शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद




शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिषद, विवेकवाहिनी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ हे संयुक्तपणे वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद घेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वाटचालीतील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे जाण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमास व्यापक स्वरुपात कृतीचा पाया लाभण्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे. अशा महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती ही प्रत्यक्ष कार्यक्रमातून हल्ली महाराष्ट्रातील लोकांपर्यंत कमी पोचते. कारण हल्ली वृत्तपत्रांना जिल्हा अथवा विभागाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रव्यापी परिषदेसारखी महत्त्वाची घटनाही योग्य प्रकारे महाराष्ट्रातील वृत्तपत्रीय प्रसारमाध्यमात नोंदवली जाईलच, असे नाही.

दुसरे असेही आहे की, अशा परिषदेच्या निमित्ताने आपला विचार सर्वदूर पोचवणे व त्यासाठी त्या विचाराच्या पैलूबाबत छोट्या-मोठ्या स्वरुपात लेखन करणे ही बाबदेखील महत्त्वाची असते. असे लेखन स्वत: करणे किंवा ज्यांना लेखनक्षमता आहे, अशा समविचारी मित्रांच्याकडून किंवा पत्रकारांकडून करवून घेणे. लेखन प्रकाशित होईल, याची काळजी घेणे हे कार्य ‘अंनिस’चे कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याकडून अपेक्षित आहे. या लेखनात कोणते मुद्दे यावेत, यासाठी पुढे विस्तृत नोंदी दिल्या आहेत. त्यापैकी काही मुद्द्यांचा वापर करून स्थानिक पातळीवरील छोटी-मोठी वृत्तपत्रे, साप्ताहिके यामध्ये छोटे-मोठे लेख द्यावेत. आधी संपादकांशी बोलून त्यांना अपेक्षित शब्दसंख्या विचारून घ्यावी. त्याबरोबरच लेखात त्यांना कोणत्या मुद्द्यांच्या चर्चा अधिक आवडेल, हेही विचारावे. लेख २१ अथवा २८ सप्टेंबर या दरम्यान प्रसिद्ध होण्यासाठी त्याआधी १० दिवस संपादकांना पोचावे लागतात. यासाठी माझ्या टिपणाचे वाचन होताच त्वरित कार्यवाही करावी. तसेच प्रसिद्धीला दिलेल्या लिखाणाची एक प्रत (ते कोठे प्रसिद्धीला दिले, या वृत्तपत्राच्या नावासह) माझ्याकडे पाठवावी.

लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे
वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या शैक्षणिक जाहीरनाम्यावरील लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे.

१) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी उभी राहिली. या टप्प्यापासून वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत समितीच्या वैचारिकतेचा झालेला कृतिशील विकास समितीची प्रगल्भता स्पष्ट करते. हे टप्पे थोडक्यात पुढीलप्रमाणे.
अ) जादूटोणा, भूत, भानामती, डाकीण प्रथा, चमत्कार या सर्वांच्या विरोधात संघर्ष करणे हे समितीचे एक प्रमुख कार्य आहे. याबाबत समिती सतत संघर्षशील आहेच. जादूटोणाविरोधी कायद्याची निर्मिती व अंधश्रद्धेला प्राधान्याने बळी पडणाऱ्या महिला व अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत राज्यव्यापी परिषद व जाहीरनामा या महत्त्वाच्या बाबी आहेत.
ब) वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी समितीने अथक प्रयत्न केले आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण, त्यामार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे, सुसज्ज वाहनातून विज्ञानबोध वाहिनी आणि फिरते नभांगण यासाठीचे प्रकल्प, सर्प, पर्यावरण व वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबतची राज्यव्यापी परिषद शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद ही सर्व या वाटचालीची उदाहरणे आहेत.
क) अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुढच्या टप्प्यावर विवेकवादाकडे वाटचाल केली. शासनाने व्यसनविरोधी समग्रनीती स्वीकारावी, यासाठी; तसेच एच.आय.व्ही.बाधित नसल्याची विवाहपूर्व चाचणी करावी, यासाठी एक लाख सह्यांचे निवेदन शासनाला दिले व राज्यव्यापी परिषद घेतली. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासाठी राज्यव्यापी केंद्र सुरू केले व त्यामार्फत सुमारे २०० विवाह संपन्न झाले. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह समर्थन व संघटन परिषद घेतली.
ड) शिक्षण क्षेत्रात मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद चालू व्हावा म्हणून सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता याची शैक्षणिक सनद तयार केली.
इ) वरील सर्व वाटचालीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्याने वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा ता. २३ व २४ फेबु्रवारीला राज्यव्यापी चर्चासत्रात तयार करण्यात आला आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या सहकार्याने हा जाहीरनामा स्वीकृती परिषद ता. २७, २८ सप्टेंबर रोजी जळगावला होते आहे. या स्वरुपाचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील हा पहिला प्रयत्न आहे.

२) संघटनात्मक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मांडणी कालसुसंगत व समाजाला पुढे नेणारी आहे. याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्राचे शिक्षण खाते, वनखाते, सामाजिक वनीकरण संचालनालय, पर्यावरण खाते अशा अनेक शासकीय यंत्रणांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर आनंदाने सहयोग केला. ही बाब देखील समिती मांडत असलेल्या विचाराला मान्यता दाखवते.
३) हा जाहीरनामा ज्या गृहितकावर तयार केला आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व मूल्यांना व्यापक प्रमाणावर अधिमान्यता आहे. ती खालीलप्रमाणे-
अ) भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी व मानवतावाद यांची जोपासना करणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे.
ब) शिक्षणाच्या गाभाघटकात महत्त्वाचा गाभाघटक म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे. याबरोबरच मूल्यशिक्षणातही त्याचा अंतर्भाव आहे.
क) महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी हाच विचार प्रभावीपणे मांडला आहे, व्यक्तिगत जीवनात आचरला आहे व सामाजिक जीवनात पुरस्कारला आहे.
ड) महाराष्ट्रातील बहुसंख्य शिक्षण संस्था आज महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवतात. महाराष्ट्रातील विद्यापीठांना संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांची नावे देण्यात आली आहेत, हे लक्षणीय आहे आणि या दोन्ही संतांनी अंधश्रद्धेविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.

४) भारतीय घटनेने व्यक्तीला धर्मपालनाचे व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. या मूलभूत स्वातंत्र्याचा पूर्ण आदर करून वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याचा विचार पसरवता येतो. याबरोबरच हेही लक्षात घ्यावयास हवे की, सामाजिक हितासाठी धर्मचिकित्सा करणे हे देखील संविधानास अभिप्रेत आहे. अशी धर्मचिकित्सा समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख करते, परमेश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री करते. त्यामधून धर्मनिरपेक्षतेचा विचार अधिक प्रगल्भ बनतो. यामुळे जाहीरनाम्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन व धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा गाभा रूजवला जाईल.

जाहीरनामा अंमलबजावणीत अपेक्षित असलेल्या बाबी
१) शाळेचे प्रार्थना, परिपाठ यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, अंधश्रद्धा निर्मूलन यांचा संदेश देणाऱ्या गीतांचा, वचनांचा समावेश करावा.

२) आजही ग्रामीण महाराष्ट्रात जादूटोणा, भूत, भानामती, मंत्र-तंत्र, मूठ मारणे, चेटूक या स्वरूपाच्या अनेक अनिष्ट व अघोरी बाबी सुरू असतात. त्याबाबत विद्यार्थीमनात एक गूढता व संदिग्धता आढळते. अशा सर्व बाबी स्पष्टपणे व धैर्याने नाकारण्याचे विद्यार्थीमानस घडवावयास हवे. आजची पिढी अशी घडल्यास उद्याच्या समाजातील अंधश्रद्धा कमी होतील. महाराष्ट्र शासनाच्या संकल्पित जादूटोणाविरोधी कायदा हे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. त्यामुळे या कार्याला थोडी अनुकुलताही प्राप्त झाली आहे.

३) समाजात सर्व प्रकारची धार्मिक कर्मकांडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, वाढवली जात आहेत. समाजाच्या धार्मिक मानसिकतेला नैतिकतेकडे नेण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. याउलट सध्या सर्वच धर्मवादी शक्ती ही धार्मिकता धर्मांधतेकडे वळवण्याचा खटाटोप राजकारणासाठी करत आहेत. अशा वेळी कालबाह्य रूढी, परंपरा याबाबतीत विधायक पर्याय देण्याची गरज आहे. असे प्रयत्न काही प्रमाणात शिक्षण क्षेत्रात आज चालू आहेत. त्याला व्यापक पाठबळ जाहीरनामा व त्याची अंमलबजावणी यामुळे लाभेल. महाराष्ट्रातील सुमारे एक कोटी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विषारी रासायनिक रंगांनी रंगवलेल्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण करतात. याला पर्याय म्हणून मातीच्या अथवा कागदाच्या लगद्याच्या गणेशमूर्ती तयार करून त्या वनस्पती रंगाने रंगवल्या व विसर्जन घरोघरी केले तर संपूर्ण परिस्थिती बदलते. लाकूड जाळणाऱ्या होळीला दुर्गुणांच्या होळीचा अभिनव पर्याय देता येतो.

४) केवळ विज्ञान विषयच नव्हे, तर शिक्षणातील सर्व विषय यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन आनंददायी पद्धतीने देता येतो, कृतिशील करता येतो. शिक्षकांचे सक्षमीकरण त्यांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून मिळवून हे करता येते. याचे प्रयोग भारत ज्ञान-विज्ञान समुदायाने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत सिद्ध केले आहेत. शाळेत आलेले सुतार, सायकल दुरुस्तीवाले, शेतकरी या व्यवसायातले पालकही एक कृतिशील वैज्ञानिक दृष्टिकोन देतात व तो उपयुक्त ठरतो. या प्रयोगांचे अनुकरण व सार्वत्रिकीकरण व्हावयास हवे.

५) अवैज्ञानिक आत्मघातकी जीवनशैली आज विद्यार्थ्यांना सतत खुणावते व बाजारी व्यवस्थेने त्यांच्यावर लादलीही जाते. व्यसनाची ओढ, फास्टफूडचे सेवन, व्यायाम व वाचनाचा अभाव, यामुळे संपूर्ण जीवनशैलीच अशास्त्रीय बनते व आजारी पडते. दुसरीकडे ग्रीन हाऊस परिणामासारख्या बाबी पृथ्वीची मृत्युघंटा वाजवत आहेत. ही बाब शास्त्रीयपणे सर्वमान्य झाली आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला संपूर्णपणे मानव जबाबदार आहे. २०३६ पर्यंत ग्रीन हाऊस वायूचे प्रमाण इतके वाढेल की, त्यामुळे संपूर्ण जगाचे भीषण व अपरिवर्तनीय नुकसान होईल, असे मानले जात आहे. काही मान्यवर तज्ज्ञ हे साल २०१२ असेच सांगतात. हा आघात सोसावा लागू नये म्हणून अनेकविध उपाययोजना व यंत्रणा आज कार्यरत आहेत. परंतु गाभ्याचा मुद्दा असा आहे की, वाढलेल्या ग्रीन हाऊस वायूचा संबंध सरळसरळ आजच्या चंगळवादी जीवनशैलीशी आहे. वातानुकूलित व्यवस्था, दिव्यांचा झगमगाट, असंख्य मोटारी, गगनचुंबी इमारती व जीवनशैलीला प्रगती मानणारा आणि त्या चंगळवादात बुडालेला वर्ग आज समाजनियंत्रण करतो आहे. हा वर्ग प्रभावी व संघटित आहे आणि या चंगळवादी जीवनशैलीचे गारूड त्याने भारतातील नव्हे, तर जगातील फार मोठ्या वंचित समूहावर घातले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने म्हणजेच विवेकवादाने जगत असताना पर्यायी जीवनशैलीची सामाजिक गरज निर्माण करणारी मानसिकताही तयार करावी लागेल. जसे खाजगी मोटारीऐवजी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अत्यावश्यकतेशिवाय वातानुकूलित व्यवस्थेला नकार इत्यादी. हा विचार एक संस्कार म्हणून शिक्षणात रूजवला जावयास हवा.

६) भारतीय संदर्भात एका विशिष्ट महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख अपरिहार्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार केला तर जन्मजात लाभणाऱ्या जातीप्रमाणे व्यक्तीला उच्च-नीच मानले जाते व त्याप्रमाणे व्यवहार करणे, ही निखालस अंधश्रद्धाच आहे. सर्व व्यक्तींची जन्मजात प्रतिष्ठा सारखी आहे हा संस्कार करावयास हवा. अर्थात, भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाची जी कल्पना आहे, तिला पाठिंबा देणे व जातीला अंधश्रद्धा मानणे या परस्परपूरक बाबी आहेत, याचे भान हवे.

शैक्षणिक जाहीरनामा अंमलबजावणी
वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याच्या शैक्षणिक जाहीरनाम्याचा वरील विस्तृत आशय पाहता हे कार्य संस्थांच्याकडून कसे पार पडेल, अशी एक आशंका येऊ शकते. त्याबाबत पुढील वस्तुस्थिती ध्यानात घ्यावयास हवी.

१) नव्या मूल्यजाणिवा रूजविण्याचे कार्य हे कोणत्याही देशात नेहमीच शिक्षण क्षेत्राचे मानले जाते. यामुळे ते स्वीकारणे हे शिक्षण व्यवस्थेने स्वत:चे कर्तव्य मानावयास हवे. भारतीय संविधानाची; तसेच शैक्षणिक धोरणाची शिक्षण क्षेत्राकडून हीच अपेक्षा आहे.

२) संपूर्ण शिक्षण क्षेत्राने या स्वरुपाचा निर्णय घेणे व राबवणे हे शासनावर अवलंबून असेल; परंतु महाराष्ट्रातील ज्या शिक्षण संस्था मनापासून शाहू, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज हा वारसा मानतात, त्यांनी स्वत:च्या शिक्षण संस्थेच्या पातळीवर या जाहीरनाम्याची अंमलबजावणी आग्रहपूर्वक करावी, अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे १५० शिक्षण संस्थांनी या जाहीरनाम्यास लेखी मान्यता कळवली आहे. या शिक्षण संस्थांच्या शाळा व महाविद्यालये यांची संख्या याहीपेक्षा बरीच जास्त आहे. या सर्व शाळा, महाविद्यालयात जाहीरनाम्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास ते इतर संस्थांना नक्कीच पथदर्शक ठरू शकेल.

३) हा जाहीरनामा स्वीकारणाऱ्या संस्थांमधील अंमलबजावणी दोन टप्प्यात असेल -
अ) याबाबतच्या जाणीवजागृतीत मनापासून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांचे प्रशिक्षण घेतले जाईल.
ब) त्यांच्या मार्फत प्रामुख्याने विद्यार्थ्यांत; तसेच सहकारी प्राध्यापकांत हा विचार रुजवणारे प्रबोधन व कृती कार्यक्रम घेतले जातील. याचा आराखडा गेल्या २० वर्षांच्या वाटचालीतून समितीकडे आहे.

४) शिक्षकाने हे कार्य कोणतेही जादा काम या भावनेने करू नये आणि तसे ते त्याला करावे लागणारही नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने स्वत: अधिक आधुनिक, यशस्वी व नैतिक व्यक्ती बनण्याचा आनंददायी प्रयत्न व त्याला सामूहिक रूप देणे, असे या कामाचे स्वरूप आहे.

५) शाळा अथवा महाविद्यालयात विचार प्रसार करणारे हे गट विवेकवाहिनी या नावाने कार्यरत होऊ शकतील. विवेकी स्वयंविकासाची ही प्रक्रिया विवेकवाहिनी या नावाने चालवण्यात महाराष्ट्राच्या उच्चशिक्षण संचालनालयाची मान्यता आहे. शालेय पातळीवर ती मिळू शकेल व त्यामुळे एक अधिकृतता लाभू शकेल.

६) जाहीरनामा अंमलबजावणी करताना प्रधान कार्य योग्य विचार करावयास शिकवणे आणि त्या विचाराचा जाहीर प्रसार करणे, हे राहील. शक्य तेवढा आचार करावा हे अभिप्रेत आहेच; परंतु प्रत्यक्ष संघर्ष हा अभिप्रेत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०१२)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...