सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

होळीची परंपरा : कालोचित कृती करावी



होळीची परंपरा : कालोचित कृती करावी

दाभोलकर, होळी उत्सव, पर्यावरण, विधायक पर्याय
मानवी जीवनात सणांना मोठे स्थान आहे. सणांमुळे घरात, समाजात सगळे एकत्र येतात. वातावरण आनंदी बनते. सामाजिक ऐक्य सहजपणे साधते. मात्र असे सण साजरे करताना कालोचित बदलाचे भान हरपले, तर आर्थिक नुकसान होते, पर्यावरणाची हानी होते. शेतीचा शोध लागल्यावर घनदाट जंगले तोडावी लागली. त्यांची होळी करण्याची प्रथा सुरू झाली. आता काळ बदलला. प्रदूषणाच्या विळख्यात पर्यावरण सापडले. पर्यावरणावरच माणसाचे जीवन अवलंबून असल्याने शाळेत हा विषय अनिवार्य बनला. झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण हटवा ही देशाची गरज बनली. होळीच्या पारंपरिक सणाचा यासाठीच पुनर्विचार करावयास हवा. घरातील लक्षावधी आणि हजारो सार्वजनिक होळ्या श्रद्धेने, हौसेने पेटवल्या जातात. घरच्या होळीत पाच शेणी, आंबा, एरंड याची डहाळी, पुरणाची पोळी यांची आहुती दिली जाते. सार्वजनिक होळीत वाकलेली झाडेझुडपे, मोडके लाकडी फर्निचर, लाकडाचे ओंडके जाळतात. खोडकर मुले पूर्वी चोरून हे मिळवत. आता चौकाचौकातील होळी मंडळे रीतसर वर्गणी काढून मोठे ओंडके आणतात. काही हजार टन लाकूड एका दिवसात भस्मसात होते. गोवऱ्या आणि पुराणपोळ्याही होळीत पडतातच. गोवऱ्या न देणाऱ्याच्या नावाने शंखध्वनी केला जातो. सभ्यतेला शरमेने मान खाली घालावयास लावणाऱ्या शिव्यांची लाखोली चवीने उच्चारली जाते.
गोरगरिबांच्या रोजच्या इंधनाचा प्रश्न देशात बिकट आहे. पावसाळ्यातील त्यांच्या इंधनसामग्रीची अशी हौशी उधळपट्टी कितपत योग्य? वृक्षतोड करून मिळालेले मोठे ओंडके वर्गणी काढून जाळणे, हवेतील धूर आणि उष्मा वाढवणे, हेही श्रेयस्कर नाहीच. होळीत बहुसंख्य ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या आवर्जून जाळल्या जातात. यामुळे बरेच उत्तम शेणखत वाया जाते. जमिनीला एक वेळ शेणखत घातले तर जमिनीचा कस पुढे चार ते पाच वर्षे उत्तम राहतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. होळीतील गोवऱ्या जाळण्याऐवजी शेतात वापरल्या तर कस वाढेल. रासायनिक खताची मात्रा कमी होईल व त्यामुळे होणारे मातीचे प्रदूषण वाचेल. घराघरातील होळीच्या पाच गोवऱ्यांचेदेखील घरातील कुंड्यांना उत्तम खत होईल. परसबाग फुलेल.
पूजा करून होळीला पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. क्षणार्धात पोळी जळून खाक होते. याच पोळीने देशातील दारिद्रयरेषेखालच्या कोट्यवधी देशबांधवांच्या पोटात पेटलेली भुकेची होळी काहीजणांबाबत एक वेळ तरी शांत होईल. भुकेल्याला अन्न हाच खरा धर्म ही संत गाडगेबाबांची शिकवणूक प्रत्यक्षात येईल. पोळीची चवच माहिती नसणाऱ्या या देशबांधवांचा विचारच होळीत पोळी टाकण्यापासून आपल्याला परावृत्त करू शकतो. शहरातील रस्त्यांची दूरवस्था, हा नेहमीच नागरिकांच्या नाराजीचा विषय असतो. आपल्याच पैशातून तयार झालेले डांबरी रस्ते होळीमुळे खराब होतात. हे टाळण्यातच सुजाण नागरिकत्व नाही काय? होळीच्या सणातील आनंदाचा सामुदायिक जीवनाचा भाग कायम ठेवायचा; परंतु त्याला कालोचित विधायक रूप द्यायचे, हा प्रयत्न गेली सहा वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. होळी केली जाते; पण कशाची? सण साजरा करू इच्छिणाऱ्या भागातील लोकांनी एकत्र जमायचे. स्वत:ची शक्ती, वेळ यांचा मेळ घालत
आपल्या आजूबाजूचा जमेल तेवढा परिसर झाडून लख्ख करायचा. जमा होणाऱ्या कोरड्या कचऱ्याची होळी पेटवायची. त्याचबरोबर माणूस म्हणून आपणा सर्वांत असणाऱ्या दुर्गुणांचा एक प्रतीकात्मक पुतळा करायचा. त्याच्या विविध भागांना आळस, कामचुकारपणा, भ्रष्टाचार अशी नावे द्यायची. त्यापासून मुक्त होण्याचा संकल्प करत त्या पुतळ्याची होळी पेटवायची. लोक जमलेले असतातच. त्यांना पर्यावरणरक्षणाचे महत्त्व थोडक्यात समजून सांगायचे आणि सर्वांनी मिळून स्त्री-सन्मानाच्या घोषणा बुलंदपणे द्यायच्या. गोवऱ्या परसबागेत अथवा फुलझाडांच्या कुंड्यांना पोचवायच्या. एकही पोळी होळीत न पडता त्या गोळा होऊन नियोजनबद्ध पद्धतीने गरिबांच्या मुखात पोचतील हे पाहायचे; अन्यथा त्या पोळ्यांचे सहभोजन करायचे. बोंब न मारणे चांगलेच; पण अगदीच राहवले नाही, तर सामान्य माणसाच्या असंख्य अडचणी आठवायच्या, त्या निर्माण करणाऱ्या व्यवस्थेच्या अनागोंदीविरुद्ध बोंब मारायची. होळी पेटवलीच तर ती छोट्यात छोटी करायची. ती पेटवण्याच्या जागेच्या जवळपास विजेच्या वा टेलिफोनच्या तारा नाहीत; गवताची गंजी, गॅस, स्फोटके नाहीत, याची खात्री करायची. होळीसाठी कोणतीही वस्तू चोरून आणायची नाही. डांबरी रस्ते खराब होऊ नयेत, हे पाहायचे. गेल्या सहा वर्षांत हा विचार पाहता-पाहता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत पसरला. काही ठिकाणी तो उपक्रमाच्या पातळीवर होता, तर काही ठिकाणी त्याची जनचळवळ बनली. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात प्राथमिक शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी त्यात हिरिरीने उतरले. रयत शिक्षण संस्था ही भारतातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था. त्यांनी स्वत:च्या शाखांत हा विचार कृती कार्यक्रमाच्या स्वरुपात पोचवला. कोल्हापूर विभागाचे उच्च शिक्षणाचे सहसंचालक, माध्यमिक शिक्षणाचे उपसंचालक, महानगरपालिका शिक्षण मंडळ यांनी या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी आदेशाद्वारे अनुकुलता प्राप्त करून दिली. अनेक शाळांनी या विषयावर शाळेत फलकलेखन केले. काही शाळांनी प्रार्थनेच्या वेळीपरिपाठाला, मूल्यशिक्षणात होळी साजरी करण्याचे हे नवे रूप बिंबवले. त्याही पुढे एक पाऊल टाकून होळी टाळा-पर्यावरण राखा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘होळी टाळा-इंधन वाचवा अशा घोषणांनी दुमदुमणाऱ्या फेऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुलांनी आपल्या परिसरातून काढल्या. नगरसेवक, महापौर यांनी पाठिंबा दिला. सार्वजनिक होळीतील मुलांचा सहभाग कमी झाल्याचे जाणवले. एका शाळेने आपल्या परिसरातील बांधकाम मजूर, गरजू कुटुंबे, इतर धर्मीय यांची नोंद घेऊन त्यांना सन्मानाने पोळीची मेजवानी दिली. एकट्या कोल्हापुरात मागील वर्षी पंधरा हजार पोळ्या जमल्या. मूल्यशिक्षणाला कृतीची जोड शक्य असलेली उपक्रमशीलता लाभली की, परिवर्तनाचा विचार कसा प्रवाही होतो, याचा वस्तुपाठच प्रथा निर्मूया नवी निराळी, करूया अमंगलाची होळी यातून उभा राहत आहे.
कृती कार्यक्रम
दुर्गुणाचा पुतळा जाळला तरी प्रदूषण होतेच. यासाठी सर्वात चांगले म्हणजे विद्यार्थ्यांनी संकल्पपूर्वक स्वत:मधील एका दुर्गुणाची होळी करण्याचे संकल्पपत्र भरून द्यावयाचे. हे संकल्पपत्र स्वतंत्रपणे वार्तापत्रात छापले आहे. तशी संकल्पपत्रे छापून घ्यावीत. मुख्याध्यापक, शिक्षक यांनी प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांशी बोलावे. मगच संकल्पपत्रे भरून घ्यावीत. पालकांची सही अत्यावश्यक. सातारा येथे हा उपक्रम झाला, त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी जास्त वेळ टी.व्ही.पाहणे हा दुर्गुण लिहिला होता.
याबाबत शाळांच्या समवेत संपर्क साधणे आता अधिकृत झाले आहे. कारण शिक्षण खात्याने पर्यावरणसुसंगत होळीबाबत पत्रक काढले आहे. तेही स्वतंत्रपणे छापले आहे. यामुळे शासनाच्या शैक्षणिक कार्यालाच आपण मदत करत आहोत. तेव्हा शिक्षण संस्थांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

संकल्पपत्राचा नमुना
प्रथा निर्मूया नवी-निराळी, करूया अमंगलाची होळी..
शैक्षणिक प्रकल्प-संकल्प स्वीकारणे
पर्यावरणाचा विचार, गरीब देशबांधवांचे हित व माझा विकास याच्याशी सुसंगत अशा पद्धतीने यावर्षी पुढीलप्रमाणे होळी साजरी करण्याचा संकल्प मी करतो/मी करते आहे.
संकल्प -
१) होळीत लाकडे जाळून वृक्षसंपदेची हानी करणार नाही. होळीनिमित्त बोंब मारणे, अपशब्द उच्चारणे यापासून कटाक्षाने दूर राहीन.
२) घरातून होळीमध्ये पुरणाची पोळी अर्पण केली जाणार असल्यास त्याऐवजी ती पोळी भुकेलेल्या, गरजू देशबांधवांच्या मुखात पोचवण्याचा प्रयत्न करेन.
३) येत्या वर्षात माझ्यामधील पुढील एका दुर्गुणाची होळी प्रयत्नपूर्वक करेन. (पालकांशी बोलून तो दुर्गुण पुढील ओळीत लिहावा.)
स्वत:चे नाव :
शाळेचे नाव :
सूचना : ही संकल्पपत्रे स्वेच्छेने भरून गुरुवार, ता. १९ मार्चपर्यंत वर्गशिक्षकांना द्यावीत.
पुरणपोळी संकलन केंद्र (संकलन करण्याचा निर्णय शाळेने घेतल्यास)
१)  आपली शाळा :
२)  आवश्यक असल्यास अन्य केंद्राची नावे (जसे - कार्यकर्त्यांची घरे, अन्य सार्वजनिक संस्था) टाकावीत.
- प्रकाशक : अंधश्रद्धा निर्मूलन समिती

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (मार्च २००८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...