शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

आमचं घुमणं चालूच राहणार

आमचं घुमणं चालूच राहणार
दाभोलकर, निवेदन, कायदा, मुख्यमंत्री



मा. ना. पृथ्वीराज चव्हाण,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सादर नमस्कार,
     
महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा एका वर्षात करण्याचे लेखी आश्वासन काँग्रेसने १९९९ मध्ये दिले. या अर्थसंकल्पी अधिवेशनात ते प्रत्यक्षात आणण्याचा शब्द आपण दिला. तो पाळला जाईल, अशी खात्री वाटत असताना पुन्हा एकदा अपेक्षाभंगच झाला. त्याबाबतची महाराष्ट्रातील पुरोगामी मानसिकतेची तीव्र वेदना आपणास कळवण्यासाठी हे खुले पत्र.

आदरणीय मुख्यमंत्री महोदय, जादूटोणाविरोधी कायदा करणारे भारतातले पहिले राज्य अशी १५ ऑगस्ट २००३ च्या स्वातंत्र्यदिनी सर्व प्रमुख वृत्तपत्रांत भली-मोठी जाहिरात देऊन आपल्या शासनाने स्वत:ची जाहीरपणे पाठ थोपटून घेतली होती. १३ एप्रिल २००५ ला विधानसभेत मांडलेले कायद्याचे विधेयक पुढे सौम्य करून १६ डिसेंबर २००५ ला विधानसभेत मंजूरही झाले. पुढे विधानपरिषदेत विधेयक मंजूर करण्याची औपचारिकता तब्बल चार वर्षे रखडवण्यात आली. संयुक्त चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्यात आले. त्या विधानसभेची मुदत २००९ साली संपली; पण संयुक्त चिकित्सा समितीला मात्र आपले कामकाज संपवायला वेळ मिळाला नाही आणि स्वाभाविकच विधेयकाचीही इतिश्री झाली. आम्हाला विलासरावजी देशमुख वा अशोकराव चव्हाण यांच्याकडून फारसे वेगळे काही घडण्याची अपेक्षा नव्हतीच. पण पृथ्वीराजजी, आपण मुख्यमंत्री झाल्यामुळे मात्र आमच्या आशा नक्कीच पल्लवीत झाल्या. सत्यसाईबाबांच्या निधनानंतर पंतप्रधानांपासून सारे दर्शनाला रांगा लावत असताना आपण शोकसंदेशही पाठवला नाहीत, ही बाबच आपल्या वैचारिक जडणघडणीचा वेगळेपणा स्पष्ट करणारी होती. त्यात आश्चर्य नव्हतेच. कारण आपल्या आईवडिलांचे आपल्यावरचे संस्कार थेट तसेच होते. शिवाय आपण तंत्रज्ञानातील परदेशातील उच्चविद्याविभूषित आहात, हा अधिकचा मुद्दा. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे कायद्याच्या बाजूने उभा राहील. स्वाभाविकच एप्रिल २०११ मध्ये मंत्रिमंडळात कायदा मंजूर झाला, त्यावेळी आम्हाला कायदा होण्याची खात्रीच वाटली.
     
मुख्यमंत्रीजी, वारकरी संप्रदायाची दिशाभूल करून या कायद्याच्या विरोधात त्यांना उठविण्याचा प्रयत्न झाला. ना. आर. आर. पाटील व ना. शिवाजीराव मोघे वारकरी बांधवांशी बोलले. ना. अजितदादा व ना. लक्ष्मणराव ढोबळे यांनी विविध खात्यांच्या प्रधान सचिवांसह वारकरी नेत्यांसमवेत सविस्तर बैठक घेतली. आपणास जे वारकऱ्यांचे प्रतिनिधी भेटले, त्यांच्या मनातील भीती व गैरसमज आपण दूर केलेत. काळी जादू, चेटूक, भानामती, डाकीण, मंत्राने विष उतरवणे, मानसिक आजारांवर अघोरी उपचार, अशा प्रत्यक्षपणे शोषण करणाऱ्या बाबींच्या विरोधातच हा कायदा आहे. त्याअभावी संबंधितांना शिक्षा करण्यात अडचण येते, असा पोलिसांचाही अनुभव आहे. अंधश्रद्धेमुळे सर्वात जास्त नुकसान गरीब माणसाचे होते. ते फसवले जातात. दैववादी, क्रियाशून्य बनतात. शोषण स्वाभाविक मानून त्याचा स्वीकार करतात,’ हे आपण आक्षेप घेणाऱ्यांना पटवले. हेही ठामपणे सांगितलेत की, ‘घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला उपासनेचे व धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिले आहे. त्या विरोधात कायदा करताच येणार नाही आणि संकल्पित जादूटोणाविरोधी कायद्यात तर तसे काहीही नाही. यानंतरही काही संघटनांचा विविध नावे वापरून कायद्याला विरोध करण्याचा उद्योग सुरूच राहिला. पण मुख्यमंत्री महोदय, आपल्या सरकारनेच या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे, त्याच संघटनातील कार्यकर्त्यांचे चेहरे यामागे आहेत, हे आपणाला ज्ञात होतेच.
     
नामदार पृथ्वीराजजी चव्हाणसाहेब, पावसाळी अधिवेशनात कायदा होणे अपेक्षित होते. अधिवेशनात शेवटच्या चार दिवसांत गोंधळ झाला आणि बिल कसेबसे मांडले गेले. नागपूर अधिवेशनात बिल चर्चेला होते. ती चर्चा घडविण्याचे आश्वासन मिळाले; पण ते फोलच ठरले. अर्थसंकल्पी अधिवेशनात विधेयक मांडून मंजूर करण्याचा शब्द आपण मला व्यक्तिश: तीनदा दिलात. उपमुख्यमंत्री ना. अजितदादांनी संपूर्ण सहमती दर्शविली. संसदीय कामकाजमंत्री ना. हर्षवर्धन पाटील यांनी ‘काळजीच करू नका,’ अशा स्पष्ट शब्दांत आश्वासित केले. संबंधित खात्याचे मंत्री ना. शिवाजीराव मोघे यांना तयार राहण्यास सांगण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, महाराष्ट्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अध्यक्ष या सर्वांनी अनुकुलता दर्शविली. दोन्ही पक्षांच्या अनेक प्रमुख मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटीत स्पष्ट पाठिंबा दर्शविला. सर्व निवडणुका संपल्या होत्या. आता किमान दोन वर्षे निवडणूकही नाही. इतक्या आश्वासक वातावरणात बिल दोन्ही सभागृहात मंजूर होणे सोडाच; एका सभागृहात साधे चर्चेलाही येऊ नये? असे जर घडत असेल तर जादूटोणाविरोधी विधेयकावरच करणी केल्याची हास्यास्पद बाबही मानावी लागावी, अशी विचित्र परिस्थिती निर्माण होत नाही काय?
     
मुख्यमंत्रीजी, तुमचे राजकीय विरोधक या कायद्याला विधिमंडळात विरोध करणारच आहेत. धर्मांच्या आधारे राजकारण करणाऱ्या क्षुद्र मन:प्रवृत्तीबाबत मी आपणास काय सांगावे? शिवसैनिकांना आपण हे जरूर सुनवावे, जे प्रबोधनकार ठाकरे यांनी १ डिसेंबर १९२१ च्या प्रबोधन पाक्षिकाच्या अंकात आम्ही नेमके कोण?’ या सवालाला जबाब देताना सांगितले होते. ते उत्तर असे : जुन्या-पुराण्या चिंध्या माथा, मनुस्मृतीच्या मुखात गाथा, कर्मठतेच्या चिपळ्या हाती, अंधश्रद्धा अंगी विभूती, या समयाला धक्का त्यांना देऊनी पुढती सरणारे हा वारसा शिवसेना आमदारांनी का विसरावा? सावरकर काय म्हणाले, ‘आमच्या हिंदू राष्ट्राने आजच्या विज्ञान युगात टाकाऊ असणाऱ्या खुळचट रूढी, व्रते, मते सोडावीत, हे त्यांना वारंवार सांगणे, हे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच मुसलमान समाजासही आमचे सांगणे हेच आहे की, उपद्रवी आचार शक्य तितक्या लवकर सोडणे हे तुमच्याच हिताचे आहे. संकल्पित कायदा हा याच विचाराने पूर्णत: धर्मनिरपेक्ष बनवलेला आहे. दखलपात्र गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचा धर्म व जात याचा त्यात सुतराम संबंध नाही.
     
माणूस कितीही प्रगत झाला तरी त्याच्या जीवनात जोपर्यंत दारिद्य्र, अज्ञान, अभाव, दु:ख आहे, तोपर्यंत त्याला कोणत्यातरी अर्थाने धर्माची गरज लागण्याची सदैव शक्यता आहे. मात्र जादूटोणा, भानामती, करणी, मूठ मारणे, गंडे, ताईत, बळी हे कुठल्याही खऱ्या धर्माचे घटक कधीही नव्हते. पटकी वा प्लेगसारख्या साथी एकेकाळी देवीचा कोप मानावयाचे. मरीआईचा गाडा ओढून बळी द्यावयाचे. आता या रोगावर लस निघाली. रोग हद्दपार झाले. धर्म बुडाला नाही; उलट माणसे जगू लागली, धर्म पाळणाऱ्यांची संख्या वाढली. भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे, धर्मचिकित्सा करणे व मानवतावादी वृत्ती बाळगणे या बाबी नागरिकांची कर्तव्ये म्हणून सांगितली आहेत. शिक्षणाचा गाभा घटक, मूल्यशिक्षण यात त्याचा आवर्जून उल्लेख आहे. समाजसुधारकांचा वारसाही बुद्धिप्रामाण्यवादाचा आहे. या सर्व भूमिकेशी जादूटोणाविरोधी कायदा पूर्ण सुसंगत आहे, हे फार महत्त्वाचे आहे.
     
माननीय पृथ्वीराजजी, बोलून-चालून आम्ही तर झपाटलेलेच. आपल्या शासनाची राजकीय, सामाजिक इच्छाशक्ती जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करण्यासाठी कचरते आहे, तोपर्यंत आमचे हे ‘घुमणे’ चालूच राहणार. त्यावर इलाज होणार जादूटोणाविरोधी कायदा झाल्यावरच. पण या घुमण्याला वेदनेची किनार आहे आणि त्यामागे पुरोगामी महाराष्ट्राच्या एल्गाराची गाज आहे, याची कृपया नोंद घ्यावी. समाजसुधारकांच्या आकाराची पूजा करायची, विचाराला विसरायचे आणि आचाराला फाटाच द्यायचा, हे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला लागलेले ग्रहण येत्या पावसाळी अधिवेशनात तरी सुटेल, अशी उमेद बाळगून आहे. लिहिताना काही अधिक-उणे झाले असल्यास माफ करावे. (जादूटोणाविरोधी विधेयकाचे) अगत्य (पावसाळी अधिवेशनात) द्यावे, ही प्रार्थना.

आपला
डॉ. नरेंद्र दाभोलकर
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे २०१२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...