सोमवार, १ जानेवारी, २०१८

विवेकवाहिनी

विवेकवाहिनी
दाभोलकर, विवेकवाहिनी, विद्यार्थ्यांचा सहभाग, स्वयंविकास
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दोन वर्षांपूर्वी लातूर येथे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद घेतली. शिक्षण क्षेत्रात वैज्ञानिक जाणिवा कृतिशीलपणे पोचवण्यासाठी महाविद्यालयात विवेकवाहिनीची स्थापना करण्याचा निर्णय त्यात झाला. यानंतर नंदुरबारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांपर्यंत थेट संपर्क साधून विवेकवाहिनीचा विचार पोचवण्यात आला. या कल्पनेला मिळालेला प्रत्यक्ष प्रतिसाद खूपच आश्वासक होता. महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण खात्याशी याबाबत चर्चा झाली. मंत्रिमहोदय, नामदार लक्ष्मणराव ढोबळे, शिक्षण विभागाचे संचालक, सहसंचालक यांनी कल्पना मनापासून उचलून धरली. त्याबाबत एक चांगले परिपत्रकही काढले. विवेकवाहिनीचे कार्य महाराष्ट्रातील महाविद्यालयात सुमारे पन्नास ठिकाणी सध्या चालू आहे. या ठिकाणी कोणते कार्य चालू आहे, याची माहिती या सदरातून दरमहा तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळी फक्त विवेकवाहिनीची एक सर्वसाधारण रूपरेखा समोर ठेवत आहे.

सध्या विवेकवाहिनी ही फक्त महाविद्यालयात चालू आहे; परंतु मुख्याध्यापकांच्या संमतीने ती माध्यमिक शाळांच्यातून सुरू करता येऊ शकेल. याबाबत माध्यमिक शिक्षक संचालक यांचे परिपत्रक निघावे, असा प्रयत्न चालू आहे; परंतु त्यासाठी विवेकवाहिनी शाळेत सुरू करण्याची इच्छा असल्यास थांबून राहण्याची गरज नाही. विवेकवाहिनीबद्दल ठळक बाबी पुढीलप्रमाणे -
१)    सध्या महाविद्यालये व शाळा यांमध्ये चालू असलेल्या सर्व उपक्रमांपेक्षा हा उपक्रम वेगळा आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांनी,            प्राध्यापकांनी यासाठी वेगळा वेळ द्यावा, अशी अपेक्षा आहे.
२)    विवेकवाहिनी हा विवेकाधिष्ठित स्वयंविकासाचा कृतिशील असा आगळा-वेगळा प्रकल्प आहे. यामध्ये सकस विचारमंथन चर्चेद्वारे करणे, स्वत:मध्ये मूल्यपरिवर्तन करणे व कृतिशीलपणे प्रत्यक्षात काही घडवून आणणे अभिप्रेत आहे.
३)    विवेकवाहिनीचे सभासद होण्यासाठी देखील साधे, सोपे, अर्थपूर्ण असे व्यक्तिगत स्वयंविकासाचे निकष आहेत.
४)    शाळेचे मुख्याध्यापक अथवा कॉलेजचे प्राचार्य विवेकवाहिनीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उत्साही प्राध्यापक वा शिक्षक, कार्याध्यक्ष वा उपाध्यक्ष असतात. १५ ते ७५ विद्यार्थ्यांचे युनिट असते. त्यांच्यातून एक विद्यार्थी व विद्यार्थिनी संघटक म्हणून निवडली जाते.
५)    विवेकवाहिनी ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीपेक्षा पूर्ण स्वतंत्र संघटना आहे. श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म, हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील बहुचर्चित विषय विवेकवाहिनीत प्राधान्यक्रमाचे नाहीत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००१)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...