‘अंनिस’ला महाराष्ट्र
फौंडेशनचा पुरस्कार
महाराष्ट्र फौंडेशन ही अमेरिकेतील महाराष्ट्रीयन बांधवांची संस्था.
त्यांनी यापूर्वीपासून समाजकार्य गौरव पुरस्कार देण्याचे जाहीर केले. तीन लक्ष रुपये
व मानचिन्ह असा हा पुरस्कार प्रथम वर्षीच आपल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला
मिळाला, हे आपण जाणताच. हा
पुरस्कार देताना त्यांनी कळवले आहे की, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही आपल्या
समाजात रूढी, अंधश्रद्धा,
धार्मिक समजुती यांचे
स्थान प्रबळ आहे. म्हणून समाजमनात विज्ञाननिष्ठा व विवेकवाद रूजविण्याची निकड आहे.
यासाठी सामाजिक प्रबोधन हवे. परंतु अशा स्वरुपाचे कार्य लोकप्रिय होण्यापेक्षा लोकक्षोभाला
निमंत्रण देणारे मनोधैर्य व अंगीकृत कार्याविषयीची निष्ठा, याशिवाय हे कार्य करणे शक्य होणार नाही.
वर्तमानकाळातील या कार्याची गरज व व्याप्ती लक्षात घेता यावर्षी हा पुरस्कार अंधश्रद्धा
निर्मूलन समितीला देण्यात येणार आहे.
पुरस्कार मिळाल्याचा फोन प्रमुख संयोजक श्री. सुनील देशमुख यांनी
अमेरिकेतून केला. आनंद वाटला, अभिमान
वाटला आणि मन विनम्र झाले. प्रतिकूल परिस्थितीत हे काम करत झगडणाऱ्या
कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाची ही किमया आहे. एका ध्येयवादाने, संघटनेच्या निष्ठेने सर्व अडचणी व आघात सोसून
जागोजागी समितीचे शेकडो जण कार्यरत आहेत.
रचना-प्रबोधन-संघर्ष या मार्गाने जनमानसावर छाप पाडणारे अंधश्रद्धा
निर्मूलनाचे कार्य उभे राहिले ते या सर्वांच्या अथक प्रयत्नातून. त्याच्या कामाची सातासमुद्रापलिकडची
पोचपावती म्हणजे हा पुरस्कार. पहिला मानाचा मुजरा त्यांना हवा आणि अर्थात त्यांच्या
कुटुंबियांनाही; ज्यांनी
प्रवाहाविरुद्ध पोहताना साथ दिली.
याबरोबरच अन्य अनेकांचे ऋणही आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक वृत्तपत्रांनी
चळवळीबद्दल सकारात्मक भूमिका घेतली व यश जवळ आणले. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प हा महाराष्ट्र
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. तो उत्तम राहिला,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या उदार सहकार्यामुळे.
श्री. गोविंद देवधेकर यांच्या ‘रॅशनॅलिस्ट
अँड सायंटिफिक अॅटिट्यूड प्रमोशन ट्रस्ट’तर्फे अनेकदा आर्थिक मदत
मिळाली. सातारच्या एकता शिक्षण प्रसारक संस्थेमुळे शिबिरे, मेळावा यांची सहजपणे सोय होत गेली. दिवंगत
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नानासाहेब
गोरे यांनी सतत खंबीर वैचारिक, नैतिक
पाठिंबा दिला. डॉ. श्रीराम लागू, प्रा.
एन. डी. पाटील, निळू
फुले, सुनील देशमुख,
देवदत्त दाभोलकर, वसंत गोवारीकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, ताहेर पुनावाला, सदाशिव अमरापूरकर यांचे सहकार्य अनेक प्रकारचे
व मोलाचे ठरले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतंत्र कायदा व्हावा, याबद्दल विधिमंडळात आवाज उठविणाऱ्या आमदार
पी. जी. दस्तूरकर व जयवंत ठाकरे यांचाही उल्लेख करावयास हवा. खरे तर विस्तारभयाने ज्यांची
नावे घेता येत नाहीत, ते
अनेक व असंख्य अज्ञात हितचिंतक या सर्वांच्यामुळे हे यश लाभले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा
निर्मूलन समितीच्या वतीने या सर्वांच्याबद्दल अंत:करणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
शेवटी विनंती एकच, प्रत्येक पुरस्कार हा एका अर्थाने समाजाच्या
तुमच्याकडून वाढलेल्या अपेक्षांचा आविष्कार असतो. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आजपर्यंतचे
उदंड प्रेम व कृतिशील पाठिंबा यापुढेही वाढता राहावा.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन
वार्तापत्र
(जानेवारी १९९७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा