रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

प्रभाव वाढतो आहे



 प्रभाव वाढतो आहे
दाभोलकर, प्रभाव, कार्यक्रम, नरेंद्र महाराज
           
           
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राच्या दिवाळी अंकात समितीच्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेण्याची ही तिसरी वेळ. खरे तर मासिकातून आपल्या उपक्रमांची, चळवळीची, मोहिमांची माहिती येतच असते. त्यामध्ये आणखी भर कशाला, असा प्रश्न कदाचित कोणाला पडेल. परंतु हा मागोवा घेण्यात दोन प्रकारचे औचित्य आहे, असे मला वाटते. एक तर दीपावली अंकाचा वाचक अधिक विस्तृत असतो. त्यांनी मासिक अंक वाचलेले असतातच, असे नाही. दुसरे असे की, एकत्रित, एकसंध मांडणी कामाच्या स्वरुपाचे अधिक नेमके दर्शन घडविते. त्यामुळे चळवळीचे स्वरूप सर्व बाजूंनी एकाचवेळी लक्षात येते. केवळ जनाधारावर उभ्या असलेल्या समितीसारख्या चळवळींना हे घडवणे आवश्यक आहे, असे वाटते. तरीही अर्थातच हा आढावा तसा धावताच आहे.           

मागील वर्षीच्या दिवाळी अंकाचे वाचकांनी उदंड स्वागत केले इथपासून खरे तर सुरुवात करावयास हवी. चळवळीच्या चाहत्यांच्या वर्तुळापलिकडे तो गेला आणि त्यांना आवडला. संघटनांच्या मासिकांचे दिवाळी अंक महाराष्ट्रात फारसे निघत नाहीत आणि निघाले तरी स्वाभाविकच त्याच्या वितरणाचे वर्तुळ सीमित असते. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दीपावली अंकाने दहा हजारांचा खपाचा आकडा ओलांडणे मला आश्वासक वाटते. तसे झाले तर वितरणासाठी दरमहा नियमितपणे स्टॉलवर जाण्याची उमेद समिती बाळगून आहे. असो.

सर्पयात्रा

            सर्प आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा नेहमीच लोकांच्या कुतुहलाचा विषय राहिला आहे. त्याच्यापुढे एक पाऊल टाकून समितीने यावर्षी बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत एक भव्य सर्पयात्रा आयोजित केली. तिला मिळालेला प्रतिसाद हा लोकांना विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची किती गरज आहे, हे स्पष्ट करणे होता. जवळजवळ २० प्रकारचे ८० साप घेऊन ही यात्रा १५ दिवस फिरली. त्याबरोबर सर्पतज्ज्ञ व कार्यकर्ते असा सात-आठ जणांचा ताफा होता. प्रत्येक ठिकाणी पेट्यांमधून सर्प नीटपणे मांडणे, पेटीसमोर त्याची माहिती देणारा फलक, पेट्यांसमोर प्रकाशाची स्वतंत्र व्यवस्था, दिवसभर प्रदर्शन, त्याची तिकीटविक्री हे सर्व सांभाळून रोज १०-१५ व्याख्याने असा भरगच्च कार्यक्रम १५ दिवस चालला. यामध्ये मुसळधार पावसाने भिजणे, एखादा साप पिशवीतून सटकणे, अपघाताने झालेला सर्पदंश अशा सर्व अडचणी आल्या. काटेकोर नियोजन, कार्यकर्त्यांची तत्परता यामुळे यावर मात करणे शक्य झाले. यात्रेच्या अशा संयोजनातील काही धोके अधिक स्पष्ट झाले. विशेष असे की, ही सर्व यात्रा मध्यवर्तीच्या सहभागाशिवाय स्थानिक शाखांनी मिळून एकत्रितपणे चोखपणे संयोजित केली. आर्थिक व्यवस्थाही त्यांनीच उचलली. चळवळ विकेंद्रित, प्रभावी व सामर्थ्यवान बनत चालल्याचे हे लक्षण मानता येईल.



राज्य मेळावा व अंधरूढींच्या बेड्या तोडा परिषद

            डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सर्पयात्रा पार पडली, तर शेवटच्या आठवड्यात राज्य मेळावा आणि महाराष्ट्रव्यापी परिषद. राज्य मेळाव्यात गटवार चर्चा झाल्याच; परंतु कार्यकर्त्यांना विशेष लक्षात राहिली ती उद्घाटनाच्या वेळी कॉ. गोविंद पानसरे व दत्ता देसाई यांची भाषणे. परिवर्तनाच्या कल्पनेचे सम्यक आकलन समितीच्या कार्यकर्त्यांनी करावयास हवे, असा आग्रह कॉ. पानसरे यांनी धरला. एकमेकांपासून शिकणे व एकमेकाला जोडणे जाणीवपूर्वक सुरू ठेवावे, असे त्यांनी सांगितले. प्रबोधनाची चळवळ करा आणि चळवळ आपोआप उभी राहत नाही म्हणून आवश्यक तेवढे संघटन करा, असा सल्ला त्यांनी दिला. दत्ता देसाई यांच्या भाषणात गावामध्ये थेट पोचण्यासाठी एक छोटा; पण प्रभावी कार्यक्रम होता. त्याचे नाव जनवाचन आंदोलन. गावात जावयाचे, आठ-दहा लोकांना जमवायचे आणि सोप्या भाषेतील छोट्या पुस्तिका वाचावयाच्या, असा हा उपक्रम. त्यामुळे लोकांना दैनंदिन जीवनातील विज्ञान विषयाची उत्सुकता वाढते व काही प्रमाणात गरज भागते, असे त्यांनी सांगितले.



अंधरूढींच्या बेड्या तोडा

            अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य आता जवळजवळ गेले दशक सुरू आहे. कालबाह्य, अर्थहीन रूढी, कर्मकांडे, परंपरा यांच्या विरोधात समिती सतत उपक्रम, प्रबोधन, संघर्ष करत आहे. समितीच्या प्रारंभीच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा एल्गार हा कार्यक्रम घेतला होता. अनिष्ट प्रथांपासून स्वत:च्या जीवनात दूर राहण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी या मोहिमेत स्वीकारला. याही पुढे जाऊन समितीने चुकीच्या प्रथांना विरोध करणारे आणि चांगले पर्याय देणारे अशा दोन्ही स्वरुपाचे कार्यक्रम राबवले. महाराष्ट्रातील असंख्य जत्रां-यात्रांत, सार्वजनिक ठिकाणी देवाच्या नावाने पशुहत्या केली जाते. समजावून सांगणे, पर्याय देणे; प्रसंगी संघर्ष करणे, या पद्धतीने जवळजवळ १५० ठिकाणी पशुहत्या समितीने थांबवल्या आहेत. (या सर्व मोहिमेची सविस्तर माहिती देणारे पुस्तक लवकरच समितीतर्फे प्रकाशित होत आहे.) विवाहातील भटजी, मुहूर्त, मानापमान, हुंडा, भपका हे सर्व टाळून; आणि तरीही कौटुंबिक सामाजिक सोहळा म्हणून त्यातील आनंद व उत्साह कायम ठेवणारी विवाहाची सत्यशोधकी पद्धत समितीने सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी सुमारे १२५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पद्धतीचे हे कालोचित पुनरूज्जीवन आहे. महाराष्ट्रात समितीच्या माध्यमातून आता असे ६० हून अधिक विवाह निरनिराळ्या जिल्ह्यांत लावण्यात आले आहेत आणि त्यातील अनेक आंतरजातीय आहेत. अत्यंत साधेपणाने; परंतु उत्साहाने हे विवाह सोहळे संपन्न होतात. थोडक्यात अंधरूढींच्या बेड्यांच्या विरोधात समितीचे कार्य सुरू होतेच; परंतु त्याला अधिक पक्का वैचारिक आशय मिळवून देण्यासाठी आणि त्याबरोबरच या विचाराला महाराष्ट्रव्यापी मान्यता मिळण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेला बॅ. वि. म. तारकुंडे, अण्णा हजारे, निळूभाऊ फुले, पुष्पाताई भावे, डॉ. श्रीराम लागू, दादासाहेब रूपवते, डॉ. आ. ह. साळुंखे, अरुण खोरे, रामनाथ चव्हाण, प्रज्ञा लोखंडे, सिसिलिया कार्व्हिलो, विद्याताई बाळ, वसंत गोवारीकर, सुनील देशमुख आदी मंडळी उपस्थित होती. उपस्थितांकडे नजर टाकली तरी परिषदेतील विचारमंथन किती संपन्न असेल, हे लक्षात येते. विशेष म्हणजे ही ज्येष्ठ मंडळी केवळ आपल्या सत्रापुरतीच उपस्थित नव्हती, तर दोन्ही दिवस जवळपास पूर्णवेळ सहभागी झाली होती. महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे ८०० कार्यकर्ता प्रतिनिधींना यामुळे चांगलेच वैचारिक खाद्य मिळाले. या परिषदेला महिलांची संख्या लक्षणीय होती. परिषदेतच त्यांनी एक स्वतंत्र बैठक घेतली आणि महिला विभागाचे कार्य पुढे नेण्याचे ठरविले, ही या परिषदेची एक महत्त्वाची फलश्रुती मानावी लागेल.



महिला व अंधश्रद्धा निर्मूलन

            १ फेब्रुवारी १९९८ ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला विभागाचे कार्य सुरू करण्यासाठी एक विशेष बैठक पुणे येथे झाली. तिला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून महिला आल्या. त्यामध्ये स्त्री आरोग्य-अंधश्रद्धा (उदा. :- पाळी - समज, गैरसमज) मुलांचे आजार अंधश्रद्धा, उपवास, व्रतवैकल्ये, सण, उत्सव, देवी अंगात येणे या विषयावर मांडणी झाली. या सर्व बाबतीत स्त्रीची मानसिकता समजावून घेऊन सकारात्मक पद्धतीने काम कसे उभे करता येईल, याचीही चर्चा झाली. संघर्षापेक्षा स्वत: शहाणे होणे आणि इतर चारजणींना शहाणे करणे, हा दृष्टिकोन बाळगण्याचे ठरले. विचाराचा हाच धागा पुढे नेण्यासाठी ३०-३१ मे ला सातारा येथे महिलांचे महाराष्ट्रव्यापी शिबीर झाले. स्त्री, धर्म व अंधश्रद्धा या विषयावर सदानंद मोरे आणि स्त्री-जन्म ते मरण, दंतकथा, व्रतवैकल्ये या विषयावर डॉ. आ. ह. साळुंखे अशी विचारप्रवर्तक भाषणे झाली. या शिबिरात अतिशय चांगल्या पद्धतीने गटचर्चा झाली. काही महत्त्वाच्या विषयांवर भाषणेही झाली. ज्येष्ठ कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर पूर्णवेळ उपस्थित होत्या. त्यांनी शिबिराचे मूल्यमापनही सर्व बाजूंनी केले. पुढील काळातील कार्यवाहीची आखणी करण्यात आली आणि जिल्हावार जबाबदाऱ्याही वाटून देण्यात आल्या.







बुवाबाजीवर हल्लाबोल

            समितीच्या विविध शाखांनी बुवाबाजीविरोधात या वर्षात केलेले संघर्ष सांगणे, हे शक्य नाही व योग्यही नाही. परंतु कामाच्या वाढत्या व्यापाबरोबर बुवाबाजीविरोधी लढ्याची धार समितीने पहिल्याएवढीच लखलखीत ठेवली आहे, हे सांगायलाच हवे. वर्षभरात समितीच्या विविध शाखांनी बुवाबाजीच्या अनेक लहानमोठ्या प्रकरणांचा जो पर्दाफाश केला, त्या सर्वांची माहिती द्यावयाची तर पुस्तिकाच काढावी लागेल, एवढे सांगितले तरी पुरे. दम्याच्या आजारावर हुकमी इलाज म्हणून मासा गिळावयास देणारे डॉक्टर (!) हैदराबादहून भारतात सर्वत्र जातात आणि मजबूत धंदा करतात. यावर्षी या मंडळींना जळगाव, सांगली, लातूर, बेळगाव या सर्व ठिकाणी आपला गाशा गुंडाळावा लागला आणि पोलीस कोठडीची हवाही चाखावी लागली. बेळगावमध्ये तर तेथील कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या बुवाबाजीविरुद्ध संघर्ष लावूनच धरला आहे आणि त्यात यशही मिळत आहे. शासकीय अधिकारी; विशेषत: पोलीस यंत्रणा अनुकूल असेल तर चळवळीला यश मिळणे सोपे जाते. बेळगाव येथे विभागाचे पोलीस उपमहासंचालक यांनी स्वत:चेच काम समजून चळवळीला मदत केली आणि त्याचा नक्कीच फायदा झाला. आसवली (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील उदयनाथ महाराजांचे प्रकरणही यंदा चांगलेच गाजले. काहीसा अचानक हा महाराज निर्माण झाला. असाध्य रोगावर उपचार करणारा म्हणून त्याची ख्याती पसरली. (पसरविण्यात आली.) दोन हजार वस्तीच्या गावात दर्शनाच्या दिवशी बाहेरून २०-२५ हजार लोक येऊ लागले. नंबर मिळण्यासाठी लोक दोन-दोन दिवस उन्हा-तान्हात ताटकळू लागले. सातारा जिल्ह्यातील शाखांनी याविरोधात आवाज उठविला, वादविवाद झडले. हिंदुत्ववाद्यांना नेहमीप्रमाणे हा धर्मावर हल्ला असल्याचा साक्षात्कार झाला. ताण वाढला; परंतु प्रबोधनाची मोहीम चिकाटीने लावून धरण्यात आली. शेवटी हळूहळू; पण निश्चितपणे लोकांना उदयनाथ महाराजाची भोंदूगिरी उमजली. आसवली गावातच त्याच्या विरोधात मोठी सभा झाली. महाराजाचा दरबार इतका रोडावला की, शेवटी (काही काळासाठी) तो बंद ठेवण्याचे त्याला जाहीर करावे लागले. कुशीरे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील गुरव बंधूंनी डोळ्यांच्या सर्व उपचारावर झाडपाल्याचे रामबाण औषध देण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरू झाला मागील वर्षी दिवाळीच्या आधी; पण पुढे तो सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद अशा अनेक जिल्ह्यांत पसरला. कायद्याप्रमाणे ही बुवाबाजी बंद पाडणे कोल्हापूरच्या जिल्हा पोलीसप्रमुखांना शक्य होते. परंतु त्यांनी ते केले नाही. कार्यकर्त्यांनी या प्रकाराविरोधात जिल्ह्या-जिल्ह्यांत लढाई केली. तीन महिन्यांत कुशेरे येथे अडीच ते तीन लाख लोक औषध घेऊन गेले, यावरून प्रश्नाची व्याप्ती लक्षात यावी. हे यश बघून स्वाभाविकच डोळ्यांवर झाडपाल्याचे औषध देणारे जिल्ह्या-जिल्ह्यांत निघाले वा बाहेरून आयात झाले. सातारा जिल्हा पोलीसप्रमुखांना समितीने यातील गैरप्रकार पटवून दिला. त्यांनी तातडीने सर्व पोलीस ठाण्यांना परिपत्रक काढले. यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व उपचार केंद्रे बंद पाडता आली. याच पत्रकाचा फायदा इतर काही जिल्ह्यांत परिपत्रक काढण्यासाठी झाला आणि गुरव बंधूंना बऱ्याच जिल्ह्यात अटकाव करण्यात यश प्राप्त झाले.



दोन वेगळी रूपे

            नाणीज (जि. रत्नागिरी) येथील नरेंद्र महाराजांच्या विरोधात मागील दिवाळी अंकात सविस्तर लेख आला होता. समितीने याविरोधात चळवळ केली; परंतु नरेंद्र महाराजांचे प्रस्थ कमी करण्यात समितीला यश आले नाही. नरेंद्र महाराजांनी हुशारीने आपल्या प्रचाराचा रोख बदलला. अध्यात्मिक प्रवचन अशा स्वरुपाचे काही सुरू ठेवले. चमत्कारांचे दावे बंद केले. बुवाबाजीच खरी; पण ती जेव्हा अध्यात्मिक परिभाषेत पुढे येते, त्यावेळी लढणे अवघड बनते. अध्यात्मिक आवरणाच्या खाली चालणारी बुवाबाजी अधिक धोकादायक असू शकते. अशा प्रकाराविरोधात लढण्यासाठी समितीला आणखी काही व्यूहरचना करावी लागेल.

            शेषराव महाराज (जि. बुलढाणा) यांचे प्रकरण आणखी वेगळे आहे. शेषराव महाराज हे स्वत: एकेकाळी अट्टल दारूडे होते. परमेश्वरी कृपाप्रसादाने ते दारूतून बाहेर पडले म्हणे! त्याबरोबरच त्यांना लोकांची दारू सोडवण्याचे अद्भुत सामर्थ्य प्राप्त झाले. उपाय अगदीच सोपा. महाराजांच्या भाषणांना जायचे आणि ते देतील ती शपथ घ्यायची. व्यसनमुक्तीसाठी महाराजांचे लाखा-लाखाचे मेळावे नाशिक, जळगाव, धुळे भागात होऊ लागले. झुंडीच्या झुंडी आणि गावेच्या गावे व्यसनापासून दूर गेली, असा डंका पिटला जाऊ लागला. अशा उपचाराबाबत जी समर्थने सर्वसामान्य करतात, ती प्रकर्षाने मांडण्यात आली. एक म्हणजे दारू सोडण्याचा हुकमी उपाय कोणाकडेच नाही; शिवाय या उपचाराने तोटा कोणताच नाही. तेव्हा असलीच दैवी शक्ती, तर त्याचा अनुभव का घेऊ नये? शिवाय काही जणांची जरी दारू सुटली तरी तेही फायद्याचेच नाही का? आणि इतर उपायांना नकार कोठे आहे? वरवर बिनतोड वाटणारे हे प्रश्न म्हणजे दोन संगीतांचे कार्यक्रम करून महाराष्ट्रातील २० लाख बेकारांना काम देण्याची वल्गना करण्याएवढेच फसवे आहे. व्यसन लागणे हा एक मानसिक आजार असतो आणि त्यातून दारूचे व्यसन एखाद्या भडकलेल्या वणव्याप्रमाणे समाजात सर्वदूर पसरत जाते. शेषराव महाराजांच्या व्यसनमुक्ती दरबाराला लाखोंनी लोक येतात. याचा अर्थ एवढाच की, व्यसनामुळे संसाराची धुळधाण झाल्यामुळे त्यापासून कुटुंबाची सुटका व्हावी म्हणून धडपडणाऱ्या दुर्दैवी आयाबहिणींची संख्या महाराष्ट्रात लक्षावधी आहे. त्यावरील उपाय हा खूप अवघड व दीर्घकाळ चिकाटीने करावयाचा असणार. महाराजांच्या आशीर्वादाने दारू सुटणे, असे मानणे या अतिअवघड प्रश्नाला अतिसोपे उत्तर शोधण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारात स्वाभाविकच अगतिकतेपायी निर्माण होणाऱ्या एका बुवाबाजीचे वेगळेच रूप पाहावयास मिळते.

आव्हान

            रत्नागिरी येथे सर्पयात्रा आलेली असताना टेंभे गावच्या जयराम पवार या मांत्रिकाने असे आव्हान दिले की, मी मंत्राधारित तांदळाचे रिंगण करून त्यामध्ये नाग खेळवून दाखवितो. या आव्हानास स्थानिक वृत्तपत्राने अमाप प्रसिद्धी दिली. यामुळे हा विषय सर्व रत्नागिरी जिल्ह्यात कुतुहलाचा ठरला. सर्वसामान्यपणे अनुभव असा येतो की, आव्हान देणारे आव्हानप्रक्रिया पार पाडण्याची वेळ आली की, माघार घेतात. परंतु यावेळी मात्र जयराम पवार शेवटपर्यंत आपल्या आव्हानाच्या मुद्द्यावर ठाम राहिले. त्यामुळेच २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता याबाबतची जाहीर चाचणी टेंभे गावी घेण्यात आली. त्याला सर्पतज्ज्ञ नीलमकुमार खैरे; तसेच उल्हास ठाकूर मुद्दामहून आले होते. पवार यांनी जे मंत्राधारित रिंगण केले, त्यामध्ये समितीच्या वतीने नाग सोडण्यात आला. आव्हान होते नागराजाला तेथे एक तास खेळवून ठेवण्याचे. प्रत्यक्षात तीन वेळा चाचणी झाली आणि प्रत्येक वेळा दोन मिनिटातच नागाने रिंगण सोडले. यानंतर आणखी एकदा हाच प्रयोग पवार यांच्या समर्थकांच्या खास आग्रहावरून करण्यात आला. याहीवेळी पवार यांच्या वाट्याला ढळढळीत अपयश आले. यानिमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोनातून या आव्हानप्रक्रियेचे महत्त्व लोकांना समजावून देण्यात आले. आव्हानप्रक्रिया थेटपणे, नीटपणे आणि धीटपणे पार पडल्यामुळे संघटनेच्या कार्यात एक मानाचा तुरा खोचला गेला.  

उपक्रम

            विविध उपक्रम ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नेहमीच ताकद राहिली आहे. महाराष्ट्रातील शंभराहून अधिक शाखांत सतत काही ना काही उपक्रम चालू असतात. त्यापैकी काही नाविन्यपूर्ण असल्यामुळे येथे नोंदवत आहे.

            खेड (जि. पुणे) तालुक्यात ५५ किलोमीटरवरील मंदोथी गावात अजूनही रॉकेलचा दिवा दैवी भीतीने वापरला जात नसे. गावात वीज नाही. समितीच्या कार्यकर्त्यांनी या गावात जाऊन मतपरिवर्तन घडवले आणि गावातील एका माणसाच्या हस्ते सर्वांच्यासमोर रॉकेलचा दिवा लावून त्याबरोबरच ज्ञानाचा दिवाही प्रज्वलित केला.

            भानामती घडते म्हणून आलेली सर्वच्या सर्व प्रकरणे समितीने यशस्वीपणे हाताळली आणि त्यामागील हात दाखवून दिला. देवदासी अथवा अन्यजण यांच्या जटा काढण्याचे काम याही वर्षी सुरू राहिले. अमावस्येच्या दिवशी स्मशानसहल काढण्याची कल्पनाही अनेक केंद्रांवरील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांनाही भावली. अशा अनेक सहली अमावस्येच्या दिवशी कब्रस्तानात व स्मशानात यशस्वीपणे नेण्यात आल्या आणि भुताला साफ पिटाळून लावण्यात आले.

            तासगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी मे महिन्यात काढलेल्या सायकल फेरीचे विशेष कौतुक करावयास हवे. २० तरुण कार्यकर्ते रणरणत्या उन्हात गावोगावी फिरले. त्यांनी पोस्टर प्रदर्शन लावले, घरोघरी जाऊन बुवांचे सर्वेक्षण केले. सायंकाळी गावात एक मोठा कार्यक्रम करण्यात आला. या सर्वांबरोबर; पण सर्वात महत्त्वाचे हे की, सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:च्या सायकलला झाडू लावलेला होता आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर दोन तास ते गाव (गावकऱ्यांच्या मदतीची अपेक्षा न धरता) लोटून काढणे, ही बाब लोकांची सर्वाधिक दाद मिळवत गेली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतंत्र कायदा करण्याची समितीची मागणी शासनापुढे गेली आठ वर्षे आहे. समितीचा विचार मांडणाऱ्या काही आमदारांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी विधान परिषदेत उपस्थित केला. शासनाने नेहमीप्रमाणे कायदा करण्याचे भरघोस आश्वासन दिले. त्यालाही आता दोन वर्षे होत आली. या सर्वांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्हा कचेऱ्यांवर ता. १ मे रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला.

            याशिवाय सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पाचा विशेष अभ्यासक्रम सुरू झाला. व्यसनमुक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्पविज्ञान, मनोविकार व भूतबाधा अशा विषयावर अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत आणि शिक्षकांमार्फत ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली सहा वर्षे सुरू असलेला सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प याही वर्षी उत्साहाने सुरू आहे आणि त्यामध्ये २५ हजारांहून अधिक मुले यंदाही परीक्षेला बसली आहेत. एकूण प्रशिक्षित शिक्षकांची संख्या जवळपास १० हजार असून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखाच्या पुढे गेली आहे.

            अणुबाँब ही माणसाच्या अविवेकाची खूण आहे. अणुबाँब वापरून जर युद्ध करण्याची दुर्बुद्धी कधी भारत-पाक दोघांनाही झाली तर त्या युद्धात कोणच जिंकणार नाही; पराभव दोघांचाही होईल आणि तो पिढ्यांपिढ्या भोगावा लागेल. यासाठी विवेकवादाचा प्रसार करणाऱ्या समितीने अणुस्फोटविरोधी ठाम भूमिका घेतली आणि शांततामय सहजीवनाची गरज लोकांच्यासमोर मांडली. वाढती व्यसनाधिनता हीही बाब समितीला अविवेकाची वाटते. विद्यार्थी वर्गाला तरी या धोक्याची जाणीव करून द्यावी, त्यांना व्यसनापासून दूर ठेवावे, यासाठी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या समितीची कल्पना आहे. या सर्व उपक्रमांबरोबर भ्रामक वास्तुशास्त्र यावरील आपला वैचारिक हल्ला जिल्ह्याजिल्ह्यात समितीने कायम ठेवला. समितीच्या कार्यकर्त्यांना व नागरिकांना समितीची धर्मविषयक भूमिका कळावी आणि काही नवे चिंतन घडावे, यासाठी डॉ. आ. ह. साळुंखे यांचे धर्म की धर्मापलिकडे हे पुस्तक यावर्षी प्रसिद्ध करण्यात आले. समितीच्या बहुतेक जुन्या आवृत्त्या बाजारात आल्या.

            समितीतर्फे सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार द्वैवार्षिक पद्धतीने दिला जातो. आयुष्यभर विवेकी विचाराच्या प्रचारासाठी झटणारे म. कृ. सामंत यांना यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत य. दि. फडके यांच्या हस्ते देण्यात आला.

            समितीच्या कार्याचा खरे तर हा संक्षिप्त आढावा आहे. अनेक गोष्टी जागेच्या मर्यादेमुळे सांगणे शक्य नाही. तसेच अनेक बाबी वार्तापत्रातून येऊन गेलेल्या आहेत; परंतु त्या एकत्रितपणे वाचताना कार्याचा वाढता विस्तार चटकन जाणवू शकेल, असे वाटते म्हणून थोडक्यात दिल्या आहेत. हा विस्तार जगभर जागवण्याची एक सोय यावर्षी अलिकडेच झाली. सिंगापूरला असलेल्या रविकिरण अरणके या तरुण मित्राने इंटरनेटवर स्वत: खर्च करून समितीची वेबसाईट तयार केली. आशा आहे की, त्यामुळे आमच्या कामाला जगात डोकावता येईल आणि जगभराचे काम समजल्यामुळे आमची सुधारणा होईल. या सर्वांतून चळवळ प्रभावी होईल, पुढे जाईल, यापेक्षा आाणखी काय हवे आहे?



नरेंद्र महाराजाविरुद्ध जनआंदोलन

            गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकातील नरेंद्र महाराजावरच्या लेखाचा शेवट करताना म्हटले होते, ‘‘दाभोळ येथे एन्रॉनच्या विरोधात आंदोलन झाले. प्रदूषणाची हाकाटी पिटत इथली जनता रस्त्यावर आली. पण नरेंद्र महाराजाच्या बौद्धिक प्रदूषणावर सारी जनता गप्प आहे.’’

            आता तो लेख छापून वर्ष झाले आहे. या वर्षानंतर काय चित्र दिसत आहे? आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांतील जनता या भोंदू नरेंद्र महाराजाविरुद्ध जोरदारपणे रस्त्यावर उतरली आहे. नाणीजच्या या महाराजाला सळो की पळो करून सोडले आहे. आपला मठ सोडून तो मुंबईला पळून गेला असल्याच्या किंवा पलायनाच्या तयारीत असल्याच्या बातम्या पेपरमधून छापून येत आहेत.

            कुडाळसारख्या शहरात त्याच्याविरुद्ध जनतेचा मोर्चा निघाला, कणकवलीत मोठी जाहीर सभा झाली, रत्नागिरीतील नरेंद्र महाराजाच्या विरोधी जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीत मोर्चा, प्रत्यक्ष नाणीजला जाऊन नरेंद्र महाराजाच्या चमत्कारांना आव्हान, आव्हान न स्वीकारल्यास नाणीजला सत्याग्रह, ‘नरेंद्र लीलामृतात चमत्कारांची वर्णने ज्या पानावर आहेत, त्या पानांची होळी असे कार्यक्रम कृती समितीतर्फे आखले गेले आहेत. बरोबर वर्षापूर्वी तासगावच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र महाराजाला तासगावातून पळवून लावला होता. त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांवर नरेंद्र महाराजाच्या भक्तांनी नंग्या तलवारीनिशी हल्ला केला होता. त्यानंतर नरेंद्र महाराजाचा पर्दाफाश करून सत्यस्वरूप दाखविण्याचा लेख अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने छापला. त्या लेखालाही खूप प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी त्या लेखाच्या फोटोकॉपीज लोकांना वाटल्या होत्या. यावेळच्या नरेंद्र महाराजाच्या विरोधाच्या आंदोलनात स्थानिक वृत्तपत्रांनी मोठी कामगिरी बजावली व त्यांनी नरेंद्र महाराजाच्या भानगडी बाहेर काढावयास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक जनता भडकून रस्त्यावर आली व नरेंद्र महाराजाविरूद्धच्या आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप आले. जनतेच्या रेट्यामुळे एका मंत्र्याला आपली नाणीज भेट रद्द करावी लागली, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना महाराजविरोधी भूमिका घ्यावी लागली.

           

हे जनआंदोलन हीच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांचा प्रभाव वाढतो आहे, याची खूण आहे.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(विशेषांक १९९८)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...