‘अंनिस’बद्दलचा गैरसमज
चुकीचा
दाभोलकर, कायदा, आक्षेप,
‘अंनिस’
कायद्यात पक्षपातीपणा का?
ग्रामीण भागात भानामती, बुवाबाजीबद्दल आपण काम करीत
आहात- सामाजिक कार्यास मदत करावी, या उद्देशानेच मीही वर्गणीदार बनलो. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत
एकदा येथे चर्चेत मी प्रत्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कुंडली-पत्रिका, फलज्योतिष इत्यादीबाबत या कायद्यात तरतूद
आहे का, असं
विचारलं असता त्यांनी म्हटलं होतं की, कदाचित देवाला नमस्कार करणंही काही जण अंधश्रद्धेमध्ये
समाविष्ट करतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक शोधणं सोपं नाही; किंबहुना हे सापेक्ष आहे, याची जाणीव मलाही आहे. परंतु अंधश्रद्धा
भारतीय मानसिकतेतून निपटून काढावयाचीच, अशी प्रेरणा (कमिटमेंट) घेऊनच आपण काम करतोय
किंवा नाही, हे
समजणं तेवढंसं अवघड नसावं. शहरातही गल्लोगल्लीत ढोंगी, बुवा, फलज्योतिषी आहेत. पण त्यांच्याविरुद्ध फारसा
ऊहापोह होत नाही.
मासिक बंद करण्याचं ठरविलंच आहे;
पण त्यापूर्वी ‘फीडबॅक’ देणं मी मात्र कर्तव्य समजून हे लिहीत आहे.
कुठलीही चळवळ ‘हाफहार्टेड’ असेल तर ती ‘काऊंटरप्रोडक्टिव्ह’ असते. परंतु या चळवळीच्या मागे आपला खरा
उद्देशच जर वेगळा असेल तर मग प्रश्नच उरत नाही.
धन्यवाद.
कि.
आ. सिरस्कर
कि. आ. सिरस्कर यांचे पत्र पाहिले. त्यांचा आक्षेप असा दिसतो की,
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात गल्लोगल्लीतील
ज्योतिषाविरोधात काही तरतूद नाही. यातून सूचित होणारा अर्थ असा की, ज्या अंधश्रद्धांना ब्राह्मणांचा,
भटांचा पाठिंबा आहे, त्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती
काही करत नाही. त्यामुळे ही चळवळ अर्धवटपणे चालवली जात आहे. याहीपुढे जाऊन चळवळीचा
उद्देशच वेगळा आहे का, असाही
प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या स्वरुपाचे आक्षेप नवीन नाहीत. अंधश्रद्धा
निर्मूलनाचे काम हे फक्त हिंदू धर्मश्रद्धा निर्मूलनाचे काम आहे
काय, असा
आक्षेप काही काळ घेतला गेला. आजही तो घेतला जातो; परंतु बऱ्याच कमी प्रमाणात. अंधश्रद्धा निर्मूलनाची
चळवळ ही ब्राह्मणी कर्मकांडाबद्दल काही करत नाही, हा याच प्रकारचा आणखी एक आक्षेप. याबाबतची
वस्तुस्थिती अगदी थोडक्यात समजून घ्यावयाची तर ती पुढीलप्रमाणे आहे -
१) अंधश्रद्धा निर्मूलनाच्या
संकल्पित कायद्यात परिशिष्टातील बाबींना अंधश्रद्धा समजाव्यात, असे नमूद केले आहे. अंधश्रद्धा समजावयाच्या
बाबींच्या परिशिष्टात अनेक गोष्टींचा समावेश इच्छा असूनही करता आला नाही. आजचा
कायदा केंद्राकडून मंजुरी मिळवून विधिमंडळासमोर जाईल, त्यावेळीदेखील परिशिष्टात बदल होऊ शकेल.
