रविवार, १० सप्टेंबर, २०१७

अंनिसचे जिल्हा मेळावे



अंनिसचे जिल्हा मेळावे
दाभोलकर, कार्यक्रम, मेळावे, संघटन




यावर्षी प्रथमच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत जिल्हा प्रेरणा संकल्प मेळावे घेत आहे. आतापर्यंत रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा असे चार जिल्हा मेळावे संपन्न झाले आहेत. हा अंक वाचकांच्या हाती पडेपर्यंत आणखी पाच जिल्ह्यांचे मेळावे झाले असतील आणि मेअखेर सर्व जिल्ह्यांतील मेळावे झाले असतील. या कल्पनेचे यश बघता ती आधीच का सुचली नाही, असे मला वाटले.

राज्यातील सर्व शाखांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटणे, ही खरे तर राज्याच्या कार्यकारिणीची महत्त्वाची गरज. पण त्यात प्रत्यक्षात अनेक अडथळे, मर्यादा येतात. शाखांचा भौगोलिक व संघटनात्मक विस्तार ही त्यातील प्रमुख अडचण आहे. त्यावरचा उपाय म्हणजे जिल्हा प्रेरणा संकल्प मेळावे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते एकमेकांना पूर्ण दिवस भेटतातच; परंतु त्याबरोबर ते सर्वजण मध्यवर्तीला पण भेटून त्यांचे आदानप्रदान शक्य होते. रोजच्या रगाड्यात संघटनेला मरगळ आलेली असतेच, ती झटकण्याची संधी देखील प्राप्त होते.

चार जिल्ह्यांतला अनुभव असा सांगतो की, ही संधी सर्व जिल्ह्यांनी आव्हान म्हणून स्वीकारली. प्रारंभ झाला रायगड जिल्ह्यापासून. त्यांनी मनापासून कसून तयारी केली होती. सकाळची दहाची वेळ होती. पण संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी शंभराची संख्या ओलांडली होती. हा मेळावा महत्त्वाचा आहे, आपण जायलाच हवे, असे कार्यकर्त्यांच्या मनावर ठसवण्यात सर्वच ठिकाणी जिल्हा संघटना बऱ्यापैकी यशस्वी झाल्या होत्या व कार्यकर्त्यांनी ते गांभीर्याने घेतले होते. याची प्रचिती प्रत्येक जिल्ह्यात आली. संख्या जिल्हानिहाय कमी-जास्त होती; पण प्रतिसाद अपेक्षित होता. आपल्याला समितीचे काम करावयाचे आहे आणि त्यासाठी अगत्यपूर्वक भेटावयास हवे. ही संधी त्यासाठी साधावयास हवी, ही भावना त्या दृष्टीने बोलकी होती.

काही बाबी अशा मेळाव्यांतून थेटपणे आणि चटकन साध्य होतात. त्या तशा झाल्याही... शाखांना संघटनेबद्दलचा आत्मविश्वास वाढतो. रेकॉर्ड पूर्ण करण्याची सुसंधी मध्यवर्तीला मिळते. वर्षाचे नियोजन होत असल्याने संघटना काय करणार आहे आणि काय करू शकणार नाही, याचे चित्र स्पष्टपणे समोर येते. शाखा आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा स्पष्टपणे समजतात. संघटनेला येत चाललेले महत्त्वही समजते. उदा. रायगडच्या मेळाव्याला जिल्ह्याचे प्रमुख दैनिक कृषिवल याचे संपादक संजय आवटे आले होते. त्यांनी प्रेरणादायी भाषण तर केलेच; पण त्याच्या दुसऱ्या दिवशी संघटनेबाबत अग्रलेख लिहिला आणि तिसऱ्या दिवशी विशेष लेख लिहिला. सातारला दैनिकांनी आपणहून फोटोग्राफर पाठवले. बातमी मागवून घेतली. कोल्हापूर, रत्नागिरीला पत्रकार परिषदा चांगल्या प्रकारे झाल्या. थोडक्यात, समितीच्या जिल्हावार कामाचा आणखी एक ठसा असे श्रेय मेळाव्याच्या उपक्रमाला सहजपणे लाभले; पण यापेक्षा तीन गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरणार, असे मला वाटते.

१)    समितीची शाखा संघटनात्मक क्रियाशील असावी, असाच आपला आग्रह असतो. वास्तवात अनेक ठिकाणी शाखा उपक्रमशीलतेच्या पातळीवर सक्रिय असतात. ही त्यांची मर्यादा आहे, हे नीटपणे समजून घेण्यातच शहाणपणा आहे. त्यामुळे संघटनेचे राज्य पातळीवरचे एकूण नियोजन अधिक नेमकेपणाने करणे शक्य होते वा होईल. समितीची शाखा संघटनात्मक क्रियाशील करण्याऐवजी ती त्यांच्या मर्यादेसह अधिक परिणामकारक व सक्षम करण्यावर भर देणे योग्य ठरेल का, असा हा वेगळा विचार आहे. प्रत्येक तालु्क्यात शाखा निर्माण करण्याचे उद्दिष्ट असताना तर हा विचार अधिक नीटपणे करावयास हवा.

२)    संघटनात्मक क्रियाशील शाखेतही अनेक कार्यकर्ते किमान निम्म्या बैठकांना येणे हा निकष इच्छा असूनही पार पाडू शकत नाहीत. त्यांना समितीशी संबंधित राहावयाचे असते; पण समिती त्याला अधिकृत चौकट देऊ शकत नाही. व्यक्तिगत क्रियाशील कार्यकर्ता संकल्पपत्र या मेळाव्यात भरून घेतल्याने ही कोंडी फुटण्यास मदत होऊ शकते. अनेक ठिकाणी तर संघटनात्मक वा उपक्रमशील शाखाच नसते; पण कार्यकर्ता असतो आणि त्याची काम करण्याची तीव्र इच्छा असते. त्यांनाही संकल्पपत्र भरून देणे हे बंध निर्माण करण्याचे अधिकृत माध्यम वाटते. याच पद्धतीने आज रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर येथे संपर्क प्रस्थापित झाले आहेत. ते टिकवणे, वाढवणे, फुलवणे, त्यांनी संघटनेला व संघटनेने त्यांना ताकद देणे, हे घडावयास हवे.

३)    प्रत्येक शाखेवर वर्षातून किमान दोनदा भेट द्यावयास हवी आणि ती हवी कौटुंबिक जिव्हाळ्याने जवळच्या नातेवाईकांना भेटल्यासारखी. यासाठी सध्याची रचना फारच अपुरी पडते. यासाठी मेळाव्यात आवाहन केले जाते की, वर्षभरातून किमान दोन व जास्तीत जास्त ६ दिवस द्या. किमान एका व जास्तीत जास्त तीन शाखांनी वर्षातून दोनदा घरगुती भेट द्या. यासाठी आवश्यक तर प्रवासखर्च समितीकडून देण्यात येईल. अनुभव फारच आनंदाचा आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, तर विभाग आणि राज्यातील शाखांना स्वखर्चाने भेट देण्यासाठी सहा-सहा दिवस देणारे पुढे येत आहेत.

काही तर सहकुटुंब तयारी दाखवीत आहेत. असे शंभरजण ही संघटनेची वेगळ्याच आकृतिबंधातील ताकद ठरेल, ज्याचा जणू नवा शोधच या मेळाव्याने पुढे आला आहे.

प्रारंभीच्या काही मेळाव्यांचा हा अनुभव नक्कीच आश्वासक आहे. तो विस्तारतच जाईल, असा विश्वास वाटतो.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे २०१२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...