शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

कदम कदम बढाये जा



कदम कदम बढाचे जा
दाभोलकर, मोहीम, जाहीरनामा, आढावा




मागील वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या आमच्या मासिकाचा पहिला दिवाळी अंक बाहेर आला. सात वर्षांपूर्वी छोट्या आकारात व द्वैमासिक स्वरुपात सुरू झालेले हे प्रकाशन पुढे मोठ्या आकारात मासिक स्वरूपात नियमित प्रसिद्ध होऊ लागले. मागील वर्षी थोडेसे धाडस दाखवून मासिकाचा दिवाळी अंक प्रसिद्ध केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्या उत्साहात या अंकाद्वारे आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे.

           

समितीच्या कार्याची ओळख करून देणारा माझा लेख मागील वर्षीच्या दिवाळी अंकात होता. समितीच्या स्थापनेपासून ते गेल्या वर्षापर्यंत झालेल्या कार्याचा धावता आढावा आणि त्याचबरोबर समितीच्या विचारांचा परामर्ष असे त्याचे स्वरूप होते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने जे संघटित कार्य गेली काही वर्षे महाराष्ट्रात प्रभावी बनत आहे, ते अवघे सात-आठ वर्षांचेच आहे, हे अनेकांना आश्चर्यकारक व कौतुकास्पद वाटले होते. या कामाला अनपेक्षितपणे दाद अमेरिकेतील महाराष्ट्रीयन लोकांकडून मिळाली. महाराष्ट्र फौंडेशन ही अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीयन लोकांची नामवंत संस्था, श्री. सुनील देशमुख ते त्यातील एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व. त्यांच्या पुढाकाराने व सहकार्याने मागील वर्षापासून ‘महाराष्ट्र फौंडेशन’ने ३ लाख रुपयांचा एक समाजकार्य गौरव पुरस्कार जाहीर केला. महाराष्ट्रातील एका संस्थेस प्रतिवर्षी तो देण्याचे जाहीर केले. या पहिल्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील; तसेच अमेरिकेतील निवड समितीने एकमताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवड केली. तुलनेने बराच कमी कार्यकाल असलेल्या समितीला मिळालेला हा पुरस्कार कार्यकर्त्यांना उत्साहित करून व सुखावून गेला. मुंबई येथे ४ जानेवारी १९९७ ला एका भव्य सोहळ्यात पुरस्काराचे वितरण झाले. असे पुरस्कार कौतुकाची थाप पाठीवर टाकतातच; परंतु लोकांच्या वाढत्या अपेक्षांचाही तो आविष्कार असतो. संघटनेच्या विविध आघाड्यांवर गेल्या दिवाळीपासून ते या दिवाळीपर्यंत या अपेक्षापूर्तींचे प्रयत्न कसे झाले, त्याचा धावता आढावा घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.

पुरस्काराचा हा उल्लेख आलाच आहे म्हणून आणखी एका बाबीचा उल्लेख करतो. केसरी-मराठा ट्रस्टतर्फे मागील वर्षी विज्ञानविषयक जाणिवा प्रसारित करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थेस ज्येष्ठ समाजसेवक डॉ. वारदेकर यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू करण्यात आला. हा पहिला पुरस्कारही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस मिळाला. समितीचे कार्य हे बुवाबाजी, भूत, भानामती दूर करण्यापुरतेच मर्यादित आहे, असा एक गैरसमज महाराष्ट्रात आढळतो. खरे तर या कामाबरोबरच वैज्ञानिक जाणिवा देण्याचे कार्यही समिती करीत असते. विज्ञानविषयक जागृतीचा पुरस्कार मिळाल्यामुळे समितीला एक मान्यता मिळाली.



बुवाबाजी विरोधी संघर्ष

भावनगर (गुजरात) मधील पार्वतीमाँ हे प्रकरण यावर्षी खूपच गाजले. मूल न होणाऱ्या जोडप्यांना पार्वतीमाँच्या केवळ आशीर्वादाने संतती प्राप्त होते, असा एक मोठा (गैर) समज महाराष्ट्रात पसरविण्यात पार्वतीमाँ व तिचे भक्तगण यशस्वी झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने निपुत्रिक जोडपी भावनगरला गेली. पार्वतीमाँची चलाखी अशी की, ती आलेल्या जोडप्यांना दोन बाबींचे पालन करण्यास सांगत असे आणि तसे वर्तन केले तरच आशीर्वाद फळाला येतील, हेही आग्रहाने मनावर बिंबवत असे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे पार्वतीमाँचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर स्वत:ला जणू काही दिवस गेले आहेत, अशा पद्धतीने त्या बाईने वागण्यास सुरुवात करायची आणि दुसरे म्हणजे पोटात राहिलेल्या गर्भासाठीच सोडा; पण अन्य कोणत्याही आजारासाठी देखील प्रसूत होईपर्यंत डॉक्टरांच्याकडून तपासून घेण्यास पार्वतीमाँच्या आदेशाप्रमाणे मनाई असे. या साऱ्यामुळे महाराष्ट्रात अक्षरश: हजारो जोडप्यांचा वेळ, पैसा, श्रम, बुद्धी व आरोग्य याचा खेळखंडोबा झाला. समितीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जनजागृती केली. अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. समितीच्या शाखांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे तारा करून उपलब्ध कायद्याच्या चौकटीत पार्वतीमाँला अटक करता येणे शक्य आहे आणि ती अटक करावी, अशी मागणी केली. तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कारवाई करण्याची निवेदने पाठविली. याबरोबरच भावनगर येथील समितीचे हितचिंतक व तेथील आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ डिव्हिजनल मॅनेजर श्री. ठोंबरे यांच्यामार्फत जिल्ह्याच्या पोलीसप्रमुखांबरोबर बोलणी केली. याबरोबरच पार्वतीमाँकडे जाऊन फसलेल्या जोडप्यांनी तिच्यावर खटला दाखल करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी केली. या सर्व मोहिमेचा परिणाम झाला; पण तो बराच मर्यादित होता, हे मान्य करावयास हवे. भावनगरचे जिल्हाप्रमुख व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी कारवाई केली नाहीच; परंतु अधिक खेदजनक म्हणजे पार्वतीमाँमुळे फसवणूक झाल्याची कबुली अनेकजण देत असले, तरीही तिच्यावर खटला घालण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. लोकांची मानसिकता, शासनाची उदासीनता, कायद्याची असमर्थता यामुळे बुवाबाजी विरुद्धची लढाई किती अवघड बनत आहे, याचे दर्शन पुन्हा एकदा झाले.     



नाणीज, जि. रत्नागिरी येथील नरेंद्र महाराज यांचे प्रस्थ फार मोठ्या झपाट्याने गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा व कोल्हापूर या भागात पसरले. सावंतवाडी येथे या विभागातील कार्यकर्त्यांची बैठक होऊन कृतीबाबत चर्चा झाली. ३० मे ला तासगाव (जि. सांगली) येथील नरेंद्र महाराजांच्या जाहीर कार्यक्रमात चमत्कार करण्याच्या त्यांच्या सामर्थ्यास आव्हान देण्यात आले. या तरुण महाराजांच्या अगाध दैवी सामर्थ्याचे वर्णन करणारे नरेंद्र लीलामृत हे पुस्तक त्यांच्या मठातर्फे विकले जाते. त्यामध्ये कॅन्सरची गाठ हस्तस्पर्शाने बरी होणे, टकलावर केस उगविणे, मतिमंद मुलाला तल्लख बुद्धी येणे, कोड नाहीसे होणे, असे चमत्कार ठासून भरले आहेत. या आव्हानानंतर नरेंद्र महाराजांचे काही भक्त हिंसक बनले. त्याची निषेधात्मक प्रतिक्रिया म्हणून उत्स्फूर्तपणे तासगाव बंद करण्यात आले. तासगावमध्ये चौकाचौकांत सभा घेण्यात आल्या. एका मोठ्या सभेने या मोहिमेची सांगता करण्यात आली. याचा परिणाम तासगाव; तसेच इतरत्रही झाला. गोव्यातून दर आठवड्याला महाराजांकडे दोनशे जीपगाड्या जात. ती संख्या एकदमच घटली. अर्थात, ही लढाई दीर्घकालीन आहे आणि ती सातत्याने व चिकाटीनेच चालवावी लागेल.

           

पुणे जिल्ह्यातील मरकळ या गावी एका सहावी पास बाईला दत्ताचा साक्षात्कार झाला आणि जमिनीत म्हणे सोन्याच्या दत्तपादुका मिळाल्या. दर गुरुवारी आरती सुरू झाली. फार मोठ्या संख्येने स्त्रिया जमू लागल्या. दैवी शक्तीच्या सहाय्याने उपचारही सुरू झाले. पुणे शाखेतील कार्यकर्त्यांनी हिमतीने व चिकाटीने याविरोधात संघर्ष केला. धोका पत्करून गुरुवारच्या दिवशी प्रबोधन केले. मॅजिक रेमिडिज या कायद्याखाली खटला दाखल केला. जमिनीतील सोन्याच्या पादुका ही सरकारी मालमत्ता आहे, ती जप्त करावी, असा आग्रह धरला. पोलिसांनी अनुकुलता दाखविली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण जिल्हा पोलीसप्रमुखांनी घेतले. त्याला निवृत्त पोलीस महासंचालक श्री. भास्करराव मिसर आले होते. मात्र या चर्चासत्राचा फायदा प्रत्यक्ष कारवाईसाठी झाला नाही. पोलिसांची इच्छाशक्ती कमी पडली की, राजकीय दबावामुळे पोलीस हतबल बनले, हे कळू शकले नाही.



बुलढाणा जिल्ह्यातील शेषराव महाराज यांचे प्रस्थ सध्या नाशिक व अन्य काही जिल्ह्यांत अतोनात वाढले आहे. ही व्यक्ती रूढार्थाने महाराज नाही. परंतु व्यसनमुक्तीचा उपदेश ती करते आणि त्यातून बहुसंख्यांची व्यसने सुटतात, असा दावा महाराज व त्यांचे भक्तगण करतात. त्यामुळे व्यसन सुटण्याच्या महाराजांच्या मेळ्यास लाखा-लाखांच्या जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. व्यसन हा एक मानसिक आजार आहे. त्यातून बरे होण्यासाठी दीर्घकाळ बहुआयामी उपचार पद्धती वापरावी लागते आणि तरीही व्यसनमुक्त जीवन जगणाऱ्यांचे प्रमाण १० ते २० टक्क्यांच्या आसपास असते. शेषराव महाराजांच्या उपचारातून अतिअवघड प्रश्नांना जादूसदृश्य अतिसोपी उत्तरे असल्याचा आभास निर्माण होतो. तो अर्थातच दिशाभूल करणारा आहे. प्रश्न पार्वतीमाँचा असो वा शेषराव महाराजांचा; समाजातील अगतिकता व अस्वस्थता बुवाबाजीला कशी जन्म देते, याची ही चांगली उदाहरणे आहेत.



या सर्वांच्या विरोधात जनजागरण तर प्रभावीपणे चालू आहेच; त्याबरोबर प्रत्यक्ष संघर्षही. स्थानिक शाखा असे छोटे-मोठे संघर्ष सतत लढवीत असतात. बुवाबाजीचा पर्दाफाश करीत असतात. हे करीत असताना एखादा उपयोगी पडणारा प्रभावी कायदा असावा, यासाठी गेली सात वर्षे समितीची धडपड सुरू आहे. विधान परिषदेत प्रस्ताव मान्य होऊनही कायद्याचे बिल मांडण्याचे शासन अजिबात मनावर घेत नाही. चळवळीचे मित्र असलेले आमदार पी. जी. दस्तूरकर व आमदार जे. यू. ठाकरे विधिमंडळात याबाबत सतत आवाज उठवत असतात. शासन प्रश्न विचाराधीन आहे असे उत्तर देते; परंतु प्रत्यक्षात काही करीत नाही. काही आमदार, न्या. धर्माधिकारी अशा लोकांनी भेट मागितली, तरी पत्राची पोच मिळत नाही, तर चर्चेसाठी वेळ देणे दूरच. यासाठी एक जोरदार अंतिम संघर्ष आता छेडावा लागणार, असे दिसते.



प्रकाशन

बुवाबाजी, भूत, भानामती याच्या विरोधातील प्रत्यक्ष संघर्षाएवढाच अंधश्रद्धेच्या बाबतीत वैचारिक संघर्षही समितीने महत्त्वाचा मानला आहे. समितीची यावर्षी काही महत्त्वाची प्रकाशने प्रसिद्ध झाली. वास्तुशास्त्र हा विषय सध्या सुशिक्षित वर्गात बहुचर्चित आहे. वेदांपासून आधुनिक विज्ञानापर्यंतचे आधार चुकीच्या पद्धतीने आणि शुभाशुभ, हानी-लाभ यांना जोडून मांडणारे हे वास्तुशास्त्र कोणत्याच अर्थाने शास्त्र या पदवीला पोचू शकत नाही. परंतु अशा नकली शास्त्रावर लिहिलेली मोठ्या किमतीची पुस्तके हल्ली भरमसाठ खपत आहेत. याला पर्याय म्हणजे या विषयाचे यथार्थ वास्तव लोकांपर्यंत पोचवणे. यासाठी समितीचे कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील यांचे भ्रामक वास्तुशास्त्र हे पुस्तक समितीतर्फे प्रसिद्ध करण्यात आले. त्यांनी ते अतिशय परिश्रमपूर्वक लिहिले आहे. समितीचे या वर्षीचे आणखी एक महत्त्वाचे प्रकाशन म्हणजे समाजसुधारक व अंधश्रद्धा. संत व समाजसुधारक यांच्या कार्याची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे आणि या सर्वांनी  अंधश्रद्धांविरोधात अनेक अंगांनी व सडेतोडपणे लिहिले आहे. यादृष्टीने महाराष्ट्रातील विविध समाजसुधारक आणि त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतचे विचार हे समितीने प्रसिद्ध केले. महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी केवळ समितीच्या प्रेमाखातर या पुस्तकाचे लेखन केले. ज्येष्ठ पत्रकार व बुद्धिप्रामाण्यवादी स. मा. गर्गे यांनी पुस्तकाचे उत्तम संपादन केले. चळवळीतील कार्यकर्ता व सामान्य वाचक या दोघांचीही यामुळे मोठीच सोय झाली.

           

याबरोबरच आणखी दोन पुस्तिका समितीने प्रकाशित केल्या. समितीच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष व नामवंत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर यांचे ‘भूतबाधा’ व मानसिक आजार व अंधश्रद्धा याबाबतचे लेखन समितीने पूर्वी प्रसिद्ध केले होतेच. परंतु बरेच दिवस उपलब्ध नसलेली ही पुस्तिका पुन:प्रकाशित केली गेली. सुधारून वाढवलेल्या या पुस्तिकेचे चांगले स्वागत झाले. समितीचे शेवगाव (जि. नगर) शाखेचे कार्यकर्ते लढ्ढा पती-पत्नी यांची आरोग्य व अंधश्रद्धा या विषयाची पुस्तिकाही लोकांना खूप उपयुक्त वाटली. अनेकविध आजारांबाबत लोकमानसात असलेल्या गैरसमजुतींचे निराकरण या पुस्तिकेत प्रभावीपणे केले आहे. भृगुसंहिता - नाडीग्रंथ व नॉस्ट्रॉडॅमस या विषयावरची पुस्तिका लवकरच प्रकाशित होत आहे. त्याबरोबरच समितीच्या कार्याचा परिचय करून देणारी आणि त्यातच वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मा, पुनर्जन्म, प्लँचेट वगैरेचा समावेश असलेली पुस्तिकाही दिवाळीपूर्वी वाचकांना मिळेल. या व पूर्वीच्या पुस्तिका यांची विक्रीही सध्या तरी पूर्णत: कार्यकर्तेच करतात. गेल्या पाच वर्षांत समितीच्या विविध विषयांवरील चाळीस हजारांहून अधिक पुस्तिका विकल्या गेल्या. या पुस्तिकांची किंमत हेतुत: उत्पादनखर्चाशी मिळती-जुळती असल्याने या विक्रीतून समितीला फारसा आर्थिक लाभ झाला नाही. परंतु सर्वदूर जाण्यास नक्कीच मदत झाली.



सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प

विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन देणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे आणि समाजसुधारकांच्या सत्यशोधकी जाणिवा मुलांच्यांत रूजविणे, यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम या वर्षात चांगलाच स्थिरावला आणि प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन असे मिळून एकूण तीस हजार विद्यार्थी या परीक्षांना बसले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत शिक्षकांची संख्या सहा हजारांवर गेली असून प्ररीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखाच्यावर गेली आहे. या प्रकल्पाचे हे यश लक्षात घेता तो विविध बाजूंनी अधिक आखीव-रेखीव व त्याचबरोबर विस्तारित करण्याचा समितीचा प्रयत्न चालू आहे. शिक्षकांची शिबिरे ठराविक पद्धतीने व परिणामकारक व्हावीत, यासाठी त्यांना शिकविणाऱ्या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. विषयाच्या मांडणीचे क्रम नक्की करण्यात आले व विषय, त्यातील मुद्दे व उपमुद्दे यांच्या छापील नोटस् शिबिरार्थी शिक्षकांना देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे शिक्षकांच्या शिबिराला अधिक नेमकेपणा प्राप्त झाला. याबरोबरच विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेता सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पांचे छोटे-छोटे विविध अभ्यासक्रम करण्यात आले. त्यामध्ये सर्पविज्ञान, व्यसनमुक्ती, चमत्कार, मानसिक आरोग्य, विद्यार्थिनींचे आरोग्य व आहार या स्वरुपाच्या विषयाचे हे अभ्यासक्रम आहेत. स्वाभाविकच ते शिकण्यात व शिकविण्यात विद्यार्थी व शिक्षक यांना आनंद व नाविन्य वाटते. याबरोबरच स्वत:चे प्रशिक्षण पोस्टल अभ्यासक्रमाद्वारे पूर्ण करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करण्याची सोयही त्यातून केली आहे. याही पुढे जाऊन ठिकठिकाणी समितीचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व परीक्षा घेतात. स्वाभाविकच विद्यार्थ्यांच्याजवळ थेटपणे जाता येते.

            अंधश्रद्धांच्या संदर्भातील या सत्यशोधनाबरोबरच झपाट्याने पुढे जाणाऱ्या विज्ञानयुगाची जाणीव समिती बाळगून आहे. आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या जगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या असंख्य दालनात अपरिहार्यपणे डोकवावे लागणार आहे. या सगळ्याची समज-उमज त्याला देण्यासाठी, व्यवहारात त्याला विज्ञान व तंत्रज्ञान साक्षर करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचीही समितीची कल्पना आहे. त्यादृष्टीने काही प्राथमिक मांडणी झाली असून त्याचा पाठपुरावा केला जात आहे.



भानामती निर्मूलन मोहीम : मराठवाडा

अचानक कपडे पेटणे, घरावर दगड येणे, अचानक कपडे फाटणे व जळणे, अंगावर बिब्ब्यांच्या फुल्या उठणे, या प्रकारांना सर्वसाधारणपणे भानामती असे म्हणतात. परंतु मराठवाड्यात याबरोबरच भानामती या प्रकाराला मनोरुग्णतेचा एक पदर आहे. भानामतीबाधित स्त्रिया घुमतात, किंचाळतात, ओरडतात, कुत्र्यासारख्या भुंकण्याचा आवाज काढतात. ही अवस्था गावातील एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही. गटागटांनी महिलांचे घुमणे सुरू होते. घुमत असताना ही अवस्था भानामती करून कोणी आणली, त्याचे नाव या स्त्रिया घेतात. त्या व्यक्तीला गावात जगणे मुश्किल होते. गावात निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्तीला त्या व्यक्तीला अकारण जबाबदार धरले जाऊ लागते. गावात गूढ भीती व तंटे-बखेडे चालू होतात. मात्र अंगात येऊन घुमणाऱ्या स्त्रियांची मनोरुग्णता तर दूर होत नाहीच. समिती या प्रकाराच्या विरोधात गेली सात वर्षे प्रबोधन करीत आहे. सुमारे अकराशे भानामतीबाधित मनोरुग्णांवर समितीचे नांदेडचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी उपचार केले आहेत. मात्र मराठवाड्यातील मानसिकतेमध्ये रूतून बसलेल्या भानामतीवरील विश्वासाला जोरदार तडाखा देण्यासाठी समाज ढवळून एखाद्या मोठ्या निघणाऱ्या मोहिमेची गरज होती. या वर्षीच्या मे महिन्यात अशी एक मोहीम लातूर जिल्ह्यात समितीने जोरदार पार पाडली. जिल्ह्याच्या सात तालुक्यांत प्रत्येकी एक असे सात जथ्थे गेले. पूर्ण आठवडा त्या तालुक्यात राहिले. प्रत्येक जथ्थ्यात भानामतीचा चमत्कार दाखविणारे कार्यकर्ते होते. त्याबद्दल माहिती देणारे वक्ते होते आणि मानसिक आजाराबद्दल मार्गदर्शन करणारे मानसोपचारतज्ज्ञही होते. तसेच या विषयावरील आणि एकूणच अंधश्रद्धा निर्मूलनावरील पुस्तिका-पुस्तके देखील होती. आठवा जथ्था जिल्ह्यातील प्रमुख मोठ्या गावी गेला. या उपक्रमाला खूप उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. महिला वर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमाला लोटला होता. मुलांची संख्याही लक्षणीय होती. नव्हे भानामती, ही तर मनोविकृती ही घोषणा गावात लहान-थोरांच्या तोंडात बसली. भानामती घडवून दाखवा-पाच लाख रुपये मिळवा हे आव्हान लोकांना भिडले. आपोआप कपडे कसे जळतात? अंगावर बिब्ब्याच्या कशा फुल्या उठतात? याची प्रात्यक्षिके लोकांचे डोळे उघडविणारी ठरली. सात दिवसांत जवळपास तीनशे गावात कार्यक्रम झाले; अतिशय नियोजनबद्ध मोहीम झाली. समारोपाच्या प्रसंगी मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सहभागी झालेल्या सर्वांनी व प्रमुख पाहुण्यांनीही समाधान व्यक्त केले. मोहिमेचा पाठपुरावा म्हणून भानामतीबाधित रुग्णांचे शिबीरही लातूरला मानसोपचारतज्ज्ञांच्या सहाय्याने पार पडले. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांत शक्यतेनुसार ही मोहीम राबविण्याचा आणि २००० पर्यंत मराठवाड्यामधून ही भानामती हद्दपार करण्याचा समितीचा संकल्प आहे.



वास्तुशास्त्रविरोधी वैज्ञानिक जाहीरनामा प्रसृती

एखादी वास्तू योग्य त्या पद्धतीने बांधली, तरच बांधणाऱ्याला ती लाभते; त्याचे राहणे एक शोककथा ठरण्याचा धोका असतो, असे मत पसरविणारा एक वर्ग सध्या समाजात आहे, आणि तरी या मताला पाठिंबा देणाऱ्यांची चलती आहे. घराच्या भूखंडापासून ते पूर्णत्वाला गेलेल्या वास्तुशांतीपर्यंत असंख्य अवैज्ञानिक सल्ले या तथाकथित वास्तुशास्त्राच्या नावाने दिले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा याला विरोध आहेच; परंतु वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिक यातील एक वर्गही या भ्रामक वास्तुशास्त्राच्या वाढत्या प्रभावाने नाराज आहे. या सर्वांचा विचार करून भ्रामक वास्तुशास्त्राबद्दल वैज्ञानिक जाहीरनामा प्रसृत करणारी एक महाराष्ट्रव्यापी परिषद पुणे येथे ता. २० जुलैला समितीने घेतली. तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सहीने भ्रामक वास्तुशास्त्राबद्दल वैज्ञानिक जाहीरनामा प्रसृत करण्यात आला. त्यातील महत्त्वाचा काही भाग असा......'वास्तुविद्या म्हणजे महाविद्यालयात शिकविले जाणारे शास्त्र आधुनिक विज्ञानावर आधारित असते. शुभ-अशुभ यांचे संकेत देणारे तथाकथित वास्तुशास्त्र दैवी ज्ञानावर व भ्रामक कल्पनांवर आधारित असते. त्यांच्या मांडणीत अनेक अशास्त्रीय कल्पना वैज्ञानिक परिभाषेत मांडल्यामुळे सत्याचा शोध अवघड बनतो. समाजाची दिशाभूल होऊ शकते. त्याबरोबरच वास्तू लाभणे ही कल्पना थेट प्रारब्ध आणि नियती यांच्याशी व्यक्तीची व वास्तूची सांगड घालते. या सर्व बाबी अवैज्ञानिक तर आहेतच; पण समाजाला, राष्ट्राला अहितकारक आहेत. खरे तर या देशातील कोट्यवधी लोकांच्या घरांचा प्रश्न हा परिसरातील वास्तुघटक वापरून सुयोग्य घरबांधणी कशी करता येईल, हा आहे. अशावेळी समाजातील या प्रश्नांचे रास्त भान अधिक प्रभावीपणे बाळगणे आपल्याला आवश्यक व उपकारक आहे. यासाठी आपल्या जीवनातील समस्यांची उकल अशा भ्रामक कल्पनांद्वारे न करता प्रयत्नवाद व वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या आधारे करावी, असे आवाहन या जाहीरनाम्याद्वारे आम्ही करीत आहोत.



या कल्पनेचे आणि विचारांचे महाराष्ट्रात उत्तम स्वागत करण्यात आले.



राज्यव्यापी मेळावा

फेब्रुवारी महिन्यात समितीचा राज्यव्यापी मेळावा पुणे येथे पार पडला. महाराष्ट्रातून ४५० क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यासाठी आयुष्य झोकून दिलेले बी. प्रेमानंदही मेळाव्याला पूर्णवेळ उपस्थित होते. त्यांनी चमत्काराच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरणही केले. मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांनी केले. वनराईचे प्रवर्तक श्री. मोहन धारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समितीच्या कार्याबद्दल अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. त्यामध्ये डॉ. श्रीराम लागू, डॉ. बाबा आढाव, डॉ. अनंत फडके, रझिया पटेल, ‘केसरीचे संपादक अरविंद गोखले आदींचा समावेश होता. मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी अंधरूढीच्या बेड्या तोडा या अभियानाची सुरुवात श्री. निळूभाऊ फुले, रावसाहेब कसबे, व डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने झाली. मेळाव्यात या सर्व वैचारिक मांडणीबरोबरच समितीच्या कार्याची संघटनात्मक आखणी अधिक सक्षम व्हावी, यासाठी ती एकत्रितपणे व जिल्हानिहाय करण्यात आली.



संघटना बांधणी

संपूर्ण महाराष्ट्रात समितीच्या शंभराहून अधिक शाखा नियमित स्वरुपात कार्यरत आहेत. समितीचे कार्य करण्यासाठी वैचारिक निष्ठेबरोबरच चिकाटी व सातत्याची गरज असते. नियमित बैठका व नव्या विचारांशी संपर्क, विविध उपक्रम, बुवाबाजीविरोधी संघर्ष, व्यापक प्रबोधन हे सारे नियमित व प्रभावी होणे, यावरच संघटनेचे यश अवलंबून असते. सध्यातरी याबाबत पूर्णपणे समाधान बाळगावे, अशी स्थिती नाही. परंतु या मार्गानेच काम चालू आहे आणि गांभीर्याने हे काम दीर्घकाल करण्याची गरज कार्यकत्र्यांनी मनोमन जाणली आहे. बऱ्याच प्रमाणात त्याचे आचरणही सुरू आहे.



विविध उपक्रम

संघटनेच्या कार्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात जाणवतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्र पातळीवर  विविध नाविन्यपूर्ण उपक्रसमिती घेत असते आणि त्यामुळे एक जागृती सतत सुरू राहते. समितीचे अनेक उपक्रम हे वाचकांना माहीत असलेलेच आहेत; परंतु काही नाविन्यपूर्ण उपक्रमांचा उल्लेख मुद्दामहून करीत आहे.

           

समितीच्या अनेक शाखा आपल्या कार्यकर्त्यांतील मैत्री दृढ करण्यासाठी कुटुंब मेळावे घेतातच. परंतु महाराष्ट्र पातळीवरील दोन दिवसांचा असा एक मेळावा यावर्षी सातारा येथे झाला. या मेळाव्याची प्रमुख अट अशी होती, की मेळाव्यात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा उल्लेख करणे, हा दंडनीय गुन्हा आहे. अनेक कार्यकर्ते सहकुटुंब या मेळाव्यात सहभागी झाले. ही कल्पना आणि तिची अंमलबजावणी सर्वांनाच भावल्याचे जाणवत होते. महाराष्ट्र पातळीवर विविध शाखांनी विविध ठिकाणी; पण एकाच दिवशी आणखी एक उपक्रम साजरा केला, तो म्हणजे राज्य कार्यकारिणीच्या निर्णयानुसार प्रतिवर्षी १ जानेवारी हा दिवस आंतरजातीय विवाह स्वागत दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. जात ही शोषणाचे हत्यार आहेच; आणि त्याबरोबरच एक निखळ अंधश्रद्धाही आहे. स्वाभाविकच आंतरजातीय विवाह करून ज्या व्यक्ती आपले नवे जीवन सुरू करतात, ते अंधश्रद्धा विरोधाची एक मूलभूत लढाई कळत-नकळत सुरू करतात. असा आंतरधर्मीय विवाह केलेल्या व्यक्तींचे स्वागत करणे हे आवश्यक आहे आणि प्रेरणादायी देखील. यामधून एक चांगला आदर्श डोळ्यांसमोर येतो, असे समितीला वाटते. 



१० मार्च १९९७ हा सावित्रीबाई फुलेंचा स्मृतिशताब्दी दिन. या तारखेपर्यंत शंभर गावांत वाचनालये सुरू करण्याचा संकल्प त्यांच्या जन्मदिनी ३ जानेवारीला बेळगाव शाखेचे कार्याध्यक्ष नारायण अतिवाडकर यांनी केला व सर्व गावांत ग्रंथयात्रा घेऊन गेले. एवढी नवी कोरी वेगवेगळी पुस्तके त्या गावात प्रथमच गेली असतील. गाव तेथे ग्रंथालय या उपक्रमालाही काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ही मोहीम १० मार्चला बंद न करता पुढे वर्षभर ते राबवीत आहेत.



औरंगाबाद शाखेने अंधश्रद्धेची अंधेरनगरी असा एक नाविन्यपूर्ण स्पर्धात्मक उपक्रम घेतला. अंधश्रद्धेचे विविध विषय शालेय विद्यार्थ्यांना आधी कळविण्यात आले. या विषयावर मिनिटात त्यांनी नाटुकले वा अन्य प्रकारे सादरीकरण करावे, अशी सूचना होती. यात खूप शाळांनी सहभाग घेतला. प्रेक्षकवर्ग असलेल्या विद्यार्थी व नागरिकांचा प्रतिसादही दांडगा होता.



भुतांच्या भेटीसाठी काढलेली स्मशान सहल हा असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम. जगात भूत कुठेच नसते, ते तुमच्या व आमच्या मनात असते याची खात्री विद्यार्थ्यांना पटविण्यासाठी भुताचे हमखास निवासस्थान समजल्या गेलेल्या स्मशानात व कब्रस्थानात अमावस्येच्या दिवशी रात्री १२ वाजता या सहली काही शाखांनी आयोजित केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी आणि वृत्तपत्रांनीही या कल्पनेला चांगली दाद दिली. मनाचे आरोग्य व मानसिक आजाराबद्दल प्रबोधन व उपाय यांची गरज आजच्या तणावमुक्त व सार्वजनिक जीवनात खूप जाणवते. लोकांना या विषयात असलेले अज्ञान व माहिती मिळविण्याचे; त्याचबरोबर असलेले आकर्षण यादृष्टीने नांदेड शाखेचे अध्यक्ष व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी मनाचिये गुंफी हा कार्यक्रम बसवला आहे. लोकांना मानसिक आरोग्य व आजार याबद्दल उत्सुकता असलेल्या प्रश्नाबाबत डॉ. मुलमुले यांची खुसखुशीत पद्धतीने घेतलेली मुलाखत असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. मनाच्या बाबत असलेल्या बहिणाबार्इंच्या कवितेपासून काही मराठी भावगीते व हिंदी गीते यांचा समर्पक उपयोग मुलाखतीमध्येच केलेला असल्याने हा कार्यकम रंजकही होतो.



मनावर ताण येणे ही आजच्या काळातील न टाळता येणारी गोष्ट आहे; विशेषत: तुलनेने अपरिपक्व मानसिक अवस्थेत स्पर्धात्मक ताणाला सामोरे जाणाऱ्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत हे अधिक जाणवते. अशा विद्यार्थ्यांना हे ताण कसे येतात व कसे टाळावेत, याबाबत माहिती देणे आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह मदत व मार्गदर्शन देणे, असा एक उपक्रम पनवेल शाखा, अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर या मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने सुरू करीत आहोत.

           

गणेश विसर्जनाच्यावेळी नदीत जे निर्माल्य टाकले जाते, त्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होते. यासाठी हे निर्माल्य नदीत न टाकता बाजूला ठेवावे. प्रदूषण थांबवा; तसेच बाजूला ठेवलेल्या निर्माल्यातून चांगले खत (बायोमास) तयार होऊ शकते, असे सांगण्याचा उपक्रम कोल्हापूर शाखा गेली तीन-चार वर्षे अतिशय चिकाटीने व यशस्वीपणे चालवीत आहे. गेल्या वर्षी हे निर्माल्य सहा ट्रॅक्टर-ट्रॉली एवढे प्रचंड होते. इचलकरंजी शाखेनेही हा उपक्रम मागील वर्षी केला. महाराष्ट्रात तो आता हळूहळू समितीव्यतिरिक्त अन्य संस्थांही करतील, असेही दिसत आहे.

           

यात्रेतील पशुहत्या थांबविण्याचा समितीचा प्रयत्न अथकपणे सुरू आहे. मागील वर्षात लातूर, नगर जिल्ह्यात याला लक्षणीय यश मिळाले. या प्रथेविरुद्ध सर्वात मोठा सत्याग्रहाचा कार्यक्रम मागील वर्षी उमरी पोहरा (जि. अकोला) येथे झाला. बंजारा समाजाची अशी भारतव्यापी यात्रा. ३०-४० हजार बोकडे नवसापोटी तेथे प्रतिवर्षी मारली जातात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय बंजारा युवक दल व कृषी गो-सेवा संघ, मालेगाव यांनी एकत्रितपणे केलेल्या सत्याग्रहाला पूर्ण यश आले नसले, तरी समर्थपणे निषेध नोंदविला गेला आहे. कर्नाटक, गुजरात, राजस्थानमध्ये सार्वजनिक ठिकाणी देवाच्या नावाने पशुहत्याबंदीसाठी असलेल्या कायद्याप्रमाणेच कायदा महाराष्ट्रात विधिमंडळाने करावा, असा आदेश त्यांना उच्च न्यायालयाने द्यावा, अशी याचिका समिती मुंबई उच्च न्यायालयात दाखल करीत आहे.

           

याव्यतिरिक्त सुरू असलेले उपक्रम तर सुरू आहेतच. समाजातील वातावरण काहीसे अगतिक, उदासीन आणि म्हणून प्रवाहपतित बनत आहे. अशा वेळी कधी नव्हे, एवढी गरज वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याची, विवेकवाद रूजविण्याची आहे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वाटते. सर्व पातळीवर समिती त्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वांच्या सक्रिय सहकार्याची उमेद बाळगून आहे.



पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

 (विशेषांक १९९७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...