रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

लोकविज्ञानाचा निष्ठावंत प्रसारक



लोकविज्ञानाचा निष्ठावंत प्रसारक
दाभोलकर, मंगल धारवाडकर, मृत्युलेख, लोकविज्ञान

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय काम करते, हे आता उभ्या महाराष्ट्राला पक्के माहीत आहे. त्याची योग्य नोंद महाराष्ट्राच्या मानसिकतेने व माध्यमाने घेतली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या संघर्षाबरोबर कळत-नकळत धर्मचिकित्साही येते. त्याचे राग-लोभ समितीला चिकटतात. त्याहीबाबत वाचकांना थोडीबहुत जाणीव आहे. पण या दोन्हीबरोबरच एक तिसरे अंग संघटनेला आहे. ते आहे, संविधानाच्या मूल्यजाणिवांसह विज्ञानप्रसाराच्या प्रबोधनाचे. खरे तर याबाबत आज प्रामुख्याने काम सुरू आहे, औरंगाबाद शहरात आणि तेही डॉ. मंगल धारवाडकर यांच्याकडून. ते नीट समजावून घेतले तर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर तर प्रकाश पडेलच; पण अनेकांना आपापल्या ठिकाणी ते पथदर्शक ठरू शकेल.

डॉ. मंगल धारवाडकर हे तंत्रज्ञानातील उच्चपदवी विभूषित आहेत. अनेक वर्षे अमेरिकेत राहिलेले आहेत. औरंगाबाद येथील प्रथितयश कॉलेजात त्यांनी विभागप्रमुख आणि प्राचार्य म्हणून जबाबदारी निभावली आहे. सध्या ते निवृत्त आहेत. गेली वीस वर्षे ते महाराष्ट्र अंनिसशी संबंधित आहेत. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प हा त्यांचा आवडीचा विभाग.

समिती महाराष्ट्रभर फिरते नभांगण आयोजित करते. हा उपक्रम अत्यंत विद्यार्थीप्रिय व समितीला नवी ओळख करून देणारा ठरला. पण याच्या प्रारंभाचे श्रेय जाते डॉ. मंगल धारवाडकरांच्याकडे. त्यांनी प्रथम आयुकाचे फिरते नभांगणाचे कार्यक्रम औरंगाबादला घेतले. त्यानंतर त्यातील ताकद ओळखून आपण महाराष्ट्रात त्याचा विस्तार केला.

महाराष्ट्र अंनिस औरंगाबाद शाखेच्या वैज्ञानिक प्रकल्पाला त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिटची जोड दिली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यासाठी महाविद्यालयातीलच विद्यार्थी त्याच कॉलेजातील राष्ट्रीय सेवा योजना केंद्राशी संबंधित असावे लागतात. राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिटचे तसे नसते. त्यामध्ये कोणतेही विद्यार्थी, निवृत्त नोकरदार, नागरिक सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्रातले हे या स्वरुपाचे पहिलेच युनिट आहे.

भारतीय संविधानात लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय व स्त्री-पुरुष समता अशा बाबींचा प्राधान्याने उल्लेख आहे. विद्यार्थ्यांपर्यंत हे विचार पोचण्यासाठी दरवर्षी त्यातील एक विषय धारवाडकर निवडतात. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अशी विनंती केली जाते की, या विषयावर दोन तासांची कार्यशाळा आपल्या महाविद्यालयात होईल. त्यांनी हॉल, ध्वनिक्षेपक द्यावा. वक्त्याला प्रवासखर्चापोटी हजार रुपये द्यावेत. विद्यार्थ्यांना उपस्थितीसाठी आवाहन करावे. आता यावर्षी १५ महाविद्यालयांत स्त्री-पुरुष समतेबाबत अशा कार्यशाळा झाल्या. सर्व ठिकाणी तरुण-तरुणींची उपस्थिती १०० ते १५० होती. वेगवेगळ्या तारखांना हा उपक्रम झाला. त्यातील एक दिवसासाठी पूर्णवेळ मेधा पाटकर आवर्जून आल्या होत्या.

यावर्षीच्या उपक्रमावर नजर टाकली तरी त्याचा वेगळेपणा चटकन लक्षात येईल. २८ नोव्हेंबरला महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी विवाहपद्धतीवर तरुणांच्या विचारांची खुली चर्चा झाली. त्यांच्या दृष्टीने संवेदनशील विषयावर त्यांनी मन:पूर्वकतेने मतप्रदर्शन केले. २६ डिसेंबरला बालविज्ञान प्रदर्शन झाले. पाणी आडवणे, जिरवणे, जलप्रदूषण रोखणे, अन्नभेसळ ओळखणे अशा अनेक बाबींचा परिचय बालचमूंना झाला. २ जानेवारीला फुले दांपत्य, फातिमाबी शेख यांचे जीवनकार्य नाटिका, पोवाडा या रूपाने सादर करण्यात आले. विशेष म्हणजे या सादरीकरणात हमाल मापाडी, मोलकरीण यांच्या संघटनांतील कामगारांच्या मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिट बरोबर होतीच. बालविज्ञान आनंद मेळाव्यात विज्ञान, भूगोल या अभ्यासक्रमातील प्रयोग सादर करण्याची कार्यशाळा शाळेतील मुलांसाठी झाली. तज्ज्ञ प्राध्यापकांनी स्वयंसेवी पद्धतीने त्यात मुलांना मार्गदर्शन केले. याबरोबरच मुलांनी स्वत: दोन प्रयोग करावयाचे होते. त्याचे सामाजिक महत्त्व सांगावयाचे होते. यामध्ये एकूण १२० मुलांनी सहभाग घेतला. त्यांना अगदी आगळे-वेगळे बक्षीस देण्यात आले. पहिल्या २० जणांना लोणारचे प्रख्यात सरोवर, २१ ते ४० या नंबरांना पाबलचा विज्ञानाश्रम आणि ४१ ते ६० यांना आयुका भेट असे ते बक्षीस होते. या प्रवासाचा एक वेळचा खर्च सोसण्यात आला. २६ फेब्रुवारीला मानसिकता व समाज यावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित झाली. , मानसिकता, ताणावर मात, यशस्वी परस्परसंवाद अशी ही सशुल्क कार्यशाळा झाली. दि. ७ - ८ मार्चला अगदी वेगळीच कार्यशाळा होती. तिचा विषय होता लाईफ सायन्सेस (मेडिसीन, केमिस्ट्री, बॉटनी, मायक्रोबायॉलॉजी, झुआलॉजी) व तंत्रज्ञान विषय. या विषयातील मराठवाडा विभागातील महिलांची कामगिरी, तिची दखल घेणे, मूल्यमापन करणे, भावी वाटचालीचे चिंतन करणे. दि. ८ मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर याचे वेगळे महत्त्व सांगायला नकोच. एक सामाजिक जाणिवा प्रकल्पही संकल्पित आहे. आपल्या शहरातील सांडपाण्याचा निचरा, ध्वनिप्रदूषण, पाण्याची गुणवत्ता, भाजीपाला, फळे यांची गुणवत्ता ट्रॅफीक नियोजन यादृष्टीने काम करू इच्छिणारे जे-जे कोणी आहेत, त्यांना एकत्रित, प्रशिक्षित व कार्यान्वित करणे असे त्याचे स्वरूप आहे.

औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात उर्दू शाळा आहेत. त्या शाळेतील सर्वेक्षण असे दाखवते की, या शाळेतील आठवी, नववीमधील १० टक्के मुले व २० टक्के मुली शाळेतून बाहेर फेकल्या जातात. घरचे दारिद्र्य आणि शिक्षणाचा पालकांच्यात अभाव ही त्याची महत्त्वाची दोन कारणे आहेत. धारवाडकरांनी एकूण १३ शाळांतील अशी गरीब ४० मुले निवडली. त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची शैक्षणिक साधनसामग्री लोकदेणग्यांतून दिली. १२ फेब्रुवारीला हे वाटप झाले. सर्व पालकांची मुले आली होती. त्यांच्या पालकांनी, ‘आम्ही या मुलांना शाळेतून गळू देणार नाही. तुमच्या मदतीने आमचा उत्साह, उमेद वाढली आहे,’ असे सांगितले. १८ ते २५ मेदरम्यान बाबा आमटेंच्या ‘आनंदवन’चे शिबीर आणि जूनमधील डॉ. अभय बंग यांच्याकडचे शिबीर यांना विद्यार्थ्यानी जावे, अशी ही धारवाडकरांची धडपड सुरू आहे.

धारवाडकरांना या वर्षात गंभीर आजाराला तोंड द्यावे लागले. त्यांचे उपचार, पथ्यपाणी अजूनही सुरूच आहे. काळजी कमी झाली; पण पूर्णांशाने गेली, असे नाही. या सर्व परिस्थितीवर मात करत ते झपाट्याने हा लोकविज्ञानाचा कार्यक्रम राबवीत आहेत. मला वाटते, तो ‘अंनिस’चे कार्यकर्ते व हितचिंतक सर्वांनाच पथदर्शक ठरावा.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल २०११)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...