शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे सत्यस्वरूप



अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे सत्यस्वरूप
दाभोलकर, विचारमंथन, भूमिका


श्रीपाद जोशी हे ज्येष्ठ गांधीवादी आहेत. स्वाभाविकच त्यांच्याकडून परिपक्व विचारांची अपेक्षा बाळगली जाते. असे असताना एकांगी स्वरुपाचे अंधश्रद्धा निर्मूलन हा लेख वाचून खेद वाटला. अशा लिखाणापूर्वी सत्यनिष्ठ बाण्याने त्यांनी वस्तुस्थितीची दुसरी बाजू समजावून घेणे आवश्यक होते. त्यासाठी लिखित स्वरुपातही भरपूर मजकूर आहे. मात्र अशा प्रकारे सत्यता न समजावून घेता केलेले चिंतन हे चळवळीवर अकारण अन्याय करणारे आहे.
           
गेली दहा वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती आपल्या १०० हून अधिक शाखांच्याद्वारे हे कार्य करत आहे. सातत्याने व संघटितपणे अंधश्रद्धा निर्मूलन करणारी ही एवढीच संघटना असल्याने श्री. जोशी यांचे आक्षेप समितीवर थेट येऊन भिडतात म्हणून हा प्रतिवाद. लेखात काही वैचारिक मांडणी व चळवळीतील काही कार्यक्रमांवर आक्षेप; तसेच त्या अनुषंगाने धर्मनिरपेक्षतेचा विचार याची मांडणी आहे. याच क्रमाने समितीच्या विचारांची मांडणी करीत आहे.
           
बुद्धीवरची फाजील निष्ठा उपयोगी नाही. वैचारिक परिपक्वता येत गेली व नास्तिकपणा, बुद्धिप्रामाण्य ही भाषा हास्यास्पद वाटू लागली. माणुसकी, सेवा हीच खरी जीवनमूल्ये आहेत, हा जोशी यांचा पहिला मुद्दा. बुद्धिवरची फाजील निष्ठा म्हणजे काय, हे त्यांनी स्पष्ट केले असते तर बरे केले असते. गणपती दूध प्यायला, हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विधान नाकारायचे की स्वीकारायचे? आणि ते कशाच्या आधारे? पंचमहादेवता म्हणा अथवा पंचमहाभूते; त्यामागील सत्यांश माणसाने शोधला नसता तर मानवी संस्कृती निर्माण झाली असती का? देशाच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी व मानवतावाद बाळगणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. हे तिन्ही शब्द एकत्रित व एकाच कलमात घालण्याचा अर्थ बुद्धिप्रामाण्यवाद व मानवी मूल्ये, यात विसंगती नाहीच; उलट सुसंगती आहे, हाच नाही का? नास्तिकता हास्यास्पद वाटण्याचे कारण काय? या शब्दाचा खरा अर्थ वेदाचे प्रामाण्य न मानणारे आणि व्यवहारातील अर्थ देव न मानणारे; मग जैन, बौद्ध हे धर्म हास्यास्पद ठरवावे लागतील. खरे असे आहे, की देव मानणारी व न मानणारी माणसे सारखीच ढोंगी, स्वार्थी असतात, तशीच त्यागी नि:स्वार्थीही असतात. देव न मानणारा माणूस असे आपण आगरकरांचे वर्णन करतोय ना? ‘मी नास्तिक आहे असा पुकारा करत भगतसिंगाने अत्युच्च बलिदान दिलेच ना? कट्टर नास्तिक; पण सेवाभावी असे हैदराबादचे श्री. गोरा हे कुटुंबीय भेटल्यानंतर महात्मा गांधींनी परमेश्वर सत्य आहे अशी धारणा सत्य हाच परमेश्वर आहे अशी केली ना? वर्तनातील मूल्यविवेक निर्णायक महत्त्वाचा. देवाला मानणे न मानणे हे गौण, हे सर्व संत, समाजसुधारकांनी सांगितले नाही काय?

समितीची भूमिका व कार्यक्रम
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम म्हणून काही बाबींचा श्री. जोशी यांनी उल्लेख केला आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न चिकाटीने न करता घिसाडघाईने केले जातात, असे लिहिले आहे. त्याबरोबरच ही मंडळी चांगली वयस्कर आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. आचार-विचारांच्या सुसंगतीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. सत्य बोलायचे तर श्री. जोशी यांचे प्रतिपादन अज्ञानावर उभे आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वयाची सरासरी काढली, तर ती निश्चितपणे तरुणाईची आहे; शिवाय केवळ एकांगी भूमिका न घेता चार मार्गांनी समिती कृतिशील आहे. पहिला मार्ग शोषण, दिशाभूल, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधात संघर्ष करणे. गेल्या दहा वर्षांत असे असंख्य संघर्ष समितीने सत्याग्रही वृत्तीने व पद्धतीने लढविले आहेत.

दुसरा मार्ग तरुणांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा. यासाठी समिती सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प चालविते. शिक्षकांना, प्राध्यापकांना प्रशिक्षित करते. त्यांच्यामार्फत या सत्यशोधकी जाणिवा विद्यार्थ्यांपर्यंत पोचविते. या प्रकल्पात गेल्या तीन वर्षांत सुमारे चार हजार शिक्षक प्रशिक्षित झाले आणि सत्तर हजार विद्यार्थी परीक्षेला बसले. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालवली जाईल आणि डोळस बनलेले हे युवक अंधश्रद्धांपासून आपोआपच दूर राहतील.  

तिसरा भाग धर्माच्या विधायक कठोर व कृतिशील चिकित्सेचा आहे. महाराष्ट्रात जत्रांच्यात सर्वत्र चालणाऱ्या अनेकविध अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांना सत्याग्रही प्रबोधनाने विरोध करणे, देवदासी, पोतराज अशा धर्मांवर कलंक असलेल्या बाबींशी संघर्ष करणे, सत्यशोधकी बचत विवाहासारखे विधायक पर्याय उभे करणे, याचा सततचा प्रयत्न समितीने केला आहे. देव, धर्म, नीती, श्रद्धा-अंधश्रद्धा याबाबत माझे व डॉ. लागूंचे विवेकजागराचे वाद-संवाद कार्यक्रम सर्व महाराष्ट्रात झाले आहेत आणि शहरी व ग्रामीण भागात त्याला अतिशय समंजस प्रतिसादही मिळाला आहे. याबरोबरच समितीच्या कार्यकर्त्यांनी आपले वर्तन हे विवेकी नीतिमूल्यांशी सुसंगत ठेवावे, असा आग्रह समितीने सतत राखला आहे. हे सर्व एवढ्यासाठीच सांगितले, की यामागे श्री. जोशी यांनी लावलेल्या उथळ, नाटकी, बौद्धिक अहंकार, घाईघाईचे बदल याचा संबंध नाही. विचारपूर्वक, समंजसपणे दीर्घ पल्ल्याचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून समितीची वाटचाल चालू आहे.

पशुहत्या व अंधश्रद्धा निर्मूलन
सार्वजनिक ठिकाणी देवाच्या नावाने नवस फेडण्याच्या नावाखाली फार मोठ्या प्रमाणात होणारी पशुहत्या हे धर्माचे जोपासण्याचे रूप नाही, असे समितीला वाटते. महाराष्ट्रातील संत व समाजसुधारक यांची साक्ष ही समितीच्या बाजूची आहे. प्रतिवर्षी ग्रामीण महाराष्ट्रातील अंदाजे तीन हजार यात्रा-जत्रांतून पाच ते सहा लाख बोकडे नवस फेडण्याच्या खुशीच्या सक्तीपायी गरीब भाविक-भक्त मारतो व कर्जबाजारी बनतो, ही वस्तुस्थिती सर्वेक्षणांतून पुढे आली आहे. हे आर्थिक कारणही या प्रथेला विरोध करण्यामागे आहे. हिंदुत्ववादी संघटनाही अधून-मधून प्रासंगिकपणे ही पशुहत्या धर्मविरोधी म्हणून आवाज उठवतात. ते वाचनात येते. परंतु या प्रथेविरुद्ध गेली सात वर्षे सातत्याने महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत चळवळ करून सुमारे १२० यात्रांमधील पशुहत्या; प्रसंगी स्वत: मार खाऊन अहिंसक पद्धतीने बंद करणारी समिती ही एकमेव संघटना आहे. यापैकी १० ठिकाणे मुस्लिम पिरांची आहेत. सोलापूरजवळचे हैद्रा हे त्याचे अलिकडील काळातील ठळक उदाहरण. अशा प्रथेविरोधात भारतातील सात राज्यात कायदा आहे तसा तो महाराष्ट्रात करावा, अशी समितीची रास्त मागणी आहे. बकरी ईदची कुर्बानी ही आपण बंद का करू नये, असा क्षीण, काहीसा एकाकी आवाज मुस्लिम समाजातून मुस्लिम प्रबोधन पत्रिकेत उठत आहे. हा या कामातून साधलेला परिणाम आहे. देवाच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी होणारी पशुहत्या ही धर्माचे टाकाऊ रूप की टिकाऊ, याबद्दल श्री. जोशी मौन का बाळगतात?

कार्य हिंदू अंधश्रद्धांपुरते नाही
अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही फक्त हिंदूंच्याच अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करते, हा आक्षेप काही वर्षांपूर्वी फार जोरकसपणे मांडला जायचा. समितीच्या प्रत्यक्ष कामातून वस्तुस्थिती कळल्यामुळे त्याची धार आता खूपच कमी झाली आहे. वस्तुस्थिती काय आहे? १) हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन या सर्व धर्मांतील अंधश्रद्धांच्या विरोधात समितीने संघर्ष केले आहेत. बुवाबाजी खणून काढताना बुवाची जात आणि धर्म यांचा विचार समितीने कधीही केला नाही. याची अनेक उदाहरणे सहज देता येतील. २) आपल्या देशात ८० टक्के लोक हिंदू आहेत. स्वाभाविकच अंधश्रद्धेची येणारी ८० टक्के प्रकरणे ही हिंदू धर्मातील असतात. ३) या देशाचे सामाजिक वास्तव असे आहे की, तुम्ही जात वा धर्म मानत असा वा नसा; तुम्हाला ओळखणारा समाज ते सर्व मानतो आणि परजातीतील, धर्मातील लोकांनी दोष दाखवला तरी अस्वस्थ होतो. या वास्तवाची मर्यादा महात्मा गांधींनी मान्य केली आहे. समितीवर ती काही प्रमाणात येणारच. ४) हिंदू धर्मात एका बाजूला अनेक धर्मग्रंथ आणि असंख्य देव; पुन्हा तुलनेने तो अधिक प्राचीन. त्यामध्ये अंधश्रद्धेची अडगळ अधिक प्रमाणात साचलेली असेल, तर ते स्वाभाविकच; पण त्याबरोबर अभिमानाची बाब अशी, की बुद्ध, चार्वाकापासून अगदी अलिकडेपर्यंत समाजसुधारकांची व त्यासाठी धर्मचिकित्सा करणाऱ्यांची एक मोठी फळी हिंदू धर्मात उभी आहे. समिती ही परंपरा आपल्या कुवतीनुसार चालवू इच्छिते. ५) सगळ्यात महत्त्वाचे हे की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हितकारक आहे की अहितकारक? ते समाजाला पुढे नेणारे आहे की मागे खेचणारे? ते विघातक असेल तर मुस्लिम वा हिंदू ते कोणासाठीच न करणे इष्ट आणि ते समाजाला पुढे नेणारे असेल तर ते मर्यादित प्रमाणात झाले, हा तक्रारीचा सूर अर्थहीन आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य उपयुक्त म्हणायचे  आणि त्याचवेळी मुसलमानांचे कोठे करता आहे कार्य, असा (अज्ञानावर आधारित) शेरा मारायचा ही तर्कविसंगती आहे आणि सत्याचा अपलाप.
मूलतत्त्ववाद, धर्मनिरपेक्षता
सगळे सेक्युलॅरिस्ट बिचाऱ्या हिंदूंवरच आपल्या विचारांचा मारा करतात. मूलतत्त्ववादी होऊ शकणारे धर्म व त्यांचे अनुयायी यांना (सोयीस्करपणे) विसरतात, असा लोकप्रिय आक्षेप आहे. श्री. जोशी यांनी त्याही पुढे जाऊन त्याला बौद्धिक विकृती म्हटली आहे. खरे तर हा स्वतंत्र लेखाचा व थेट समितीच्या कामांशी संबंधित नसलेला विषय आहे; परंतु मितीच्या कार्याचा व्यापक परिणाम म्हणून भारतीय जनमानसात धर्मनिरपेक्षतेचा विचार रूजवावा, अशीच समितीची धारणा आहे. काँग्रेसची याबाबतची ढोंगी वागणूक व हिंदुत्ववाद्यांची मतलबी चाल यामुळे धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व प्रश्नचिन्हांकित करणे योग्य नाही. (हे शक्यही नाही, याचा प्रत्यय भारतीय राजकारणात नुकताच आला.)
           
धर्म, लोक व शासन यांच्या परस्परसंबंधाचा धर्मनिरपेक्ष विचार कसा करायचा, हा विषय जरूर चर्चेचा आहे; परंतु एका गोष्टीबद्दल स्पष्टता हवी ती ही, की कोणत्याही धर्माचे मूलतत्त्ववादी अनुयायी समाजाला सुरुंगच लावत असतात. घटनेला नाकारून, संसदेला अंधारात ठेवून सर्वोच्च न्यायालयाला फसवून दुसऱ्या धर्माचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करणे व तो भाग गौरवाचा म्हणून मिरवणे, या कृतीला मूलतत्त्ववादी प्रकृती नाही तर काय म्हणायचे?

समितीची देवा-धर्माबाबतची भूमिका
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देवा-धर्माबाबत तटस्थतेची भूमिका आहे आणि चळवळ करताना याबाबत येणाऱ्या आक्षेपांना तोंड देऊन विचारपूर्वक ही भूमिका समितीने मांडली आहे. या भूमिकेमुळे समितीचे कार्य कधीही अडचणीत आले नाही. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्यासाठी, धर्माची चिकित्सा करण्यासाठी देव आणि धर्म नाकारणे, ही पूर्वअट समितीने कधीही मानलेली नाही. असे असताना बौद्धिक घमेंडखोर हा शब्दप्रयोग श्री. जोशी यांनी समितीबाबत का वापरावा, हे समजू शकत नाही. समाजामध्ये असंख्य अंधश्रद्धांच्या रूपाने आणि त्यातून निर्माण झालेल्या हितसंबंधांनी खरा देव आणि धर्म सतत बदनामच होत असतो. हे कोणाही सामान्यासही सहज समजू शकते. या विरोधात चळवळ करणारे आमच्यासारख्यांना म्हणूनच खरे तर सच्चा धर्मवाद्यांच्याकडून सहकार्य मिळावयास हवे, ते नाही मिळाले तरी त्यांनी स्वतंत्रपणे, संघटितपणे या विरोधात कार्य करावयास हवे. गेल्या दहा वर्षांचा अनुभव असा सांगतो, भोंदूबाबा, देवदासीसारख्या प्रथा, अनेक अनिष्ट रूढी, परंपरा यांच्याविरोधात लढताना स्वत:ला शुद्ध धार्मिक असे उच्च खानी म्हणणारी मंडळी कधीही मदतीला येत नाहीत. अनेकदा तर छुपा वा प्रकट विरोधच करतात. खऱ्या धर्मभावनेशी हे वर्तन सुसंगत की विसंगत?             माणूसपण जपणारी, शाश्वत जीवनमूल्यांना आधार देणारी, माणसाचं व समाजाचं उन्नयन करणारी नीती ही धर्मभावनेतून येवो, की विवेकनिष्ठ मानवतावादातून; खऱ्या उमाळ्याची असेल आणि खऱ्या-खुऱ्या नीतिमान आचारासाठी समाजबदलाची गरज मान्य करीत असेल, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांचं सदैव स्वागतच करते. कारण नीतिमान समाजाची निर्मिती हा समितीला सर्वाधिक महत्त्वाचा विषय वाटतो.              

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल १९९७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...