बुधवार, १० जानेवारी, २०१८

अपुऱ्या आकलनाचे आक्षेप




अपुऱ्या आकलनाचे आक्षेप
दाभोलकर, कायदा, आक्षेप, स्पष्टीकरण
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पारित केलेले जादूटोणा आणि दुष्ट प्रथा व रूढी यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २००५ हे विधेयक विधानसभेसमोर आहे. पावसाळी अधिवेशनात ते मंजूर करण्याचे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनी दिले. मी डॉ. एन. डी. पाटील, मृणाल गोरे व पुष्पा भावे त्यांना ६ जूनला भेटलो. त्यांनी कायदा करण्याबाबतचे नि:संदिग्ध आश्वासन दिले. दोन टप्पे ठरले. पहिला कायद्याच्या समर्थकांनी सावधगिरी म्हणून कायद्याचे आणखी एकदा अवलोकन करावे. त्यानंतर विरोधी पक्षप्रमुखांना मुख्यमंत्र्यांनी बोलावून कायद्यात हिंदू धर्म अथवा कोणत्याच धर्माच्या विरोधात काही नाही, हे पटवून द्यावे.

यापैकी पहिल्या टप्प्यावरच्या कार्यवाहीबाबत श्याम मानव यांनी महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सम्राट या दैनिकांत लिहिलेल्या लेखांचा विचार करावा लागेल. क्वचित अपवाद वगळता या सर्व लेखातील प्रतिपादन एकच आहे. कायदा शक्य तेवढा परिपूर्ण व परिणामकारक व्हावा, याबद्दलची श्याम मानव यांची तळमळ आहे. या भावनेचा आदर करूनही प्रत्यक्षात हे सर्व आक्षेप वस्तुस्थितीबाबतच्या त्यांच्या अपुऱ्या आकलनातून निर्माण झाले आहेत. याचा नेमका तपशील देण्यासाठी, हे लेखन.

श्याम मानव यांनी कायद्यातील अनेक प्रकारांचे स्वागत करून तो भाग हवाच, ही घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. त्यापुढे जाऊन विविध ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या भीतीबद्दलची वस्तुस्थिती अशी-
१)    कलम क्र. ४ अणकुचीदार वस्तू टोचणे, पोतराजासारखा चाबूक मारून घेणे, स्वत:ला जखम करणे या अंधश्रद्धा नक्कीच आहेत; पण त्यांना सात वर्षांची शिक्षा का?’ इति. मानव... पोतराज अंगावर चाबूक मारल्याचा देखावा करतो. चळवळीतील शेकडो कार्यकर्ते हा प्रयोग करतात. यात शिक्षेचा प्रश्न येतोच कुठे? एकच गळ नवस फेडण्यासाठी हजारो भाविकांनी टोचून घेणे, कपाळावर एकाच वस्तऱ्याने अनेकांनी चिरा मारून रक्त काढणे, यात देवाच्या पूजेचा अंशही नाही; एड्सची भीती वेगळीच. न्यायमूर्ती तरतमभाव वापरतात, तेव्हा अशा गुन्हेगारांना एकदम सात वर्षांची शिक्षा होईल, ही भीती अनाठायी आहे.
२)    कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून देवाचा वा देवीचा संचार करवणे हा गुन्हा कसा? अष्टमीला हजारो स्त्रियांच्या अंगात येते, त्यांना तुरुंगात कोंबणार का?’ हा श्याम मानव यांचा प्रश्नही अज्ञानावर आधारित आहे. अंगातील संचार ही संमोहन अवस्था असते. परंपरेच्या संस्काराने त्याला देवीचे अंगात येणे मानले जाते. स्वत:च्या भावनांचे विरेचन करण्यासाठी असे घुमणे आणि त्याला संचार अथवा सवारी समजणे हा गुन्हा नाही. कायद्यातील गुन्ह्याच्या व्याख्येत त्या अंधश्रद्धेच्या आचरणातून वेदना, इजा, दुखापत वा फसवणूक झाल्यासच ते कृत्य गुन्हा स्वरुपाचे बनते. अंगात संचार झाल्याचा दावा करून कोणी करणी केली आहे?’ त्याचे नाव उच्चारून गावात भांडण लावणे, खऱ्या-खोट्याच्या निवाड्यासाठी संचार अवस्थेतील देवीने उकळत्या तेलात हात घालण्याची शिक्षा फर्मावणे, लोकांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊन फसवणूक करणे, याचा संबंध कलम ५ शी येतो आणि हे गुन्हेच आहेत.

३)    कलम क्र. ८ - भूत उतरवण्याच्या नावाखाली जे मंत्र-तंत्र व क्रियाकर्म होतात, ते घबराट निर्माण करतात, हे मानवच मान्य करतात. दैवी दहशतवादापासून निर्माण केला जाणारा  हा धाक नेहमीच्या दहशतवादापेक्षा अधिक गंभीर आहे व त्याला कायदा नाहीच. म्हणून या कलमाची गरज. यापेक्षा मानवांची अधिक गंभीर गफलत म्हणजे त्यांचे आपल्याला भूत लागले आहे, असे ज्यांना वाटते, त्यांचे भूत मंत्रोच्चाराने उतरू शकते, ही वस्तुस्थिती आहे. सध्या तरी असे मनोरुग्ण मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे शक्य नाही. त्यांच्या उपचाराचा हाही मार्ग बंद करावयाचा का?’ हे प्रतिपादन. व्यक्तीचा मानसिक आजार तीव्र वा सौम्य या प्रकारचा असतो. हावभाव बदलणे, स्वत:शी पुटपुटणे, भास होणे, स्वच्छतेची शुद्ध हरपणे, वर्तनातील सुसंगतपणा जाणे या स्वरुपाची आजाराची गंभीर लक्षणे असताना (ज्याला सायकोसिस म्हणतात), भूत लागले, असे समजून मांत्रिकाकडे नेणे ही मोठे चूक आहे. अशा व्यक्ती कधीही मांत्रिकाच्या मंत्रोच्चाराने बऱ्या होत नाहीत. उलट या सर्व चुकीच्या मार्गामुळे योग्य उपचार लांबतो, धोका वाढतो. या उपचाराला मानसोपचारतज्ज्ञच हवा. सौम्य मानसिक आजारातील व्यक्तिमत्त्वातले प्रासंगिक बदल हेही त्या तात्पुरत्या काळातील भुताने झपाटणेच मानले जाते. मांत्रिकांच्या सूचना स्वीकारून काही काळ या रुग्णांना बरे वाटते; पण हाही उपचार चुकीचा आहे. सौम्य मानसिक विकृती ज्या सामाजिक, कौटुंबिक ताणातून निर्माण झाल्या, त्यांचे निराकरण करणे, शास्त्रशुद्ध पद्धतीने होकारात्मक सूचना देणे, आवश्यकतेपुरतेच (ते बरेच कमी लागते) औषध देणे हे यावरील उपाय करण्यासाठी मानसोपचार-तज्ज्ञाची अजिबात गरज नाही. साधा डॉक्टर वा कम्युनिटी सायकिअ‍ॅट्रीयातील तज्ज्ञ कार्यकर्ताही हे अधिक चांगले करतो. मांत्रिकाने असे उपचार करणे हा रोग्याच्या मानसिक अवस्थेशी खेळण्याचा गंभीर गुन्हाच आहे. (खरे तर आज अस्तित्वात असलेला बोगस डॉक्टरविरोधी कायदाही याबाबत कारवाईचे अधिकार देतो.)
४)    कलम क्र. ९ जागतिक आरोग्य संघटनेने पूरक उपचार म्हणून मान्यता दिलेल्या बाबी मनोकायिक आजाराबाबत वापरण्यास काय हरकत आहे?’ या मानव यांच्या प्रश्नाचे उत्तर हेच की आजार मनोकायिक आहे, हे कोण ठरवणार? डोके दुखत आहे ते मानसिक चिंतेने? की मेंदूतील गाठीने? की वाढलेल्या रक्तदाबाने? का सर्दीमुळे? की चष्मा लागल्याने? याचे यथायोग्य निदान पूरक उपचार करणारा करूच शकत नाही. शारीरिक आजार असताना तो मानसिक आहे, असे समजून उपचार करण्याने अनावस्था प्रसंग ओढावतो, याची असंख्य उदाहरणे आहेत. फार तर असे म्हणता येईल की, निदान पक्के झाल्यावर ताण व चिंता कमी करण्याचे उपचार, पारंपरिक शिक्षणाने करणाऱ्यांना, किमान प्रशिक्षण देऊन त्याबाबत अनुमती द्यावी.

५) कलम १४ - विकोपाच्या आजारात नातेवाईक कमालीचे संवेदनशील असतात व पूर्णत: अशास्त्रीय अंधश्रद्ध उपायाकडे वळतात, हे दु:खद सत्य आहे. अशा पीडित व्यक्ती व त्यांचे नातेवाईक याबद्दल पूर्ण सहानुभूतीच    हवी. पण लोकांची अगतिकता हा फसवणुकीचा परवाना मानणे ही गंभीर चूक आहे. सध्याच्या कायद्यात दैवी उपचाराची जाहिरात हा गुन्हा आहेच. नव्या कायद्याने एक पाऊल पुढे टाकून प्रत्यक्ष उपचार हा गुन्हा ठरेल. अगदी अलिकडेच डॉक्टरांनी उपचार थांबवलेले कॅन्सरचे शेकडो रुग्ण कोणत्याही शस्त्राशिवाय हाताच्या बोटाने दैवी ऑपरेशन करणाऱ्या अस्लमबाबाकडे शेवटची मात्रा म्हणून गेले. भरपूर पैसा खर्च झाला. रुग्ण नातेवाईक यांना प्रवास, राहणे, उपचार यातून प्रचंड त्रास झाला. पुन्हा हे सगळे व्यर्थ ठरलेच. आधार म्हणून देवाचा अंगारा लावणे समजू शकते; मात्र अस्लमबाबावर कारवाई हवीच. म्हणून कायदा हवा. या कलमाच्या अंमलबजावणीच्या वेळी पोलीस व न्यायाधीश सारासार विवेक वापरतीलच आणि तो पुरेसा आहे. नातेवाईकांच्या भावनांत हस्तक्षेप होतो, हे श्याम मानवांचे प्रतिपादन अपुरे आहे. खरा हस्तक्षेप त्या भावनांशी स्वत:च्या स्वार्थापोटी अंधश्रद्धेचा वापर करणाऱ्या शोषक वर्गासाठी करावयाचा आहे

६)    भानामतीचे प्रकार कसे घडतात, हे मांत्रिकाला माहीत नसते, तरी तो त्याबाबत भरपूर पैसे घेऊन उपाय करतो. अशा मांत्रिकाला गुन्हेगार ठरवणे हे नैतिकतेला धरून नाही, हे श्याम मानव यांचे प्रतिपादन अजिबात पटणारे नाही. ज्या बाबतीत पूर्ण अज्ञान आहे, त्याबाबत उपाय करून लोकांचा वेळ, श्रम, पैसा, बुद्धी वाया घालवणे आणि पुन्हा प्रश्न कायमच राहणे हे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे आहे.

७)    चौथ्या महिन्यात विशिष्ट विधीद्वारे हमखास पुत्रप्राप्ती करून देण्याचे दावे होतात. गर्भधारणेनंतर कोणत्याही कारणाने लिंग बदल होत नाही. अशा वेळी असे कर्मकांड ही गंभीर फसवणूक ठरते; शिवाय मुलगाच हवा याचे समर्थनही ठरते. हे सर्वच आक्षेपार्ह म्हणूनच गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे.

८)    नग्नतेला अवलिया अथवा विदेही शब्द लावून त्याचे उदात्तीकरण करणे व स्त्रियांशी असभ्य वर्तन करणे, या कलमाच्या समावेशाशी हिंदू परंपरेतील नागा साधू, दिगंबर जैन आचार्य यांचा दूरान्वयानेही संबंध येत नाही.       तरीही वाद टाळण्यासाठी हे कलम वगळण्यास हरकत नाही.

कायद्याच्या प्रारूपात व्याख्या या सदरात २ (१) (घ) यामध्ये जादूटोणा करणे, याची व्याख्या केली आहे आणि परिशिष्टातील बाबी या त्याची उदाहरणे आहेत. या एकूण २७ नोंदी शासनाच्या कायदा विभागाशी प्रदीर्घ विचारमंथनातून झाल्या आहेत. तरीही व्यापक सहमतीसाठी त्यातील काहींचा समावेश वगळण्याची बाब देखील मान्य करावी, असे महाराष्ट्र अंनिसचे मत आहे. कायदा एकदा मंजूर झाला की, त्याची अंमलबजावणी व न्यायालयीन निवाडे याद्वारे अधिक स्पष्टता येईल. त्या प्रकरणात अधिक काटेकोरपणा कायद्यात आणण्याचा प्रयत्न करता येईल.

या कायद्यात श्रद्धा आणि धर्माच्या नावाखाली ज्यांची आर्थिक फसवणूक होते, त्यांनी तक्रार केल्यास त्यावर कारवाई करण्याची शक्यता असलेली  तरतूद हवी. या श्याम मानव यांच्या मागणीशी मात्र मी १०० टक्के सहमत आहे. मात्र ते म्हणतात तसे हा कायदा केवळ ग्रामीण, अडाणी लोकांना डोळ्यासमोर ठेवून व शहरी सुशिक्षितांना वगळून करण्यात आला आहे, हे मात्र खरे नाही. शहरातील, महानगरातील अंधश्रद्धांना बळी पडणाऱ्या घटकांचे सर्वेक्षण हे सहजपणे स्पष्ट करेल. सध्याचा कायदा हा इष्ट दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे, असे मानावे आणि भरभक्कमपणे एकमताने टाकून पुढील वाटचालीसाठी सिद्ध व्हावे, हेच श्रेयस्कर. हे पहिलेच पाऊल उचलण्यासाठी तब्बल १४ वर्षांहून अधिक काळ लागला आहे, या वास्तवाची जाण ठेवणेही उचित ठरेल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जुलै २००५)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...