जनमताचा रेटा प्रभावीपणे निर्माण झाल्यास ब्राह्मणी कर्मकांडांचा त्यात समावेश होईल
अथवा रेटा कमी पडल्यास परिशिष्टातील काही बाबी वगळल्याही जातील. परंतु आहे या पद्धतीने
कायदा मंजूर झाला तरीदेखील एक पाऊल पुढे पडेल, असे समितीला वाटते. अंधश्रद्धा असणाऱ्या
ब्राह्मणी कर्मकांडांचा समावेशही या परिशिष्टात व्हावा, यासाठी प्रयत्न जरूर चालू ठेवायला हवेत,
हीच समितीची भूमिका आहे. मात्र त्यांचा समावेश
होत नाही, तोपर्यंत आहे या स्वरुपात
कायदा मंजूर करू नये, असे म्हणणे योग्य नाही.
२) ब्राह्मणी कर्मकांडाबद्दल
सातत्याने व समर्थपणे संघर्ष करणाऱ्यांच्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे
नाव तिच्या कार्याने घ्यावे लागेल. काही ठळक उदाहरणे अशी : -
अ) यज्ञ हा वैदिक संस्कृतीचा
सर्वाधिक पवित्र भाग. वर्षभर चालणाऱ्या गंगाखेड,
जि. परभणी येथील यज्ञास सर्वतोपरी विरोध
फक्त महाराष्ट्र अंनिसनेच केला.
ब) फलज्योतिष विद्यापीठात
शिकवू नये, यासाठी सर्व कुलगुरूंना
निवेदने दिली. याबाबतच्या उत्तम पुस्तकांची निर्मिती केली. जिल्ह्याजिल्ह्यांत
सभा घेतल्या. महाराष्ट्रव्यापी परिषद घेतली. प्रमुख ज्योतिषांना फलज्योतिषाची शास्त्रीयता
सिद्ध करण्यासाठी आव्हान देणारी पत्रे पाठवली.
क) वास्तुशास्त्र ही अशीच
एक ब्राह्मणी अंधश्रद्धा, ज्या विरोधात गेली अनेक वर्षे समिती नेटाने लढत आहे. समितीच्या
पुढाकाराने वास्तुशास्त्राचा वैज्ञानिक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. विविध जिल्ह्यांत
आर्किटेक्ट असोसिएशनच्या सोबत व्याख्याने, जाहीर संवाद, चर्चासत्रे
आयोजित करण्यात आली. याबाबतच्या मराठी, इंग्लिश पुस्तकांची निर्मिती करण्यात आली.
ड) मुहूर्त आणि पुरोहित
नाकारून महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी पद्धतीने विवाह लावण्याचे कार्य समिती गेली
१० वर्षांहून अधिक काळ करीत आहे.
इ) अलिकडच्या काळातील
सर्वात मोठे ब्राह्मणी कर्मकांड म्हणजे नाशिक येथील सिंहस्थमेळा. याविरोधात खुद्द नाशिकमध्ये महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र
अंनिसनेच आवाज उठवला असे म्हटले, तर
ते फारसे चूक ठरणार नाही. याबाबत ‘अंनिस’ने पुस्तिका प्रकाशन केले, निबंध स्पर्धा घेतली. संत तुकाराम व कुसुमाग्रज यांच्या
मांडणीची बहुरंगी पोस्टर्स सर्व महाराष्ट्रभर वितरीत केली. सिंहस्थ मेळाव्याबद्दल सर्वेक्षण केले, लिखाण केले, शासनाकडे मागण्या केल्या.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व जाती-धर्मातील सर्व प्रकारच्या
अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्वत:च्या शक्तीनुसार कृतिशील आहे. अशावेळी गैरसमजातून समितीच्या
कार्यावर आक्षेप घेणे व त्यापासून दूर जाणे हे मूळ कार्यालाच हानी पोचवणारे ठरेल.
याचा विचार सर्वांनी करावा, अशीच समितीची कळकळीची विनंती आहे.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन
वार्तापत्र
(मार्च २००४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा