आपण
मनावर घेतले तर...
दाभोलकर, बुवाबाजी, अस्लमबाबा, हाताच्या बोटांनी ऑपरेशन्स
प्रिय
आर. आर.
स. न. वि. वि.
एका मोठ्या राज्याच्या गृहमंत्र्याला,
एका बाबाला आवरा,
असे साकडे घालण्याची पाळी
यावयास नको होती, हे
मला समजते.
पण परिस्थितीचे गांभीर्यच तसे करायला मला भाग पाडत आहे. कर्नाटकातल्या चंदनचोर वीरप्पनला
पोलिसांची पाळत तरी सतत चुकवावी लागते. कर्नाटकातला अस्लमबाबा तेवढाच खतरनाक. पण तो
महाराष्ट्रातल्या हजारो लोकांच्या आरोग्यावर उपचाराच्या नावाने दिवसाढवळ्या दरोडा घालून
वर उजळमाथ्याने वावरतो. दोघेही दहशतवादीच; पण अस्लमबाबाचे कृत्य अधिक गंभीर. कारण स्वत:च्या करणीला तो थेट
कुराणाचे समर्थन देतो.
आबा, अस्लमबाबाचा
हा हंगामा जवळपास गेली वर्षभर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून वादळासारखा फिरत आहे.
हजारो लोकांना घेऊन गोंदिया-गडचिरोली ते सिंधुदुर्गपर्यंतच्या गाड्या अहोरात्र बागलकोटला
पळत आहेत. अस्लमबाबा हाताच्या बोटांनी मोठमोठी ऑपरेशन्स पंधरा मिनिटात करतो. अपेंडिक्स,
मूतखडे, कॅन्सरच्या गाठी अद्भुत शक्तीने हा-हा म्हणता
काढतो. सोबत झाडपाल्याची दवा दिली जाते. रोजची गर्दी तीन-चार हजारांची. बहुसंख्य महाराष्ट्रीय.
हजारजणांवर रोज उपचार (!) होतात. सरासरी पाचशे रुपयांप्रमाणे रु. पाच लाखांचा रोजचा
गल्ला जमतो. उरलेले सर्वजण उपचाराच्या अत्यंत गलिच्छ बकाल जागेत गैरसोय सोसून आपल्या
गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी नंबर येईपर्यंतचे दिवस जीव मुठीत धरून राहतात. प्रत्यक्षात
भल्यामोठ्या फसवणुकीचे बळी ठरतात. आजार असाध्य असतात, माणसे अडचणीत असतात; पण लोकांची अगतिकता हा लुटारू धंद्याचा परवाना
ठरावा काय? डॉक्टरी उपाय महाग खरेच;
पण हा उपायदेखील भरपूर पैसे मोजायला लावतोय.
समाजसुधारकांची नामावली उठता-बसता घेणाऱ्या महाराष्ट्राच्या शासनाने थंड, तटस्थ नजरेने जनतेची ही नागवणूक पाहावी काय?
गृहमंत्री महोदय, दोन वर्षांपूर्वी ही कीड थेट महाराष्ट्राच्या भूमीवर पसरू पाहत
होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शर्थीने ती रोखली. अस्लमबाबाचे सोलापूरला
उपचार शिबीर होते. समितीच्या प्रयत्नाने त्यात पोलीस हस्तक्षेप झाला. गुन्हा दाखल झाल्यामुळे
अस्लमबाबाला नंतर महाराष्ट्रातले आपले काळे कारनामे थांबवावे लागले. या कारवाईच्या
वेळी सोलापूरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी
वस्तुस्थितीच्या पाहणीसाठी तज्ज्ञ सर्जन असलेल्यांची नेमणूक केली. त्यांचा अहवाल आरोग्य
खात्याकडून मिळवून नामदार महोदय, आपण
जरूर वाचावा. आपल्या रेडी रेफरन्ससाठी या पत्रात त्यातील काही बाबींचा फक्त उल्लेख
करतो.
अस्लमबाबांची दस्तूरखुद्द जबानी असे सांगते की, मी पाच वर्षांचा असताना कुराण, सहा वर्षांचा असताना वेद, सात वर्षांचा असताना बायबल व नऊ वर्षांचा
असताना सर्व हिस्ट्री वाचली. अल्लाहतालाच्या कृपेने वयाच्या दहाव्या वर्षापासून रुग्णांवर
उपचार व शस्त्रक्रिया करू लागलो. एचआयव्ही, टी.बी., ब्लड कॅन्सर, टक्कल पडणे, कातडीचे आजार या सर्वांवर मी उपचार करतो.
मी हार्ट, स्टमक स्टोनसाठी ऑपरेशन करतो.
सैतानाचाही इलाज करतो. निदान करण्यासाठी मला रुग्णाला हात लावण्याची कधी गरज भासत नाही.
कोणत्या रुग्णाला औषध द्यावयाचे व कोणाचे ऑपरेशन करावयाचे, हे मी कुराण व ‘हादीस’च्या आधारे ठरवितो. या ग्रंथांच्या हिशोबाने
जगात ३५०० आजार आहेत. त्यापैकी १००० दवा से व १००० दुवा से बरे होतात. हजारांसाठी ऑपरेशनची
गरज पडते; तर ५०० आपोआप बरे होतात.
ऑपरेशनासाठी रुग्णाला भूल देण्याची गरज मला भासत नाही. पाण्याने हात ओले करून बोटे
पोटात अथवा छातीत खुपसून मी ऑपरेशन करतो. हृदयाचे व्हॉल्व्हज् बिघडले असतील तर छातीत
बोटे खुपसून मी हे व्हॉल्व्ह बाहेर काढतो, रिपेअर करतो व जागेवर ठेवतो. टाके न घालता पंधरा मिनिटांत जखम बरी
होते. ऑपरेशननंतर काही काळजी, औषधे
लागत नाहीत. ही ऑपरेशन्स ही अल्लाहची देन आहे. हजारो रुग्ण येतात. त्यामुळे कशाचीही
नोंद ठेवली जात नाही. गृहमंत्री महोदय, कारवाई करण्यासाठी आणखी कुठल्या कबुलीजबाबाची गरज आहे? विशेष म्हणजे दोन तास थांबून व कबूल करूनही
बाबा एकही ऑपरेशन तज्ज्ञ सर्जनला दाखवू शकला नाही. आर. आर. पाटीलसाहेब, महाराष्ट्रात ज्याची दुकानदारी आम्ही रोखली,
त्याने बागलकोटला आता ‘सुपर मार्केट’ खोलले आहे. एके काळी खाटिकाचा धंदा करणारा
अस्लमबाबा प्राण्याच्या आतड्याचे, मांसाचे
तुकडे ऑपरेशनमधून काढले म्हणून रुग्णाच्या हातावर ठेवत आहे. गुंडाची यंत्रणा मजबूत
आहे. धंदा वाढवण्यासाठी स्वत:च्या अद्भुत ऑपरेशनच्या सी. डी. काढणारा हा पहिलाच ‘हायटेक’बाबा. टेम्पो ट्रॅक्सने रुग्णांना वाहून
आणणाऱ्या वाहनचालकांना व्यवस्थितपणे धंद्याचे एजंट बनविण्यात आले आहे. दोनशे एकर जमीन
खरीदण्यात आली आहे. त्याला स्थानिक पाठिंबा शून्य आहे. कर्नाटकातील रुग्ण कमीच आहेत.
भरभरून गर्दी करत आहे आणि स्वत:चा वेळ, श्रम, बुद्धी,
पैसा वाया घालवून बसत आहे, ती बहुसंख्येने महाराष्ट्राची रयत.
सुजाण नामदार महोदय, गेली वर्षभर आम्ही या विरोधात शक्य तेवढा आवाज उठवला; पण आम्ही अपुरे पडलो आहोत. काही वृत्तपत्रांनी
अस्लमबाबाची बुवाबाजी फार तपशीलवारपणे व पोटतिडकीने मांडली; पण जनांचा प्रवाह थांबवण्यासाठी तेही अपुरे
ठरले आहे. वृत्तवाहिन्यांनीही बातम्या दिल्या, तरीही अपेक्षित परिणाम साधलेला नाही. यापैकी
कशावरही आपण नजर टाकली तर आपला महाराष्ट्रीय बांधव कसा व किती लुटला जात आहे,
त्याच्या आजाराचा अस्लमबाबा कसा लिलाव मांडत
आहे, याची कल्पना आपणास येईल.
ही संतापजनक नागवणूक अजूनही मोठ्या प्रमाणावर चालू असल्याची माहितीही आपले अधिकारी
आपल्याला देतील.
आबा, आपल्याला
साकडे घालण्याचे आणखी एक कारण म्हणजे उत्तर कर्नाटकचे पोलीस महासंचालक पी. ओमप्रकाश
यांची मी अलिकडेच बेळगावला भेट घेतली. अस्लमबाबावर कारवाईची मागणी केली आणि त्यांनी
माझी साफ निराशा केली. ‘कोणत्या कायद्याखाली कारवाई करू,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी मला केला. बड्या
मुस्लिम राजकीय नेत्याचा अस्लमबाबाला कसा पाठिंबा आहे, याची रेकॉर्ड वाजविली. अस्लमबाबा पोटावर
पांढरा कागद पसरतो, मग
ऑपरेशन करतो. कागद लाल रंगाने न्हाऊन निघतो, ते रक्त समजले जाते. तो तांबडा रंग कशाचा
आहे, रक्ताचा
असल्यास ते रक्त प्राण्याचे आहे का? माणसाचे असल्यास ऑपरेशन केलेल्या व्यक्तीच्या रक्तगटाचेच ते रक्त
आहे का? काढलेला मांसाचा तुकडा
तपासल्यावर त्यातील पेशी काय सांगतात, असे साधे प्रश्न त्यांना सुचले नव्हते आणि सांगितल्यावर ‘बाप दाखव, नाही
तर श्राद्ध कर’ असे बजावत अस्लमबाबाच्या मुसक्या आवळण्याची
त्यांची तयारी नव्हती.
मा. आर. आर. पाटील, छत्रपती शिवरायांचा कल्याणकारी वारसा आपण सांगता ना? मग शासकीय प्रसारमाध्यमांना प्रभावीपणे वापरून
बागलकोटला फसण्यासाठी जाणाऱ्या आपल्या बांधवांचे लोंढे कृपया थांबवा! आरोग्यासाठी तरी
कॉलऱ्याची लस टोचण्यापासून, पाणी
उकळून पिण्याची सक्ती करणारे शासन, प्रखर
प्रचारमोहिमेतून जनमानसाला अस्लमबाबाच्या मायाजालापासून नक्कीच बऱ्याच प्रमाणात रोखू
शकते. अस्लमबाबावर सोलापूर कोर्टात दखलपात्र गुन्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन
समितीने दाखल करून दोन वर्षे झाली. हा खटला जनहितार्थ त्वरित चालविण्याची विनंती आपण
न्यायमूर्तींना करावी. आम्हाला या निर्णयातून अस्लमबाबाला धडा मिळण्याची मोठी आशा वाटते.
कर्नाटक सरकारच्या गृहखात्यालाही आपण लिहावे. त्यांची कारवाईची हिंमत होत नसेल,
तर आपले तडफदार अधिकारी पाठवावेत. कर्नाटकच्या
वा महाराष्ट्राच्या तुरुंगात खडी फोडण्यासाठी अस्लमबाबाची लवकरात लवकर रवानगी होईल,
हे पाहावे.
यातले काहीच होणे नसेल, तर मात्र अस्लमबाबाला सन्मानपूर्वक महाराष्ट्रात
बोलवावे. आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू करावे. कोट्यवधी रुपयाची वैद्यकीय महाविद्यालये
आणि लक्षावधी रुपयांच्या फीचा विद्यार्थ्यांना भुर्दंड यापेक्षा अस्लमबाबा विद्यापीठाची
डिग्री सुरू करावी. आपण अनेक वर्षे महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ केवळ
पाहत नाहीत, तर
त्याचे सक्रिय साथीदार आहात. नरेंद्र महाराजाच्या बुवाबाजीविरोधी पहिला प्रखर संघर्ष
तासगावात सात वर्षांपूर्वी झडला, त्यावेळी
आपणच तर त्यात अग्रभागी होता. आपण मनावर घेतलेत तर अस्लमबाबाची बदमाषी कठोरपणे व त्वरित
बंद करू शकाल, असा
विश्वास वाटतो. आपण तो सार्थ ठरवाल या अपेक्षेने, हा पत्रप्रपंच.
आपला,
नरेंद्र
दाभोलकर.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा