विज्ञाननिष्ठ
मानवतावादाच्या दिशेने
दाभोलकर, परिवर्तन, विवेकशीलता, धर्मचिकित्सा, अध्यात्म, अंधश्रद्धा
निर्मूलन
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कार्याशी माझा
संबंध आला, तो व्यापक राजकीय जाणिवा बाळगणाऱ्या चळवळीतील
एक कार्यकर्ता म्हणून. पुरोगामी विचाराच्या प्रवाहात मी गेली ३० वर्षांहून अधिक काळ
आहे. त्यापैकी सुमारे २० वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात व १२ वर्षे याबाबतच्या
संघटित चळवळीत आहे. या कामात मी ओढला गेलो, गुरफटला
गेलो. डाव्या चळवळीतील माझ्या अनेक मित्रांना हे फारसे रूचले नाही. एका व्यापक विचारप्रवाहातून
एका अतिशय छोट्या, मर्यादित विचार व कार्यक्षेत्रात मी जावे, हे त्यांच्या मते योग्य नव्हते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याने महाराष्ट्रात
थोडाबहुत परिणाम निर्माण केल्यानंतर त्यांचे हे मत थोडेसे बदलले; परंतु फारसे नाही. या कामात असताना कामाचा व्यापकत्वाशी असणारा
संबंध याचे चिंतन मनात सुरूच होते.
लातूर येथे ३० जून व १ जुलैला महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची
‘वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद’ झाली. त्या परिषदेत कृतिशील वैज्ञानिक जाणिवा यावर सखोल
विचारमंथन झाले. त्यामुळे विचाराला आणखी चालना मिळाली. समितीच्या कार्याबद्दल नक्की
केलेल्या चतु:सूत्रीबद्दल विचारमंथन चालू झाले. हा विचार अधिक चर्चा करून थोडा निवांतपणे
पचवण्याची इच्छा होती. परंतु गेल्या दोन महिन्यांत उलटेच घडले. ‘विज्ञानवाहिनी’साठीचे निधी संकलन आणि महाविद्यालयात ‘विवेकवाहिनी’ची स्थापना करणे यासाठी अखंड धावपळ झाली.
त्यामुळे केलेल्या लेखाचे स्वरूप,
कच्चा आराखडा वा टाचण
या पद्धतीचे झाले आहे, याची जाणीव आहे. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना
विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे, धर्माची कृतिशील चिकित्सा व व्यापक परिवर्तनाच्या
चळवळीशी स्वत:ला जोडून घेणे ही अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची चतु:सूत्री आहे. शोषण, फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या
अंधश्रद्धांना विरोध करण्याचे काम समिती निष्ठेने पार पाडत आहे आणि ते अजून काही दशके
तरी पुरोगामी महाराष्ट्रातही तेवढ्याच नेटाने करावे लागेल, याची मला जाणीव आहे; जनसामान्यांच्यात वैज्ञानिक
दृष्टिकोन रूजवणे हे कार्य समिती आपल्या ताकदीनुसार आजही करते आहे. ‘विज्ञानवाहिनी’च्या निर्मितीमुळे त्याला अधिक गती येईल.
परंतु काही कामांच्या बाबतीत फार मोठा अवसर आहे, याची समितीला जाणीव आहे.
विसर्जित गणपती दान करा, पर्यायी होळी, सत्यशोधकी विवाह अशा अनेक मार्गांनी धार्मिक रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांडे यांना विधायक
पर्याय देण्याचा समितीचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र अजूनही तो प्राथमिक अवस्थेत
आहे. समितीचे हे सर्वच कार्य प्रामुख्याने उपक्रमांची साखळी या पद्धतीने चालते. समाजात
एकूण कृतिशीलता कमी आहे. अशा वेळी महाराष्ट्रभर पसरलेले शेकडो निष्ठावान कार्यकर्ते
जे कार्य करतात, त्यामुळे समितीच्या कार्याची एक प्रतिमा
उभी राहते. परंतु या कामाला अधिक भरभक्कम वैचारिक अधिष्ठान जेवढे स्पष्ट असेल, तेवढी कार्यकर्त्यांची परिणामकारकता वाढेल. कामाचे क्षेत्र अजूनही
दीर्घकाळ आहे तेच राहिले, तरीही ही गोष्ट फलदायी आहे.
धर्माचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न समाजात
जाणीवपूर्वक आहे. अशावेळी विवेकाच्या विचारांची मांडणी सैद्धांतिक स्वरुपात अधिक ठोसपणे
होण्यासाठीही याची गरज आहे.
समितीच्या कार्याचे चौथे उद्दिष्ट व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ला जोडून घेणे, हे असले तरी त्यामध्येही धर्माचे अंग समितीच्या कार्यक्षेत्राचे
प्राधान्य लक्षात घेता अधिक महत्त्वाचे ठरते. त्यामुळे लेखात त्याची मांडणी काहीशा
विस्ताराने केली आहे. कार्यकर्ते समितीचे कार्य सोडून जीवनाच्या अन्य क्षेत्रांतही
कार्यरत असतात. तसेच समितीच्या विचाराने प्रभावित झालेले नागरिकही समाजात वावरत असतात.
या सर्वांना दुहेरी प्रश्न पडतो.
निवडणुकीच्या राजकारणाशी आमचा संबंध नाही, असे मत समिती ठामपणे मांडते व तसे वागतेही. पण दुसरीकडे समाजाचे
होणारे विविधांगी शोषण व नैतिकतेचे अवमूल्यन पाहिले तर त्यात हस्तक्षेप न करता समाज
विवेकी बनवणे, या घोषणेला फक्त बालिश उत्साहाचे रूप येते.
अशावेळी व्यापक परिवर्तनाला जोडून घेणे म्हणजे काय, याची एक वैचारिक रूपरेखा
तरी समोर असणे आवश्यक ठरते. हा लेख काहीसा जड झाला आहे, याची मला जाणीव आहे. त्या क्लिष्टतेने आकलनात अडथळा येऊ शकतो. वाचकांना
तसा तो ज्या ठिकाणी वाटेल, तो त्यांनी जरूर कळवावा. मांडणीत सुलभता आणण्यास मला त्याची
मदत होईल.
