गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

सोयीस्कर (धर्म) राष्ट्रवादी सावरकर



सोयीस्कर (धर्म) राष्ट्रवादी सावरकर
दाभोलकर, सावरकर, हिंदुत्ववाद

प्रति संपादक,
आपल्या मे-९९ च्या अंकात पृष्ठ ३२ वर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा सेक्युलर हिंदुत्ववाद हा लेख आहे. तो वाचल्यावर मला काय वाटलं, ते थोडक्यात असं....

ते असं म्हणतात की, स्वा. सावरकरांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे प्रत्यक्षात त्यांच्या जमातवादी तत्त्वज्ञानाला ताकद देण्यासाठीच त्यांना हवे होते, हेच स्पष्ट होते..... त्यांची भूमिका विवेकवादी बुद्धिप्रामाण्यवादाची नव्हती.

रत्नागिरीला स्थानबद्ध असताना स्वातंत्र्यवीरांनी अस्पृश्यता निवारणाचे जे प्रचंड कार्य केले, त्यानं महात्मा गांधीही प्रभावित झाले होते व ते सपत्नीक रत्नागिरीला येऊन स्वा. सावरकर व त्यांच्या पत्नी यांना त्या दोघांनी सादर नमस्कार केला होता! हिंदू हे एका धर्माचे नाव नसून एका राष्ट्राचे आहे, विज्ञान हाच आजच्या युगाचा धर्म झाला पाहिजेजुने धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणे इ. कपाटात गुंडाळून ठेवा, केवळ संदर्भासाठी अशी ठाम विधाने करणारे सावरकर जमातवादी-धर्मवादी कसे, ते मला उमगत नाही आणि ते विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी नव्हेत, असं ठाम विधान लेखक कसं करतात, तेही माझ्या आकलनात येत नाही. समाजवादी मताचे मुसलमान बॅ. असफअली व ‘ब्लिट्झ’चं शेवटचं पान लिहिणारे साम्यवादी मताचे दुसरे मुसलमान ख्वाजा अहमद अब्बास यांच्या लिखाणात सुद्धा स्वा. सावरकरांबद्दल गौरवोद्गार आढळतात. त्यांनाही सावरकरांचं लेखकानं वर्णिलेलं रूप उमगत नव्हतं, असं समजायचं काय?

स्वा. सावरकरांचा बुद्धिवादस्वा. सावरकरांचं समाजकारण : सत्य आणि विपर्यास हे दोन पारितोषिकप्राप्त बृहद्ग्रंथ लिहिणाऱ्या नांदेडच्या प्रा. शेषराव मोरे यांनाही सावरकर समजलेच नाहीत, असं समजायचं का? ते तर लेखकाच्या या लेखावर माझ्यापेक्षाही अधिक समर्थपणे विवरण करू शकतील. योग्य वाटल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. स्वा. सावरकर राष्ट्रसेवा दलाचे नव्हते म्हणून तर ही प्रतिकूल टीका, ‘नावडतीचं मीठ अळणी या न्यायानं नाही ना? मग तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कॉ. एम. एन. रॉय, कॉ. माधवराव बागल यांच्यासारख्यांच्या कट्टर बुद्धिवाद्यांबाबतही ते विवेकवादी बुद्धिप्रामाण्यवादी नव्हते, असं म्हणण्याची पाळी येईल! दाभोलकर खुलासा करतील काय?

