विवेकवाहिनी
: वाटचाल
दाभोलकर, विवेकवाहिनी, स्वयंविकास, संघटन, उपक्रम
‘विवेकवाहिनी’ची वाटचाल आश्वासक पद्धतीने सुरू आहे, असे मला वाटते; मात्र अजून खूपच प्रगतीला वाव आहे. प्रारंभ
योग्य प्रकारे झाला आहे,
एवढे खरे.
‘विवेकवाहिनी’ ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मित्रसंघटना असली, तरी एक पूर्णत: स्वतंत्र संघटना आहे. सध्याच्या विद्यार्थी संघटनेपेक्षा
तर ती वेगळी आहेच; परंतु महाविद्यालयातील शैक्षणिक अनुदान असलेल्या
अन्य सामाजिक उपक्रमांपेक्षाही ती वेगळी आहे. मूल्यात्मक स्वयंविकास-संवादातून व कृतिशीलपणा
हे त्याचे सूत्र आहे. या स्वरुपाचे काम करणारी अन्य संघटना आज महाराष्ट्रात नाही.
‘विवेकवाहिनी’मागील विचार व संघटना बांधणी कशी करावी, याचे दोन दिवसांचे एक शिबीर श्रीरामपूर येथे ता. २३ व २४ ऑगस्ट
रोजी उत्तमपणे संयोजित झाले. यामध्ये ‘रयत विचार मंच’ या रयत शिक्षण संस्था कर्मचारी मंचाने अतिशय तळमळीने पुढाकार घेतला
होता. नगर-नाशिक विभागाचे ‘रयत’चे अध्यक्ष अरुण कडू यांच्या
नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सर्व कॉलेजच्या प्राचार्यांनी
याबाबत भरीव सहकार्य दिले. मीनाताई जगधने यांचाही मोलाचा सहभाग होता. प्रा. सदाशिव
कदम यांनी मनोरंजनाची प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारली होती. ‘रयत विचार मंच’ने असा निर्णय घेतला आहे की, शाळेतील विचार व्यासपीठ ‘विवेकवाहिनी’ या नावाने उभे करावयाचे. यामुळे ‘रयत’च्या पन्नास शाळेतील प्रत्येकी दोन शिक्षक
शिबिरास होते. विवेकवाहिनी’ चालू करू इच्छिणारे नगर जिल्ह्यातील १३
महाविद्यालयांतील ‘प्राध्यापकही आले होते. शिबिराचे उद्घाटन
प्रा. एन. डी. पाटील यांनी केले. त्यांनी महाराष्ट्रातल्या ‘सत्यशोधकी चळवळीची वाटचाल’ यावर फार प्रभावी मार्गदर्शन
केले. ‘हिंदू-मुस्लिम प्रश्न व राखीव जागा’ याबाबत पन्नालालजी सुराणा यांनी सविस्तर चर्चा केली. जळगावचे डॉ.
प्रदीप जोशी हे ‘व्यसनमुक्ती व व्यक्तिमत्त्व विकास’ यासंदर्भात बोलले. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद’ हे विषय घेतले. रात्री
मच्छिंद्र वाघ यांनी चमत्कारांची बहारदार प्रात्यक्षिके सादर केली. संघटना बांधणीच्या
सत्रात सर्व शिबिरार्थींनी आपापल्या कॉलेज व शाळेत ‘विवेकवाहिनी’ चालू करण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘रयत विचार मंच’ याचा पाठपुरावा प्रत्यक्ष शाळा, कॉलेजात जाऊनही करणार आहे. संगमनेरचे डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते
शिबिराचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी जगधनेताई होत्या.
‘विवेकवाहिनी’ सुरू करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या महाविद्यालयांना
पत्रे पाठविली आहेत. सुमारे १४० महाविद्यालयांनी याबाबत अनुकुलता दर्शविली आहे. या
सर्व महाविद्यालयांतून ‘विवेकवाहिनी’ची संघटनात्मक निर्मिती दीपावलीपूर्वी व्हावी, असा प्रयत्न आहे. दिवाळीच्या सुट्टीत पुणे येथे महाराष्ट्रातील
महाविद्यालयांत सुरू झालेल्या ‘विवेकवाहिनी’च्या सर्व कार्यकर्त्यांचे शिबीर होईल. त्यामुळे वैचारिक मांडणी, संघटनात्मक बांधणी व कार्यक्रमाची आखणी केली जाईल. डिसेंबर, जानेवारी महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘विवेक वाहिनी’च्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांकडे शिबीर
होईल. या रचनेतून ‘विवेकवाहिनी’ची वैचारिक व संघटनात्मक मांडणी आणखी स्पष्ट होत जाईल. ‘विवेकवाहिनी’चे संघटन थोड्या नीट प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील
सर्व जिल्ह्यात उभे राहण्याची अनुकुलता जाणवते.
महाविद्यालयीन ‘विवेकवाहिनी’ कोणते कार्यक्रम घेऊ शकेल, याबाबत आणखी कल्पक विचार करावयास हवा. सर्वांनी
आपली प्रतिभा त्यासाठी वापरावी. कार्यक्रम असा हवा की, जो नाविन्यपूर्ण आहे. उपयुक्त आहे. बिनखर्चिक
आहे व त्याबरोबरच परिणामकारकही. यामुळे कार्यकर्त्यांची उमेद व उत्साह वाढतो. लोकांचे
लक्षही वेधून घेतले जाते.
केवळ कल्पनेसाठी दोन उपक्रम पुढे सुचवीत आहे. हे प्रत्यक्षात आणलेले उपक्रम आहेत. एक
उपक्रम असा की, ज्या विचाराचा प्रसार आपणास करावयाचा आहे, त्या विषयाबाबत ठरवून विविध वृत्तपत्रातील ‘वाचकांच्या पत्रव्यवहारा’त पत्रे लिहून पाठवणे.
त्यामुळे अनेक फायदे होतात. विषय समजावून घ्यावा लागतो. मुद्देसूद नेमके लिहिण्याची
सवय लागते. पत्र छापून आल्यास त्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढतो; शिवाय ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ मोठ्या प्रमाणात वाचला
जात असल्याने विचारांचा प्रसार होतो. दुसरा उपक्रम असा की, आपण अगर आपल्या मित्रमैत्रिणीने हुंडा न घेता लग्न करणे अगर आंतरजातीय
लग्न करणे असा निर्णय घेतला आहे,
असे समजून आपल्या अगर
मित्राच्या पालकांना आपल्या निर्णयाचे समर्थन करणारे आणि त्यांनी मोठ्या मनाने यास
पाठिंबा द्यावा, असे विनंती करणारे पत्र पाठविणे. अशा पत्रलिखाणाच्या
प्रयत्नातून आपला मुद्दा नेमकेपणाने आर्जवीपणे कसा योजला, याचा सराव काहीसा होतो. माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी काही
वेगळे उपक्रम शोधण्याची गरज आहे.
‘विवेकवाहिनी’ हे समाज विवेकशक्तीच्या सहाय्याने बदलण्याचा प्रयत्न करणारे अभिनव
संघटन आहे. अनेकांच्या सर्जनशील विचारांची घुसळण त्यात झाली, तर हे मंथन अधिक चांगले होईल. त्यासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण
!
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर २००३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा