रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद




वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिषद, विवेकवाहिनी, संघटन
आज समाजात वैचारिक चर्चा करण्यात कोणाला रस राहिलेला नाही; कृती तर दूरच. सर्वत्र मरगळ आली आहे. या दृढ होत चाललेल्या नेहमीच्या समजांना महाराष्ट्रातल्या शिक्षणक्षेत्राच्या वैज्ञानिक जाणिवा कृती परिषदेने जोरदार धक्का दिला. ३० जून आणि १ जुलैला लातूरला ही परिषद संपन्न झाली. महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले व्यापक प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, कार्यकर्ते यांची ओसंडून वाहणारी संख्या; या सर्वांत प्रामुख्याने वयाने तरुण असलेल्यांचा सहभाग, उदंड उत्साह, चोख व्यवस्था व शिस्त आणि कृतीचा निर्धार या सर्वच बाबी मनाची उमेद वाढविणाऱ्या होत्या.

अंधश्रद्धा निर्मूलन पुढच्या टप्प्यावर
गेले एक तपाहून अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला काहीसे यश लाभले, तशाच मर्यादाही जाणवू लागल्या. चळवळीमधील सामर्थ्य कायम ठेवून मर्यादा ओलांडण्याचा लक्षणीय प्रयत्न म्हणजे ही परिषद. विज्ञानाची करणी हरघडी वापरताना विज्ञानाची विचारसरणी मात्र दूर ठेवण्याच्या प्रवृत्तीला या परिषदेने धक्का दिला. याची सुरुवात शिक्षण क्षेत्रातून होणेही उचितच होते. खरे तर भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, हे सर्व नागरिकांचेच कर्तव्य सांगितले आहे. पण शिक्षण क्षेत्रात त्याचे महत्त्व अधिक. कारण शिक्षणाचा गाभाघटकातील महत्त्वाचा घटक आहे, वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती. शिक्षण म्हणजे जर वर्तनबदल असेल तर त्याबाबत शिक्षण क्षेत्राने विचार देणे व कृतीचा संस्कार करणे, दोन्ही मोलाचे ठरते. महाराष्ट्रातील सत्यशोधकी विचारांचा पैलू देखील याला पूरकच आहे. व्यवहारात मात्र आज माणसे, युवक डोळस विचारांच्या आधारे कृती करून समाजजीवन अनुकूल पद्धतीने बदलता येते, हा वैज्ञानिक दृष्टिकोनातील आत्मविश्वास गमावताना आढळतात. फलज्योतिषाचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश, पंतप्रधानांना आराम पडण्यासाठीचा यज्ञ, समाजधुरिणांचे चमत्कार करणाऱ्या बाबापुढचे लोटांगण, ही त्याची एक बाजू वाढता दैववाद, छद्मविज्ञानाचा प्रभाव, प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात दीर्घदृष्टीचा अभाव व विवेकहिनता ही त्याची दुसरी बाजू. देशाचे वैज्ञानिक धोरण मांडताना पंडित नेहरू यांनी Scientific temperament is spirit of a free man असे उद्गार काढले होते. ते पुन्हा कसे आणावयाचे, हा खरा प्रश्न होता. याची सुरुवात केवळ विचारमंथनातून नव्हे, तर स्वत:च्या जीवनात आग्रहाने व निर्धाराने बदलण्यापासून व्हावी. हा संकल्प सामूहिक स्वरुपात व्यक्त व्हावा, ही कल्पना शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद संयोजनामागे होती.

विचारमंथन - वैज्ञानिक दृष्टिकोन
हेमू अधिकारी, ना. य. डोळे, विकास आमटे व दत्ता देसाई यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर सखोल चर्चा घडवून आणली. त्यातील सकारात्मक भाग पुढे आणला. ही विचारपद्धती मानवाच्या अंगभूत समतेचा विचार करून उत्तरे शोधता येतात, याकडे लक्ष वेधले गेले. राखीव जागांनी शिक्षणाचा दर्जा घसरला, मुसलमानांची संख्या या देशात एकदा हिंदूंना मागे टाकेल, मोठी धरणे हेच पाणी नियोजनाचे प्रभावी उत्तर आहे, या सर्व (गैर) समजाची चिकित्सा करतानाही वैज्ञानिक विचारपद्धती वापरता येते. मात्र यासाठी खुली चर्चा व चूक स्वीकारण्याची प्रवृत्ती आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा नीतीसाठी काहीच उपयोग नाही, हेही खरे नाही. मूल्यनिर्मितीसाठीही त्याचा वापर करता येतो. देवावरची श्रद्धा ही वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत; पण हा दृष्टिकोन रोज प्रश्न विचारावयास शिकवते, ही प्रवृत्ती केवळ निसर्गविज्ञानात नाही, तर मानवी दैनंदिन जीवनात वाढीला लावावयास हवी. विद्यार्थ्यांनी शिक्षणव्यवस्थेला, अनुयायांनी नेत्याला, सज्जनांनी गुंडाला प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावयास हवी. ही मनोवृत्ती वाढीस लागली, तरच आपण ही अवघड लढाई हरतो आहोत, असे वाटते. तिचे विजयात रूपांतर होऊ शकेल, असा प्रतिपादनाचा सूर होता.

धर्मांधता, धर्मनिरपेक्षता, धर्मचिकित्सा
गोविंद पानसरे, पुष्पाताई भावे, डॉ. आ. ह. साळुंखे व रावसाहेब कसबे यांच्या सहभागाने रंगलेले हे चर्चासत्र परिषदेचे परमोच्च बिंदू ठरावे. माणसाने चांगला माणूस होण्यासाठी स्वत:च्या गरजा निर्माण केल्या, त्यात धर्म आहे. जगात सर्व लोकसमूह धर्म मानणारे. त्यात एक असले तरी धर्माचा विनियोग तपासावयास हवा. माणुसकीचे वर्तन करणारा धर्म मान्य करावयास हवा. शोषण करणारा धर्म नाकारावयास हवा. यासाठीच चिकित्सा हवी. धर्माचे विलक्षण सामर्थ्य हे की, त्याच्यामुळे ज्यांचे शोषण वाढते, तेच त्याच्यासाठी रक्त सांडतात. ही माणसे सश्रद्ध व अगतिक फसवली गेलेली आहेत त्यांच्याबद्दल कणवच हवी. त्यांना योग्य बाजूने आणण्यासाठी केवळ शुष्क युक्तिवाद नाही, तर हृदय त्यांच्याशी जोडावे लागेल. जे चूक असेल ते निर्भयपणे नाकारावे लागेल. याचबरोबर धर्मग्रंथ, कर्मकांड, व्रतवैकल्य या सर्वांची चिकित्सा करावी लागेल. जनसमुदायाला असेच अंधश्रद्ध ठेवण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, ते या चिकित्सेवर हिंसक हल्ला करतात, असा अनुभव आहे. त्याचा मुकाबला शक्तीने करावा लागेल आणि भौतिक वास्तव सामान्यांना सुखकर करणाऱ्या लढ्याशी त्यासाठी जोडून घ्यावे लागेल.

उद्घाटन-समारोप
परमेश्वर नाकारल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन अशक्य, ही आपली नेहमीची भूमिका उद्घाटनाच्या सत्रात डॉ. श्रीराम लागू यांनी रोखठोक मांडली. मात्र पुढच्या काही सत्रात दत्ता देसाई व पुष्पाताई भावे यांनी त्याचा समर्थ प्रतिवाद केला. धर्म, विज्ञान व समाज यातील गुंतागुंत प्रा. य. दि. फडके यांनी समर्थपणे मांडली. शिक्षणक्षेत्राचे भगवेकरण करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाकडेही लक्ष वेधले. समारोपाच्या सत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा विचार अजून शिक्षण क्षेत्राच्या बाहेर अडकलेल्या लक्षावधी तरुणांपर्यंत पोचविण्याचा सल्ला प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला. अतिशय छोटे; पण आशयसंपन्न बोलताना निळूभाऊ फुले यांनी वैज्ञानिक जाणिवा रूजवण्यासाठी स्वत:च्या पातळीवर यासंदर्भातील कथनी आणि करणी यातील फरक नष्ट करावा, असे आवाहन केले. निर्धाराने केलेल्या कृती कार्यक्रमाने काय घडू शकते, याची उदाहरणे दिली. महाराष्ट्रातील विविध पुरोगामी प्रवाह या परिषदेनिमित्त एकत्र आले, याचा आनंद आवर्जून व्यक्त केला आणि हे शहाणपण पुढेही चालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कृती कार्यक्रम
सर्व प्रतिनिधींना विवेकजागर ही पुस्तिका नोंदणी करताना देण्यात आली होती. त्यामध्ये पंचवीस कृती कार्यक्रम देण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा त्याला आधार होता. यापैकी काही कार्यक्रमांबाबतचे अनुभवकथनही एका सत्रात झाले. वटसावित्रीच्या व्रताचे केलेले व्यापक सर्वेक्षण, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, भानामती निर्मूलनाची धडक मोहीम, पंधरा हजारांहून अधिक गणपती दान मिळवणारी विसर्जित गणपती दान करा ही मोहीम, फलज्योतिषाला आव्हान देण्याची शास्त्रीय पद्धती, याबाबतची माहिती प्रतिनिधींना उद्बोधक वाटली. खरे तर इतर उपक्रमही अनेक आहेत. प्रश्न आहे ते निर्धाराने अमलात आणण्याचा. याबाबतही ठोस निर्णय झाले. येत्या १५ ऑगस्टपर्यंत दीडशे महाविद्यालयांत याबाबत व्याख्याने, चर्चा घडविल्या जातील. जे विद्यार्थी, प्राध्यापक यासाठी स्वत:हून पुढे येतील त्यांचे गट करण्यात येतील, त्यांना विवेकवाहिनी समर्पक नावही देण्यात आले आहे. ही केंद्रे महाविद्यालय व्यवस्थापनाच्या मान्यतेने व त्यांच्यामार्फतच चालविली जातील. त्यांना मदत, मार्गदर्शन, प्रशिक्षित करण्याचे कार्य परिषद संयोजन समिती करेल. विद्यार्थी व प्राध्यापक यांनी वैज्ञानिक जाणिवा कृतिशील करण्याच्या निर्धाराने केलेला उठाव, असे त्याचे स्वरूप असेल. याचा प्रभाव त्या-त्या महाविद्यालयातील युवकांवर व सर्वांचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावर पडावा, अशी अपेक्षा आहे. हा प्रभाव समाजजीवनाला डोळसपणे, विवेकाने स्वत:चे आत्मभान जागृत करून अधिक समर्थ बनवेल, कृतिशील करेल, असा विश्वास परिषदेने निर्माण केला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि लातूर जिल्हा शिक्षणसंस्था चालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद, लातूर.
ठराव
समाजात आज वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. त्यामुळे समाजापुढील खरे प्रश्न बेकारी, दारिद्र्य, विषमता, जाती निर्मूलन, धर्मांधता यांचा डोळसपणे विचार करून उपाय शोधण्यास समाज अपुरा पडत आहे. मूल्याधिष्ठित वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अंग आहे, याचा जाणीवपूर्वक उल्लेख आम्ही करत आहोत. यामुळे सामाजिक मूल्यनिर्मितीसाठीही वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी भूमिका बजावू शकतो, असे आम्हाला वाटते. या विचाराचा उठाव महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात व्हावयास हवा. महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने जनमानसात प्रभावी व कृतिशील बनण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहनही परिषद करीत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००१)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...