मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

चमत्काराने चळवळीला संधी मिळाली



चमत्काराने चळवळीला संधी मिळाली
दाभोलकर, चमत्कार, दूध प्राशन

ता. २१ सप्टेंबर. सकाळी ९.३० ची वेळ. माझ्या दिल्लीच्या भावाचा फोन सातारला खणखणला. त्याच्या मते, मला दिल्लीत काम निर्माण झाले होते. कारण दिल्लीला लोकांच्या झुंडी देवाला दूध पाजायला घराबाहेर पडत होत्या आणि भगवान शंकर आपल्या कुटुंबीय मंडळीसह; एवढेच नव्हे, तर गळ्यातील नाग आणि समोरचा नंदी यासह दूध प्राशन करू लागले होते.
      सकाळी ११ वाजता सातारा शहरातून या बातम्या सांगण्यासाठी माझ्या घरचा फोन अखंड वाजू लागला. घराबाहेर पडून हे सारे तपासणे आवश्यक होते. परंतु तपासणी चोख व्हावयाची तर ती नियंत्रित परिस्थितीत व्हावयास हवी. ज्या उत्साहाने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दूध पाजण्यात आणि चमत्काराचा जयजयकार करण्यात मग्न होते, त्यांना अशी तपासणी रुचणारी आणि पचणारी नव्हती, हे स्पष्टच होते. संजय देशमुख, धीरज घाडगे, उदय चव्हाण हे कार्यकर्ते स्वतंत्रपणे काही ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती पाहून आले. त्यापैकी काही ठिकाणी मूर्तीला तोंडाच्या खालच्या बाजूस पांढरा टर्कीश टॉवेल गुंडाळलेला आढळला, तर काही ठिकाणी मूर्तीच्या अंगावरील सर्व दूध थोड्या वेळाने पुसून मूर्ती कोरडी करण्याचा प्रकार चालू होता. काही ठिकाणी इतकी गर्दी होती की, व्यक्तीच्या हातातील दुधाचा चमचा देवाच्या तोंडाजवळ जाईपर्यंत मागची गर्दी त्या व्यक्तीच्या अंगावर आदळत असे आणि चमचा रिकामा होत असे. काही ठिकाणी तर रांगेतल्या लोकांचे चमचे स्वत:च्या हातात घेऊन पुजारीच देवाला दूध पाजत असे आणि चमच्यातील दूध नाहीसे झाल्यामुळे संतुष्ट होऊन भक्तगण रिकामा चमचा घेऊन परत जात असत. देवाला पाण्याची अंघोळ घातल्यावर ज्या गोमुखातून पाणी देवळाबाहेर येते, त्याच गोमुखातून दूध वाहत असताना कार्यकर्त्यांना व पत्रकारांनाही दिसले. एकूण सर्वत्र भरपूर गोंधळ होता, एवढे मात्र खरे.
      सातारा जिल्ह्याचे पोलीसप्रमुख जिल्ह्यात नव्हते. शहर पोलीस प्रमुखांना फोन केला. दुग्धप्राशनाच्या चमत्कारासाठी पोलीस बंदोबस्त देऊन ते थोडे वैतागले होतेच; शिवाय धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करावा की करू नये, याहीबद्दल त्यांचे मत दोलायमान होते. त्यामुळे चमत्काराची तपासणी सहाजिकच लांबली.
      वृत्तपत्रांचे फोन महाराष्ट्रातून येत होते. जगभर हा चमत्कार सुरू असून त्याबाबत समितीचे म्हणणे काय आहे, हे त्यांना हवे होते. आपल्या कार्यकर्त्यांचे फोनही पुणे, दापोली, सोलापूर, लातूर, जळगाव या ठिकाणाहून आले. सायंकाळी ६ वाजता मुंबई दूरदर्शनच्या वृत्तसंकलकांचा फोन आला. त्याप्रमाणे गणपतीच्या सोंडेला लावल्यानंतर कमी होत जाणाऱ्या चमच्यातील दुधाची चित्रफीत त्यांच्याकडे होतीच. हे जाहीर करताना; त्याबरोबरच त्यांना माझीही प्रतिक्रिया पाहिजे होती. मी त्यांना असे म्हणालो की, चमच्यातील दूध कमी होत जाणे हे आपण खरे मानू; परंतु त्याचा अर्थ देवाच्या मूर्तीने ते दूध प्राशन केले, असा कोठे होतो? चमच्यातील दूध कमी होत जाण्यावरून देवतांच्या दुग्धप्राशनाचा निष्कर्ष काढणे योग्य नव्हे (हा मुद्दा त्यांना बहुधा पटला असावा. कारण सातच्या दूरदर्शनच्या बातम्यात मला तरी जाणवले.) मी त्यांना थोडक्यात तीन मुद्दे सांगितले. एक तर हा सारा योजनाबद्ध बनाव आहे. दुसरे म्हणजे भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे, हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. हा चमत्कार त्याच्याशी उघड विसंगत आहे. म्हणून शासनाचेच त्यामागील सत्य हुडकणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि तिसरे म्हणजे असा चमत्कार आमच्या समोर कोणी केल्यास त्याला समितीचे पाच लाख रुपयांचे आव्हान आहे. या आव्हानप्रक्रियेचे अध्यक्ष आहेत, पंतप्रधानांचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. वसंत गोवारीकर. प्रतिक्रिया नेमकी यावी, यासाठी त्या वृत्तनिवेदकांनी ती मला पुन्हा वाचून दाखवली आणि त्याप्रमाणे ती सात वाजता दूरदर्शनवरील बातम्यांत आली देखील.
      या वेळेपर्यंत सातारच्या पोलीस स्टेशनमध्ये बहुतेक सर्व वृत्तपत्रांचे वार्ताहर जमले होते. पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही सर्वजण भटजी, महाराजांच्या मठातील राम मंदिरात गेलो. तेथील प्रभू रामचंद्र, सीतामाई व मारुतीराव यांच्या मूर्ती दुपारपासून दुग्धप्राशन करू लागल्या होत्या. एक नामवंत वकील मला हे पटवत होते. मंदिराचा गाभारा छोटा होता. बाहेर मंडपात बायकांची भरपूर गर्दी होती. पुरुषही होते. मी दुधाचा ग्लास हातात घेतला, त्याची कड रामाच्या ओठावर टेकवली एक थेंबही दूध बाहेर पडले नाही. तीच गोष्ट सीतेची आणि मारुतीची. अचंबा वाटला. मला चमच्याने दूध पाजण्याचा आग्रह झाला. त्याप्रमाणे मी चमच्यात दूध घेतले. पुन्हा परिणाम तोच. एक थेंब दूध कमी होईल तर शपथ. त्यानंतर मी पत्रकारांना पुढे बोलावले. त्यांच्या हातात दुधाने भरलेला चमचा दिला. तिन्ही मूर्तींवर प्रयोग झाला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची पाळी आली. एकाही ठिकाणी, एकाही वेळी, एकही थेंब दूध कमी झाले नाही. या सर्वांचे व्हिडीओ चित्रीकरण चालू होते. गोंधळलेल्या वकील महाशयांनी स्वत:च्या हातात दुधाने भरलेला चमचा घेतला. चमच्याची कड राममूर्तीच्या ओठाच्या फटीवर दाबली. चमच्यातील दूध कमी होऊ लागले. परंतु चमच्याखाली मूर्तीच्या अंगावर मी माझे बोट धरले होते. त्यावर हे टपटप पडताना स्पष्ट दिसले. पुन्हा एकदा शेवटचा निर्धारी प्रयत्न वकील महाशयांनी केला. यावेळी त्यांच्या चमच्याच्या खाली मी माझ्या हातातील दुसरा मोकळा चमचा धरला. वरच्या चमच्यातील दूध कमी झाले खरे; परंतु नेमके तेवढेच दूध माझ्या हातातील चमच्यात जमा झाले. प्रभू रामचंद्र आपल्या भक्तांना खोटे ठरवत आहे, हे लक्षात आल्यावर वातावरणाचा ताण वाढला. घोषणा सुरू झाल्या. आम्ही बाहेर पडलो. पोलीस स्टेशनला परत आलो तर आकाशवाणीचे प्रतिनिधी वाटच पाहत होते. त्यांनी आम्हा सर्वांच्या मुलाखती ताबडतोब घेतल्या व रात्री ९.३० वाजता ध्वनिक्षेपित केल्या. त्यामुळे पारा चढलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणीमधील कर्मचाऱ्यांना फोनवरून दमदाटी केली.
      ही झाली सातारची संक्षिप्त हकिकत. कमी-जास्त फरकाने सर्वत्र हे घडलेच. या प्रासंगिक घटनेतून कोणते वास्तव सामोरे आले?
      शिक्षणाने माणसाला वैज्ञानिक दृष्टी मिळावी, असा स्वाभाविक आग्रह आहे. उच्चविद्याविभूषित लोकांनी ज्या पद्धतीने चमत्काराचे समर्थन केले, त्यामुळे शिक्षणाचा प्रसार व अंधश्रद्धा निर्मूलन यांचे नाते आहेच, असे नाही हे विदारक सत्य पुढे आले. खरे तर असे व्हावयास नको होते. परंतु जर तसे घडलेच आहे तर त्यावर उपायही शोधावयास हवा. सत्यशोध प्रज्ञा परीक्षा हा आपला प्रकल्प त्यावर एक छोटा उपाय होऊ शकतो, हे याच घटनेने सिद्ध झाले. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पात प्रशिक्षक असलेले शिक्षक आणि त्यातील शालेय विद्यार्थी यांनी अनेक ठिकाणी स्वत:हून हा वेडगळपणा थांबवण्याचा प्रयत्न केला. आई-वडील देवाला दूध पाजू मागत आहेत आणि १२-१३ वर्षांचा त्यांचा मुलगा मोठ्या ठामपणे त्याचा प्रतिवाद करत आहे, असे काहीसे गमतीदार; परंतु निश्चितच आश्वासक चित्र अनेक ठिकाणी निर्माण झाल्याचे कळले. खरे तर ही शोधक आणि निर्भय वृत्ती शिक्षण व्यवस्थेचाच भाग बनावयास हवी.
      महाराष्ट्रात सत्यशोधनाच्या परंपरेस मोठा इतिहास आहे. परंतु त्यातील धग आता विझली आहे, याची दु:खद जाणीव यानिमित्ताने झाली. खरे तर महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या धुरिणांनी आपल्या अनुयायांना रस्त्यावर आणून अशा अफवांचा बीमोड ताबडतोब व परिणामकारक करावयास हवा होता. त्यामुळे ज्यांना हे करण्यात रस होता, त्यांना अधिक प्रभावी चपराक बसली असती; परंतु हे घडले नाही. जनमानसाला विकृत उधाण आणणारी ही अफवा एका मर्यादित अर्थाने निरुपद्रवी होती. परंतु यापुढे असा प्रसंग उद्भवल्यास त्यावेळी आंधळे बनणारे जनमानस किती प्रक्षुब्ध असेल, हे सांगणे अवघड आहे. यासाठी राजकीय व आर्थिक लढ्याबरोबरच व्यक्तीचे मन बदलण्याचा सांस्कृतिक लढाही प्रभावी करावयास हवा. हे सत्य महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीने स्वीकारावयास हवे.
      प्रसारमाध्यमे आणि गावोगावी जोडलेली शासनयंत्रणा ही शासनाची प्रभावी अंगे आहेत. यांचा परिणामकारक वापर केला असता तर दुपारी २ पर्यंत अफवेवर नियंत्रण शक्य झाले असते. परंतु अशी कोणतीच तत्परता किंवा सुनियोजितता शासनाने दाखवली नाही. महाराष्ट्रात तर ‘आनंद’च होता. ज्याठिकाणी वरिष्ठ शासकीय अधिकारी ठामपणे उभे राहिले, तेथील चित्रही वेगळे झाले. लातूर येथे जिल्हा पोलीसप्रमुखांनी स्वत: पुढाकार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. या कार्यकर्त्यांनी देवाची मूर्ती घेऊन पोलिसांच्या मदतीने रस्त्या-रस्त्यावर चमत्काराचा फोलपणा दाखवला. थोडी समज असती तर महाराष्ट्राचे गृहखाते प्रत्येक जिल्ह्यात हे करू शकले असते. निदान भावी काळात तरी अशी अफवा पसरल्यास तिचा त्वरित कणखर मुकाबला करण्याचा मार्ग शासनाने शोधून ठेवावयास हवा.
      लोकमानसाला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीची गरज तीव्रपणे जाणवली, हे मात्र या घटनेने आपोआप घडले. वृत्तपत्रांनी, दूरदर्शनने ज्या पद्धतीने समितीच्या मताला स्थान दिले, त्यावरून अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समितीच्या कार्याला एक आस्था व मान्यता मिळाली आहे, हे जाणवते. अनेक कार्यकर्त्यांनी मला पाठवलेल्या पत्रातही ही भावना व्यक्त केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, काही ठिकाणी तिला सहकार्य करणारे राष्ट्रसेवा दल, छात्रभारती संघटना यांच्यामुळे अफवेचा प्रतिसाद तत्परतेने व ताकदीने घडून आला, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांनी मला कळवले. आपल्या समाजात अशा अफवा या वेगाने पसराव्यात, ही स्थिती दु:खदच; पण एका अर्थाने आपल्या चळवळीच्या वाढीसाठी आव्हानात्मकही मानावयास हवी.
      घटना घडू लागल्यावर त्या-त्या ठिकाणी लोकांनी त्यावर कल्पकतेने मात करण्याचा प्रयत्न केला. सातारला एका कार्यकर्त्याने जमलेल्या गर्दीला सांगितले, ‘‘चमचाभर दूध तरी कशाला? आपण मूर्तीच्या ओठाला दुधाचे दोन थेंब लावू, ते प्राशन झाले तरी मुद्दा मिटला.’’ मूर्तीच्या तोंडाला दोन थेंब दूध लावण्यात आले आणि ते अर्धा तास तसेच राहिल्यावर भक्तांचा सगळा उत्साह आपोआप ओसरलाच. सरफेस टेन्शन व केशाकर्षण याचा परिणाम सुरू होतो. दुधाचा थेंब ओठाला लागला तर (माझ्या हातून व पत्रकार, पोलीस यांच्या हातून देवाने पेल्यातून, चमच्यातून अजिबात दूध प्राशन केले नाही. याचे कारण आम्ही पेला अथवा चमचा काठोकाठ भरला नव्हता आणि तो सरळ धरून दुधाचे बिंदू ओठाच्या संपर्कात न येण्याची काळजी घेतली होती. त्यामुळे दुग्ध प्राशन अशक्य होते.) आपल्या एका मुस्लि कार्यकर्त्याला रास्त भीती पडली. चमत्काराला मान्यता तर देता येत नाही आणि नकार दिला तर धर्मभावना दुखावल्याचा ठपका. त्याला जाहीरपणे हा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्याने डोकेबाज उत्तर दिले. तो म्हणाला, ‘हे पाहा, गणपती हा तुमच्या बुद्धीचा देव. आता तुमच्यातील लहान मुलंही नाकाने दूध पित नाहीत. कारण ते फुफ्फुसात जाऊन मरण ओढवेल, हे त्याला कळते. गणपतीचे नाक म्हणजे सोंड. बालबुद्धीची व्यक्ती जे करणार नाही, ते बुद्धीची दैवत असलेली देवता करेलच कशी? दूध प्राशन करायचे तर त्यांनी ते तोंडानेच करावयास हवे नाही का? आपल्या देशात देवांनी दूध प्यायले याचा फार मोठा फायदा म्हणजे आता देशात परदेशी लोकं निश्चितपणे, बिनधास्तपणे मोठी गुंतवणूक करतील. कारण या देशाएवढे फसवायला सोपे असलेले मूर्ख लोक अन्यत्र नाहीत, याचा ढळढळीत पुरावा आपण त्यांना सादर केला आहे, या एका कार्यकर्त्याच्या मल्लिनाथीवरही सभांमधून दिलखुलास टाळी मिळत असे. सी.बी.आय.मार्फत चौकशी करावी, या मागणीस ज्या तत्परतेने ज्येष्ठ मंडळींनी प्रतिसाद दिला, त्यावरूनही ही घटना आपली चळवळ लोकमानसात जाऊन पोचवण्यास उपकारक ठरल्याचे दिसते.
      कार्यकर्त्यांना अडचणी, धाकदपटशा याचा त्रास झालाच. खोटे बोलणे हा तर आपल्या विरोधकांचा हुकमी डाव. मी देवाला दूध पाजले व देव दूध प्यायला ही अफवा साताऱ्यात होती, देव दूध कसे पितात हे पाहण्यासाठी दाभोलकर असे म्हणाले की, मूर्ती फोडून बघा, अशी अफवाही पसरवण्यात आली. मग त्याआधारे असे बोलणाऱ्या दाभोलकरांचेच डोके आम्ही फोडू, असे बोर्ड गावात लागले. भावना दुखावल्यामुळे माझ्या (प्रतिमेची) प्रेतयात्रेची व दहनाची तयारीही झाली. नाशिकला खटला दाखल झाला. पण या सगळ्यांमधून चळवळ पुढेच गेली. आनंदाची गोष्ट ही की, लातूर असो वा सोलापूर, जळगाव असो की, सांगली, म्हसवड असो की मल्हारपेठ, धरणगाव असो की बीड; संख्येने कमी असलेले आपले कार्यकर्ते सर्वत्र निर्धाराने बाहेर पडले. विरोध सोसून उभे राहिले. त्यामुळे चळवळीचा अनुकूल ठसा जनमानसावर उमटू शकला.
      माणसे अशी सहजासहजी सैरभैर का होतात, याचे एक व्यापक स्पष्टीकरण नेहमी दिले जाते. समाजजीवनातील अगतिकता, चंगळवाद यामुळे मोडकळीस आलेले मन अशा मूर्खपणावर सहज विश्वास ठेवते. त्यामुळे असे प्रकार बंद होण्यासाठी सर्वंकष समाजपरिवर्तन व्हावयास हवे. तोपर्यंत हे असेच चालणार. या स्पष्टीकरणातील तथ्यांश मान्य करूनही मला ते पूर्णपणे पटत नाही. संपूर्ण समाजपरिवर्तन कधी होईल, यासाठी आजची लढाई थांबवण्याची गरज नाही. त्यामुळे अन्यायाचा, फसवणुकीचा ताबडतोब प्रतिकार हे सूत्र सोयीस्करपणे दूर ठेवले जाते. दूरवरच्या उद्दिष्टांचे भान हवेच; परंतु शोषणाशी सत्वर संघर्षही हवा.
      चमत्काराच्या विरोधात पाच लाखांचे आव्हान ज्या ताकदीने जनसामान्यांच्या मनात घुसले आणि त्यामुळे चमत्कारावर विश्वास ठेवणारी त्यांची मानसिकता द्विधा होण्यास मदत झाली, त्याचे महत्त्व जाणावयास हवे. चळवळीची समर्थ प्रासंगिकता आणि दूरगामी वैचारिकता, याचे भान कृतीच्या पातळीवर आणण्यासाठी चमत्काराने संधी दिली. आपल्या संघटनेने समर्थपणे त्याला सामोरे जावयास हवे...
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (नोव्हेंबर १९९५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...