सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

प्रभावी कार्याचा स्रोत (भाग 2)



प्रभावी कार्याचा स्रोत (भाग 2)
दाभोलकर, कार्यक्रम, जाहीरनामा, भूमिका 



विविध उपक्रम
अ) अंध्दश्रध्दा निर्मूलनासाठी युवा एल्गार
विद्यार्थी वर्गाचा मोठा सहभाग मिळणे, यावरच कोणत्याही चळवळीचे यश अवलंबून असते. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक संकल्पपत्र तयार केले. या संकल्पपत्रात एकूण १० संकल्प होते. मी जन्मकुंडली न पाहता लग्न करेन, नशीब या कल्पनेचा त्याग करेन व प्रयत्नावर विश्वास ठेवेन, पाहण्यात आलेल्या प्रत्येक चमत्काराच्या चिकित्सेचा आग्रह धरेन, विवाहपूर्व वैद्यकीय तपासणी करेन. या स्वरुपाचे हे संकल्प होत. युवकाने जाणीवपूर्वक व स्वत:च्या जबाबदारीवर संकल्प स्वीकारावेत आणि त्यांचा पाठपुरावाही करावा, अशी कल्पना होती. २५ हजार विद्यार्थ्यांनी ही संकल्पपत्रे भरून या कल्पनेस प्रचंड प्रतिसाद दिला.

ब) सर्प आणि अंध्दश्रध्दा
सर्प हा नेहमीच भीतीचा विषय राहिला आहे. खरे तर सर्प हा माणसाला उपयुक्त असा पर्यावरणाचा मित्र आहे आणि चार जाती वगळता बाकीचे सर्प बिनविषारी असतात. परंतु बहुतेकांना त्यामुळेच यापैकी काहीच माहीत नसते. यामुळेच बाकीचे सर्पाबाबत पराकोटीच्या अंधश्रद्धा आढळतात. या अंधश्रद्धा दूर करणे व सर्पाबाबत उपयुक्त ज्ञान पोचविणे, हे कार्य समितीचे सर्पतज्ज्ञ सतत करत असतात. जिवंत विषारी, बिनविषारी सर्पासह सादर केले जाणारे हे प्रबोधन लोकांना खूप आवडते, असा अनुभव आहे.

क) चर्चासत्रे
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात वैचारिक जाणीव सजग ठेवण्याची फार आवश्यकता असते. विशेषत: हे कार्य ज्या दोन घटकांत प्रभावीपणे केले जाणार आहे, त्यामध्ये याची गरज अधिक जाणवते. यापैकी एक घटक विद्यार्थ्यांचा आणि दुसरा महिलांचा. या दोन्हीही विषयांवर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलावून महाराष्ट्र पातळीवरील चर्चासत्रे आयोजित केली होती. यामुळे या क्षेत्रात करावयाच्या कार्याबद्दल अधिक तपशीलवार व सर्वांगीण कल्पना येऊ शकली. यामधूनच पुढे सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प उभा राहिला.

ड) व्यसनविरोध
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य समिती करते. कारण अंधश्रद्धा माणसाचा विवेक नाहीसा करतात. नेमके हेच व्यसनाकडूनही घडते. अंधश्रद्ध माणूस स्वत: अंधश्रद्ध आहे, हे कधी कबूल करत नाही आणि व्यसनी माणूसही स्वत:चे व्यसन मान्य करत नाही. व्यक्तीच्या अंधश्रद्धेमुळे त्याला त्रास होतोच; परंतु आजूबाजूच्या कुटुंबाचे, समाजाचे वातावरण बिघडते. व्यसनामुळे नेमके हेच घडते. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबर व्यसनविरोधाचे कार्यही समिती अनुषंगिक म्हणून करते. समितीचे कार्यकर्ते गावोगाव करत असलेल्या प्रबोधनात व्यसनविरोधी विचार आग्रहाने मांडतात.


