शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

माझे अध्यात्मिक आकलन (उत्तरार्ध)




माझे अध्यात्मिक आकलन  (उत्तरार्ध) 
दाभोलकर, अध्यात्म, धार्मिक, विवेकाधिष्ठित नीती, समाजसुधारकांचा वारसा, धर्मजागर
ईश्वरदर्शन
अध्यात्माचे प्रयोजन हे ईश्वरदर्शनाचेच आहे. ईश्वर कशाला म्हणावयाचे, या घटापटादी चर्चेत न पडता तीन प्रकारे हे दर्शन होऊ शकते, असे मानले आहे. अ) अंतर्यामी ब) निसर्गात क) जनता जनार्दनात.
ईश्वर आहे का नाही, या वादात जाण्याचे कारण नाही. तो नाही असे मानूनही एक विवेकवादी म्हणून या तीन पातळ्यांवर काय दिसते?
·         माणसाच्या वासना, विकारावर मात आणि माणसाच्या मंगल नैतिक भावनांचा परिपोष. ही बाब ईश्वराच्या नावाने असो वा त्याच्या नावाशिवाय; घडून येण्याची गरज आहे. माणसाच्या मनाचे हे उन्नयन कसे घडून येईल, याचा शोध धर्माने आणि अध्यात्माने आपल्या परीने घेतला. त्यातील प्रामाणिकपणा मान्य करूनही तो साफ अपुरा ठरला, हे दिसतेच आहे. मात्र त्याचा आदर करावयास हवा. दुसऱ्या बाजूला मनोविज्ञानाच्या क्षेत्रात एक आव्हान आहे की, माणूस स्वत:च्या भावभावनांचे शुद्धीकरण व उन्नतीकरण कसे करू शकेल? बाह्यपरिस्थितीमुळेच या भावभावना उद्भवतात, असे जरी मानले तरी देखील याबाबत करण्यासारखे बरेच काही मनोविज्ञानासाठी शिल्लक आहे.
·         निसर्गसुसंगत जीवन जगावे यासाठी खरे तर त्याद्वारे आपणास परमात्म्याचे दर्शन घडते, असे सांगण्याची गरजही राहिली नाही आणि तसे घडते असे मानून कोणी पर्यावरणसुसंगत जीवन जगत असेल तर त्याला विरोध करण्याचेही कारण नाही. एक पर्यावरणविसंगत आत्मघातकी जीवनशैली आजचा समाज अंगीकारत आहे. यामध्ये देव आहेच मानणाऱ्यापासून देव नाही मानणाऱ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. पालेभाज्या, उसळी, फळे नियमाने सेवन करावेत. तेलकट, तिखट, तळलेले, गोड यांचे सेवन टाळावे. साधे सुती कपडे घालावेत. नैसर्गिक पेये प्यावीत. थोडे शरीरश्रम आवर्जून करावेत. डोळ्यांचा वापर सतत टी.व्ही. पाहण्याऐवजी वाचन व निसर्ग अवलोकन यासाठी करावा. हे समजण्यात काहीही अध्यात्मिक नाही. हा साधा शहाणपणाचा भाग आहे आणि याचा अवलंब कोणी अध्यात्मिक साधना म्हणून करत असेल तर त्यात आक्षेपार्हही काही नाही. याच जाणिवेचे विकसित रूप म्हणजे एकूणच समाजजीवनाची जडणघडण पर्यावरणसुसंगत पद्धतीने करण्यासाठी धडपडणे.
·         विनोबाजींनी असे म्हटले आहे की, मी १२ वर्षे संपूर्ण भारतात दोन वेळा पदयात्रा केली. यामुळे मला जनता-जनार्दनाच्या रूपातील ईश्वराचे तिसरे रूपही भेटले; अन्यथा माझी अध्यात्मिकता अपूर्ण राहिली असती. जनता-जनार्दनाच्या रूपात परमेश्वर भेटतो की नाही, हे माहीत नाही. पण आज अध्यात्माच्या नावाने ज्यांच्याभोवती लक्षावधींची गर्दी होते, ते सर्वजण जनता-जनार्दनाशी संबंधित मानवी मूल्यांच्या लढ्याकडे पाठ फिरविताना दिसतात. या कथित कोट्यवधी अध्यात्मिक सुस्थितीतील भाविकांचे मन स्वत:विषयीच्या अनेक ताणाने अस्वस्थ होते. त्यांना उत्तरे मिळवताना त्यांची वृत्ती उघडपणे स्वार्थाची व आत्मकेंद्री असते; अध्यात्माची नसते. नैतिक सामर्थ्य कृतीत आणण्यासाठी माणूस स्वत:च्या देहाच्या मर्यादेत, समाजाच्या मर्यादेत भारावलेपणाने काम करतो. या अवघड प्रयत्नात व त्याच्या यश-अपयशातच आनंद आहे, कृतार्थता आहे. कारण त्यामध्ये शोषितांच्याविषयी जिव्हाळा आहे. म्हणजे ज्याला जनता जनार्दनाच्यामधून अध्यात्माद्वारे परमात्म्याला भेटावयाचे असेल, त्याने खरे तर माणुसकीकडे वळावयास हवे. ही विज्ञाननिष्ठ व्यवस्था परिवर्तनाची जाण देते. अध्यात्म त्याबद्दल जर बोलत नसेल तर ते फुकाचे अध्यात्म ठरते. उदा. दरवर्षी निघणाऱ्या आषाढी वारीच्या अध्यात्मिकतेबद्दल बरेच काही बोलले जाते. प्रत्यक्षात मात्र काही शतके-वैष्णवाचा धर्म वैष्णव ते जन। भेदाभेद भ्रम अमंगळ।। म्हणणाऱ्या वारकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात त्या अमंगल भेदाचे उच्चाटन झाल्याचे कोठेही दिसत नाही. वारकरी संप्रदायाच्या प्रभावामुळे अस्पृश्यता कमी झाली, गावकुसाबाहेरच्या दलित वस्त्या गावात आल्या. आंतरजातीय लग्नाला पाठिंबा देणारी मानसिकता निर्माण झाली. निवडणुकीत जातीचा प्रभाव कमी झाला, असे काहीच झालेले दिसत नाही. परमेश्वर न मानणारी विज्ञाननिष्ठ व्यक्ती समाजपरिवर्तनासाठी जनता जनार्दनाबरोबर असण्याची शक्यता अधिक आहे आणि परमेश्वर मानणारी अध्यात्मिक व्यक्ती आज तरी शाब्दिकतेपलिकडे जनता-जनार्दनातील परमेश्वरासाठी काहीच करण्यास तयार नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

वरील सर्व मांडणीचा थोडक्यात अर्थ असा की, अहंकार सोडण्यासाठी सतत कार्यमग्न राहण्याचा सल्ला देणारे अध्यात्म, समोरील व्यक्तीचे गुणग्रहण करून मन­:शुद्धीची कल्पना मांडणारे अध्यात्म, सामूहिक सुखासाठी साधना करू मागणारे अध्यात्म, यासाठी बिचकून जाऊन विरोध करण्याचे वा त्याबरोबर भांडत बसण्याचे कारण नाही. दुसऱ्या बाजूला यातून साध्य होणार आहे, ती अभिव्यक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा माणूस अधिक सहजपणे आत्मसात करू शकेल. कारण स्वत:चे मन व आत्मभान उन्नत करणे, पर्यावरणसुसंगत वर्तन करणे आणि विज्ञाननिष्ठ परिवर्तनाबाबत आग्रही राहणे या गोष्टी विवेकवादी व्यक्ती करतच असते. या अर्थाने ती व्यक्तीच खरी अध्यात्मिक नाही काय?

शेवटी एक मुद्दा चळवळीसाठी. अध्यात्माचा दावा करणाऱ्या अनिरुद्ध बापूंच्याबद्दल असा थेट खोटा प्रचार केला जातो की, ते भक्तांना एकाच वेळी विविध देवांच्या रूपात भेटतात. दुसरे अध्यात्मिक पुरुष नरेंद्र महाराज हे तर जाहीरपणे विरोधकांचे हातपाय तोडण्याची धमकी देत असतात. आसारामबापू हे मागील जन्मातील पापामुळे या जन्मी स्त्री विधवा होते, असे खुशाल सांगतात. सत्य साईबाबा चमत्कार करतात; पण तो कधीही तपासू देत नाहीत. आणि स्वत:वर हल्ला करणाऱ्या स्वत:च्या भक्तांना अटक करण्याऐवजी गोळी घालून संपवले जाईल, असे पाहतात. निर्मलामाताच्या कुंडलिनी जागृतीला आव्हान दिले तर तिचे भक्त निदर्शकांच्यावर तुटून पडून मारहाण करतात. ही सर्व मंडळी अध्यात्मिक मानले जाणे, याचा अर्थ अध्यात्म या शब्दाचे समाजाचे आकलन अपुरे असणे आहे. दुसरे असे की, यापैकी प्रत्येकाचे वागणे अत्यंत अलिशान असते. महाप्रचंड मालमत्ता जमा झालेली असते. ती पद्धतशीरपणे अत्यंत मूठभर व्यक्तींच्या हातात केंद्रित असते आणि थोडी समाजोपयोगी कामे करून जणू काही फार मोठी सत्कृत्ये केल्याचे दावे ही मंडळी करत असतात. व्यवस्था परिवर्तनाबद्दल ते कधी चकार शब्द बोलत नाहीत. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, जातीयता, धर्मांधता, विषमता, स्त्री-भ्रूणहत्या हे त्यांचे विषयच नसतात.

याउलट गाडगेबाबा, महात्मा गांधी, विनोबाजी यांची परंपरा आहे. गाडगेबाबांनी कोट्यवधी रुपये जमा केले, प्रत्येक पैचा हिशोब चोख ठेवला आणि आयुष्यभर स्वत:ची मालमत्ता म्हणून बाळगल्या फक्त चिंध्या, हातातील काठी आणि भिक्षा घेण्यासाठी खापराचा तुकडा. उभा महाराष्ट्र स्वच्छ करण्याचे व्रत घेऊन ते हिंडले. जातीच्या उच्च-नीचतेबद्दल, अंधश्रद्धांबद्दल सतत कडाडून आसूड ओढत राहिले. विनोबाजी संपूर्ण भारतात सतत १२ वर्षे एकदाही आजारी न पडता पदयात्रा करत राहिले. ४२ लाख एकर जमीन त्यांनी दान मिळविली. त्यातील काही लाख जमिनींचे वितरणही केले. बॅरिस्टर असलेले गांधी इंग्लंडमधील कडाक्याच्या थंडीतही एकाच पंचावर राहिले. बादशहालाही तसेच भेटले आणि स्वत:च्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाले असतानाही स्वातंत्र्यदिनाला हजर न राहता नौखालीत दंगलग्रस्तांचे अश्रू पुसावयास गेले. ही सर्व माणसे अत्यंत सश्रद्ध होती. देव मानणारी होती. अध्यात्मिक उन्नतीची एक विशिष्ट उंची कष्टसाध्यतेने मिळवलेली होती आणि आजच्या कथित अध्यात्मिक पुरुषांच्यापेक्षा संपूर्ण वेगळी आणि संपूर्ण अस्सल होती. त्यांची परिभाषा देवाची, धर्माची आणि अध्यात्माची होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची परिभाषा ती असण्याचे कारण नाही; पण या विभूतींच्या जीवनातील सकारात्मकतेचा अर्थ लावताना अध्यात्म या शब्दाचा सकारात्मक (कोणी त्याला चळवळीसाठी सोयीस्कर असेही म्हणून शकेल) अर्थ लावण्यास काय हरकत आहे?

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००७)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...