मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

आम्हाला तुमचा अभिमान वाटतो



आम्हाला तुमचा अभिमान वाटतो
दाभोलकर, मिलिंद देशमुख, नितीन राऊत, अभिवादन, प्रेरणा, विश्वविक्रम

मिलिंद देशमुख हे सध्या महाराष्ट्राचे प्रधान सचिव आहेत. परंतु ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी राज्य पातळीवर समिती निर्माण होण्यापूर्वी पुणे येथे जे काम सुरू होते, तेव्हापासून संबंधित आहेत. ते राहतात देहू रोडला, त्यांचे काम चालते, पिंपरी-चिंचवड शाखेबरोबर; परंतु तरीही गेली २५ वर्षे ते पुणे शहर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही अत्यंत क्रियाशील कार्यकर्ते आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आता ते चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.

डोक्यावर भरलेल्या दुधाच्या बाटल्या घेऊन सलग १०४ किलोमीटर चालण्याचा विश्वविक्रम त्यांनी १३ मे १९९३ ला पुणे येथे केला. त्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नामांकित पुस्तकातही अधिकृतपणे झाली. या विक्रमाला १३ मे २०१३ मध्ये बरोबर २० वर्षे पूर्ण झाली. यासाठी त्या विक्रमाचा द्विदशकपूर्ती सोहळा पिंपरी-चिंचवड शाखेने उत्तम प्रकारे साजरा केला. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत साजरा झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी-चिंचवड शाखेच्या लौकिकाप्रमाणे उत्तम होते. कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद होता. यामध्ये अर्थातच गेल्या २० वर्षांतील मिलिंदच्या संघटनात्मक धडपडीचा मोठा वाटा होता. आलेल्या सर्वांना मिलिंदबद्दल अगत्य आणि मन:पूर्वक जिव्हाळा होता. अनेकांनी मिलिंदबाबतची आपली छोटीखानी मनोगते व्यक्त केली. मिलिंदने या प्रदीर्घ काळात जोपासलेल्या ऋणानुबंधाच्या गाठींची ती साक्ष होती. त्याच्या कन्येने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मिलिंदची पत्नी बोलली, हेही छानच झाले. मिलिंदवर तयार केलेली छोटी चित्रफीत दाखवण्यात आली. ते दर्शन भावणारे होते. मिलिंदची मुलाखत घेतली गेली. त्यामधून विक्रमाची उजळणी झालीच; पण त्या विक्रमामागे चळवळ बळकट करण्याचे जे मानस होते, तेही यथोचित उलगडले गेले. मुद्दामहूनच कोणाचाही नामोल्लेख केला नाही. कार्य घरचेच आहे, या भावनेने सहभागी झालेल्याचा ता आनंद सोहळा होता. त्यानिमित्ताने व्यक्त झालेली मिलिंदची व संघटनेची भावकी ही त्याच्या  विश्वविक्रमाएवढीच सुखावणारी होती.

नितीन राऊत
रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन राऊत यांच्या कन्येचा विवाह सोहळा हा परिवर्तनाचा आनंद सोहळा करण्याची किमया नितीन राऊत, त्यांची पत्नी, त्यांचे व्याही आणि अर्थातच मुलगी आणि जावई यांनी करून दाखवली. सिंहाचा वाटा नितीन राऊत यांच्याकडेच जातो.

नोंदणी लग्न स्वागत समारंभाच्या दिवशी सकाळीच पार पडले होते. स्वागत सोहळा साधा; परंतु आनंददायी व आशयसंपन्न होता. भपकेबाजपणा टाळूनही त्यात एक देखणेपणा होता. स्वागत समारंभाच्या प्रवेशद्वारापासून ते वेगळेपण येणाऱ्यांना जाणवत होते. प्रवेशद्वाराला ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांचे नाव दिलेले होते. प्रवेशद्वाराच्या कमानीच्या दोन्ही बाजूस एकीकडे सावित्रीबाई व दुसरीकडे जोतिराव फुले यांचे फोटो होते. मुख्य स्थळी पोचण्यासाठी बराच मोठा पॅसेज चालून जावे लागत होते. त्या मार्गावर दुतर्फा महाराष्ट्रातील समाजसुधारक, नामवंत साहित्यिक, शास्त्रज्ञ यांचे फोटो होते आणि त्याखाली नेमक्या शब्दांत या मान्यवरांच्या कार्याची महती वर्णिली होती. पुढे गेले की, मुख्य स्थळाकडे जाताना छोट्या कमानीचा रस्ता होता. त्या प्रत्येक कमानीवर वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, व्यसनमुक्ती याबाबत मार्गदर्शक ठरणारी वाक्ये होती. त्या पलिकडे ग्रंथप्रदर्शन लावले होते. बहुतेक ग्रंथ समितीच्या विचाराला उठाव देणारे होते. आनंदाची बाब म्हणजे आठ हजार रुपयांची पुस्तके विकली गेली. वधू-वरांच्या स्वागतमंचला परिवर्तनाची सप्तपदी असे नाव देण्यात आले होते. या मंचाच्या चारी बाजूंनी नेत्रदानाची महती सांगणारी घोषवाक्ये लावली होती.

खरे तर विवाह हा लोकमानसात मंगल व शुभ सोहळा मानला जातो आणि नेत्रदान ही व्यक्ती निधनाच्या दु:खद घटनेनंतर करावयाची बाब आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या होत्या; परंतु कोणालाही या खटकल्यासारख्या वाटल्या नाहीत. मानसिकता बदलत आहे, याचाच तो सुखद प्रत्यय होता. बुवाबाजीविरोधातील मंगेश पाडगावकरांची कविताही ठळकपणे लावली होती. विशेष म्हणजे पूर्वसूचना देऊन आहेर स्वीकारला जात होता आणि ती सर्व रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी जाणार, हे आधीच जाहीर केले होते. विवाहातील खर्चात कपात करून दुष्काळग्रस्तांसाठी नितीन राऊत यांनी ५० हजार रुपये दिले आणि या पद्धतीने परिवर्तनाचा आनंद सोहळा कल्पकतेने करणाऱ्या महाराष्ट्र अंनिसच्या एका कार्यकर्त्याला प्रतिवर्षी स्वत:च्या वडिलांच्या नावाने पाच हजार रुपयांचा पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला रुपये ६० हजारांची देणगी घोषित केली. स्वागत समारंभाच्या स्थळावरून बाहेर पडताना स्वागत कमानीच्या मागील बाजूस लावलेली अक्षरे डोळ्यांसमोर येत होती. ती होती, ‘पाऊले चालती परिवर्तनाची वाट...’

आपल्या कृतिशीलतेने ही वाट संपन्न करणाऱ्या मिलिंदचा आणि नितीनचा सर्व चळवळीला जो अभिमान वाटतो, तो मी या लेखाद्वारे व्यक्त करत आहे, एवढेच.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जून २०१३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...