इ) २१ सप्टेंबर १९९५ ला महाराष्ट्रात व जगात अनेक ठिकाणी गणरायाने दुग्धप्राशन केले. ज्या पद्धतीने अफवा पसरवण्यात आली. त्यावर लोकांनी विश्वास ठेवला. भल्याभल्यांनी त्याला मान्यता दिली. ते सर्वसामान्य माणसाला चक्रावून टाकणारे होते. त्यावेळी समितीच्या महाराष्ट्रातील सर्व शाखांनी या अफवेचा प्रतिकार करून लोकांच्यासमोर सत्य मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.  परंतु या घटनेमुळे चमत्काराबरोबर सहज वाहून जाणारी लोकमानसिकता लख्खपणे पुढे आली. यासाठी दरवर्षी २१ सप्टेंबर हा चमत्कार सत्यशोधन दिन म्हणून साजरा करण्याचे समितीने ठरविले आहे. यासाठी पहिल्याच वर्षी म्हणजे १९९६ साली दुग्धप्राशन करणाऱ्या गणरायाला विद्यार्थ्यांचे पत्र अशी लेखन स्पर्धा समितीने घेतली. तिला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन हजार विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. ते सर्व गडचिरोलीपासून सिंधुदुर्गपर्यंतचे होते.

याबरोबरच समितीने १ जानेवारी हा दिवस प्रतिवर्षी आंतरजातीय विवाह स्वागत दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. जात ही देशाच्या विकासात अडसर बनलेली फार मोठी अंधश्रद्धा आहे. आंतरजातीय विवाह हा यावरील एक प्रभावी उपाय आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती आंतरजातीय विवाह करतील, त्यांचे समाजात आवर्जून व नियमितपणे कौतुक होत राहिले पाहिजे, ही कल्पना यामागे आहेच. परंतु त्याबरोबरच आंतरजातीय विवाह करून समाजपरिवर्तनाला प्रभावी हातभार लावलेले लोक समाजात विखुरलेले आहेत. ते यानिमित्ताने संघटित झाले तर मोठेच सामाजिक कार्य ठरेल, असे समितीला वाटते.

ई) दैवी वास्तुशास्त्राला विरोध
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात; विशेषत: शहरात व सुशिक्षितांत घर बांधताना एक नवीनच प्रकार उदयाला आला आहे. घर सुरक्षित, सोयीचे आवडी-निवडीप्रमाणे बांधणे हे योग्यच आहे. परंतु याऐवजी लाभणारे घर कसे बांधावे अथवा अस्तित्वात असलेल्या घराची मोडतोड करून ते लाभदायी कसे बनवावे, याचे विज्ञान (!) म्हणजे दैवी वास्तुशास्त्र. महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या वास्तुशास्त्रापेक्षा हे अगदी वेगळे असते. त्याला कोणताही आधार नसतो; आधार असतो प्राचीन  वाङ्मयाचा आणि दावा असतो ते सर्व अत्यंत अचूक असल्याचा. हे फॅड फार झपाट्याने महाराष्ट्रात सर्वत्र पसरले आहे. याचे अधिकृत शिक्षण विद्यापीठात सुरू करावे आणि नगरविकासाच्या आराखड्याचे नियम त्याप्रमाणे बदलले जावेत, अशी मागणी होत आहे. व्यक्तीला गोंधळून टाकणारा व दैववादी बनविणारा हा सारा बनाव आहे. याविरोधी समितीने मोहीम सुरू केली असून महाराष्ट्रातील काही बांधकाम व्यावसायिक व वास्तुशास्त्रज्ञ समितीच्या बाजूने ठामपणे उभे आहेत, ही आनंदाची बाब आहे.

खरे तर समितीच्या अनेक शाखा आपापल्या पातळीवर अनेक उपक्रम राबवत असतात. या सगळ्यांची जंत्री देणे शक्य नाही, आवश्यक नाही. महाराष्ट्र पातळीवरील संयोजित झालेले काही उपक्रम वर लिहिले आहेत. समितीचे कार्य सुरू केल्यानंतर संबंधितांना विचारविनिमयातून; तसेच समितीच्या माहितीपत्रकातून या अनेकविध उपक्रमांचा तपशील सहज मिळू शकेल.

सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प
विद्यार्थी दशेत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार रूजावा, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व सत्यशोधकी जाणिवांचा संस्कार व्हावा, यासाठी हा उपक्रम समितीने तयार केला आहे. शिक्षकांच्यासाठी एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, तो शिक्षकांना दोन वा तीन वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबिरांत शिकवला जातो. त्यानंतर शिक्षकांनी २५ दिवसांच्या शालेय तासांचा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्वयंसेवी पद्धतीने शिकवावा, अशी कल्पना असते. प्राथमिक पातळीवर सत्यशोध परिचय परीक्षा, माध्यमिक पातळीवर सत्यशोध प्रज्ञा परीक्षा व महाविद्यालयीन पातळीवर सत्यशोध प्रबोध परीक्षा घेतली जाते. या शिबिरांना अतिशय चांगला प्रतिसाद असून गेल्या चार वर्षांत जवळपास ८० हजार विद्यार्थी या परीक्षांना बसले आहेत व मुख्याध्यापक, विद्यार्थी या सर्वांनी हा प्रकल्प अतिशय उपयुक्त असल्याचे कळविले आहे. भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ व पंतप्रधानांचे माजी वैज्ञानिक सल्लागार कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर याचे अध्यक्ष आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने प्रशिक्षण शिबिरासाठी अर्थसहाय्य दिले आहे. या परीक्षांच्या बरोबरच आता एकेका विषयाच्या उदा. :- बुवाबाजी, चमत्कार, सर्पविज्ञान, खगोलविज्ञान, व्यसनमुक्ती परीक्षाही सुरू केल्या जात आहेत. या सर्वांमधून सत्यशोधक विद्यापीठ उभे राहावे, असा प्रयत्न आहे.
संघटन
            महाराष्ट्रात विदर्भातील काही भाग वगळता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात समितीचे संघटन आहे. कुठल्याही चळवळीला यशस्वी व्हावयाचे असेल, तर शिस्तबद्ध संघटनेची आवश्यकता असते. यासाठी समिती सतत प्रयत्नशील आहे. मात्र संघटनेची शिस्त ही वाढीचा अडसर ठरू नये, यासाठी ही काळजी घेतली आहे. उपक्रमाच्या पातळीवर जे कोणी समितीचे कार्य करू इच्छितात, त्यांचेही स्वागत आहे.

वार्तापत्र
समितीचे वार्तापत्र गेली पाच वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होते व महाराष्ट्रभर वितरीत होते. समितीचा विचार व व्यवहार दर महिन्यास लोकांमध्ये पोचविण्यात वार्तापत्राचा मोठा वाटा आहे.

प्रकाशन
समितीचा स्वतंत्र प्रकाशन विभाग आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध विषयांवरील समितीच्या पुस्तिका या अत्यंत रास्त दरात वितरीत केल्या जातात. त्यामागे पैसे मिळविण्याची कल्पना नसून विचार सर्वदूर पोचावा, ही तळमळ आहे.

समितीची नीतीविषयक भूमिका
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यामुळे शेवटी कशावरच श्रद्धा राहणार नाही आणि नीतीचा ऱ्हास होईल, अशी शंका अनेकजण व्यक्त करतात. परिस्थिती नेमकी उलटी आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा गाभ्याचा आशय नीतिमान समाजाची निर्मिती हाच आहे. पण नीतिमूल्य म्हणजे तरी काय? समाजधारण ज्यामुळे होते व ज्यांच्या आचरणाबद्दल जनमानसात व्यापक मान्यता असते असे सर्वसामान्य नियम. समाजधारणेसाठी त्यांचे अस्तित्व अपरिहार्य असते. उदा. :- खरे बोलावे, व्यभिचार करू नये, शेजाऱ्यांवर दया करावी, बालकांना प्रेम द्यावे. या स्वरुपाच्या विचारांनाच आपण नीतिमूल्ये म्हणतो. यामागे उदात्तता असतेच; पण प्रामुख्याने समाज चालण्यासाठी लागणारी अपरिहार्यता निदान त्या-त्या काळातील असते. उदा. समाज सुरळीत चालायचा तर एकमेकांशी सत्याने वागले पाहिजे. प्रत्येकजण दुसऱ्याशी खोटेपणाने वागू लागला तर गोंधळ होऊन समाजजीवन अशक्य होईल. अनौरस संतती निर्माण होणे नको असेल व मालमत्ता हस्तांतरणाचा प्रश्न योग्य प्रकारे सुटावयाचा असेल, तर व्यभिचार अनैतिक ठरावयास हवा. प्रत्येकजण कुणाचा तरी शेजारी असतोच. तेव्हा सर्वांनीच आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणे सर्वांनाच सुखकारक व उपयोगी ठरेल. प्रत्येकालाच बाल्य व वृद्धावस्थेतून जावयाचे असते. समाजात त्यांची संख्या मोठी असते. समाज नीट राहावयाचा तर या बालकांना प्रेम व वृद्धांना संरक्षण मिळावयास हवे. या स्वरुपाच्या समाजधारणेसाठी आवश्यक असलेल्या विचारांची नीतिमूल्ये बनली आहेत.

याबरोबरच समाजातील हितसंबंधी वर्गांनी स्वत:चे हितसंबंध कायम राहावेत, यासाठी मतलबीपणे काही विचारांना नीतिमूल्यांचे स्वरूप दिले, तर अज्ञानापायी काही विचारांना न तपासताच नीतिमूल्यांचा दर्जा देण्यात आला. नीतिमूल्ये व देव आणि धर्म यांची सांगड घातल्याने या सर्वांची चिकित्सा करणे अवघड होऊन बसले. मानवी जीवनाची मूल्यात्मकता, समाजधारणेसाठीची अपरिहार्यता व समाजजीवनातील स्थळकाळसापेक्षता यातून जी मूल्ये समाज व व्यक्तिहिताची ठरतात, त्यांचा पूर्ण पुरस्कार व आदर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची विचारधारा करते. परंतु यासाठी जी चिकित्सा करावी लागेल, तिचा आधार अपरिहार्यपणे बुद्धिप्रामाण्यवाद व विवेकनिष्ठा हाच असतो.

नीतिमूल्यांना, धर्मापलिकडे स्वातंत्र्य, स्वायत्त अशा विचारांचा पाया असतो. नीतिमूल्यांच्या नावाखाली होणारे शोषण हे धर्माची नीती या बुरख्याखाली चालूच राहणार नाही, यासाठी डोळसपणाही माणसांना येण्याची गरज असते. आपण उदाहरण घेऊ - खरे बोलणे, स्त्रियांनी न शिकणे व चूल-मूल सांभाळणे, ब्राह्मणांनी मांसाहार न करणे या तिन्ही बाबी शे-दीडशे वर्षांपूर्वी आपल्या समाजात नैतिक होत्या. आज काय स्थिती आहे?

खरे बोलणे हे शाश्वत नीतिमूल्य आहे. त्यामुळे ते आजही सुप्रतिष्ठित आहे. (आचारात नाही, हा भाग अगदी वेगळा.) स्त्रियांनी शिकू नये, ही धारणा पूर्णपणे बदलली आहे. स्त्रियांना शिकवायला बाहेर पडलेल्या सावित्रीबाई फुलेंना समाजाकडून अवघ्या सव्वाशे वर्षांपूर्वी दगड व शेणसड्याचा मारा घ्यावा लागला, त्या महाराष्ट्रात समाजाचे प्रतिनिधित्व करणारे शासनच स्त्रीशिक्षणासाठी आवर्जून प्रयत्न करत आहे. स्त्रियांना शिकण्याची संधी ही नीती झाली आहे. समाजसुधारकांचे प्रयत्न, कुटुंबासाठी अर्थार्जन करण्यासाठी स्त्रीला घराबाहेर पडण्याची निर्माण झालेली अटळ गरज यातून नीतिमूल्ये बदलली आहेत. स्त्रीला धार्मिक कारणाने न शिकवणे हीच अंधश्रद्धा बनली आहे. शाकाहार, मांसाहार यात श्रेष्ठ-कनिष्ठ काय, याची चर्चा चालूच राहील; पण मांसाहार करणारा ब्राह्मण अनैतिक आहे, असे म्हणणे आता हास्यास्पद व मूर्खपणाचे ठरेल. समाजजीवनात परिस्थितीबाबतचे असे मंथन विचाराच्या व विवेकाच्या आधारे सतत चालू ठेवण्याचे हे काम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा गाभा आहे. अंधश्रद्धांची चिकित्सा यासाठीच केली जाते. त्यामुळे कालसापेक्ष व मानवी प्रतिष्ठेवर आधारलेली नीतिमूल्ये समाजापुढे आग्रहाने मांडल्यास सगळ्यात जास्त मदतच होणार आहे, होत आहे.

विवेकी विचारांचे कृतिशील आचरण या अर्थाने नीतिमूल्यांवरील श्रद्धा हा शब्द कोणी वापरल्यास त्याच्याशी वाद नाही, बुद्धिप्रामाण्याने स्वीकारलेल्या विश्वासानेच हे भावनाधिष्ठित रूप आहे, एवढाच त्याचा अर्थ.
हिंदूंवरच डोळा का?
अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने चळवळ करते ती फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांच्यावरच; अन्य धर्मातील अंधश्रद्धा तुम्ही का वगळता, असा एक तिरकस प्रश्न नेहमी विचारला जातो.
           
एखाद्या विषयाचा मूळ हेतू बाजूला ठेवून त्याला विपर्यस्त वळण देण्याचा कसा प्रयत्न होतो, हा प्रश्न म्हणजे याचे नमुनेदार उदाहरण आहे. चळवळीच्या सुरुवातीच्या काळात हा आरोप अधिक जोरदार केला जाई. चळवळीची विचारधारा व स्वरूप लक्षात आल्यावर अलिकडे हा आरोप काहीसा बोथट झाला आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. मात्र हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतोय व हेतुत: निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी यामागील वैचारिक भूमिका स्पष्टपणे समजावून घ्यावयास हवी.
अ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ बघितली, तर या आक्षेपातील खोटेपणा लगेच स्पष्ट होईल. हिंदू धर्माबरोबरच इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, बोहरा अशा अन्य प्रमुख धर्मांतील व्यक्तींनी केलेली बुवाबाजी व धार्मिक स्थानांचा अंधश्रद्धावाढीसाठी केला जाणारा उपयोग, याची अनेक उदाहरणे देता येतील. धर्म बाजूला ठेवून या प्रकाराविरुद्ध चळवळ झाली आहे. त्यातील काही घटनांबद्दल तर वृत्तपत्रे, साप्ताहिके वगैरेंनी विस्तृत वृत्तांतही छापले आहेत. हिंदू धर्मामध्येही अनेक जाती व पंथ आहेत आणि अंधश्रद्धा जाण्याबद्दल त्यांना कळकळ असली, तरी स्वत:च्या समाजातील अंधश्रद्धांचे ते या-ना-त्या प्रकारे समर्थन करतात आणि दुसऱ्या जाती-जमातीच्या अंधश्रद्धांकडे बोट दाखवून त्याबद्दल काही करण्यासाठी सुनावतात. अंधश्रद्धा व त्याआधारे होणारे कोणतेही शोषण, दिशाभूल यांना समितीने नेहमीच व तीव्रतेने विरोध केला आहे. कारण मुद्दा अंधश्रद्धांचा आहे; धर्माचा नाही.
ब) धर्म हा जन्मत:च लाभत असल्याने या देशातील ८० टक्के लोक जन्माने हिंदूच आहेत. स्वाभाविकच चळवळीत येणाऱ्या प्रत्येकी १० पैकी ८ प्रकरणे ही हिंदूंची असतात.
क) चळवळीतील कार्यकर्तेही प्रामुख्याने हिंदू असतात व असणार. आपल्या देशातील परस्परधर्माच्या टीकेबाबत असलेली अनुदारता लक्षात घेतली तर मुस्लिम व अन्य धर्मियांनी हिंदू धर्मावर टीका केलेली समाजातील बहुसंख्याकांना अजिबात रुचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही अपरिहार्यता लक्षात घेता धर्मीय विरोध हा वास्तवता म्हणून मान्य केला पाहिजे.
ड) बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम हे धर्म अलिकडच्या दोन ते अडीच हजार वर्षांतील आहेत. हिंदू धर्माच्या निर्मिती काळाबद्दल विविध मते असली, तरी तो या धर्मापेक्षा दोन ते अडीच हजार वर्षांनी नक्कीच जुना आहे. देवांची संख्याही फार प्रचंड आहे. (बाकीचे प्रमुख धर्म एकेश्वरवादी आहेत.) यामुळे हिंदू धर्मात पुराणे भरपूर आहेत. त्यांच्यामुळे अंधश्रद्धा निर्माण होण्यास सुपीक भूमी तयार होते. याचबरोबर दुसऱ्या बाजूस हिंदू समाजाला कठोर चिकित्सेची अशी परंपरा आहे. प्राचीन काळात चार्वाक, लोकायत, बुद्ध; अर्वाचीन काळात महात्मा फुले, लोकहितवादी, आगरकर, आंबेडकर, सावरकर, गाडगेबाबा यांच्या विचारांमुळे अंधश्रद्धांवर आसूड ओढण्याचे कामही चालत आलेले आहे. (इस्लाममध्ये तर ते आताशी कुठे चालू होत आहे. ते काम जसे वाढेल, तशी धर्माचीही अधिक परखड समीक्षा होईल.)

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक १९९६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...