य. ज. महाबळ,
जळगाव

प्रति संपादक,
            य. ज. महाबळ यांचे पत्र वाचले. तरीही मला माझी भूमिकाच योग्य असून आग्रहाने मांडावयास हवी, असे वाटते. सावरकरांची जी विधाने महाबळ यांनी दिली आहेत, त्याचा अर्थ काय होतो, ते नीटपणे बघितल्यासही तेच सिद्ध होते.
१)    हिंदू हे एका धर्माचे नाव नसून एका राष्ट्राचे आहे, हेच नेमके आज भाजप सांगत आहे. हिंदू हा धर्म नसून ती राष्ट्रवादी जीवनपद्धती आहे आणि इतर धर्म उदा. इस्लाम, ख्रिश्चन या उपासनापद्धती आहेत. स्वाभाविकच या उपासनापद्धतीच्या नागरिकांनी स्वत:ला हिंदू-मुसलमान, हिंदू-ख्रिश्चन असे म्हणावे व खुशाल या हिंदू राष्ट्रात राहावे. अशी भूमिका धर्मनिरपेक्षतेच्या थेट मुळावरच येणारी आहे व भाजपने ती सावरकरांच्याकडून उचलली आहे.
२)    विज्ञान हाच आजच्या युगाचा धर्म झाला पाहिजे, असे सावरकर म्हणणारच. कारण विज्ञानाला प्रचंड सामर्थ्य आहे आणि सावरकरांना सामर्थ्य संपादनाचे जणू वेडच होते. बलाचा वापर हे जमातवादाचे एक प्रमुख लक्षण आहे. विज्ञानाद्वारे प्राप्त होणाऱ्या शक्तीला मूल्य चिकटलेले नसते. अणुशक्ती ही विधायक व विध्वंसक दोन्हीही असू शकते. हे मूल्य विवेकबुद्धीच्या आधारे      प्राप्त होते. केवळ विज्ञानाला धर्म मानणे, यामध्ये सामर्थ्यसंपन्न बनून हिंदू धर्मराष्ट्र (वर उल्लेखलेले) विजयी करणे यापेक्षा अधिक काही नाही.
३)    जुने धर्मग्रंथ, पोथ्या-पुराणे कपाटात गुंडाळून ठेवा; फक्त संदर्भासाठी, या विधानाचा थेट अर्थ असा की, या पोथ्या-पुराणाने हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या हत्यारांना गंज चढतो, म्हणून विरोध आहे. सावरकरांचा सत्यनारायणाच्या       पूजेला विरोध होता. परंतु तरीही त्यांनी सत्यनारायणाची पूजा घातल्याचे आढळते. याचे समर्थन त्यांनी ‘पुढील वर्षभरात वसईकडील धर्मांतरित हजार ख्रिश्चन कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात आली तर मी हजार सत्यनारायण       घालीन,’ अशी मागणी पूजेच्या वेळी केली, या शब्दात केले आहे. त्यांचा विरोध जुन्या पोथ्या-पुराणे यांना होता. कारण ती हिंदू राष्ट्रनिर्मितीत अडथळा आणत होती. हिंदू राष्ट्रनिर्मितीस पूरक ठरत असेल, तर सत्यनारायणाचे पौरोहित्य करण्यात त्यांना काही चूक वाटत नव्हती. मुळात धर्माच्या आधारे राष्ट्रउभारणीचा कालबाह्य विचार करणारा कुणीही माणूस विवेकवादी होऊच कसा शकणार? कारण विवेकवादाच्या कठोर तपासणीवर धर्म नावाचे काही विवेकी वास्तव शिल्लक राहत नाही, हा जगभरच्या       धर्मचिकित्सकांचा अनुभव आहे.
४)    कोणत्या व्यक्तींनी सावरकरांना कसे गौरवले आहे, यावर सावरकर समजून      घेण्याची गरज मला वाटत नाही. कारण शब्द प्रामाण्यवाद मानून विचार करू नये, हे विवेकवादाचे प्रथम तत्त्व आहे आणि हे महाबळ यांच्यासारख्या       श्रेष्ठांना मी सांगण्याची गरज नाही.
५)    सावरकर राष्ट्रसेवा दलाचे नव्हते. म्हणून ही प्रतिकूल टीका करता का? आणि त्या न्यायाने लक्ष्मणशास्त्री जोशी, एम. एन. रॉय, माधवराव बागल यांनाही ते विवेकवादी नाहीत, असे म्हणण्याची पाळी येईल, हा महाबळ       यांचा युक्तिवाद बालिश तर आहेच किंवा वरील महनीय व्यक्तींच्याबद्दल घोर अज्ञान दाखवतो. सुदैवाने वरील तीनही लोकांचे पुरेसे लिखाण उपलब्ध आहे. ते लेखन आणि सावरकरांचे लेखन शेजारी-शेजारी ठेवले तर कोण मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी आहे व कोण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून   धर्मानिष्ठित राष्ट्रउभारणीवादी आहे, याचा फैसला सहज करता येईल.

नरेंद्र दाभोलकर
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जून १९९९)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...