शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

विवेकी चैतन्य लोपले



विवेकी चैतन्य लोपले
दाभोलकर, आर. ए. जागीरदार, मृत्युलेख, अनुभव, रॅशनॅलिस्ट फौंडेशन, रीझन

एखाद्या व्यक्तीचे जगणे हाच एक उत्सव असतो. त्याच्यासाठी नव्हे, तर त्याच्या सहवासात येणाऱ्या सर्वांसाठी. न्या. राघवेंद्र जागीरदार हा असा एक उत्सव होता. यावर्षीच्या २३ फेब्रुवारीला तो संपला.

जहागिरदार अंतर्बाह्य निखळ होते. एका बाजूला विचारशीलता, तत्त्वनिष्ठा होती. दुसऱ्या बाजूला शिस्तबद्ध नीटनेटके जीवन, सौंदर्यदृष्टी, जीवन जगण्याची हौस या बाबी होत्या. या दोन्हींचा मेळ घालता-घालता भल्याभल्यांची दमछाक होते. राघवेंद्र जहागिरदारांना ते सहज साधले होते. तुका म्हणे झरा। आहे मूळचाचि खरा।। याची मूर्तिमंत प्रचिती म्हणजे त्यांचे जगणे होते.

१५ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन. तो भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणूनच ओळखला जातो. स्वातंत्र्य हेच सर्वोच्च मूल्य मानणाऱ्या मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तत्त्वज्ञानाच्या पाईकाला हाच जन्मदिवस लाभावा, हे किती अन्वयार्थक आहे. न्या. जहागिरदारांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी रॉय यांनाही (रॉय यांच्या इतर काही अनुयायांप्रमाणे) आंधळेपणाने अजिबात अनुसरले नाही. रॉय यांच्या २२ मुद्द्यां’च्या सुप्रसिद्ध प्रबोधनाबाबतही त्यांनी आपली चिकित्सक बुद्धी वापरून काही प्रश्न उपस्थित केले होते.

न्या. जहागिरदार विवेकवादी होते. देव कल्पनेला स्पष्टपणे नकार देणारे होते आणि तरीही त्यांचा पिंड हा मानवतावादी विचारांचा अधिक होता. देव आणि धर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत, ही महाराष्ट्र अंनिसची भूमिका त्यांना अधिक योग्य वाटत होती. न्यायमूर्ती म्हणून निर्णय देतानाही त्यांनी कायद्याच्या कक्षेत माणुसकीच्या बाजूने झुकते माप दिले. त्यांच्यासमोर आलेल्या एका केसमध्ये बाईने विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि स्वत:बरोबर स्वत:च्या मुलालाही घेतले, असा आरोप होता. आरोपीच्या वकिलांनी आरोपी विहिरीत पडल्यानंतर मदतीसाठी ओरडत होता (म्हणजेच त्याचा आत्महत्येचा हेतू नव्हता), असा बचाव घेतला. तो न्यायमूर्तींनी मान्य केला. त्यांचे मत असे होते की, त्या बाईला शिक्षा ठोठावणे म्हणजे तिच्या मुलाचे जगणेच पूर्ण उद्ध्वस्त करण्यासारखे होते, जे टाळणे त्यांना इष्ट वाटले.

न्या. जहागिरदारांच्या पिढीचा कालखंड हा मार्क्सवादी, समाजवाद, गांधीवाद अशा एखाद्या विचारधारेच्या आधारे जीवनातील सर्व प्रश्नांना उत्तरे मिळू शकतात, असे मांडण्याचा होता. या सर्वांपलिकडे विवेक हे तत्त्व न्यायमूर्ती महोदयांना महत्त्वाचे वाटत होते. जीवन असंवेदनशील नसावे, हाव कमी व्हावी, अंधश्रद्धांना थारा देऊ नये, विचारात कर्मठपणा नसावा, या बाबींना त्यांच्या लेखी अधिक मूल्य होते. या मूल्यांचा पाठपुरावा त्यांनी कृतिशीलपणे केला. विचारांच्या प्रसाराचे काम मनापासून केले. १९३१ ते १९४२ पर्यंतचे रीझन या मासिकाचे अंक विचारप्रचारार्थ स्कॅन करून सी.डी.च्या रूपाने लोकांना उपलब्ध करून दिले. अनेक लेख लिहिले, भाषणे दिली. विवेकवादी विचारांच्या कार्यक्रमात स्वत:हून हजेरी लावली. त्यांचे लिहिणे, बोलणे इंग्रजीत असे. खरे तर ही बाब भारदस्तपणा प्राप्त करून देणारी. पण न्यायमूर्तींनी मात्र आपणास मराठीत लिहिणे, बोलणे चांगले जमले असते, तर लोकांच्या अधिक जवळ जाता आले असते, याची खंत बाळगली. मला त्यांनी ती अनेकदा बोलून दाखवली.

लोकांत जाऊन विवेकवादाची चळवळ चालवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल त्यांना मनापासून आस्था होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला त्यांनी अंत:करणपूर्वक व सर्व प्रकारे मदत केली. समितीच्या दिवाळी अंकातील परिसंवाद प्रायोजित केले. पुस्तके प्रकाशित करण्यासाठी अर्थसहाय्य दिले. वास्तुशास्त्राच्या विरोधात दादर येथे घेतलेल्या व गाजलेल्या परिसंवादाचे अध्यक्षपद स्वीकारले. माझी महत्त्वाची एक आठवण आहे. निर्मलामातेच्या भक्तांनी समितीवर खोटा खटला दाखल केला. सातारा येथील जिल्हा न्यायालयात त्याचा निर्णय समितीच्या बाजूने लागला. हायकोर्टमध्ये अपील झाले. हायकोर्टात कोण वकील द्यावयाचा, हे आम्हाला माहीत नव्हते, परवडणारेही नव्हते. त्यावेळी वकील झालेले न्या. जहागिरदार त्यांच्या गाडीतून एका नामवंत वकिलाकडे आम्हाला घेऊन गेले. स्वाभाविकच आमचे पुढचे सर्व प्रश्न चुटकीसारखे सोपे झाले. ती केस आम्ही हायकोर्टात जिंकली.

आपण ज्या संघटनेचे भाग आहोत, त्यामध्ये तरुण नाहीत, याची खंत त्यांना सतत जाणवत असे. त्याबाबतचे एक वाक्य ते मला विनोदाने सतत ऐकवत. ते म्हणत, ‘मी अवघा ६८ वर्षांचा आहे आणि माझ्या संघटनेतला सर्वांत तरुण आहे. अखेरपर्यंत या ब्लॅक ह्यूमरमधील स्वत:ची वयोमर्यादा वाढत गेली, एवढेच. काम पुढे नेण्यासाठी स्वत:च्या उत्पन्नातूनच काही लाख रुपये बाजूला काढून त्यांनी रॅशनॅलिस्ट फौंडेशनची स्थापना केली. आपल्या हयातीत प्रामुख्याने तरुणांच्याकडे त्याची जबाबदारी सोपवली. अंनिसशी संबंधित ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी आता त्या न्यासाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. त्यामार्फत न्या. जहागिरदारांच्या लेखनाचे दोन इंग्लिश खंड देखणेपणे प्रकाशित होऊन महाराष्ट्रातील महाविद्यालयांना पोचले आहेत.
न्या. जहागिरदारांची अखेरची काही वर्षे आजारपणात गेली. तीव्र दुखण्याच्या तडाख्यातून ते वाचले. त्यांना ओळखणाऱ्यांनी गमतीने हा उपकारकर्ता हात देवाचा आहे असे सांगितले. न्या. जहागिरदारांनी मात्र यथार्थतेने याचे सारे श्रेय आपल्या नामवंत डॉक्टर पत्नी शरद जहागिरदार यांना दिले. ते सर्वार्थाने खरेही होते. त्यांच्या अखेरच्या आजारपणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संभाव्य वास्तूसाठी फार मोठी देणगीही त्यांच्यावतीने श्रीमती जहागिरदार यांच्यामार्फत मिळाली. वास्तू होईल त्यावेळी त्याच्या सभागृहास न्या. राघवेंद्र जहागिरदार यांचे नाव सन्मानपूर्वक देण्यात येईलच; पण न्यायमूर्तींच्या अस्तित्वाअभावी निर्माण होणारी पोकळी मात्र भरून निघणे कठीण. त्यांच्या स्मृतीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परिवाराचे विनम्र अभिवादन!

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल २०११)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...