विवेकाच्या सहाय्याने माणसाने परंपरेत, अंधश्रद्धेत, रूढी-प्रथेत गमावलेला आपला ‘स्व’ परत मिळवणे व त्या आधारे सभोवतालपासून आपली
स्वायत्तता कमावणे, या धारणेत पंधराव्या-सोळाव्या शतकातील युरोपमधील
प्रबोधन युगाचा उष:काल आहे. परंपरा
व प्रघात यांच्या अधिकारवाणीतून मुक्त झालेलं माणसाचं कोरं करकरीत मन हे आता अनुभवातून
शिक्षण घेण्यास उपलब्ध झालं. जगाचा प्रवास करीत, विविध अनुभव घेत-घेत मनाला
संस्कारित करणे, हा ज्ञान मिळवण्याचा नवीन मार्ग ठरला. या
प्रक्रियेत साहजिकच, इहलोकातील भौतिकता व इंद्रियांद्वारे त्याची
येणारी अनुभूती यास प्राधान्य मिळत गेले. रेने देकार्तच्या निखळ बुद्धिप्रामाण्यवादाला
जॉन लॉकच्या प्रत्ययवादाची जोड मिळाली व जगाकडे विवेकाच्या मदतीने नव्याने बघण्याची
परिस्थिती निर्माण झाली. इम्यॅन्युअल कांटने तत्त्वज्ञानात्मक डागडुजी करून देकार्तचा
विवेकाधिष्ठित ‘स्व’ पुनःप्रस्थापित करण्याचा
प्रयत्न केला. त्याने मानले की,
जरी बाह्यविश्व असंघटित, अनिश्चित, अशाश्वत स्वरुपाचं असलं तरी मानवाचं मन त्यास
संकल्पनेद्वारे सुसंगत रूप देते. म्हणजे मानवी मन बाह्यजगातील घटना नुसतं टिपत नाही, तर त्यास अर्थही देते व वास्तवाला बांधीव करते. देकार्त-कांट परंपरेने
विवेक हा व्यक्तीच्या ठायी कल्पिला व त्या आधारे त्रिकालाबाधित ‘स्व’ व सार्वत्रिक सत्य याची रचना दिली. परंतु
वैज्ञानिक क्रांतीने व्यक्तिनिरपेक्ष असं नियमांचं विश्व उपलब्ध करून दिल्यानंतर मानव-समाजातील
स्थित्यंतर त्यानुसार मांडण्याचा प्रयत्न हेगेलने केला. हेगेलने विवेक हा व्यक्तीच्या
ठायी न कल्पिता मानव इतिहासात दिसतो, हे स्पष्ट केले, तर रूसोने विवेकावरील एकांगी
भर दमनकारी निपजू शकतो, हे भय व्यक्त केलं होतं. युरोपातील प्रबोधनयुगाच्या
वाटचालीतील उपरोध असा की, देकार्तने विवेकाधिष्ठित ‘स्व’चा उगम दास्यविमोचनाचा द्योतक मानला, तर फुकोने याच विवेकाधिष्ठित ‘स्व‘पासून मुक्तता करून घेण्यात धन्यता मानली. आधुनिकोत्तरवाद व्यक्तिधिष्ठित
विवेकाची अशी उचलबांगडी करत असतानाच सोविएत युनियनच्या पाडावामुळे दास्यविमोचनेने प्रेरित
हेगेल-मार्क्स परंपरेतील सामूहिक विवेकही बदनाम
झाला. अशा अवस्थेत संगणक व इंटरनेटच्या स्वरुपात तंत्रवैज्ञानिक विवेक आणि खासगीकरण-उदारीकरणाच्या
रूपात भांडवली व्यवहारवादी विवेक यांची सरशी झालेली आढळते.
आधुनिकोत्तरवादाची आजकाल चलती आहे, याचं कारण हे की, भांडवल व यंत्र यांच्या
कर्तृत्वाचा तोडीस तोड, सार्वत्रिक दास्यविमोचनाला कटिबद्ध असा, सामूहिक मानवी कर्ता मार्क्सच्या कामगारानंतर सध्यातरी उपलब्ध नाही.
आज सामूहिक कर्ता, जात, लिंग, भाषा, वंश, प्रदेश, जमात इत्यादींनी ठरवला जात आहे. समाजवादाने वर्गाच्या एकजिनसी चौकटीत
व्यक्तीचा ‘स्व’ न कोंबता, वरील घटकांचं ‘स्व’च्या घडवणुकीत असलेलं
योगदान स्वीकारलं पाहिजे. तरीही,
दुसरीकडे असं आढळतं की, या विविध अस्मितांच्या हितसंबंधांवर उभारलेल्या चळवळी दिलेल्या
भांडवली अवकाशातच आपले वेगळेपण राखण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या हक्कांची भाषा, थोडे अपवाद वगळता, भांडवली अवकाशाला भेदण्याची
महत्त्वाकांक्षा बाळगत नाहीत. अशा परिस्थितीत, भांडवली आधुनिकतेतील हितसंबंधांच्या
अवाढव्य पसाऱ्यात, मानवी व्यवहार यंत्रामार्फत जागतिक पातळीवर
अधिकाधिक परस्परावलंबी होत असताना न्याय्य समाजरचनेसाठी विविधतेची जोपासना करणारा; परंतु सार्वत्रिक असा सामूहिक विवेक नव्याने कल्पिला जाऊ शकतो का, हा आपल्यापुढील आजच्या घडीला कळीचा प्रश्न आहे
धर्माबद्दल खरा पायाभूत प्रश्न येतो नैतिक जाणिवांचा. कांट या जगप्रसिद्ध
तत्त्ववेत्त्याने याबाबत केलेले भाष्य मोलाचे आहे. तो म्हणतो, ‘‘ज्या दोन गोष्टींचे जितके स्मरण करावे, चिंतन करावे,
तितके मन आश्चर्य व गंभीरता
यांनी भरून जाते. त्या गोष्टी म्हणजे अवकाशातील तारांगण व अंत:करणातील नैतिक विवेक.
जीवन क्षणभंगुर आहे. सामाजिक व्यवहार चंचल आहे तर नीतीचे शाश्वत मूल्य कोठून येते? सारे जग विरोधात गेले तरी नीतियुक्तच जगेन हे धैर्य कोठून येते? नीतीचा भंग केला तर जे भय वाटते, ते कुणाचे वाटते? हा युक्तिवाद बिनतोड नाही; पण धार्मिक श्रद्धा, धार्मिक अनुभव व संस्कार या पार्श्वभूमीवर तो एका श्रेयाकडे निर्देश
करतो. मानवी जीवनातील विवेकबुद्धी वेगळ्या वाटेने हेच उत्तर समर्थपणे शोधते. माणसाचा
सारासार विचार करण्याची शक्ती म्हणजे विवेकबुद्धी असे स्थूल मानाने समजता येईल.
विवेकबुद्धी दोन क्षेत्रांत काम करते - ज्ञानाच्या
क्षेत्रात व आचरणाच्या क्षेत्रात. ज्ञानाच्या क्षेत्रात सत्य काय, असत्य काय, याचा निर्णय
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे विवेकबुद्धी करते. यामध्ये चोख पुरावा व तर्क यांच्या
बळावर सिद्ध झालेल्या वैज्ञानिक उपपत्तीपुढे धर्मश्रद्धेला अटळपणे माघार घ्यावी लागते
व लागली. परंतु महत्त्वाची गोष्ट ही की, मूलत: संघर्ष हा धर्मश्रद्धा
व वैज्ञानिक ज्ञान यांच्यामध्ये नव्हता, तर तो धर्मश्रद्धा व विवेकवाद
(रॅशनॅलिझम) यांच्यामध्ये होता. आधुनिक विज्ञान हे विवेकवादाला आलेले एक फळ आहे. आचरणाच्या
क्षेत्रात इष्ट काय, अनिष्ट काय, याचा निर्णय विवेकबुद्धी करते. विवेकी आचरणाचा एक महत्त्वाचा निकष
म्हणजे ते आत्मकेंद्रित नसते. आपल्या विचाराबरोबर दुसऱ्याचा विचारही त्यात असतो. दुसऱ्याच्या
भावना दुखावू नयेत, त्याच्यावर अन्याय होऊ नये, याबद्दल विवेकशील मनुष्य स्वत:इतकाच दक्ष असतो. दुसऱ्याने माझ्याशी
जसे वागणे मला आवडते, तसे मी इतरांशी वर्तन करणे आणि इतरांनी माझ्याशी
जसे वर्तन केलेले मला आवडणार नाही,
तसे वर्तन मी इतरांशी
करणार नाही, हा विवेकी मानवी व्यवहाराचा निकष असतो. सात-आठ
वर्षांपर्यंत मुले खूप आत्मकेंद्रित असतात. मनोविकास होणे म्हणजेच ही आत्मकेंद्रितता
नष्ट होऊन सामाजिकतेची जाणीव येणे,
विवेकशील बनणे. माणसाच्या
मनाची घडण विलक्षण गुंतागुंतीची असते. मनुष्याच्या आचरणामागे उपभोग, लालसा, कीर्ती, अंधश्रद्धा अशा अनेक प्रेरणा
असतात; परंतु त्या कित्येक वेळा प्रभावी ठरतातच,
असे नाही. त्या प्रभावी ठरणे म्हणजेच विचाराला व कृतीला विवेकाची बैठक प्राप्त करून
देणे. ही बैठक हा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. त्यामुळे विचाराला मूल्यांचे
स्वरूप प्राप्त होते. विवेकवाद हा मानवी जीवनाबद्दलचा मूल्याधिष्ठित दृष्टिकोन आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन तर्कशुद्ध शास्त्रीय असतो. त्याला विवेकशील (रॅशनल) हे विशेषण
लावले जात नाही. विवेकशीलता मानवी जीवनाच्या संदर्भातच असते. कारण मानवाच्या प्रत्यक्ष
जीवनातच आचरण्याचा प्रश्न येतो. चातुर्य म्हणजे विवेक नाही, याचे भान ठेवावयास हवे. चातुर्ययुक्त वागण्याचा; ते वागणे चांगले का वाईट याच्याशी संबंध नसतो. विवेकबुद्धी मात्र
त्याचा विचार करूनच चांगल्याचा स्वीकार करते. बुद्धीने दिलेला निर्णय योग्य आहे का, याचाही निर्णय विवेकशक्ती करते. मानवी जीवनातील बुद्धीसह मूल्य, भावना, श्रद्धा या सर्वांचा विवेकही विवेकशक्तीनेच
होतो. आचरणाचे धर्मावर अवलंबून असलेले क्षेत्रच यामुळे बदलते. धर्मग्रंथ, रूढी यांना प्रमाण न मानता विवेकाला प्रमाण मानावे, असा निष्कर्ष निघतो. विवेकवाद हा धार्मिक श्रद्धेच्या विरोधातील
ऐहिक तत्त्वज्ञान म्हणून पुढे येतो. त्याचे आधारभूत निकष म्हणजे माणसाचे हित व प्रतिष्ठा
ही आचरणाच्या केंद्रस्थानी असते. सृष्टीच्या घडामोडीचे ज्ञान ऐहिक पद्धतीनेच होते आणि
व्यक्तीच्या व मानवी विकासाच्या दृष्टीने मानवी व्यवहाराची, सामाजिक संबंधाची, संस्थांची फेरमांडणी करावी, हे त्यात अभिप्रेत असते. मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे व तो
स्वभावत:च समाजशील आहे, या दोन वैशिष्ट्यांतच माणसाच्या विवेकशीलतेचा
उगम आहे. मानवी चांगलेपण हे फक्त समाजजीवनाच्या संदर्भातच शक्य आहे, अस्तित्वात आहे. निर्जन बेटावर पूर्णपणे एकाकी राहणाऱ्या माणसाने
विवेकी वागणे याला अर्थ नाही. तेव्हा विवकशीलतेच्या उगमाचा सामाजिक संदर्भ लक्षात घेऊनच
विवेकदृष्ट्या ‘चांगले’ या संज्ञेचा अर्थ निश्चित
करावयास हवा. सामाजिक असणे ही माणसाच्या अस्तित्वाची मूलभूत शर्त मानली, तर माणसाची आत्मकेंद्रितता नष्ट होऊन इतरांबद्दलची जाणीव त्याला
निर्माण होणे, इतरांचा आत्मौपम्यबुद्धीने त्याने विचार
करणे म्हणजेच चांगले वा विवेकी वागणे, इतरांच्याकडे तो आपल्या
गरजा पुरविणारी माणसे या दृष्टीने पाहत नाही, तर आपल्याबरोबर माणुसकीचा
अनुभव घेणारी, जीवनाची गुंतागुंत अनुभवणारी, माणुसकीच्या एकाच भावनेने बद्ध असणारी माणसे या दृष्टीने बघतो.
चांगलेपण व विवेकशीलता ही माणसांच्या या मानसिक वैशिष्ट्यावर व सामाजिक जीवनावर आधारलेली
असते आणि तिचा रोख अखिल मानवजातीच्या सर्वांगीण समृद्धीकडे असतो. आत्मकेंद्रिततेचे
सामाजिक जाणिवेत रूपांतर होणे, तत्कालीक
स्वसुखाच्या मर्यादा ओलांडून व्यापक, विश्वात्मक
पातळीवर जाणे म्हणजे विवेकशील होणे. ही नैतिकता उघडच धर्मनिरपेक्ष असते. माणसाची नैतिक
भावना निसर्गाची देणगी आहे. तिचा
उगम धर्मात वा दैवी शक्तीत नाही. उत्क्रांतीत अपरिहार्यपणे वाढलेली ही स्वाभाविकच प्रेरणा
आहे. मनुष्य हा समाजातच राहतो. त्याचे भवितव्य सामाजिक सहकार्यावर अवलंबून असते. सहृदयता, प्रेम, अहिंसा या स्वरुपाच्या सहभावना निसर्गदत्त
आहेत वा असतात. या नैतिक भावना मानवी जीवनाला पारितोषिक असल्यामुळे उत्क्रांतीकाळात
व जडणघडणीत त्या एक स्वाभाविक प्रवृत्ती बनण्याची शक्यता असते. तशा त्या बनतातही. धर्माशिवाय
नीतीला आधार नाही, असे लोक मानतात. मनुष्यप्राणी हा स्वाभाविकच
स्वार्थी असल्यामुळे धर्माच्या दडपणाशिवाय तो नैतिकतेला धरून वागणे शक्य नाही, असा युक्तिवाद केला जातो. पण नैतिक भावना ही मनुष्य स्वभावाची एक
नैसर्गिक प्रवृत्ती असेल, तर हे प्रतिपादन चूक ठरते. (मात्र या नैसर्गिक
प्रवृत्तीच्या आविष्काराला आवश्यक ती समाजस्थिती अस्तित्वात आणणे ही पायाभूत बाब आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही.) कोणत्याही नैसर्गिक प्रवृत्तीला वाव
मिळाला, तर मनुष्याला समाधान होते म्हणूनच नीतिमत्तेने
वागणारे लोक सुखी असतात. परपीडनाने त्यांना दु:ख होते, परोपकाराने समाधान वाटते. या नैतिकतेचा पाया असणारी विवेकबुद्धी
(रॅशनॅलिझम्) ही दैवी देणगी नाही. व्यक्तीचे जीवन यशस्वी करण्यासाठी नैसर्गिक उत्क्रांतीतील
निर्माण पावलेली ती एक मन:प्रवृत्ती आहे. हे लक्षात घेऊन कोणीही माणूस आपली विवेकबुद्धी
व त्याद्वारे आपली नैतिकता प्रखर करू शकतो. व्यक्तीच्या सुखासाठी समाज नीतिमान असावा
म्हणून व्यक्ती नीतिमान असावी, हा कार्यकारणभाव कोणालाही पटण्यासारखा आहे.
विवेकी माणसाची नीतिमत्ता ही स्वयंस्फूर्त असल्याने तो स्वतंत्र असूनही नीतिमान असू
शकतो. याची नीती ही धर्माच्या भीतीपोटी निर्माण होण्याची गरजच राहत नाही. बाह्यपरिस्थिती
सगळ्याच प्राण्यांना घडवते; पण मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की, त्याच्या ठिकाणी विवेकबुद्धी आहे. त्यामुळे तो परिस्थितीचा दास
राहत नाही, तर आपली आंतरिक शक्ती व बाह्यपरिस्थिती यांना
मूल्यात्मक वळण लावू शकतो. हे संकल्प स्वातंत्र्य हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. राजकीय
दडपण आणणारी हुकुमशाही, मानसिक गुलामगिरी लादणाऱ्या धार्मिक रूढी, अंधश्रद्धा माणसाचे हे स्वातंत्र्य हिरावू पाहतात, माणसाच्या नैतिकतेचा, माणूसपणाचा पायाच उद्ध्वस्त करू इच्छितात.
याविरोधी लढा लढण्याची इच्छा असणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे म्हणूनच विवेकवाद
हे हत्यार असते. हा विवेकवाद पारंपरिक ख्रिस्ती धर्मश्रद्धेच्या आणि सामान्यपणे धर्मश्रद्धेच्या
विरोधात उभा ठाकतो. धर्मश्रद्धा हे जसे जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील व्यवहाराचे नियामक
तत्त्व आहे, त्याऐवजी विवेकशक्ती ही सर्वच जीवनव्यवहारातील
नियामक शक्ती असली पाहिजे, असा दावा करतो. नीती ही मानवी व्यवहारातील
पायाभूत गोष्ट, ती विवेकनिष्ठ असली पाहिजे; धर्माधिष्ठित नव्हे, असा आग्रह धरतो. सृष्टीतील
वस्तू, माणसे, मानवी कृत्ये, त्यांचे परिणाम सत्यावर आधारित असावेत आणि नीतीने चालावेत आणि या
गोष्टी फक्त विवेकशक्तीच्या वापरानेच शक्य होतात, असे आग्रहाने मांडतो.
परंपरेने चालत असलेले समाजातील सर्व व्यवहार
व्यक्ती, कुटुंब, राज्य वा सामाजिक संस्थांच्या संबंधातील
वा नैतिक कृत्याबाबतचे, त्यांचे भ्रामक (धार्मिक) स्वरूप दुरुस्त
करून त्याच्या सम्यक स्वरुपाची व्याख्या करणे, त्यांचे सम्यक स्वरूप स्पष्ट करणे, हे विवेकाचे कार्य आहे आणि ते व्यवहार समाजात रूढ करणे, हीच खरी विवेकाधिष्ठित नीती आहे, अशी उमेद बाळगतो. या आधुनिक
विवेकवादाने धार्मिक श्रद्धेपुढे उभ्या केलेल्या आव्हानाला तत्त्वज्ञानाच्या पातळीवर
एक उत्तर देण्याचा प्रयत्न झाला आहे. धर्मश्रद्धेच्या बाजूने त्याबाबत तटस्थतेची भूमिका
घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला अडथळा येतो, असे वाटत नाही. ही भूमिका
थोडक्यात अशी की, माणूस हा विश्वात एक ज्ञाता असतो आणि या
स्वरुपाचे त्याला विश्वाचे जे ज्ञान होते त्यासाठी वैज्ञानिक विचारपद्धतीचा वापर अपरिहार्य
आणि तिचे सामर्थ्य वादातीत असते;
परंतु हाच माणूस एक नैतिक
कर्ता म्हणून वापरतो, त्यावेळी त्याचे एक वेगळे स्वरूप त्याच्या प्रत्ययाला येते. नीतीला
अनुसरून वागणारे हे माणसाचे रूप स्वायत्त असते. आपल्या इच्छा, वासना, आपल्या मानसिक प्रवृत्तींचा कल किंवा दडपण
काहीही असो, त्या पलिकडे जाऊन एखादे कृत्य करणे, ज्यावेळी कर्तव्यच आहे, असे व्यक्तीला वाटते, त्याचा अर्थ असा होतो की, ते कृत्य कोणत्याही शारीरिक
वा मानसशास्त्रीय वा बाह्यदबावाला अनुसरून निर्धारित झालेले असते. हा निर्णय व्यक्तीची
मानसिक घडण, तिची परिस्थिती या आगंतुक घटकावर अवलंबून
नसतो, तर नैतिक कर्ता हे त्याचे स्वरूप आहे. त्याद्वारे
व्यक्त झालेला असतो. थोडक्यात नीतीचे मूल्य, नीतिमत्तेचा निकष माणसाला
निसर्गात निरीक्षणाने सापडत नाही. एक नैतिक कर्ता या माणसाच्या स्वायत्त नैतिक कर्त्याचे
जे नैतिक जग बनलेले आहे, ते ज्ञेय जगाचा भाग आहे. कारण हे नैतिक कर्ते
माणसेच आहेत. पण दुसऱ्या अर्थाने हे नैतिक जग नाही. कारण ज्या तत्त्वांनी नैतिक जगाचे
नियमन होते, त्याचा ज्ञेय जगातील वस्तुघटनांचे नियंत्रण करणाऱ्या निसर्गनियमांशी काही
संबंध नाही, ते स्वायत्त असे जग आहे. म्हणजे माणूस एकाच
वेळी दोन भिन्न जगात वावरतो. तो या जगात असतो आणि ईश्वराच्या राज्यात असतो. (किंवा
ब्रह्मस्वरूप असतो वा त्याच्या-त्याच्या धर्मकल्पनेतील अतीताचा भाग असतो.) खरे तर हे
अतीत तत्त्व इंद्रियांच्या कक्षेत येणारे नसतेच, असे मानले जाते; परंतु आत्मभान असलेल्या नैतिक कर्त्याला स्वत:च्याच रूपात ते गवसत
असल्याने हा अंतर्विरोध राहत नाही. आता माणसात जर अतीत तत्त्व असेल तर विश्वातील वस्तुज्ञानातही
असे तत्त्व असणार. माणसाने स्वत:चा घेतलेला शोध हा या अतीत तत्त्वाच्या शोधाचा प्रारंभ
आहे. ईश्वराने मानवी आत्म्याला स्वत:ची प्रतिमा म्हणून निर्माण केले. ही पारंपरिक श्रद्धा
आणि विश्वातील अतीत तत्त्व ही माणसाच्या प्रकृतीतील अतीत तत्त्वाची प्रतिमा आहे, ही आधुनिक श्रद्धा. माणसाचे रूप दुहेरी असते. प्राणी हे त्याचे
स्वरूप घेतले तर ते निसर्गात पूर्णपणे सामावलेले असते; पण नैतिक कर्ता हे त्याचे स्वरूप निसर्गाच्या चौकटीत सामावू शकत
नाही. माणसाच्या या भिन्न अतीत रूपाचा आविष्कार भिन्न स्वरुपाच्या व्यवहाराच्या जगात
होतो. एकाच वेळी या भिन्न जगाचा तो धारक असतो. आपण नैतिक कर्ते आहोत, आपले आत्मभान प्रमाण आहे, हे ज्ञान श्रद्धेने समजून
घ्यावे लागते, त्याचे प्रमाण देता येत नाही. प्रामाण्य
न देता येणारी गोष्ट का मानावी,
असा मुद्दा स्वाभाविकच
उपस्थित होतो. अतीतच्या श्रद्धेवर आश्वासित होऊन मूल्याधिष्ठित आचरण करावे, नीतीने वागावे,
असे कोणी प्रतिपादत असेल
आणि त्याचे वर्तन त्या कसोटीला उतरत असेल तर वादाचे कारण नाही, असे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला वाटते. असे नीतिमान आचरण हीच अधिक
महत्त्वाची व वास्तवातील गोष्ट आहे. विवेकशील व्यक्तीची निर्णायक कसोटी ही त्याच्या
धारदार वैज्ञानिक दृष्टिकोनावर नाही, तर विवेकी आत्मौपम्य वर्तनावरूनच
ठरत असते. इतिहासात असे घडले आहे की, धार्मिक पद्धतीने विचार
करण्याची रीत सर्वप्रभावी बनली. इतिहासात सामान्य माणसे कष्ट करून पोट भरत होती, कवी काव्य निर्माण करत होते. मात्र हे सर्व होत असतानाच या सर्वांच्यावर
एक सर्वोच्च मूल्य होते, ते म्हणजे धर्म. इतर सर्व मूल्ये त्याच्यापुढे
गौण होती. याच्याकडे जाण्याची फक्त साधने होती. याची आता गरज आहे काय? धार्मिक माणसेदेखील जी मानवी मूल्ये मनोमन मानतात, त्या मूल्यांकडे केवळ मानवी मूल्ये म्हणून का बघता येऊ नये? निकोप सामाजिकता, सौंदर्यविषयक मूल्ये, न्याय, कर्तव्य, समता, बंधुभाव या कल्पना धर्मकल्पनेवर आधारण्याची आवश्यकता नाही. तुम्ही
धार्मिक असा वा नसा; प्रत्यक्ष अनुभवातून तुम्हाला असे वाटते
की, मानवी जीवन सतत जास्तीत-जास्त सुधारता येणे
शक्य आहे. जगताना अगदी रोजच्या व्यवहारातही आपल्याला असे वाटते की, स्वत:च्या मर्यादा ओलांडून मी गेले पाहिजे. यापेक्षा अधिक चांगल्या
तऱ्हेने जगले पाहिजे. अतीत जाण्याच्या परतत्त्व स्पर्शाच्या कल्पनेत गूढ असे काहीही
नाही. स्वत:च्या मर्यादा समजणे आणि त्या ओलांडण्यासाठी धडपडणे हा प्रयत्न सजग माणूस
सतत करत असतो. मानवाच्या मूळ स्वरुपाशी सुसंगत अशीच ही बाब आहे. एक सर्वांगीण अरिष्ट
समाजाला ग्रासते आहे. हिंसा, द्वेष, धर्मांधता, अतिरेकी उपभोग याचे वादळ घोंघावत आहे. अंधश्रद्धांची व्यापक वाढती
श्रेणी, त्याबाबतचे अभिमान, अहंकार हे त्याचे एक रूप आहे. अंतिम सत्य, खराखुरा सत्यधर्म याच्या घटपटादी चर्चेत उत्तर शोधण्याची ही वेळ
नाही. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने उभे राहिले पाहिजे आणि विचारले पाहिजे, मानवी मूल्यांच्या संघर्षात मी काय करू शकतो? मानवी मूल्ये ही काहीतरी गूढ गोष्ट बनवण्याची अजिबात गरज नाही.
ज्यांना हा झगडा करावयाचा नसतो,
त्यांनाच बहुधा ती मूल्ये
गहन, गूढ वाटतात. धार्मिक संस्था, धार्मिक लोक या निकडीच्या लढ्याकडे पाठ फिरवून असतील, तर त्यांचे धार्मिकत्व नकलीच असणार. आळशीपणामुळे वा स्वत:च्या मर्यादित
कक्षेत समाधानाने घडून राहण्याच्या सुखासीनतेमुळे विवेकवाद्यांनी हा संघर्ष टाळला, तर विवेकशीलता पुस्तकी व बेगडीच ठरणार. या मानवी मूल्यांना दुसरीकडे
कोठेही आधार शोधण्याची गरज नाही. निसर्ग, विज्ञान, परमतत्त्व वा अतीत यांच्यात त्यांना अधिष्ठान नाही. मानवी मूल्यांना
फक्त एकच परिमाण आहे ते म्हणजे मानव. अतीताबद्दलचा हा युक्तिवाद जणू काही असे सूचित
करतो की, हे अतीत विश्वातील सर्वोच्च, सार्वभौम व नियामक तत्त्व आहे. हे अतीत तत्त्व मानवी प्रकृतीतही
घटक म्हणून असते आणि म्हणून विश्वातील अतीत तत्त्वाशी यथायोग्य संबंध जोडण्याची खोल
प्रेरणा मानवात असते, असा संबंध जोडण्यात मानवाचे सर्वोच्च साफल्य
असते. ज्या प्रकारच्या आचरणाने हे शक्य होते, ते धार्मिक आचरण. मानवाची
ज्ञानसाधना म्हणजे इंद्रिय आणि तर्क ही अतीतपर्यंत पोचण्यास तोकडी पडतात. मानवप्राण्याचे
नैतिक कर्ता हे जे रूप आहे, ते अतीताचे उत्तम उदाहरण आहे, असे कांटने मानले आहे. विचारवेध संमेलनात ज्येष्ठ विचारवंत प्रा.
रेगे यांनीही प्रभावीपणे हा युक्तिवाद केला होता. त्यांना असे म्हणावयाचे होते की, उत्क्रांतीच्या ओघात जेव्हा शेवटी मनुष्याची उत्पत्ती होते, तेव्हा
एक वेगळ्या प्रकारचे अस्तित्व पृथ्वीवर अवतरते. प्राणिजीवन हे कार्यकारण नियमाने बद्ध
असते; पण मनुष्याच्या जीवनात या नियमाप्रमाणेच
स्वतंत्र निर्णय करणाऱ्या कर्त्याची कर्मेही आढळतात. याचा उलगडा विश्वात आणि मानवात
अतीत तत्त्व मानल्याशिवाय देता येणे शक्य नाही.
वस्तुस्थिती काय आहे?
प्राण्यांच्या उत्क्रांती क्रमात अधिकाधिक गुंतागुंतीचे प्राणी
निर्माण होत गेले आणि सुमारे २० लक्ष वर्षांपूर्वी मानवप्राणी भूतलावर आला. अन्य प्राणी
आणि मानव यातील प्रमुख भेद म्हणजे मानवाला असलेले स्वत:चे स्पष्ट भान. या मनुष्याचे
वैशिष्ट्य असे की, त्याला एकाच ठिकाणी काही मानस आणि काही शारीरिक
गुण आहेत. तो विचार करतो. सुख-दु:ख,
राग-लोभ या अनुभवात गढून
जातो आणि बौद्धिक कृतीत गढलेला हाच ‘मी’ काही फूट उंचीचा, काही किलो वजनाचा आणि
खुर्चीत बसलेला असतो. मानवी शरीर मानसव्यापार तीन प्रकारचे असतात.
अ) मानवाच्या काही हालचाली निर्जीव जडाच्या हालचालीसारख्या असतात.
मनुष्य एक शरीर आहे म्हणून अन्य भौतिक शरीरांप्रमाणेच भौतिक नियमांनी बद्ध असते.
ब) मानवी हालचालींचा दुसरा प्रकार म्हणजे जैव हालचाली याच्यात येतात.
क) या दोन प्रकारच्या हालचालींच्या जोडीला अनेक प्रकारच्या बौद्धिक
क्रियाही मनुष्य करतो. यात प्रामुख्याने आपल्या भोवताली असलेल्या निसर्गाचे ज्ञान मिळवण्याच्या
अनेकविध क्रिया आणि अनेक शक्य कर्मापैकी एकाची निवड करून ते करण्याची क्रिया, याचा अंतर्भाव होतो.
आता माणसाची ही कर्मे नैसर्गिक नियमानुसार घडतात हे खरे. म्हणजे
भूक लागली की, तो अन्न शोधतो आणि खातो. तहान लागली की, पाणी पितो. परंतु याचबरोबर मानवी पातळीवर या कर्माविषयी युक्त
(right) किंवा अयुक्त (wrong) अशी मूल्यमापनाने करता येतात. या मूल्यमापनाचे नियम हे नैसर्गिक
कार्यकारणाचे नियम नाहीत. ते कर्माची युक्तायुक्तता ठरवण्याचे नियम आहेत. युक्त आणि
अयुक्त काय, हे कार्यकारणाच्या नियमानुसार घडतात. त्यामुळे युक्त आणि अयुक्त या दोन्ही
प्रकारची कर्मे कार्यकारणाच्या नियमानुसार ठरत नाहीत. ज्या नियमानुसार आपण कर्मयुक्त
आहे किंवा अयुक्त, हे ठरवतो ते नियम कार्यकारण पद्धतीने कर्माचे
वर्णन करणारे नसतात, तर मूल्यमापन करणारे स्वतंत्र असतात. हे
मूल्यमापन निर्धारित करणे आणि त्यानुसार वागणे याचे स्वातंत्र्य मनुष्याला आहे. हे
स्वातंत्र्य अमर्याद नाही. परंतु मर्यादित प्रमाणात का होईना ते आहे, या सामर्थ्याचा अनुभव आपण सतत घेत असतो. आपण काय करावे, हे ठरविण्याचे मर्यादित स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे, ही गोष्ट माणसाच्या नित्य परिचयाची आहे. ती अलौकिक अथवा अतीत मानण्याचे
काही कारण नाही.
धर्माचे ईश्वर, पारलोक, मरणोत्तर अस्तित्व याच्याशिवाय चालत नाही.
या सर्व गोष्टी मानायला श्रद्धेची गरज आहे. पण नीतीला श्रद्धेची गरज नसते; प्रसंगी असे मानता येईल की, धार्मिक प्रेरणा आणि नैतिक प्रेरणा यापैकी धार्मिक प्रेरणा अगोदर
निर्माण झाली असेल आणि कालांतराने तिच्यातून नैतिक प्रेरणा उद्भवली असेल; परंतु नैतिक प्रेरणा एकदा उद्भवली म्हणजे मग तिची स्वतंत्रपणे वाढ
होते आणि अनेक माणसांच्या ठिकाणी ती शुद्ध स्वरुपात आढळते. विवेकाचा उगम हा आर्थिक
व्यवहारात होतो. समाजातील उत्पादन पद्धती व उत्पादन संबंध या पायावर नीती, धर्म, कायदा, कला, विज्ञान, तत्त्वज्ञान या उर्ध्ववास्तूची निर्मिती
होते. स्वाभाविकच कला अथवा विज्ञान वा तत्त्वज्ञान या जाणिवांच्या स्वरुपांना आर्थिक
व्यवहारापेक्षा दुय्यम स्थान व गौणत्व आहे आणि आर्थिक व्यवहार मूलभूत सत्य आहे, असे
मानून मार्क्सचे इतिहासाचे रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. सर्व जीवनमूल्ये मार्क्सच्या
मते त्या-त्या आर्थिक कालखंडापुरतीच खरी असतात. आर्थिक शक्तीशी सापेक्षपणे बांधून टाकलेली
असतात. तो आर्थिक कालखंड बदलला की मूल्ये आपोआप बदलतात. थोडक्यात, आर्थिक प्रगती हा संस्कृतीचा प्राण आहे आणि संस्कृतीच्या सर्व अंगाची
प्रगती म्हणजे आर्थिक पद्धतीचे अनुषंगिक पर्यवसान होय, असे मार्क्सला वाटते. परंतु इतिहासाची साक्ष आणि तात्त्विक पृथ:करण
यांचा यास पूर्ण पाठिंबा मिळत नाही. अर्थमूलक सर्वांगीण प्रगतीची कल्पना तपशीलवार तपासली
असता निर्दोष ठरत नाही, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींना वाटत
होते. शाश्वत चिरस्थानी मूल्ये हा केवळ आभास आहे, हे मार्क्सचे मत त्यांना
मान्य नाही. यामुळे तर्कतीर्थांचे प्रतिपादन असे की, समाजातील भौतिक प्रवृत्तींवर
समाजातील वैचारिक स्थिरमूल्ये अधिपत्य गाजवू शकतात. इंद्रिय निग्रह, चित्तशुद्धी सर्वांभोवती अनुकंपा, समत्व, बुद्धी इत्यादी नैतिक मूल्ये मनुष्यजातीच्या
अंतापर्यंत आर्थिक उत्पादन पद्धतीत अनेक स्थित्यंतरे झाली, तरी आपले सामर्थ्य किंवा प्रभुत्व टिकवून ठेवतात, असे तर्कतीर्थांना वाटते. मात्र अशी चिरंतन सत्ये व मूल्ये सापडली
तरी त्यांची पारख सतत सावधपणे करावीच लागते, हेही लक्षात घेण्याची
गरज आहे.
मनुष्य बाह्यविश्वावर संस्कार करून त्यात बदल घडवून आणतो आणि स्वत:वरही
संस्कार करून स्वत:मध्ये बदल घडवून आणतो. या दोन्ही क्रिया एक समयावच्छेदे करून सुरू
असतात. दोन्ही अंगे परस्परसंबंध असलेली असतात. मानवाच्या इतिहासात कधी एकावर, कधी दुसऱ्यावर अतिरिक्त भर दिला जातो आणि संस्कृतीमधील मूल्यनिर्मितीचा
समतोल ढासळतो. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात मध्ययुगात हा समतोल ढळला होता, भौतिक प्रगती खुंटली होती. एवढेच नव्हे, तर व्यक्तिगत नैतिक जाणिवांचे अंगही अर्थहीन कर्मकांडे, पारलौकिक कल्पना, नैराश्यवाद या चुकीच्या
विचाराने ग्रासलेले होते. सामाजिक बुद्धीतील व कर्मातील मांद्य व आंध्य नष्ट करण्यास
वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज होती. विज्ञाननिष्ठ मानवतावाद यासाठी गरजेचा आहे, या विचारसरणीने आपल्या संस्कृतीच्या अवनतीची जी चार लक्षणे तर्कतीर्थांनी
सांगितली, ती अशी - १) जगण्यास व प्रगतीस आवश्यक अशा
अर्थप्रवृत्तीचा अभाव
२) राजकीय दुर्बलता
३) जातिभेद व विषमतापूर्ण समाजव्यवस्था आणि
४) पारलौकिकतेवर एकतर्फी भर.
मानवी संस्कृतीच्या भौतिक किंवा अध्यात्मिक विचारप्रणाली; यातील
एकाच अंगावर अवाजवी व एकतर्फी भर देणाऱ्या विचारप्रणाली स्वतंत्रपणे विकसित झाल्या
आहेत. अशावेळी सामाजिक वर्गदास्याचा अंत व्हावा, माणसाच्या सगळ्या सद्गुणांची वाढ व्हावी
आणि मानवजात एका जीवाभावाने नांदावी, यासाठी एका विज्ञाननिष्ठ
मानवतावादाची आवश्यकता आहे.
खरा प्रश्न आहे की, असा विचार हे स्वप्नरंजन
आहे काय? जगातील भांडवलशाही एका वेगळ्या दृश्यावर
पोचली आहे. राजकीय साम्राज्ये प्रस्थापित न करता जगाच्या आर्थिक व्यवहाराचे नियंत्रण
ती करत आहेत. या सर्वांशी लढण्यासाठी श्रमिक एकजुटीच्या रूपाने एक धडधाकट कर्ता मार्क्सवादाला
उपलब्ध होता. विवेकवादाजवळ अशी कोणती मांडणी आहे? दुसरीकडे धर्मांधतेचे रूप जागतिक पातळीवर
अधिकाधिक हिंस्त्र चेहरा दाखवत आहे. बहुसंख्य माणसे धार्मिक आहेत. त्यांची धार्मिकता
ही नैतिकतेकडे वळविण्याऐवजी अंधतेकडे वळविण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. याचा मुकाबला कसा करावयाचा? धर्मातील नैतिक विचार पुढे आणून की धर्माला पूर्णत: नकार देऊन?
धर्माच्या बाबतीत जगातील बहुतेक सर्व विवेकवादी असे म्हणतात की, एकेकाळी नीतीसाठी धर्माची निर्मिती झाली असेलही; परंतु विज्ञानपूर्व काळात निर्माण झालेले हे सर्व धर्म आता कालबाह्य
झाले आहेत. सबंध मानवजातीला कवेत घेणाऱ्या एका नव्या मानवतावादी जीवनदृष्टीची आता गरज
आहे. प्रश्न असा आहे की, हा विचार मानणारे लोक अत्यल्प आहेत. धर्माचा
अंधपणे वापर करू इच्छिणारे लोकही अल्पच आहेत. परंतु एक मोठा जनसमूह असा आहे की, जो आजही कारण कोणतेही असो, या ना त्या स्वरुपात संघटित
धर्म स्वीकारतो आणि त्याचवेळी या धर्मात कालोचित बदल करण्यासाठी प्रतिसाद देतो. आता
एका अर्थाने धर्माचे असे परिष्करण करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे आणि दुसऱ्या धर्माने
अशा परिष्करणासाठी काम करणे म्हणजे धर्मांध लोकांना आंदण देऊन टाकलेल्या धर्माला नीतीच्या
आधारे निर्भयपणे प्रश्नचिन्हांकित करणे आहे. असे उपक्रम (उदा. ‘विसर्जित गणपती दान करा’ या स्वरुपाचे) जर मोठ्या
प्रमाणात होत राहिले तर धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा सतत होत राहील आणि अंधतेकडे
धर्माला वळवणे अवघड बनत जाईल. देशातील धर्मनिरपेक्षता हा आज राजकारणाचा मध्यवर्ती मुद्दा
बनला असताना अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचा धर्माबाबतीतील व्यवहार कसा असावा? विवेकनिष्ठ आहे म्हणून धर्माकडे पाठ फिरवण्याचा की धर्मामध्ये विधायक
कृतिशील हस्तक्षेप करण्याचा? आणि याबरोबरच आणखी एक मुद्दा असा येतो की,
धर्मश्रद्धा मनापासून मानणारे आणि त्या मर्यादेत आपापल्या परीने परिवर्तनाला मदत करणारे
जे लोक आहेत, त्यांच्याशी व्यवहार कसा करावयाचा? परंतु विवेकवादी जीवन जगण्यासाठीचा माझ्या दृष्टीने सगळ्यात कळीचा
महत्त्वाचा मुद्दा असा की, समूहाच्या पातळीवर हा विचार व्यक्त कसा होईल? आज राजकारण हा शब्द पुरेसा बदनाम व भीतिदायक
झाला आहे. लोकशाही हा त्या राजकारणाचा पाया सत्ता, पैसा, जात, गुंडगिरी याआधारे बराचसा पोखरून काढला गेला
आहे. भांडवलशाही देशातील राजकीय व्यवस्था जागतिकीकरणाच्या जमान्यात क्रमश: अशीच कुजत
जाणार, असा एक निष्कर्ष निघू शकतो आणि समाजसत्तावादी
क्रांतीनंतरच हे चित्र बदलू शकते,
असा सुसंगत निष्कर्ष त्याला
जोडूनही काढता येऊ शकतो. परंतु लोकांच्या विवेकशक्तीचा आहे त्या परिस्थितीतही प्रभावी
सामूहिक आविष्कार होऊ शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. लोकांनी तो तसा केला
तर ते निवडणुकीचे राजकारण होत नाही,
हे विवेकाचे सामुदायिक
आविष्करण होते, असे मानता येईल काय?
दोन-तीन उदाहरणे अगदी
स्पष्ट आहेत.
ग्रामस्वच्छता अभियानात महाराष्ट्रातील गावांनी स्वयंस्फूर्तीने
सुमारे २०० कोटी रुपयांची विकासकामे केली आणि काही गावांनी तरी आपला चेहरामोहरा पुरा
बदलून टाकला, त्याचे एक उदाहरण. दुसरे उदाहरण प्राथमिक
शिक्षणाचे. भारताचा विकास व्हावयाचा असेल तर प्राथमिक शिक्षण व आरोग्यसुविधा सार्वत्रिक
प्रमाणात उपलब्ध हव्यात, हे नोबेल पारितोषिक विजेता अमर्त्य सेनच
बोलून चुकला आहे. आता खेडोपाडी प्राथमिक शिक्षणाची स्थिती काय आहे, याचा पंचनामा बऱ्याचवेळा झालेला आहे. असे असताना कोणती एक बुलढाणा
जिल्हा परिषद इच्छाशक्ती दाखवते. दहा वर्षांपासून केवळ कागदावर अस्तित्वात असलेल्या
ग्रामशिक्षण समित्या खऱ्या अर्थाने कार्यान्वित करते आणि आपल्या जिल्ह्यातील प्राथमिक
शिक्षणाचा सर्व चेहरामोहराच बदलून टाकते. हेही उदाहरण आश्वासक आहे. केरळमध्ये १९९५
मध्ये सत्तेत आलेल्या कम्युनिस्ट शासनाने ग्रामनियोजनाचा एक सशक्त प्रयोग राज्यभर केला.
लोकांना राजकारणापलिकडची एक उभारी व दिलासा मिळाला. त्यामुळे स्वत:च्या बुद्धीने लोकशाही
पद्धतीने आणि म्हणजेच विवेकाने सत्ता आपल्या हितासाठी वापरावयाची संधी मिळालेल्या ग्रामपंचायतींनी
राजकारणात सत्तांतर झाले, तरी ग्रामनियोजनाची ही प्रक्रिया राजकीय
साठमारीच्या बाहेर काढली. याचाच अर्थ असा की, विज्ञाननिष्ठ मानवतावादाला
लोकांच्या केवळ अमूर्त विवेकाला आवाहन करत राहण्याचे कारण नाही, तर तो विवेक लोकशाही मार्गाने प्रकट करता येणेही शक्य आहे. जनसमूहाची
अशी होणारी जडणघडण हे कोणत्याच अर्थाने सध्याचे निवडणुकांचे राजकारण नाही. त्यामध्ये
समितीला रस नव्हता व नाही आणि यापुढेही नसेल. परंतु लोकांच्या विवेकाचे वास्तवाच्या
पातळीवरचे सशक्तिकरण असेल. हे डोळसपण व कर्तृत्व एकदा निर्माण झाले, तर आजचा महत्त्वाचा प्रश्न बनलेली आर्थिक अस्थिरता, जातिभेदाने ग्रासलेली विषम समाजरचना, जनचैतन्य हरवल्याने आलेले राजकीय दौर्बल्य
आणि जीवनातल्या प्रश्नांची खरी उत्तरे मिळवण्याच्या असमर्थतेतून, ती उत्तरे मिळतील या भ्रामक कल्पनेने धर्माला कवटाळणे, या सर्व प्रश्नांना विचाराच्या, सामूहिक निर्धाराच्या
व कृतीच्या पातळीवरची उत्तरे देण्यासाठी विवेकवाद स्वत:ला पणाला लावू शकेल. एका नव्या
वास्तवाला जन्म देण्याचं स्वप्न तो पाहू शकेल; अन्यथा स्वत:च्या व्यक्तिगत
पातळीवर अंधश्रद्धांसकट सगळ्या अवैज्ञानिक व अविवेकी गोष्टींचा निरास करणे आणि त्या
मर्यादेत स्वत:च्या जीवनाची सूत्रे स्वत:च्या हातात घेणे, हे काम तो करेलच. ते उघडच मर्यादित असेल; परंतु तरीही तेवढे काम कमी श्रेयस्कर आहे, असे मला वाटत नाही.
(लेखातील प्रारंभीच्या मांडणीसाठी महेश गावसकर
यांच्या लेखाचा आधार घेतला आहे.)
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन
वार्तापत्र
(विशेषांक २००१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा