कायदा
समजून घ्या
दाभोलकर, कायदा, विरोध, सैलानीबाबा, वैज्ञानिक
दृष्टिकोन, अघोरी उपचार, नरबळी
महाराष्ट्र विधानसभेने अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित कायदा अलिकडेच
मंजूर केला. हा कायदा कोणत्याही प्रकारे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, याची पूर्ण कल्पना असूनही ‘लांडगा आला रे, लांडगा आला’ या पद्धतीने स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणाऱ्या
संघटनांनी आरोळी ठोकली.
सत्तारूढ पक्षाचे आमदारही काही प्रमाणात या भूलथापांना बळी पडले. १३ एप्रिल २००५ रोजी
सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनीच स्वत:च्या सरकारने केलेल्या कायद्याचे बिल रोखण्याचा
अविवेक केला. खरे तर या बिलात तसे काहीही नव्हते. मात्र याबाबत विरोधकांना ठणकावून
सांगण्याऐवजी कायदा सर्वसंमतीने करावा, अशी सूचना विलासरावजींनी
केली. कायद्याच्या मसुद्यात दूरान्वयानेही धर्मविरोधी काही नाही, हे मुख्यमंत्र्यांना पटले होते. परंतु एखादा सामाजिक कायदा सर्व
संमतीने झाला तर बरे, असे त्यांना वाटत होते. विधानसभेतील चर्चा
लक्षात घेऊन कायद्याचे प्रारूप सौम्य करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करण्यात
आली. मात्र प्रत्यक्ष कायदा मंजूर होताना विरोधकांनी (अकारण) गोंधळ घालावयाचा तो घातलाच.
असेच होणार होते तर आधीचे प्रारूपच जे मंत्रिमंडळानेही एकमताने मंजूर केले होते, ते ठेवून काय बिघडले असते, असे वाटल्यावाचून राहिले
नाही. पण आता जे झाले ते झाले. असलेला कायदा समजून घेणे, त्याप्रमाणे कारवाईचा आग्रह धरणे आणि ज्या बाबी कायद्याच्या कक्षेत
येत नाहीत, त्याबाबत पुन्हा नव्याने आग्रह निर्माण करणे, हे करावे लागेल. यासाठी कायदा समजून घ्यावयास हवा. तो तसा समजून
घेणे सोपे आहे. कारण कायद्याच्या व्याख्येत परिशिष्टातील बाबींना अंधश्रद्धा समजावे, अशी स्पष्ट व थेट तरतूद आहे. (या लेखाआधीच्या कायद्यावरील लेखातील
अनुसूची वाचावी.) या बाबींचे आचरण करणे हा सहा महिने ते सात वर्षांच्या सक्तमजुरीपर्यंतची
शिक्षा असलेला गंभीर गुन्हा होऊ शकतो.
क्र. १ ची तरतूद पाहावी. आपल्या देशात अजूनही माणसाचे मन आजारी
पडते, हे माहीत नाही. माणूस वेड्यासारखा वागू लागला
तर तो अचानक असे वागू लागला, याचे कारण बाहेरची बाधा असे मानण्यात येते.
त्यावरचा उपाय स्वाभाविकपणेच भगत,
मांत्रिक, देवऋषी करतात. हे उपाय केवळ अज्ञानावर आधारित नसतात; तर अघोरी व क्रूर असू शकतात. मनोरुग्ण व्यक्तीला भूतबाधा झाली असे
समजून तिचे केस ओढणे, तिला चटके देणे व मारणे या सर्व बाबी व्यक्तीच्या
अंगातील भूत उतरवून त्याला पूर्ववत माणूस बनवणे, या उदात्त (?) हेतूने केल्या जातात. स्वाभाविकपणे मनोरुग्णाला छळ, मानहानी सोसावी तर लागतेच; परंतु त्याबरोबरच चुकीचा
उपाय होतो, हे आणखीच घातक. बुलढाण्यापासून अवघ्या ३०
किलोमीटर अंतरावर असलेल्या सैलानीबाबाच्या दर्ग्यावर भुताने झपाटल्याच्या नावाने मनोरुग्ण
दोन वर्षांपूर्वी साखळदंडाने बांधून ठेवलेले आढळले होते. अशी ठाणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी
आहेत. भूत उतरवण्याचे काम तेथे अमावस्या, पौर्णिमेला अथवा काही
विशिष्ट दिवशी चालते. या बाबींची माहिती मिळाल्यास अथवा असा उपचार करणाऱ्यांना हा कायदा
कळाल्यास प्रतिबंधात्मक म्हणूनही हा प्रकार रोखता येईल.
२) ही तरतूद तथाकथित चमत्काराचा दावा करणे व फसवणे यासाठी आहे.
यामध्ये चळवळीने एक महत्त्वाचा विजय संपादन केला आहे. कायद्यात चमत्कारांचा उल्लेख
‘तथाकथित चमत्कार’ असा आहे. कोणताही चमत्कार तथाकथितच असतो, ही याच्यातील महत्त्वाची बाब आहे. भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन
बाळगणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे म्हणजे कार्यकारणभाव
तपासणे आणि चमत्कार घडणे, याचा अर्थ विज्ञानाचा कार्यकारणभावाचा नियम
ओलांडून काही अद्भुत बाबी घडतात,
असे मानणे. अर्थात, असा
तथाकथित चमत्कार करणे हा गुन्हा नाही, तर त्याचा प्रचार, प्रसार करून लोकांना फसवणे, आर्थिकदृष्ट्या लुबाडणे, स्वत:ची दहशत बसवणे हा गुन्हा आहे. एखादा बाबा महिलेकडे जातो. तिच्याच
घरातले कुंकू तिच्याच हातावर ठेवून तिच्याच घरातले पाण्याचे चार थेंब त्यावर टाकतो.
बघता-बघता लालभडक कुंकू काळेकुट्ट होते. अर्थ उघड आहे. कुंकवाने व्यक्त होणाऱ्या सौभाग्याला
धोका आहे. शांती करण्यासाठी काही रकमेची मागणी केली जाते. ती निमूटपणे दिली जाते. पुन्हा
घरातलीच हळद बाईच्याच हातावर देऊन घरातलेच पाणी त्यावर शिंपडले जाते आणि हळदीचे कुंकू
बनते. घरधन्याचा धोका टळतो. बाई खुशीने पैसे देते, हे फसवणे आहे आणि दैवी
दहशतवादही. हा मी अतिशय प्राथमिक प्रकार सांगितला. यापेक्षा अनेक पातळ्यांवर विविध
स्वरुपाच्या कथित चमत्कारांद्वारे फसवणूक चालूच असते. अशा सर्व प्रकाराबाबत पोलिसांकडे
तक्रार दिल्यास खटला दाखल केला जाईल. त्यामुळे स्वाभाविकच या प्रकारापासून कायद्याच्या
धाकाने परावृत्त होणाऱ्यांची संख्या वाढेल. फसवणुकीचे प्रमाण घटेल.
३) महाराष्ट्रातल्या अनेक जत्रा-यात्रांत नवस फेडण्यासाठी अनेक
अघोरी प्रकार चालतात. देवळाच्या दगडी भिंतीवर टकरा घेणे, पाठीला लोखंडी गळ टोचणे, डोक्यावर वस्तऱ्याच्या सहाय्याने चिरा मारून
रक्त काढणे वगैरे या बाबी कोणत्याही धर्माचा भाग असूच शकत नाहीत. या प्रथांचा अवलंब करणे अथवा करावयास भाग
पाडणे, हा गुन्हा आहे. मात्र मसुद्यात ‘जीवघेणा’ असा शब्द आहे. या स्वरुपाचे कृत्य जीव घेणे
आहे की नाही, याचा निर्णय कोर्टच देऊ शकेल आणि ‘केस लॉ’ तयार होईल व मग परिणामकारकता वाढेल.
४) या प्रकाराशी संबंधित बाबी मानवहत्येपर्यंत गेल्यानंतर आजही
गुन्हाच बनतात. मात्र या तरतुदीमध्ये अशा प्रकारांना प्रवृत्त करणे व प्रोत्साहन देणे, हा देखील गुन्हा आहे. हा कायदा अस्तित्वात असता तर पैशाचा पाऊस
पाडण्याच्या लोभातून झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोशीचे हत्याकांड रोखणे सोपे
गेले असते.
५) अंगात संचार होणे आणि तो दैवी आहे, असे सांगून इतरांच्या मनात भीती निर्माण
करणे, हे प्रकार आजही अनेक ठिकाणी चालू असतात.
अंगात येणाऱ्या बायका जे बोलतात, त्याला
दैवी उद्गाराचे प्रामाण्य लाभते आणि त्यामुळे अशा बाईच्या वा व्यक्तीच्या मुखातून जो
निर्णय येतो, तो पाळणे सक्तीचे बनते. अशा सर्व बाबींना
या कलमातील तरतुदींद्वारे रोखता येईल.
६) ही तरतूद प्रामुख्याने आदिवासी भागातील डाकीण व भुताळी या अघोरी
प्रथेबद्दल आहे. गावात काही मुले आजारी पडतात, लवकर बरी होत नाहीत. त्यातील
काही दगावतातही. काही वेळा गावात रोगराई निर्माण होते. या सर्वांचे खापर अंधश्रद्ध
बहुसंख्य जनमानस व काही मतलबी लोकांचे कटकारस्थान यातून गावातील एखाद्या व्यक्तीवर
डाकीण व भुताळी या नावाने ठेवले जाते. या व्यक्तीला गावात जगणे तर अवघड बनतेच; प्रसंगी जीवालाही मुकावे लागते. महाराष्ट्र राज्याच्या आदिवासीबहुल
जिल्ह्यात हा प्रकार आजही मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याला थेट आळा घालणे कलमातील या
तरतुदीमुळे जमू शकेल.
७) या कलमातील तरतूद करणी, मूठ मारणे या स्वरुपाच्या
प्रकाराबद्दल आहे. अशा बाबी असतात व त्या खऱ्या असतात, असा मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे घरावर कोणी करणी केली किंवा
मूठ मारली, हे सांगितले गेले की, संबंधित व्यक्तीच्या मारहाणीपर्यंत प्रकरण जाते. दोन व्यक्तींची
मारामारी ही किरकोळ बाब मानली जाईल;
पण करणीच्या नावाने होणारी
मारहाण ही मात्र आता त्यातील अंधश्रद्धेच्या घटकामुळे गंभीर बाब मानली जाईल. शिक्षाही
जबर होऊ शकेल आणि त्यामुळे असे प्रकार थांबण्यासच या कायद्याची मदत होईल.
८) पश्चिम महाराष्ट्रात आजही ‘मोठी आई’ किंवा ‘बाई’ हा प्रकार; विशेषत: डोंगराळ भागात आढळतो. व्यक्तीला कोणत्याही स्वरुपाची गाठ
उठते. ती कधी करट असते, कधी कॅन्सरचे ट्युमरही असू शकते; तर कधी क्षयरोगाच्या गंडमाळा असतात. या गाठीकडे बोट दाखवून असे
सांगितले जाते की, हा मोठ्या आईचा (अथवा बाईचा) कोप आहे. यावर
डॉक्टरांचे उपाय त्वरित बंद करा. त्यानंतर ‘मांड भरणे’ नावाचा एक भरपूर खर्चिक विधी करावयास लावला जातो. याची परिणती
शेवटी केवळ कर्जबाजारीपणातच होते,
असे नाही तर योग्य उपचाराच्या
अभावी व्यक्तीला जीवही गमवावा लागतो. चळवळीच्या प्रभावाने असे प्रकार आम्ही मर्यादित
प्रमाणात रोखले आहेत; मात्र या कायद्याने अशा बाबींवर थेट आघात
होऊन त्या पूर्णपणे बंद होण्याची शक्यता वाढेल.
९) पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर एकमेव उपाय असतो, प्रतिबंधात्मक इंजेक्शन घेण्याचा; अन्यथा रेबीज हा रोग होऊ शकतो. आजही जगात त्याला उपाय नाही. १००
टक्के मृत्यू हीच सुटका. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाची पारंपरिक इंजेक्शन्स
प्रचंड दुखतात. हल्ली निघालेली नवीन इंजेक्शन्स खूप महाग आहेत. यावरचा उपाय म्हणून
काही ठिकाणी पोटात घेण्याचे अत्यंत स्वस्त औषध दिले जाते. सांगलीजवळील कोल्हापूर जिल्ह्यातील
नांदणी गावातील रमजान गुंडू शेख याच्यावर याबाबत समितीने खटला घातला होता. आठवड्यातील
ज्या दिवशी तो औषध देई, त्यावेळी दूरदूरहून शेकड्यांच्या संख्येने
गर्दी होई. न्यायालयात आम्ही खटला हरलो होतो. आता तसे होणार नाही. अशी मंडळी थेट गजाआड
जातील. विषारी नागाचा दंश झाल्यानंतर त्यावर एकच उपाय म्हणजे त्वरित प्रतिविषाचे इंजेक्शन
घेणे. परंतु याही बाबतीत मंत्र टाकून विष उतरवणाऱ्या मांत्रिकांची चलती आहे. अनेकदा
सर्प बिनविषारी असतो आणि श्रेय मांत्रिकाला जाते. यापुढे असे उपचार करणाऱ्या केंद्रावरील
व्यक्ती आणि त्यांना तेथे नेणारे हे दोघेही थेट तुरुंगात जातील. साप विषारी की बिनविषारी, हा मुद्दाच राहणार नाही. योग्य वैद्यकीय उपचाराऐवजी दिशाभूल करणे
व योग्य उपचार रोखणे हा गुन्हा मानला गेला आहे. (अर्थात यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य
केंद्रांत पुरेशा प्रमाणात प्रतिविषाची इंजेक्शने उपलब्ध असणे याची गरज आहे, हे लक्षात ठेवायला हवे.)
१०) हाताच्या बोटाने पोटाची अथवा हृदयाची अवघड शस्त्रक्रिया
करण्याचा दावा करणाऱ्या अस्मलबाबाने महाराष्ट्रातील जनतेला मजबूत लुटले. आता त्याला
त्वरित अटक व भरभक्कम शिक्षा होऊ शकेल. (कारण त्याने स्वत:च्या प्रचाराच्या सी. डी.
काढल्या होत्या. त्यामुळे पुरावा आयताच उपलब्ध आहे.) मुलगाच हवा या हव्यासापोटी गर्भवती
स्त्रीवर काही विधी करून गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती काही वर्षांपूर्वी
दिसत, त्या आता दिसत नाहीत. परंतु मुलगा होण्याची
आकांक्षा असे विधी करवून घेण्यास प्रवृत्त करते. या स्वरुपाच्या प्रकारांना त्यामुळे
आळा बसेल.
११) ‘बुवा तेथे बाया’ असे एक दु:खदायक समीकरण बऱ्याच ठिकाणी दिसते. विवंचनेने ग्रासलेल्या
आणि पारंपरिक विचारातून आलेल्या अवतार कल्पनेने भारलेल्या वास्तवामुळे स्त्रियांना
कथित अवतार असलेल्या बाबा, बुवा, महाराजांचा आधार वाटू
लागतो; शिवाय अशा ठिकाणी अशा व्यक्तीकडे वारंवार
जाणे हा धार्मिक आचरणाचा भाग मानला जात असल्यामुळे याबाबतीत अडथळाही येत नाही. यातूनच
स्त्रियांचे लैंगिक शोषण जन्म घेते. पुणे येथील काही वर्षांपूर्वी गाजलेली वाघमारे
बाबाची केस ही याबाबत कुप्रसिद्ध आहे. अनेक स्त्रियांशी शरीरसंबंध करूनही तो कायद्याच्या
चौकटीत फारसा अडकला नाही. नव्या कायद्याने ही त्रुटी भरून निघेल.
१२) बुवाबाजी हा अत्यंत बरकतीला आलेला धंदा आहे. त्यातील एक
अफलातून युक्ती अशी की, मंद बुद्धीची एखादी व्यक्ती निवडावयाची की
जितकी जास्त मंद बुद्धीची असेल, तितके
अधिक बरे. अशी व्यक्ती ही अवलिया महाराज आहे. तिच्यामध्ये काही विशेष शक्ती आहे, असे भासवून तिच्या नावाने धंदा उभारला जातो. अशा बाबाला काहीच कळत नसल्यामुळे टोळक्यांचे
चांगलेच फावते. या बाबींच्यात आता त्वरित हस्तक्षेप करता येईल.
मूळ कायदा यापेक्षा कडक होता. त्यामध्ये अंधश्रद्धेची एक व्यापक
व्याख्या होती. त्यामुळे परिणामकारकता वाढली होती. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाची
तरतूद होती. त्यामुळे कायदा केवळ पोलिसांवर अवलंबून राहिला नसता. पोटावर हात फिरवून
मुले देणारी पार्वतीमाँ, डोक्यावर फरशी ठेवून निदान करणारा फरशीवालेबाबा
यांचा थेट समावेश होता. या सर्व बाबी आता वगळल्या आहेत. एक मागणी अशीही आहे की, कायद्यात नारायण नागबळी, वास्तुशास्त्र, तोडगे विधी सांगणारे ज्योतिषी यांचा समावेश करा. मागणी रास्तच आहे; पण अवघडही. पहिले पाऊल तर पडले आहे. कायदा अधिक कडक करण्याच्या
मागणीमागील जनतेचा आवाज जेवढा बुलंद आणि सक्रिय होईल, त्याप्रमाणात पुढच्या टप्प्यांकडे वाटचाल होईल. मात्र त्याआधी खूप
प्रबोधन करावे लागेल आणि संघर्षही.
आवाहन
१) या कायद्यानं सांगितलेल्या बाबी आपल्या भागात जेथे कोठे घडत
असतील, त्या व्यक्ती, त्यांच्या जागा,
त्यांचे दिवस वा तिथी, तेथे चाललेले प्रकार हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मध्यवर्ती कार्यालय यांच्याकडे कळवावी. या माहितीसोबत माहिती देणाऱ्याचे
नाव, पत्ता व फोन नंबर कळवावा. तो पूर्ण गुप्त
ठेवला जाईल. या उपक्रमातून कायद्याच्या गरजेचे व्यापक सर्वेक्षण घडून येईल.
२) या कायद्याच्या कक्षेत आज न येणाऱ्या; पण खरे तर यावयास हव्यात, अशा ज्या बाबी वाचकांना
वाटतील त्या त्यांनी वरीलप्रमाणेच तपशीलवार कळवाव्यात.
३) या कायद्याच्या माध्यमातून व स्वतंत्रपणे याबाबतची अंमलबजावणी
करणे, यासाठी ज्यांना उत्साह असेल ती मंडळे व व्यक्ती
यांनी जरूर कळवावे. त्यांना सर्व ती मदत व प्रशिक्षण देण्यात येईल.
या कायद्यातील सर्व तरतुदी या ग्रामीण, अडाणी, अशिक्षित लोकांसाठी आहेत. पांढरपेशी, शहरी उच्चभ्रू लोकांच्या अंधश्रद्धांना यात
हातच लागलेला नाही, हा आक्षेप बरोबर आहे. याबाबतची स्पष्ट भूमिका
अशी की, अंधश्रद्धा ही प्रामुख्याने गरिबाला गरीब
ठेवण्याचे कारस्थान आहे.
त्यामुळे ज्यांचे या अंधश्रद्धांतून शोषण, नुकसान होऊन जीवन उद्ध्वस्त
होते, त्यांनाच प्रथम वाचवणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा
वाईटच; पण त्या आघाताने मोडून पडू शकणाऱ्या दुर्बल
घटकांना संरक्षणाची गरज अधिक म्हणून कायदाही प्रथम त्यांच्याकरिता.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी २००६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा