला. गंमत म्हणजे नंतर एकदा बारामतीला हा चमत्कार श्री. कुमार मंडपे या समितीच्या कार्यकर्त्याने सादर केला. कार्यक्रम संपल्यावर आणि लोक निघून गेल्यावर गोडबाबानेच त्याला दाद दिली होती. बारामतीला विषमता निर्मूलन परिषद भरली. त्यावेळी गोडबाबाने लोकविज्ञान संघटनेचे श्री. गुत्तीकर यांना सुगंधी विभूती दिली. त्यांनी हसत विचारले गोडीचे काय झाले? तो म्हणाला, आता गोडी नाही. हा चमत्कार.
गोडबाबाचा कथित चमत्कार हा मधली काही वर्षे केवळ समितीच्या प्रात्यक्षिकांचा भाग उरला होता. मात्र तीन वर्षांपूर्वी मुंबई येथे गोडबाबाने हा चमत्कार पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी त्यांनी दिलेले पाणी त्याने गोड केले. सामनाच्या पहिल्या पानावर याबाबतचा फोटोही छापून आला. काही इंग्लिश वृत्तपत्रांतही याच्या बातम्या ठळकपणे आल्या. गोडबाबा पुन्हा चर्चेचा विषय झाला. याही काळात एक गंमत घडली. गोडबाबा हा चमत्कार अनेक संस्थांमध्ये जाऊन तो दाखवत असे. एकदा यासाठी तो मुंबईच्या पोस्ट ऑफिसात गेला. तेथे त्याने हात लावेल ती वस्तू गोड करण्यास सुरुवात केली. समितीच्या कार्यकर्त्या सौ. रेखा देशपांडे तेथे नोकरी करतात. त्या दोन मिनिटात बाहेरून सॅकरीनच्या गोळ्या घेऊन आल्या. त्याची पूड हाताला लावून त्यांनी चमत्कार दाखवण्यास सुरुवात केली. गोडबाबाने तेथून अक्षरश: पळ काढला.
इंडिया टुडे या भारतातील नामवंत मासिकाने या काळात भारतातील बुद्धिवादी चळवळीवर एक लेख प्रसिद्ध करण्याचे ठरवले. त्यांच्या प्रतिनिधीने मला फोन केला आणि गोडबाबाच्या चमत्काराबाबत विचारणा केली. मी त्यांना सांगितले, तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवा. स्वतंत्रपणे शोध घ्या. त्याप्रमाणे त्यांच्या प्रतिनिधी लेखा रत्नानी या बारामतीला गेल्या. त्यांनी गोडबाबाने गोड केलेले पाणी आणले. ते पुणे येथील इंडियन ड्रग्ज अ‍ॅण्ड रिसर्च लॅबोरेटरी या संस्थेने तपासले. औषधांना प्रमाणित करणारी ही शासकीय मान्यताप्राप्त नामवंत संस्था आहे. त्या संस्थेने अहवाल दिला की, या पाण्यात सॅकरीन आढळले. समितीचे कार्यकर्ते डॉ. बोरकर यांनी ते पाणी स्वतंत्रपणे तपासले. त्यांचाही निष्कर्ष तोच होता. इंडिया टुडे या मासिकाच्या १५ ऑगस्ट १९९३ च्या अंकात स्पष्टपणे याचा उल्लेख आहे. गोडबाबाच्या ढोंगीपणाचा हा लखलखीत पुरावा आहे.
रसायनाने हात धुण्यास नकार
यानंतरचा गोडबाबाचा प्रवास सुरू झाला, तो डॉ. प. वि. वर्तक यांच्या सोबत. प. वि. वर्तक यांचा दावा असा आहे की, अध्यात्मिक साधनेने त्यांना चमत्काराचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी अमेरिकेचे यान मंगळ व गुरू यावर पोचण्याआधी ते समाधीद्वारे लिंगदेह प्राप्त होऊन त्या ग्रहावर पोचले होते. त्यांचीच निरीक्षणे नंतर या यानांना आढळली. केवढी महान साधना! पण हा देश असा करंटा की, ते स्वत: वगळता अन्य कोणालाच याचे महत्त्व समजले नाही. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी हे प्रयोग पुढे बंदच केले. मी त्यांना भेटून आव्हान दिले की, या सूक्ष्म देहाद्वारे तुम्ही समोरच्या बंद डब्यातील वस्तू का नाही ओळखत? नाही तर, निदान माझ्या खिशातील नोटेचा नंबर ओळखा. त्यावर त्यांचे अजब उत्तर असे की, मी मंगळावर गेलोच नव्हतो, हे तुम्ही आधी सिद्ध करा; मगच मी तुमची चाचणी देईन. अर्थात, अशी पळवाट अपेक्षित असल्याने मला त्याचे आश्चर्य वाटले नाही. असो.
तर हे वर्तकसिद्धीमुळे चमत्कार सामर्थ्य प्राप्त होते, याचा पुरावा म्हणून गोडबाबाला घेऊन फिरत असतात. जळगाव येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या त्यांच्या व्याख्यानात त्यांनी सिद्धीप्राप्त पुरुष म्हणून गोडबाबाला सादर केला. जळगावचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. शेखर सोनाळकर, अविनाश पाटील व अन्य कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम रोखला, आव्हान दिले. वर्तकांनी पुन्हा आडमुठी भूमिका घेतली. ती अशी की, समितीचे सोनाळकर व गोडबाबा दोघांनीही अंघोळ करून चमत्कार सादर करावा. दोघांनीही अंघोळी केल्या. हात धुतले. दोघांनीही पुन्हा वस्तू गोड केल्या. नंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की, ज्या अर्थी सोनाळकरांनी वस्तू गोड केल्या, त्या हातचलाखीने, तसेच गायकवाडनेही केले असणार आणि मागे हे सिद्धही झाले आहे. तेव्हा भानुदास गायकवाड याचे हात इथर, अ‍ॅसिटोन वा क्लोरोफॉर्म याने धुऊन घ्यावेत आणि मग चमत्कार दाखवावा. असा आग्रह धरताच गोडबाबा म्हणू लागला की, यांना रासायनिक द्रव्ये वापरून माझे हात जाळावयाचे आहेत. कार्यकर्त्यांनी सांगितले की, ती द्रव्ये आधी आम्ही आमच्या हाताला लावतो, त्यामुळे शंकेला जागा राहणार नाही. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. बेंडाके म्हणाले, यामध्ये काहीच गैर नाही. आम्ही डॉक्टर रोज हे वापरतो. याबरोबर वर्तक व गायकवाड यांनी घूमजाव केले. आज चमत्कार दाखवू शकत नाही. नंतर दाखवू, असे म्हणून वेळ मारून नेली. हा सूर्य, हा जयद्रथ करण्याची वेळ आली, की आव्हान देणारे पळ काढतात, हा अनुभव पुन्हा एकदा आला.
      
पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन हा सर्व प्रकार समितीने लोकांसमोर मांडला. यानंतर या नाटकाचा तिसरा अंक सुरू झाला. गोडबाबाने मुलाखत देऊन मी आव्हान स्वीकारत आहे, हे जाहीर केले. याला प्रामुख्याने सकाळ या दैनिकाने फार ठळक प्रसिद्धी दिली. त्याला उत्तर देणाऱ्या माझ्या निवेदनालाही प्रसिद्धी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा गोडबाबाचा चमत्कार ही बातमी कुतूहल व चर्चा याचा विषय झाली. हे केवळ वृत्तपत्रातून होऊ नये म्हणून मी आव्हानप्रक्रियेचा लेखी करार करण्यासाठी डॉ. वर्तक यांच्या घरी पुणे समितीचे श्री. मिलिंद जोशी यांच्यासह गेलो. गोडबाबा तेथे आलेला होताच. त्याला व वर्तक यांना आव्हानप्रक्रिया स्पष्ट करणारा कागद दिला. त्यांच्या सह्या घेतल्या. हा कागद स्वीकारण्यास देखील गोडबाबाने फार खळबळ केली.
गोडबाबाला दिलेले आव्हान अतिशय स्वयंस्पष्ट आहे. याबाबत गोडबाबाच्या प्रतिक्रिया काय होत्या? वृत्तपत्रामध्ये त्याची जी प्रतिक्रिया आली, त्यामध्ये चाचणीच्या संदर्भात अनेक अर्थहीन बाबी होत्या. ही चाचणी हरल्यास नरेंद्र दाभोलकर यांनी सहा महिने दत्त मंदिरात उपासना करावी. पंढरीची वारी करावी, माझ्या पाया पडावे, कुलदैवताची रोज पूजा करावी वगैरे. प्रत्यक्षात फोनवर बोलताना तोंडात दमदाटीची भाषा होती, सातारला येऊन बघून घेतो. अशी आणि स्वत:ला मान्य असलेला म्हणून त्याचा जो मसुदा त्याने पाठवला, त्यामध्ये कांगावा होता (पण वस्तुस्थितीत ती माघारीची अप्रत्यक्ष कबुलीच होती.) त्या लेखी पत्रात भानुदास गायकवाडने स्पष्ट म्हटले आहे की, मी गोड केलेल्या पाण्यात कृत्रिम पदार्थ आढळल्यास त्यामुळे मी चमत्कार करत नाही, हातचलाखी करतो हे सिद्ध होते, हे मला मान्य नाही. याचा अर्थ उघड आहे की मी कृत्रिम पदार्थ हाताला लावून पाणी गोड करतो, तरीही तुम्ही तो चमत्कार मानावयास हवा.           
गोडबाबाबरोबरची आव्हान-प्रतिआव्हाने यांना यावेळी प्रसिद्धी खूप मिळाली; पण अपवाद वगळता दोन्ही बाजूच्या बातम्या देणे असे त्याचे स्वरूप राहिले. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता खूप निर्माण झाली. पण चित्र नेमके स्पष्ट न झाल्याने साशंकता तयार झाली. वर्तमानपत्रांनी समितीच्या बाजूने लिहावे, अशी अपेक्षा नव्हती; पण गोडबाबाने गोड केलेल्या पाण्यात सॅकरीन सापडल्याचा तटस्थ महत्त्वाचा पुरावा पुढे आणल्यानंतर तरी ती बाब ठळकपणे लोकांसमोर यावयास हवी होती. वृत्तपत्रांनी भूमिका न घेण्याची भूमिका, गोडबाबाच्या पाठीराख्यांचे काही प्रमाणात यशस्वी प्रयत्न आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कमी पडलेला संपर्क यातून हे घडले.  
या सगळ्याचा परिणाम काय झाला? गोडबाबाने गोड केलेल्या पाण्यात सॅकरीन सापडले, तरी तो चमत्कार का मानू नये, हे काहींना पटवून देण्याची गरज पडली. दूध प्यायलेला (!) गणपती इथे मदतीला आला. मी याबाबत दोन मुद्दे पत्रकारांशी बोलताना मांडले. गणपती दूध प्यायला ही अफवाच. याचे साधे कारण देवाची मूर्ती ही निर्जीव असते आणि निर्जीव कधीही अन्नपदार्थ सेवन करत नाही. तसा भास कसा झाला हा वेगळा मुद्दा; पण गणपतीचे दूध पिणे त्याच्या निर्जीवपणामुळे मुळातच निकाली निघते. कृत्रिम पदार्थाबाबतही तसेच आहे. कृत्रिम पदार्थ हा कृत्रिम असतो, याचा अर्थच शरीराच्या जैविकतेचा तो कधीच भाग नसतो. म्हणजेच हा लावून गोड गेलेल्या पाण्यात सापडला तर तो चमत्कार नसून हाताला सॅकरीन लावून केलेली बुवाबाजी बनते. त्यामुळेच गोडबाबाचे प्रतिपादन वैचारिक दिवाळखोरीही आहे आणि माघारही.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (फेब्रुवारी १९९६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...